Wednesday, 16 November 2016

गॅलरी

जेव्हा कॉल आला, तेव्हा बारा वाजून गेलेले होते. मी अर्धवट झोपेत होतो आणि माझ्या जुन्या स्टिरिओ सिस्टिमवर गाणी ऐकत होतो. काही जुनी गाणी, विशेषतः गझल – अंधारातच ऐकायला छान वाटतात. आजूबाजूला शांतता होती आणि तेवढ्यात फोन वाजला. मी भानावर आलो, रिमोटने स्टिरिओ बंद केला आणि फोन उचलला.
“राजेंद्र देशमुख?”
“येस सर!”
“अमित रॉय हिअर!”
बापरे! जॉइंट कमिशनर साहेबांचा फोन! काय झालंय?
“एक केस आहे. स्थानिक पोलीस स्टेशनकडून सरळ क्राइम ब्रँचकडे आलीय. मर्डर केस आहे. बाकीच्या युनिट्सकडे भरपूर लोड आहे. त्यामुळे तुमच्या युनिटकडे केस ट्रान्सफर झाली आहे. मला असं सांगण्यात आलंय की हा आणि याच्या पुढचा पूर्ण आठवडा तुम्ही आणि शेळके कॉलवर आहात!”
“होय सर!”
“गुड! मग क्राइम सीनवर जाऊन चार्ज घ्या.”
“येस सर!”
“बाकीचे डीटेल्स तुम्हाला तुमच्या ऑफिसकडून मिळतीलच आत्ता. पण तुमच्या मनात ही शंका आलीच असेल की मी तुम्हाला फोन का केलाय.”
“हो सर.”
“केस महत्त्वाची आहे हे सांगण्यासाठी. तिथे गेल्यावर तुम्हाला समजेलच. ऑल द बेस्ट! गेट गोइंग! जय हिंद!”
“जय हिंद सर!”
“आणि आणखी एक गोष्ट!”
“येस सर!”
“जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज लागली, तर फोन करा. माझा नंबर आहे तुमच्याकडे!"
“येस सर!”
त्यांनी फोन ठेवून दिला.
लगेचच दुसरा फोन आला. ऑफिसचा.
“सर, तुम्हाला फोन आला असेलच. मलबार हिलवर बॉडी सापडलीय. हँगिंग गार्डनच्या जवळ ती बॅकबे रेक्लमेशन गॅलरी माहीत असेल तुम्हाला. तिथे.”
“ठीक आहे. मी निघतोय.”
“शेळके सरांना मी कळवलंय. तेही निघताहेत.”
“ठीक आहे.” मी फोन बंद केला.
मी माझ्या ड्रॉवरमधून एक छोटी वही आणि पेन घेतलं आणि वहीच्या पहिल्या पानावर या सगळ्या माहितीची नोंद केली. नवीन केस, नवीन वही.
बॉडी सापडलीय हे ठीक आहे, पण नक्की कोणाची? या लोकांनी मला पुरुष किंवा स्त्री हेही सांगितलं नव्हतं. पुरुष असेल, तर लुबाडण्याच्या उद्देशाने किंवा मग कुठल्यातरी भांडणामुळे – प्रॉपर्टी, बायका, जमीन. स्त्री असेल, तर मग वेगळे मुद्दे समोर येतात – ऑनर किलिंग, बलात्कार, प्रेमप्रकरण. काहीही असू शकतं. जेसीपी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ही केस महत्त्वाची तर आहेच. पण का?
याच विचारात मी माझी गाडी स्टार्ट केली. बायकोला झोपेतून उठवायचा प्रश्नच नव्हता, आणि तशीही तिला सवय होतीच. तिच्या फोनवर एक निरोप ठेवून मी निघालो. गाडी बाहेर रस्त्यावर आणून अमोल शेळकेला फोन केला. मी दादरला राहत असल्यामुळे मलबार हिलला लवकर पोहोचलो असतो. पण अमोल पार मालाडला राहत असल्यामुळे त्याला नक्कीच वेळ लागला असता. अगदी रात्रीचे १२ वाजून गेलेले असले, तरीही मुंबईमध्ये रस्ते रिकामे मिळणं म्हणजे जवळपास अशक्यच.
अमोलचा आवाज अजिबात झोपाळलेला नव्हता. ही एक चांगली गोष्ट होती. मी त्याच्या आधी मलबार हिलला पोहोचलो असतो आणि स्थानिक पोलिसांकडून चार्ज घेतला असता. ही एक अत्यंत नाजूक गोष्ट असते. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला असेल, त्यांना क्राईम ब्रँचने ती केस ताब्यात घेणं म्हणजे स्वतःच्या हुशारीचा आणि कौशल्याचा अपमान वाटू शकतो आणि त्यातून काही अप्रिय प्रसंग घडतात. त्यामुळे हे अत्यंत कौशल्याने हाताळावं लागतं.
“तू कसा येतो आहेस अमोल?”
“सर, माझी गाडी घेऊन.”
“ती वरळी ऑफिसमध्ये ठेव आणि तिथून आपली ऑफिसची गाडी घेऊन ये. पण आपली गाडी आहे असं वाटायला नको.” लोकांना पोलिसांची गाडी दिसली की त्यांची माहिती द्यायची पद्धतच बदलते. मुळात लोक बोलायला तयार होतील की नाही, इथपासून सुरुवात होते. त्यामुळे उघडपणे पोलिसांची गाडी वाटणार नाही अशी एखादी गाडी असली, की नेहमीच बरं असतं.
“ओके सर. पण नक्की प्रकार काय आहे?”
