Sunday 27 November 2016

श्रीगणेश लेखमाला

मी आज शिक्षणाच्या क्षेत्रात आहे, त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे 'माझ्या आईकडे सुट्टे पैसे नव्हते.'
मला कोणीही जेव्हा कधी तू या क्षेत्रात कसा आणि कुठून आलास असं विचारतो, तेव्हा माझं हे ठरलेलं उत्तर आहे, आणि ते १०० टक्के खरं आहे. १ मे १९९६ या दिवशी जर माझ्या आईकडे सुट्टे पैसे असते, तर माझं संपूर्ण आयुष्य फार वेगळ्या मार्गाने गेलं असतं. माझी आई मुंबई महानगरपालिकेच्या स.गो.बर्वेनगर, घाटकोपर पश्चिम इथल्या शाळेत शिक्षिका होती आणि १ मे हा नेहमीप्रमाणे त्या शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी महाराष्ट्र दिन असल्यामुळे शाळेत झेंडावंदन करणं, सह्या करणं आणि दीड महिन्याची सुट्टी चालू झाली, आता परत १५ जूनला किंवा त्या वर्षी जो काही शाळा परत चालू होण्याचा दिवस असेल, त्या दिवशी भेटू, असा नेहमीचा डायलॉग मारणं हा तिचा आणि तिच्या सहकार्‍यांचा ठरलेला कार्यक्रम होता.

मी त्या वेळी माझ्या बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला होतो आणि मुंबई विद्यापीठाने परीक्षांच्या घातलेल्या घोळामुळे आमची परीक्षा मेच्या शेवटी सुरू होऊन १२ जूनला संपणार होती. मी त्याच्याच अभ्यासात होतो. पूर्वीच्या काळचे हिंदी पिक्चरचे हिरो कसे, फक्त बी.ए. झाले, तरी त्यांना मस्त मॅनेजरची नोकरी, चकाचक केबिन आणि यथावकाश हिरवीण या गोष्टी मिळायच्या. मी बी.ए.ला येईपर्यंत हा रम्य काळ इतिहासजमा झाला होता, आणि नुसत्या बी.ए.ला बाजारात काहीही किंमत उरलेली नव्हती. त्यामुळे त्याच्यानंतर काहीतरी करणं गरजेचं होतं. एम.ए. किंवा एल.एल.बी. असे नेहमीचे यशस्वी पर्याय होते, पण ‘सगळेच जण ते करतात‘ म्हणून मी त्या वाटेला जायचं नाही, असं ठरवलेलं होतं. एम.बी.ए.साठी तेव्हा कॅट आणि सीडब्ल्यूटी अशा दोनच परीक्षा होत्या (मला माहीत असलेल्या). दोन्हीमध्ये माझा परफॉर्मन्स काही खास नव्हता. त्यामुळे काय करायचं हा प्रश्न होता.

तर अशा पार्श्वभूमीवर माझी आई १ मे १९९६ या दिवशी झेंडावंदन वगैरे करून घाटकोपर स्टेशनवर आली, आणि तिच्या लक्षात आलं की रिक्षावाल्याला द्यायला तिच्याकडे सुट्टे पैसे नाहीयेत. तिच्याबरोबर ज्या तिच्या मैत्रिणी आल्या होत्या, त्यांच्याकडेही सुट्टे पैसे नव्हते. रिक्षावाल्यांकडे सुट्टे पैसे असणं हे त्यांच्या युनियनच्या आदेशाप्रमाणे महाभयंकर पाप असल्यामुळे त्याच्याकडेही नव्हते. मग आता करायचं काय? म्हणून मग तिने स्टेशनच्या बाहेरच असलेल्या पेपर स्टॉलवरून एक ‘एम्प्लॉयमेंट न्यूज‘ नावाचा पेपर विकत घेतला आणि रिक्षावाल्याला सुट्टे पैसे दिले.