“मी तिथेच चाललोय. मला समजल्यावर तुला सांगतो.” मी फोन बंद केला. माझं सर्व्हिस वेपन तर मी घेतलं होतंच, त्याशिवाय माझ्या गाडीच्या लॉकरमध्ये माझी आणखी एक गन होती. .९ मिलीमीटर उझी. २००८च्या २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या देशाच्या आणि राज्यांच्या सरकारांनी देशातील वेगवेगळ्या शहरांच्या पोलीस आणि पोलीस कमांडो दलांना शहरी युद्धतंत्राचं (urban combat techniquesचं) प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. हे प्रशिक्षण देण्यासाठी परदेशातून, विशेषतः इझराईलमधून तज्ज्ञ प्रशिक्षक यायचे. त्यामुळेच क्राइम ब्रँचमध्ये माकारोव्ह पिस्तुलांबरोबर आता उझी आणि ल्युगर यांचाही वापर होत होता. उझीचं मॅगझीन चेक करून मी गाडीचा वेग वाढवला.
रस्त्यात तुरळक रहदारी होती. नेपिअन सी रोडवरून मलबार हिलला लवकर पोहोचता येतं हे मला अनुभवाने माहीत होतं, त्यामुळे मी तोच रस्ता पकडला आणि जिथे बॉडी सापडली होती, तिथे पोहोचलो. पोलीस नक्की कुठे असतील, हे कुणाला विचारायची गरज नव्हतीच. फ्लडलाईट्सचा भरपूर प्रकाश पडलेला दिसत होताच. आणखी थोडं जवळ गेल्यावर पोलिसांच्या गाड्याही दिसल्या. फोरेन्सिक डिपार्टमेंटची गाडीही होतीच. माझी गाडी पोलिसांच्या गाडीच्या मागे पार्क करून मी चालत पुढे आलो. गाड्या जिथे पार्क केल्या होत्या, साधारण त्याच्या ७-८ फूट पुढे पिवळी टेप – लोकांना दूर ठेवण्यासाठी – लावलेली होती. तिथून मलबार हिलची ती प्रसिद्ध गॅलरी, म्हणजे तिचं रेलिंग साधारण २० ते २५ फूट लांब असेल. रेलिंगकडे येणारे रस्ते आणि आसपासचा भाग टेप लावून सर्वसामान्य लोकांसाठी बंद केलेला होता. तसंही आत्ता तिथे कुणी पर्यटक किंवा प्रेमी जोडपी असण्याची शक्यता नव्हतीच. पण खबरदारी घेतलेली कधीही चांगली. टेपच्या त्या बाजूला, म्हणजे क्राइम सीनवर फक्त एक गाडी डिकी उघडलेल्या अवस्थेत उभी होती. ऑडी. बहुतेक ज्याचा किंवा जिचा खून झालाय त्याची/तिची असणार. ऑडी म्हणजे नक्कीच कुणीतरी श्रीमंत, आणि मलबार हिल म्हणजे राजकारणी लोकांशी संबंध. जेसीपी साहेबांच्या बोलण्याचा अर्थ आत्ता माझ्या लक्षात आला.
टेप वर उचलून मी क्राइम सीनवर आलो. एक हवालदार धावतच माझ्या दिशेने आला आणि त्याने माझ्यापुढे एक रजिस्टर धरलं. त्यावर सही करून मी त्याच्याकडे पाहिलं.
“माझ्याबरोबर या सर” असं म्हणून तो मला बॉडीच्या दिशेने घेऊन गेला.
“या देशमुखसाहेब!” हा कोण एवढ्या अगत्याने स्वागत करतोय म्हणून मी त्या दिशेने पाहिलं. इन्स्पेक्टर अजय नेवाळकर समोर उभा होता. आमची मैत्री होती असं मी नक्कीच म्हटलं नसतं, पण आम्ही एकमेकांना गेली अनेक वर्षं ओळखत जरूर होतो. अगदी तो एम.पी.एस.सी.चा आणि मी यू.पी.एस.सी.चा अभ्यास करत होतो तेव्हापासून. मी पुढे जाऊन हात मिळवले. चला. नेवाळकर आहे म्हणजे केसचा चार्ज घेताना काही प्रश्न येणार नाही.
“क्राइम ब्रँचमधून कुणीतरी चार्ज घ्यायला येतंय असं सांगण्यात आलं होतं,” नेवाळकर म्हणाला, “पण तू असशील असं वाटलं नव्हतं.”
“वेल्, मलाही माहीत नव्हतं. मला आत्ता कॉल आला आणि सांगितलं गेलं.”
“तू एकटाच आला आहेस?”
“नाही. माझा सहकारी येतोय. अमोल शेळके. तो मालाडवरून येतोय. केस काय आहे?”
नेवाळकरने ऑडीच्या दिशेने नजर केली आणि आम्ही दोघेही तिथे गेलो. डिकीमध्ये मृत व्यक्तीच्या गोष्टी रचून ठेवल्या होत्या. फ्लडलाईट्सचा प्रकाश प्रामुख्याने बॉडीच्या दिशेने असल्यामुळे इथे फारसा प्रकाश नव्हता. पण फोरेन्सिकच्या लोकांनी वेगवेळ्या झिपलॉक प्लास्टिक पिशव्यांमध्ये गोष्टी ठेवल्या होत्या. पैशांचं पाकीट, काही किल्ल्या असलेली कीचेन, एक गळ्यात घालण्यासाठी असलेलं आयडी कार्ड, आणखी एक स्टीलची छोटी बॉक्स होती. तिच्यात बर्‍यापैकी पैसे होते. सगळ्या हजाराच्या नोटा होत्या आणि एक आयफोन होता. तो अजूनही चालू होता.
“आमचं काम संपतच आलंय. अजून एक दहा मिनिटं आणि मग आम्ही तुम्हाला हे सोपवून जाऊ,” नेवाळकर म्हणाला.
आयडी कार्ड असलेली प्लास्टिक पिशवी उचलून मी कार्डकडे निरखून पाहिलं. 'श्रीमती संध्या के. ताहिलियानी हॉस्पिटल फॉर विमेन' असं त्यावर ठळक अक्षरांमध्ये छापलेलं होतं. एसएसकेटी हॉस्पिटल हॉस्पिटल तर प्रसिद्ध होतंच. मुंबईमधलं फक्त स्त्रियांसाठी असलेलं पहिलं आणि सुसज्ज हॉस्पिटल असा त्याचा लौकिक होता. उद्घाटनाला त्या वेळचे पंतप्रधान आले होते, हे मला आठवलं. ही केस महत्त्वाची आहे, याचे एक एक पुरावे समोर यायला लागले होते. कार्डवर एका पुरुषाचा फोटो होता. माणूस दिसायला चांगला होता. काळे केस आणि शोधक डोळे फोटोमध्येही लक्षात येत होते. फोटोखाली नाव होतं – डॉ. संतोष त्रिवेदी. मी कार्ड उलटं करून पाहिलं. हे नुसतं आयडी कार्ड नव्हतं, तर की कार्डदेखील होतं. बंद दरवाजे उघडण्यासाठीही त्याचा उपयोग होत असावा.
“मला या केसबद्दल माहिती हवीय अजय,” मी म्हणालो.
“सांगतो ना. साधारण एक तास-दीड तासांपूर्वी या बॉडीबद्दल आम्हाला समजलं. मलबार हिल आणि नेपिअन सी रोड या दोन्हीही पोलीस स्टेशन्सच्या हद्दी इथे ओव्हरलॅप होतात. त्यामुळे दोन्हीही पोलीस स्टेशन्सची इथे राउंड असते. हा संपूर्ण भाग – एका बाजूने केम्प्स कॉर्नर, एका बाजूने नेपिअन सी रोड, एका बाजूने वाळकेश्वर आणि एका बाजूने राज भवन – एकदम महत्त्वाचा आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांचा बंगला इथून जवळ आहे. त्यामुळे इथे नियमितपणे राउंड असतात. मलबार हिल पोलीस स्टेशनची वायरलेस वाळकेश्वर ते गोदरेज बाग आणि पुढे केम्प्स कॉर्नर असा राउंड घेते. साधारण सव्वाअकराच्या सुमारास जेव्हा ही वायरलेस इथून जात होती, तेव्हा त्यांना इथे ही ऑडी डिकी उघडून ठेवलेल्या अवस्थेत मिळाली. पण जवळपास कुणीही नव्हतं. गाडीमध्येही कुणी नव्हतं. वायरलेसमधल्या ऑफिसर्सनी जेव्हा आजूबाजूला शोध घेतला, तेव्हा त्यांना ही बॉडी सापडली. या माणसाच्या डोक्यात मागून दोन गोळ्या झाडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे तो त्याच्या चेहर्‍यावर पडला होता.”
“डोक्यात गोळ्या? त्याही मागून?”
“हो. असं वाटतंय की या माणसाला मृत्युदंड दिलेला आहे. He has been executed. Clean and simple.”
“ओके. मग?”
“मग आम्ही इथे आलो, पंचनामा केला. आयडी कार्ड याच माणसाचं आहे आणि पाकीटही. डॉ. संतोष त्रिवेदी. हा माणूस कफ परेडजवळ राहतो. त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्या पाकिटातच होतं आणि यावरून आम्हाला त्याचा पत्ता समजला. त्याची गाडी टी अँड के मेडिकल फिजिसिस्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर नोंदवलेली आहे. त्यातला टी म्हणजे हाच माणूस असावा. त्रिवेदी.”
“ओके. या माणसाच्या घरी कुणी गेलंय?”
“नाही.”
“गाडीची तपासणी केलीय?”
“नाही,” नेवाळकर हसला, “क्राइम ब्रँच येणार म्हटल्यावर आम्ही...”
मला राग आला होता, पण मी काहीच बोललो नाही.
“ठीक आहे. मी चार्ज घेतोय इथला. फोरेन्सिकच्या लोकांना सांगा आणि जो काही पंचनामा लिहिलेला असेल, तो मला द्या.”
सगळ्या औपचारिकता पूर्ण करून नेवाळकर आणि त्याचे लोक निघून गेले. मला मदत म्हणून दोन हवालदार आणि गायतोंडे नावाचा एक पी.एस.आय. तिथे थांबले होते. अमोल अजूनही पोहोचला नव्हता. पण ते अपेक्षित होतं. तोपर्यंत वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. मी माझ्या पँटच्या खिशातून दोन ग्लोव्ह्ज काढले आणि हातांवर चढवले. फोरेन्सिकच्या लोकांना माझं पाहून झाल्यावर गाडीची पूर्ण तपासणी करायला सांगितलं आणि तिथला एक मोठा कमांडर टॉर्च घेऊन गाडीत बघायला सुरुवात केली. गाडीत कुठेही रक्त वगैरे नव्हतं. या माणसाला त्याच्या मारेकर्‍याने गाडीबाहेरच मारलं असणार. ड्रायव्हरच्या जागेच्या शेजारी एक ब्रीफकेस ठेवलेली होती. मी उचलून पाहायचा प्रयत्न केला, तेव्हा ती उघडीच असल्याचं जाणवलं. आतमध्ये पाहिल्यावर अनेक फाइल्स, एक कॅल्क्युलेटर, पेन्स, अनेक रायटिंग पॅड्स आणि काही एन्व्हलप्स आणि लेटरहेड्स होती. मी ब्रीफकेस बंद करून जिथे होती तिथे ठेवून दिली. ब्रीफकेस ड्रायव्हरच्या शेजारच्या जागेवर होती, याचा अर्थ हा माणूस इथे एकटाच आला होता आणि त्याच्या मारेकर्‍याला इथे भेटला होता. त्याचा मारेकरी त्याच्याबरोबर आला नव्हता.