आम्ही त्या वेळी डोंबिवलीला राहत होतो. घाटकोपर ते डोंबिवली या प्रवासात तिने सहज तो पेपर चाळला आणि तिला त्यात काहीतरी इंटरेस्टिंग सापडलं. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन अभ्यास विभाग किंवा शुद्ध मराठीत डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडीजच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची जाहिरात होती. मला कॉलेजमध्ये असताना चित्रपट, नाटक आणि एकंदरीतच माध्यमं किंवा मीडिया या क्षेत्राबद्दल कुतूहल होतं. तिने जेव्हा घरी आल्यावर मला ती जाहिरात दाखवली, तेव्हा हे काहीतरी वेगळं आहे, हे माझ्या लक्षात आलं आणि मी हा एक प्रयत्न करून पाहायला हरकत नाही असं ठरवलं. अभ्यासक्रमासाठी सुरुवातीला प्रवेश परीक्षा असणार होती आणि नंतर गटचर्चा आणि मुलाखत किंवा शुद्ध मराठीत ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू. मी या सगळ्या पायर्‍या पार केल्या आणि त्याच वर्षीच्या जुलै महिन्यात आमचा अभ्यासक्रम सुरु झाला, आणि पहिल्याच फटक्याला माशी शिंकली. आम्हाला प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात ज्या प्रकारे आमचा हा अभ्यासक्रम शिकवला जात होता, यात प्रचंड तफावत होती. थोडीफार ती असते, हे मान्य आहे, पण एवढी तफावत? काही प्राध्यापक अप्रतिम शिकवायचे, उदाहरणार्थ समर नखाते, शान्तिश्री पंडित, देवेन धनक, एस.जी. गोडबोले. पण काही प्राध्यापक धन्यवाद होते, आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार करूनही जेव्हा काही निष्पन्न होत नाही हे आमच्या लक्षात आलं तेव्हा मग आमची बॅच आणि आमचे सीनियर्स यांनी संप केला. तेव्हा सुदैवाने डॉ.वसंतराव गोवारीकर विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी चर्चा केली, तीसुद्धा आमच्या डिपार्टमेंटला येऊन. खरोखर मोठा माणूस. आमचे तेव्हाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट बदलले गेले आणि मुंबईचे प्रसिद्ध टीव्ही निर्माते आणि दिग्दर्शक विनय धुमाळे आमचे हेड झाले.

‘उपन्यास’ ही त्यांची मालिका प्रचंड गाजली होती. त्यामुळे आम्हाला आता जरा काहीतरी व्यावसायिक क्षेत्रातलं शिकायला मिळेल अशी अपेक्षा होती. धुमाळे आल्यावर त्यांनी काही सकारात्मक बदल केले. आमचे बरेचसे अभ्यासक्रम वर्गात शिकवले जायचे. प्रात्यक्षिकांवर भर नसायचा. त्यांनी ते बदललं. सगळ्या विद्यार्थ्यांना भाग घेता येईल असे उपक्रम आणि प्रकल्प त्यांनी राबवायला सुरुवात केली. आमच्या दुसर्‍या वर्षाच्या पहिल्या सत्रात त्यांनी संपूर्ण वर्गाला एक टेलिफिल्म करायला लावली. या वर्षात आम्हाला आमचं स्पेशलायझेशन निवडावं लागत असे. टेलिव्हिजन प्रॉडक्शन आणि मीडिया रिसर्च अशी दोन स्पेशलायझेशन्स होती. मी अर्थातच टेलिव्हिजन प्रॉडक्शन घेतलं होतं. ही टेलिफिल्म हा एक अप्रतिम अनुभव होता. सुप्रसिद्ध छायाचित्रकार ए.एस.कनल (त्यांनी सई परांजप्यांच्या मालिका आणि काही चित्रपट केले होते) आणि फिल्म इन्स्टिट्यूटमधले संकलन विषयाचे प्राध्यापक योगेश माथुर या दोघांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना पाच गटांमध्ये विभागलं आणि आमच्यात एक स्पर्धा घेतली – स्क्रिप्ट लिहायची. फक्त दोन व्यक्तिरेखा. कोणीही असू शकतात. त्यांच्यात आता संपूर्ण बेबनाव आहे. पूर्वी असं नव्हतं. काहीतरी घडलं आणि हा बेबनाव झाला. आता ते या बंद खोलीत तीन दिवस आणि दोन रात्री एकत्र आहेत. आणि जेव्हा हा काळ संपतो, तेव्हा ते परत मित्र होतात – अशी एक ढोबळ कल्पना आम्हाला दिली होती आणि आमचे मीडिया रिसर्च करणारे सहकारी आणि पहिल्या वर्षाचे विद्यार्थी यांच्यासमोर आम्हाला आमचं स्क्रिप्ट प्रस्तुत करायचं होतं. त्यांनी दिलेल्या मतांनुसार कोणतं स्क्रिप्ट चित्रित होणार ते ठरणार होतं आणि प्रत्येक गटाला त्याचा एक सीन चित्रित करायचा होता आणि नंतर संकलन करून संपूर्ण टेलिफिल्म बनवायची होती. चित्रीकरणासाठी आम्ही विद्यापीठाच्या स्टाफ क्वार्टर्समधला एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. प्रत्येक गटात एक दिग्दर्शक, एक छायाचित्रकार, एक निर्मिती नियंत्रक आणि एक संकलक असणार होते. अभिनेत्यांपैकी एक आमचीच वर्गमैत्रीण होती आणि एक व्यावसायिक अभिनेता. त्यांनाही प्रत्येक गटाने कसं चित्रीकरण केलं आणि कशा प्रकारे अभिनेत्यांकडून अभिनय करवून घेतला यावर मत द्यायला सांगितलं होतं. हा संपूर्ण अनुभव जबरदस्त होता. आजही जेव्हा आम्ही कोणी भेटतो, तेव्हा याच्या आठवणी निघतातच.