गाडीचा ग्लोव्ह बॉक्स उघडल्यावर बॉडीवर जसं आयडी कार्ड मिळालं होतं, तशी अनेक कार्डस खाली पडली. मी प्रत्येक कार्ड उचलून पाहिलं. प्रत्येक कार्डवर वेगवेगळ्या हॉस्पिटल्सची नावं होती आणि तीसुद्धा की कार्डस होती. प्रत्येक कार्डच्या पाठी एक नंबर आणि काही अक्षरं लिहिलेली होती. डॉ. संतोष त्रिवेदी हे नाव मात्र प्रत्येक कार्डवर होतं. आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. या प्रत्येक हॉस्पिटलच्या गायनॅकॉलॉजी विभागाचं नाव कार्डवर लिहिलेलं होतं आणि एसएसकेटी हॉस्पिटल तर स्त्रियांसाठी असलेलंच हॉस्पिटल होतं. या माणसाला मुंबईमधल्या जवळपास सर्व हॉस्पिटल्सच्या स्त्रीरोग विभागांमध्ये मुक्त प्रवेश होता, असं दिसत होतं. असं काय करत होता हा माणूस?
सगळी कार्डस परत ग्लोव्ह बॉक्समध्ये ठेवून देऊन मी बॉक्स बंद केला. सीट्सच्या खाली आणि दोन सीट्सच्या मध्ये काहीच सापडलं नाही. आता परत डिकीमध्ये पाहायचं मी ठरवलं, आणि त्याप्रमाणे पाहत असताना मला एक जरा विचित्र गोष्ट जाणवली. डिकीमध्ये लाल रंगाचं कार्पेट होतं आणि त्यावर खोलवर गेलेल्या चार खुणा होत्या. एखादी चौरसाकृती आणि जड गोष्ट – चार पाय किंवा पायांना चाकं असलेली एखादी वस्तू त्यावर ठेवलेली असणार. गाडी डिकी उघडी असलेल्या अवस्थेत सापडली होती, म्हणजे ही जी काही वस्तू होती, ती या माणसाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मारेकर्‍याने नेली असणार. पण जर ही वस्तू एवढी जड असेल, तर – कदाचित एकापेक्षा जास्त मारेकरी असतील.
“सर?”
मी माझ्या तंद्रीतून बाहेर आलो.
“काय झालं?”
“सर, या मॅडम आल्या आहेत इथे. त्यांना तुम्हाला भेटायचंय. मी त्यांना सांगितलं, पण त्या ऐकत नाहीयेत.”
“पत्रकार आहेत का? मी भेटणार नाही म्हणून सांग.”
“नाही सर. प्रेसवाल्या नाहीयेत. आपल्यापैकी आहेत.”
"आपल्यापैकी? कुठे आहेत?"
तो हवालदार मला क्राइम सीनच्या टेपपर्यंत घेऊन गेला. पलीकडच्या बाजूला एक बर्‍यापैकी उंच स्त्री उभी होती. तिच्या उभं राहण्याच्या पद्धतीवरूनच ती त्या हवालदाराने सांगितल्याप्रमाणे ‘आपल्यापैकी’ असावी हे कळत होतंच.
ती पुढे झाली आणि मला तिचा चेहरा दिसला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला.
“सुजाता, तू? तू इथे काय करते आहेस?”
“हाय राजेंद्र! रात्री साडेबारा वाजता मी अशा निर्मनुष्य ठिकाणी काम असल्याशिवाय येईन का?”
“काम? आयबीला मुंबईत घडलेल्या खुनामध्ये रस असण्याचं कारण काय?”
“आयबी नाही, एन.आय.ए. नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी.”
“कधीपासून?”
“चार वर्षं.”
सुजाता सप्रेला शेवटचं भेटून नक्की किती दिवस किंवा महिने किंवा वर्षं झाली होती, हे मला आठवत नव्हतं, पण तिची आठवण झाली नाही असा एकही दिवस नव्हता. २००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांनंतर जे तपासकार्य चालू झालं होतं, त्यात मुंबई क्राइम ब्रँचबरोबरच आयबीचाही (इंटेलिजन्स ब्युरोचाही) समावेश होता. सुजाता तेव्हा आयबीमध्ये होती. एन.आय.ए.ची तेव्हा निर्मितीही झालेली नव्हती. तेव्हा ती जेवढी सुंदर आणि स्मार्ट दिसायची, त्यात अजूनही काही फरक पडलेला नव्हता.
माझ्या मनातले विचार बहुतेक तिने ओळखले असावेत, “तुझ्यातही काही फरक नाही पडलेला राजेंद्र.”
मी हसलो.
“पण तुला हे सांगायला मी आलेले नाही.”
“मग?”
“वेळ आल्यावर सांगेन. आता मला क्राइम सीन बघता येईल का?”
तिच्या आवाजात आता ती टिपिकल धार होती. मीही औपचारिक व्हायचं ठरवलं.
“जरूर. का नाही?”
“मी तुला मदत करू शकते इथे,” तिने आवाजातली धार थोडी कमी केली, “जर मला बॉडी पाहायला मिळाली, तर तुला त्याच्या घरच्या लोकांना इथे किंवा मॉर्गमध्ये बोलवून त्याची ओळख पटवायची गरज भासणार नाही.” हे बोलताना तिच्या उजव्या हातात असलेली एक फाइल तिने पुढे केली.
आम्ही दोघेही बॉडीच्या दिशेने गेलो. गॅलरीच्या रेलिंगपासून ५ ते ७ फुटांवर हा माणूस पडलेला होता. रेलिंगच्या पलीकडे मुंबईची शान – क्वीन्स नेकलेस दिसत होता. हा माणूस मात्र हे सुंदर दृश्य आता कधीच बघू शकणार नव्हता. तो इथल्या लाल मातीवर निष्प्राण पडला होता. आमच्या मदतीला असलेल्या हवालदारांपैकी एकाने माझ्यासमोर पंचनामा धरला. सुजाता माझ्या बाजूला येऊन उभी राहिली.