विनय धुमाळे जेव्हा आमचे हेड म्हणून आले, तेव्हा ते ‘लोकमान्य’ नावाच्या एका हिंदी मालिकेवर काम करत होते. नावावरून हे स्पष्ट होतच होतं की ही मालिका टिळकांवर होती. मी अनुभव घेण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे काम करायचं ठरवलं. त्यांनीही काही हरकत घेतली नाही, आणि मी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. वेषभूषा आणि वस्तू (कॉस्च्युम आणि प्रॉपर्टी) ही माझी जबाबदारी होती. त्यामुळे पुण्यातला जुना बाजार, राजा केळकर वस्तुसंग्रहालय आणि मुंबईमधला मगनलाल ड्रेसवाला इथे नेहमी माझ्या फेर्‍या होत असत. चित्रीकरण प्रामुख्याने पुण्यातच होणार होतं आणि बरेचसे कलाकार पुण्यातल्याच पी.डी.ए. आणि इतर नाट्यसंस्थांमधले होते. टिळकांचं काम करणारा अमित शंकर हा अभिनेता बिहारी होता. त्याचा आवाज जबरदस्त होता. खर्जातला आणि टिळकांच्या भाषणांविषयी जी सिंहगर्जना अशी वर्णनं ऐकलेली आहेत, ती खरी ठरवणारा आवाज होता. रास्तेवाडा, फर्ग्युसन महाविद्यालय, राज भवन, सिंहगड अशा अनेक ठिकाणी चित्रीकरण झालं. ही मालिका दूरदर्शनसाठी असल्यामुळे सरकारकडून अनेक गोष्टींची परवानगी मिळाली होती. त्यामुळे आम्ही वाठार रेल्वे स्टेशन आणि येरवडा तुरुंग इथे बाह्य चित्रीकरण सहजपणे करू शकलो.

येरवडा तुरुंगात चित्रीकरण करणं हा एक विलक्षण अनुभव होता. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा अशी वेळ आम्हाला देण्यात आली होती आणि त्या कालावधीत जे काही सीन चित्रित करायचे होते, ते संपवायचे होते. आमच्या दामोदर आणि बाळकृष्ण चापेकरांची फाशी आम्ही खर्‍याखुर्‍या फाशीगेटमध्येच चित्रित केलेली आहे, जिथे कदाचित खर्‍या चापेकर बंधूंना फाशी देण्यात आली होती. फाशी देताना काय प्रोसीजर असतं, ते त्याच वेळी तिथल्या अधिकार्‍यांनी अगदी तपशीलवार समजावून सांगितलं आणि तिथले ‘जल्लाद’ अर्जुन मोरे याचीही ओळख करून दिली. सदैव दारूच्या धुनकीत असणार्‍या या सिंगल फसली माणसाने लोकांना फासावर चढवलं असेल हे मान्य करणं थोडं कठीण गेलं. त्यांनी सांगितलेल्या काही फासावर लटकवलेल्या माणसांच्या गोष्टी तर जबरदस्त होत्या. जोशी-अभ्यंकर हत्याकांडातल्या जक्कल, सुतार, जगताप आणि शाह यांना त्यांनीच फाशी दिली होती. त्याचप्रमाणे जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणार्‍या जिंदा आणि सुखा या दोन खलिस्तानी अतिरेक्यांनाही त्यांनीच फाशी दिली होती.

अनुभव जरी सगळे असे जबरदस्त मिळत गेले, तरी आर्थिक पातळीवर बोंबाबोंबच होती. पैसे देण्याच्या बाबतीत धुमाळे अत्यंत कुप्रसिद्ध असल्याचं मी बर्‍याच कलाकारांकडून ऐकलं होतं. पण ते माझ्याबाबतीतही खरं होईल असं वाटलं नव्हतं. कधी तगादा लावला की तेवढ्यापुरते पैसे मिळायचे, पण त्याला काही अर्थ नव्हता. आम्ही ऑफिसमध्ये बसलेले असलो की कुणातरी माणसाचा मागे कधीतरी घेतलेले पैसे परत करा असा फोन किंवा मग तो माणूस स्वतः तिथे येणं ही नेहमीची गोष्ट होती. पैसे मिळत नसल्यामुळे मग मी तिथून निघायचा निर्णय घेतला.

नंतर मग अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. झी न्यूज, ईटीव्ही मराठी (सध्या कलर्स मराठी), बालाजी टेलिफिल्म्स, विनार मीडिया, तारा मराठी (जे मोजून एक वर्ष चाललं) अशा अनेक निर्मितीसंस्थांमध्ये आणि वाहिन्यांमध्ये काम केलं. तिथलेही अनुभव संस्मरणीय वगैरे म्हणता येतील असे आहेत, पण ते परत कधीतरी. दरम्यान मी वकिलीचा थोडाफार अभ्यासही केला आणि एका मित्राबरोबर एक पब्लिक रिलेशन्स फर्मही भागीदारीत सुरू केली. हा सगळा काळ (१९९८ ते २००२) मोठा उलथापालथ घडवणारा होता - माझ्या आयुष्यात आणि बाहेरही. डॉट कॉम क्रॅशमुळे टीव्ही वाहिन्यांकडे येणारा भांडवलाचा ओघ आटल्यासारखा झाला होता. निदान सांगण्यात तरी तसं येत होतं. नवीन कार्यक्रम बनत नव्हते. वाहिन्या बंद पडत होत्या. झी आणि ईटीव्ही तोट्यात चालू होत्या आणि तेही त्यांच्यामागे भक्कम आधार असल्यामुळे. एकता कपूरच्या कार्यक्रमांची चलती होती, पण मला त्यात काही करण्याची इच्छा नव्हती. विनय धुमाळ्यांच्या पत्नी आणि स्वतः सुप्रसिध्द निर्मात्या असलेल्या विजया जोगळेकर-धुमाळे यांच्या आग्रहामुळे मी तारा मराठीमध्ये आलो होतो, आणि सुरुवातीला परिस्थिती चांगली होती, पण बाजारात मंदी असल्यामुळे जाहिरातींचा पैसा वाहिनीकडे येत नव्हता, आणि त्यामुळे एक दिवस ज्याची भीती होती, तेच झालं. माझी नोकरी गेली. त्यामुळे ठरलेलं लग्नही मोडलं. मला त्यातून आलेल्या नैराश्यातून बाहेर येण्याचा एकच मार्ग दिसत होता - इतकं काम करायचं की रात्री घरी आल्यावर कुठलेही विचार मनात न येता सरळ झोप आली पाहिजे. म्हणून मग मी ईटीव्हीवर येऊ घातलेल्या ‘चार दिवस सासूचे’ नामक मालिकेसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. इथे अनुभव चांगले आणि वाईट असे दोन्हीही प्रकारचे आले. जेव्हा एक वर्ष झाल्यावर आणि मालिका जबरदस्त चालत असूनसुद्धा निर्मात्यांनी पैसे वाढवायला नकार दिला, तेव्हा मग मी तिथूनही बाहेर पडलो.
मी त्या वेळी २६-२७ वर्षांचा होतो, आणि आता निर्णय घेण्याची वेळ आली होती. याच क्षेत्रात मिळतंय ते किडूकमिडूक काम करत राहायचं आणि कधीतरी आपलं नशीब फळफळेल याची वाट पाहायची, किंवा मग या क्षेत्रातून बाहेर पडून दुसरीकडे कुठेतरी नशीब आजमावायचं. मी दुसरा पर्याय निवडला, कारण किती थांबायला लागेल याची शाश्वती नव्हती आणि एकंदरीत इथल्या लोकांच्या मला आलेल्या अनुभवामुळे माझा बर्‍यापैकी भ्रमनिरास झालेला होता.