पंचनाम्यानुसार, जेव्हा हा माणूस सापडला, तेव्हा तो पोटावर पडलेला होता, आणि त्याच्या तपासणीसाठी त्याला पोलिसांनी त्याच्या पाठीवर झोपवला होता. त्याच्या चेहर्‍यावर, विशेषतः कपाळावर जखमा होत्या. त्याला डोक्यात गोळ्या लागल्यावर तो तोंडावर पुढे पडला असणार आणि त्या वेळी या जखमा झाल्या असणार. पण त्याचा चेहरा बिघडला नव्हता. आयडी कार्डवरचा चेहरा आणि हा चेहरा एकाच माणसाचा होता, हे सहज दिसून येत होतं. त्याच्या अंगावर पांढरा फुलशर्ट होता आणि पँट राखाडी निळसर रंगाची होती. त्याच्या गुडघ्यांवर लालसर माती लागलेली दिसत होती. बहुतेक या माणसाला मारण्याआधी त्याच्या मारेकर्‍यांनी त्याला गुडघे टेकून बसवलं असावं किंवा मग गोळ्या घातल्यावर तो पहिल्यांदा गुडघ्यांवर पडला असावा आणि नंतर खाली कोसळला असावा.
सुजाताने तिच्या फाइलमधून एक फोटो काढला आणि तो मृतदेहाच्या चेहर्‍याशी पडताळून पाहिला.
“पॉझिटिव्ह!” ती म्हणाली, “तोच माणूस आहे. डॉ. संतोष त्रिवेदी.”
मी पंचनाम्यात पाहिलं. डोक्यात दोन गोळ्या मारलेल्या आहेत असं लिहिलं होतं, पण चेहर्‍यावर कुठेही गोळी बाहेर येताना झालेली जखम किंवा exit wound नव्हती.
“आणखी एक गोष्ट आहे सर,” पी.एस.आय. गायतोंडे पुढे येत म्हणाला आणि त्याने दोघा हवालदारांना इशारा केला. त्यांनी परत मृतदेह त्याच्या पोटावर झोपवला.
“हे पाहा सर.”
मृत संतोष त्रिवेदीच्या अंगावर असलेल्या पांढर्‍या शर्टाच्या कॉलरवर रक्ताचे डाग होते. या माणसाच्या डोक्यावर दाट केस असल्यामुळे असेल कदाचित, पण रक्त फारसं खाली ओघळलं नव्हतं. त्याचे केस रक्ताने चिकटले होते. दोन जखमा स्पष्टपणे दिसत होत्या. पण शर्टवर, कॉलरच्या खाली कसलेतरी तपकिरी द्रवाचे डाग होते. रक्त नव्हतं हे निश्चित.
“हे काय आहे?” मी विचारलं.
“सर, बहुतेक कोका कोला किंवा पेप्सी.”
“काय?”
“हो,” सुजाता म्हणाली, “ज्याने कुणी गोळ्या झाडल्या, त्याने त्या गनची नळी कोक किंवा पेप्सीच्या प्लास्टिक बाटलीमध्ये खुपसून गोळी झाडली असणार. बाटलीमध्ये जे थोडंफार कोक किंवा पेप्सी असेल, ते गोळीबरोबर वेगाने बाहेर फेकलं गेलं, आणि याच्या शर्टवर पसरलं. आणि असं करण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे सायलेन्सर नसावा. त्यांनी हा कामचलाऊ सायलेन्सर वापरला.”
“बरोबर. म्हणूनच इथे कुणालाही दोन गोळ्या झाडलेल्या असूनही आवाज मात्र आला नाही.” पी.एस.आय. गायतोंडे म्हणाला.
“हा सगळा प्रकार कधी झाला असेल पण?” मी विचारलं.
“सर, आमची वायरलेस इथून सव्वाअकरा वाजता गेली, तेव्हा त्यांना ही गाडी दिसली. आम्हाला त्यांच्याकडून समजल्यावर आम्ही ताबडतोब निघालो आणि इथे पावणेबाराच्या सुमारास पोचलो. त्याच्या आधी दोन-तीन तास. जास्त नाही. कारण सूर्यास्ताच्या वेळी आणि त्यानंतरही अर्धा-एक तास इथे लोक असतात. जे काही झालं, ते त्याच्यानंतरच. अंधार पडल्यावरच हे झालं असणार.”
“त्यांनी त्याच्या तोंडातसुद्धा बोळा कोंबला असणार,” सुजाता म्हणाली, “कारण त्यांनी गनसाठी सायलेन्सर वापरला, पण जर हा माणूस गोळ्या लागल्यावर ओरडला असता, तर कुणाचं लक्ष वेधलं गेलं जाण्याचा धोका होता. तो टाळण्यासाठी या मारेकर्‍याने त्याच्या तोंडात बोळा कोंबला असणार.” तिने कॉलरच्या बंद बटणाकडे आमचं लक्ष वेधलं, “माझ्या मते त्याचा स्वतःचा टाय वापरला असणार त्यासाठी.”
“आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे सर.” गायतोंडे काहीतरी आठवल्याप्रमाणे म्हणाला आणि पुढे येऊन त्याने आम्हाला संतोष त्रिवेदीचे हात दाखवले. त्रिवेदीच्या दोन्ही हातांच्या मधल्या बोटांवर प्लास्टिकच्या रिंग्ज होत्या. एखाद्या अंगठीपेक्षा मोठ्या. हाताचे तळवे उघडे होते. या दोन्ही रिंग्ज लाल रंगाच्या होत्या, पण मध्येच एक पांढरा पॅच होता, आणि तो तळहाताच्या बाजूला होता.
“काय आहे हे?” मी विचारलं.
“माहीत नाही सर,” गायतोंडे म्हणाला.
“मला माहीत आहे,” सुजाता म्हणाली, “याला TLD म्हणतात.”
“TLD?”
“Thermal Luminescent Dosimetry. या रिंगमुळे तुम्ही जर किरणोत्सर्गी पदार्थांच्या संपर्कात आलात, तर समजतं.”
किरणोत्सर्ग हा शब्द ऐकल्यावर आजूबाजूला असलेल्या सगळ्यांचं बोलणं बंद झालं. सुजाताचं बहुतेक त्याकडे लक्ष गेलं नाही, कारण ती बोलतच होती, “आणि जेव्हा हा पांढरा भाग असा आतल्या बाजूला वळलेला असतो, तेव्हा त्याचा अर्थ हा असतो, की ही रिंग घालणारा माणूस किरणोत्सर्गी पदार्थ प्रत्यक्ष हाताळतो.”
त्या क्षणी सगळे जण – मी, पी.एस.आय. गायतोंडे आणि त्या दोन हवालदारांसकट – एका बाजूला झाले आणि मृतदेहापासून दूर जायला लागले.
“एक मिनिट, एक मिनिट, सगळ्यांनी लक्ष द्या,” आपल्या बोलण्याचा परिणाम शेवटी सुजाताच्या लक्षात आला, “घाबरू नका. तसं काहीही झालेलं नाहीये. जर किरणोत्सर्ग जरुरीपेक्षा जास्त झाला असेल, तर हा पांढरा भाग काळा होतो. इथे, या रिंग्ज अजूनही पांढर्‍या आहेत. याचाच अर्थ आपण सुरक्षित आहोत. शिवाय माझ्याकडे हे आहे.” तिच्या ब्लेझरच्या खिशातून तिने एक जुन्या काळचे पेजर असायचे तशी दिसणारी एक डबी काढली, “हा रेडिएशन मॉनिटर आहे. जर इथे किरणोत्सर्ग असता, तर या डबीतून मोठा आवाज आला असता, आणि सर्वात पहिले मी पळाले असते. पण तसं काहीही झालेलं नाहीये. ओके? आता सर्वांनी आपापलं काम पूर्ण करा.”
हे काहीतरी विचित्र घडत असल्याची जाणीव मला झाली. किरणोत्सर्ग वगैरे प्रकाराची कल्पनाही मी केलेली नव्हती. मी सुजाताकडे पाहिलं, तर ती माझ्याकडेच पाहत होती.
“तू जरा माझ्याबरोबर इकडे ये सुजाता. मला तुझ्याशी जरा बोलायचंय.”
“बोल ना.” ती दोन पावलं माझ्या दिशेने आली.
“तू काय करते आहेस इथे?”
“जसा तुला मध्यरात्री कॉल आला, तसाच मलाही आला.”
“याने मला काहीही समजलेलं नाहीये.”
“मी तुझी कशी खातरी पटवू, की मी इथे मदत करण्यासाठी आलेले आहे?”
“ठीक आहे. मदत करण्यासाठी आली आहेस ना तू? मग मला तू इथे का आली आहेस आणि काय करते आहेस ते सांग. आत्ताच्या आत्ता. त्याने मला भरपूर मदत होईल.”
तिने आजूबाजूला पाहिलं आणि मला क्राइम सीनच्या टेपच्या बाहेर चलण्यासाठी खुणावलं. आम्ही दोघेही टेपच्या पलीकडच्या बाजूला गेलो. आपलं बोलणं कुणालाही ऐकू जात नाहीये, याची खातरी करून घेण्यासाठी तिने एकदा परत इकडेतिकडे पाहिलं.
“मी जे तुला आत्ता सांगणार आहे, ते अत्यंत गुप्त आहे, आणि ते तसंच राहिलं पाहिजे.” ती माझ्याकडे रोखून पाहत म्हणाली, “निदान सध्यातरी.”
“ओके. माझा शब्द देतो मी.”
“ठीक आहे. डॉ. संतोष त्रिवेदी हे नाव आमच्या एका यादीवर आहे. त्याचा खून झालाय हे आज पोलिसांना समजलं. मग ही केस क्राइम ब्रँचकडे सोपवायचा निर्णय झाला. डॉ. त्रिवेदीबद्दल माहिती गोळा करण्यासाठी क्राइम ब्रँचच्या एका ऑफिसरने सायबर सेलशी संपर्क साधला. त्यांच्याकडून आम्हाला – एन.आय.ए.ला ताबडतोब हे समजलं, आणि डॉ. त्रिवेदी हे नाव समजल्यावर एन.आय.ए.च्या दिल्ली हेडऑफिसमधून आम्हाला इथे कॉल आला आणि तो कॉल माझ्यासाठी होता.”
“का? हा डॉ. त्रिवेदी दहशतवाद्यांना मदत वगैरे करतो का?”
“नाही. तो वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ आहे... होता. Medical Physicist. आणि त्याने आयुष्यात कुठलाही गुन्हा वगैरे केलेला असण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.”
“मग त्या रिंग्ज? आणि कुठल्या यादीवर होता हा माणूस?
तिने माझ्या प्रश्नाकडे सरळसरळ दुर्लक्ष केलं.
“मला एक सांग,” ती म्हणाली, “या माणसाच्या घरी कुणी गेलंय? त्याच्या बायकोला हे सांगायला?”
“अजून नाही. इथे क्राइम सीनवरचं काम संपवून आम्ही तिथे जाणार होतो.”
“मग आपल्याला ते आत्ता करायला पाहिजे,” तिच्या आवाजात घाई होती, “आपण तिथे जाऊ या. तुला जे काही विचारायचंय ते तू मला रस्त्यात विचार. त्याच्या घराची चावी त्याच्या गाडीच्या चवीबरोबर असेल. मी माझी गाडी घेते.”
“नाही. आपण माझ्या गाडीने जाऊ.” मी म्हणालो, “तिथून जर पुढे कुठे जावं लागलं मला, तर तुझ्या गाडीने कसा जाणार?”
तिने खांदे उडवले, “कुठे आहे तुझी गाडी?”