त्याच वेळी संजय पारेख नावाचा माझा एक जुना मित्र मला भेटला. तो टाटा एआयजीसाठी काम करत होता. त्याने मला "एक दिवसभर प्रशिक्षण देऊ शकशील का?" असं विचारलं. त्यांचा नेहमीचा प्रशिक्षक आजारी होता. मी हो म्हणालो आणि ते काम केलं आणि हे आपल्याला आवडतंय आणि जमतंयसुद्धा हे माझ्या लक्षात आलं. मी जेव्हा घरच्यांशी याबद्दल बोललो, तेव्हा त्यांचाही असाच विचार पडला की मग तू शिक्षणक्षेत्रात का जात नाहीस? तुझ्याकडे पदवी आहे, अनुभव आहे. मुंबई विद्यापीठाने त्या वेळी नुकताच बी.एम.एम. (बॅचलर ऑफ मास मीडिया) हा अभ्यासक्रम सुरु केलेला होता आणि तिथे मी शिकवू शकेन असं मला वाटलं. २००३ च्या एप्रिलमध्ये जयहिंद महाविद्यालयाची याच अभ्यासक्रमासाठी अधिव्याख्याता पदासाठी जाहिरात आली होती. मी अर्ज केला, मुलाखतीसाठी बोलावणं आलं आणि माझी निवडही झाली.

१३ जून २००३ या दिवशी मी पहिल्यांदा टेबलाच्या दुसर्‍या बाजूला उभं राहून विद्यार्थ्यांकडे पाहिलं. माझे पाय थरथरत होते, तोंड कोरडं पडलं होतं. टेबलाचा आडोसा घेऊन मी उभा राहिल्यामुळे माझे थरथरणारे पाय विद्यार्थ्यांना दिसणार नाहीत, असं मला वाटत होतं. मी त्यांच्याकडे बघून बोलायला सुरुवात केली. पंधरा-सोळा मिनिटं बोललो. तेवढ्यात कुणीतरी एक प्रश्न विचारला. मी त्याचं उत्तर दिलं. त्या विद्यार्थ्याचं बहुधा समाधान झालं असावं, कारण तो नंतर काही बोलला नाही. पन्नास मिनिटांचं लेक्चर संपल्यावर मी स्टाफरूममध्ये गेलो. माझी कानशिलं गरम झाली होती. मी बाहेर पडल्यावर आमच्या अभ्यासक्रमाच्या समन्वयक प्रा. मोहिनी डायस आत गेल्या होत्या, विद्यार्थ्यांना लेक्चर कसं वाटलं ते विचारायला.
मी शांत राहायचा प्रयत्न करत होतो, आणि मला माझ्या बाजूला कोणीतरी बसल्याचं जाणवलं. पाहिलं तर डायस मॅडमच होत्या. “They have liked you,” त्या म्हणाल्या, “They just wanted you to speak slowly.”

चला. निदान सुरुवात तरी चांगली झाली होती. नंतर मग मी माझं एम.बी.ए. केलं. त्यासाठी कॉलेजने पूर्ण सहकार्य केलं. एम.बी.ए. केल्यामुळे बी.एम.एस.(बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) या अभ्यासक्रमाच्या समन्वयाची जबाबदारीही माझ्यावर टाकण्यात आली.

८ वर्षांनी - म्हणजे २०११मध्ये मी जयहिंद कॉलेजमधून माझ्या सध्याच्या नोकरीत रुजू झालो. ८ वर्षं कॉलेजमध्ये शिकवल्यावर त्यातलं आव्हान कमी झालं होतं. अशी परिस्थिती निर्माण झाली होती की मी डोळे बंद करून एखाद्या वर्गात गेलो असतो, आणि तिथे विचारलं असतं की आज काय करतोय आपण आणि त्यांनी सांगितलं असतं, तर मी लगेच तो विषय शिकवला असता. बनचुकेपणाची एक भावना यायला लागली होती आणि ते मला नको होतं. म्हणून मग मी प्रशिक्षण क्षेत्रात जायचा निर्णय घेतला. माझं एम.बी.ए.तर होतंच, आणि शिवाय मला ८ वर्षांचा शिकवण्याचा अनुभव होता. त्यामुळे तशी अडचण आली नाही. फक्त एक जाणवलं की प्रशिक्षण क्षेत्रात तुम्हाला चांगलं शिकवावंच लागतं. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या शिक्षकाचं शिकवणं आवडलं नाही, तर विद्यार्थी त्याला पूर्णपणे नाकारू शकत नाहीत. त्यांना हजेरीसाठी तरी तिथे बसावं लागतं. पण ज्या क्षेत्रात मी काम करतोय – स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण – तिथे तुम्हाला पाट्या टाकता येत नाहीत. एक तर विद्यार्थी जी फी भरतात, ती भरपूर असते, आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या पैशाचा मोबदला हवा असतो.