“तिथे मागे. बाकी पोलीस गाड्यांच्या मागे. MH-01 BL 5579,” मी म्हणालो, “गायतोंडे, इथे क्राइम सीनवर सापडलेल्या गोष्टी क्राइम ब्रँचच्या गाडीत हलवा. मला डॉ. त्रिवेदींच्या घरी जावं लागेल. मी लवकर परत येईन. इन्स्पेक्टर अमोल शेळके कुठल्याही क्षणी इथे पोहोचतील. ते येऊन तुम्हाला रिलीव्ह करतील.”
“ठीक आहे सर!” गायतोंडे म्हणाला.
मी शेळकेला फोन केला. तो १५-२० मिनिटांमध्ये पोहोचला असता. त्याला लवकर क्राइम सीनवर पोहोचायला सांगून मी त्रिवेदीच्या घराची आणि गाडीची चावी असलेली प्लास्टिक पिशवी घेतली आणि निघालो.
सुजाता माझ्या गाडीच्या बाजूला उभी होती आणि कुणाशी तरी फोनवर बोलत होती. मी येऊन गाडीचा दरवाजा उघडल्यावर ती येऊन आत बसली.
“माझा पार्टनर.” ती म्हणाली, “ त्याला मी डॉ. त्रिवेदींच्या घरी परस्पर यायला सांगितलंय.”
मी गाडी चालू केली. आम्ही सरळ पुढे केम्प्स कॉर्नरला उतरून डावीकडे नेपिअन सी रोडच्या दिशेने वळलो. तिथल्या एका सिग्नलवर यू टर्न घेऊन मी गाडी पेडर रोडवर आणली आणि मरीन ड्राइव्हच्या दिशेने निघालो. सुजाता बाहेर बघत होती.
“जर डॉ. त्रिवेदी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी नाहीये, तर मग नक्की कुठल्या यादीवर त्याचं नावं आहे?”
तिने माझ्याकडे पाहिलं, “तो मेडिकल फिजिसिस्ट आहे, आणि त्यामुळे त्याचा किरणोत्सर्गी पदार्थांशी सरळ संबंध येत होता. त्यामुळे तो त्या यादीवर आला.”
“संबंध कुठे? हॉस्पिटल्समध्ये?”
“हो. तिथेच हे पदार्थ ठेवलेले असतात. प्रामुख्याने कॅन्सरवरच्या उपचारांसाठी त्यांचा वापर होतो.”
“ओके.” मला साधारण कल्पना येत होती, पण काही गोष्टी अजूनही स्पष्ट झालेल्या नव्हत्या.
“मग? ”
“जे किरणोत्सर्गी पदार्थ तो नियमितपणे हाताळत होता, त्यांच्यावर जगातल्या काही लोकांचा डोळा आहे. त्यांना या पदार्थांचा उपयोग आपल्या फायद्यासाठी करून घ्यायचा आहे. पण अर्थातच त्यात कॅन्सरवरील उपचारांचा काहीही संबंध नाहीये.”
“दहशतवादी.”
“बरोबर.”
“पण तुझं असं म्हणणं आहे, की हा माणूस आपण जसे आपल्या ऑफिसमध्ये जातो तितक्या सहजपणे हॉस्पिटल्समध्ये जायचा आणि हे पदार्थ हाताळायचा? याचे नियम असतील ना काहीतरी?”
“नियम असतात, पण जेव्हा एखादी गोष्ट ही नेहमीच होते, रुटीन होते, तेव्हा नियम आणि ज्या कडकपणे ते पाळले गेले पाहिजेत, त्यात शिथिलपणा येतो. जगातल्या कुठल्याही सुरक्षाव्यवस्थेत हे दोष असतातच. जेव्हा काहीतरी जबरदस्त घडतं, तेव्हाच लोक भानावर येतात आणि सगळे नियम परत व्यवस्थित पाळतात.”
मी विचार करत होतो. डॉ. त्रिवेदीच्या गाडीत मला जी आयडी कार्डस मिळाली होती, त्यांच्या मागे जे नंबर्स आणि अक्षरं लिहिलेली होती, ती तिथल्या किरणोत्सर्गी पदार्थ ठेवलेल्या तिजोर्‍यांच्या दरवाजांवरील कुलपांची काँबिनेशन्स असावीत बहुतेक.
“जर तुला एखादी सुरक्षाव्यवस्था भेदून, किंवा तिला बाजूला सारून काही माहिती किंवा गोष्ट मिळवायचीय, तर तू कुणाकडे जाशील?” तिने विचारलं.
“ज्याला किंवा जिला त्या व्यवस्थेची इत्यंभूत माहिती आहे, त्या व्यक्तीकडे.”
मी एव्हाना कफ परेडच्या जवळ आलो होतो आणि ज्या रस्त्याचं नाव ड्रायव्हिंग लायसन्सवरच्या पत्त्यावर लिहिलं होतं, त्या रस्त्याच्या नावाचा बोर्ड कुठे दिसतो का ते बघत होतो. मला जे हवं होतं, ते सुजाताने अजून तरी मला सांगितलं नव्हतं. अर्थात, तिच्यासारखी हुशार एजंट इतक्या सहजपणे माहिती देईल अशी अपेक्षा नव्हतीच माझी.
“तू ओळखत होतीस का डॉ. त्रिवेदींना?” तिला हा प्रश्न विचारताना मी तिच्याकडे बघत होतो. मला उत्तरापेक्षाही तिची प्रतिक्रिया पाहायची होती. ती माझ्यापासून वळली आणि तिने बाहेर बघितलं. आणि परत माझ्या दिशेने वळली, “नाही. मी ओळखत नव्हते त्यांना.”
मी गाडी थांबवली.
“काय झालं?”तिने विचारलं.
“आलं की त्यांचं घर.”
तिने आजूबाजूला पाहिलं, “इथे नाही, इथून दोन सिग्नल पुढे आणि मग डावी...” ती बोलताबोलता थांबली. आपलं खोटं बोलणं उघडकीला आल्यावर लोक जसे थांबतात, तशीच.