प्रशिक्षण क्षेत्रातले अनुभवही चांगले/वाईट असे सगळ्या प्रकारचे आहेत. ज्येष्ठ मिपाकर खेडूत यांनी अभियांत्रिकी शिक्षणाच्या दुरवस्थेबद्दल लिहिलेली मालिका स्वतः अनुभवायला मिळाली आहे. कंपन्या ज्या aptitude tests घेतात, त्यासाठी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण देतो. त्या निमित्ताने मुंबईतल्या सरदार पटेल, डी.जे. संघवी, मुकेश पटेल या प्रथितयश महाविद्यालयांपासून ते वसई-विरारपर्यंत आणि ऐरोली, कोपरखैराणे ते पनवेलपर्यंत मी जाऊन आलेलो आहे. अॅकॅडेमिक हुशारी आणि अशा तर्‍हेच्या प्रशिक्षणात दिसून येणारी हुशारी यांचं प्रमाण काही ठिकाणी सारखं असलं, तरी बर्‍याच ठिकाणी व्यस्त आढळलं आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे इंग्लिश भाषा येण्याची गरज आहे, हे प्रत्येकाला मान्य आहे, पण त्यासाठी मेहनत करायला लागेल हे मान्य करायला कोणीही तयार नाही. त्यामुळे हुशारी असून आपण मागे पडू हे मानायलाच कोणी तयार नाही. नव्या मुंबईत एका काॅलेजमध्ये आम्हाला काम मिळालं नाही, कारण आम्ही कोणत्याही प्रकारची हमी द्यायला नकार दिला. तिथल्या प्रिन्सिपॉलनी या शब्दांत आमची बोळवण केली होती - "आता तुम्ही गॅरंटी देत नाही, तर आम्ही स्टुडंट्सकडून या तुमच्या प्रोग्रॅमसाठी पैसे कसे काढणार?"

आणखी एका काॅलेजमध्ये तर तिथल्या टीपीओने (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अाॅफिसरने) आमची ओळख करुन देताना असे तारे तोडले होते - "तशीही हा प्रोग्रॅम करुन तुम्हाला नोकरी मिळणं शक्यच नाही, कारण तुमची तेवढी लायकीच नाही."
केंद्र आणि राज्य सरकारांनी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनेक योजनांमध्ये प्रशिक्षण सहयोगी (Training Partner) म्हणून आमची कंपनी सहभागी आहे. त्याच संदर्भात महाराष्ट्रात नांदेड, परभणी, धुळे, नाशिक, उदगीर; महाराष्ट्राबाहेर गुजरातमध्ये अहमदाबाद, वडोदरा, कलोल, थालतेज; हरयाणामध्ये पानिपत आणि पंचकुला आणि पंजाबमध्ये रोपड, मोरिंडा, संगरुर, पतियाळा आणि राजपुरा इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. एक अत्यंत आशादायक गोष्ट म्हणजे या सर्व ठिकाणी मुलींची संख्या एकूण विद्यार्थ्यांच्या किमान ४०% आहे, आणि त्यांच्यातली शिकण्याची जिद्द आणि मेहनत करण्याची तयारीही चांगली आहे.

आज जरी मी टेलिव्हिजन क्षेत्रापासून अनेक मैल दूर गेलो असलो, तरी तिथे जो वेगवेगळ्या लोकांशी, भाषांशी आणि विचारांशी संबंध आला, त्याचा आता भरपूर फायदा होतो, हे कळतंय. शिकलेलं कधीही वाया जात नाही हे जेव्हा लहानपणी ऐकलं होतं, तेव्हा त्याचा अर्थ नीट समजला नव्हता. तो आता समजू लागला आहे.

तर, अशी ही माझी आजपर्यंतची कथा. पण अजूनही मनात विचार यायचं काही थांबत नाही – त्या दिवशी आईकडे सुट्टे पैसे असते, तर?......

No comments:

Post a Comment