“तुला मला खरं सांगायचंय की गाडीतून उतरायचंय?” मी विचारलं.
“हे पाहा राजेंद्र, तुला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे...”
“उतर माझ्या गाडीतून आत्ताच्या आत्ता. मी एकटाही डॉ. संतोष त्रिवेदींचं घर शोधू शकतो.”
“मी एक फोन कॉल केला ना, तर पुढच्या एक तासात तुझ्या हातून ही केस गेलेली असेल, आणि कदाचित तुझी नोकरीसुद्धा.” तिच्या आवाज अत्यंत थंड होता.
“जरूर. माझ्या फोनवरून केलास तरी चालेल. तू माझ्या क्राइम सीनवर आलीस, स्वतःला माझ्या तपासात घुसवलंस आणि आता मलाच दमदाटी करते आहेस? ज्याला कुणाला तुला फोन करायचा असेल त्याला कर. मग पुढे जे होईल त्याला मी जबाबदार नसेन.”
तिने माझ्याकडे रोखून पाहिलं. बराच वेळ. “ओके.” ती एक निःश्वास टाकून म्हणाली, “काय माहिती हवी आहे तुला?
“मला सत्य काय आहे ते हवंय. लपवाछपवी नाही.”
ती बराच वेळ काही बोलली नाही. बहुतेक मला काय सांगायचं आणि कसं सांगायचं याचा विचार करत असावी.
“तुला डॉ. संतोष त्रिवेदी कोण आहे आणि तो कुठे राहतो, किंवा राहायचा याबद्दल अगदी व्यवस्थित माहिती आहे हे तर उघड आहे,” मी म्हणालो, “तरीही तू माझ्याशी खोटं बोललीस. तो दहशतवादी गटांना मदत करत होता का?”
“नाही. आणि हे खरं आहे. त्याचा दहशतवादाशी दूरवरचाही संबंध नव्हता. तो भौतिकशास्त्रज्ञ होता. तो आमच्या यादीवर होता, कारण तो किरणोत्सर्गी पदार्थ हाताळायचा. हे पदार्थ जर चुकीच्या लोकांच्या हातात पडले, तर त्यांचा वापर अनेक धोकादायक गोष्टींसाठी होऊ शकतो.”
“म्हणजे?”
“अनेक लोक – विशेषतः गर्दीच्या ठिकाणी जर या पदार्थांमधून होणार्‍या किरणोत्सर्गाच्या संपर्कात आले, तर अनर्थ होऊ शकतो. लंडनमध्ये एका रशियन हेराला मारण्यासाठी त्याच्या मारेकर्‍यांनी पोलोनियमचा वापर केला होता. ती बातमी सगळ्या जगभर प्रसिद्ध झाली होती. तिथे त्याचा वापर एका माणसासाठी केला गेला, पण विचार कर – जर एखाद्या दहशतवादी गटाने त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला – मॉल, रेल्वे स्टेशन्स, मुंबईसारख्या मोठ्या शहरातला कुठलाही मोठा रस्ता, तर? लंडनमध्ये अगदी थोड्या प्रमाणात पोलोनियम वापरण्यात आलं, पण एखाद्या शहरासाठी मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्गी पदार्थ लागेल, आणि अर्थातच तो कुठल्या साधनाद्वारे पसरवला जातोय तेही महत्त्वाचं आहे.”
“साधन? म्हणजे बाँब वगैरे? डॉ. त्रिवेदी जे पदार्थ हाताळायचा, त्यांचा बापर एखाद्या बाँबसाठी वगैरे होऊ शकतो?”
“हो. होऊ शकतो. त्याच्यासाठी सध्या IED – Improvised Explosive Device हा शब्द वापरला जातो हे तर माहीत असेलच तुला.”
तिने दिलेल्या माहितीमुळे मी जरा अस्वस्थ झालो होतो, “हे त्याचं घर नाही, हे तुला कसं माहीत?”
तिने डोकं दुखत असल्याप्रमाणे तिचे हात तिच्या कपाळाच्या दोन्ही बाजूंना ठेवून दाबले. समोरच्याला काही समजलं नाही, की तिची हीच प्रतिक्रिया असायची हे मला माहीत होतं, “कारण मी याआधी त्याच्या घरी गेले आहे, ओके? झालं समाधान? गेल्याच वर्षी – अगदी नेमकं सांगायचं तर ६-८ महिन्यांपूर्वी मी आणि माझा पार्टनर, आम्ही दोघेही डॉ. त्रिवेदींच्या घरी गेलो होतो, आणि त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या व्यवसायात असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली होती. त्यांच्या घराची सुरक्षाविषयक तपासणीही केली होती, आणि त्यांना काय आणि कशी काळजी घ्यायची, तेही सांगितलं होतं. आम्हाला असं करायला केंद्रीय गृहखात्याकडून सांगण्यात आलं होतं.”
“ओके. पण मला एक सांग, हे तुम्ही केंद्रीय गृहखात्याने करायला सांगितलेला खबरदारीचा उपाय म्हणून केलं होतं, का डॉ. त्रिवेदींच्या जिवाला धोका आहे, हे तुम्हाला समजलं होतं, म्हणून केलं होतं?”
“त्यांच्या जिवाला धोका नव्हता. हे पाहा, आपण उगाचच वेळ वाया घालवतोय.”
“मग कुणाला धोका आहे?”
सुजाता आता प्रचंड वैतागली होती, “कुणा एका माणसाच्या जिवाला धोका आहे, असं अजिबात नव्हतं. आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून हे सगळं करत होतो. अमेरिकेत एक केस झाली होती. सव्वा वर्षापूर्वी. तिथल्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातल्या ग्रीन्सबरो या ठिकाणी असलेल्या एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कुणीतरी शिरलं. त्यांनी तिथे असलेल्या सुरक्षाव्यवस्थेला चकवलं आणि आणि सीशियम १३७ नावाचं एक किरणोत्सारी समस्थानिक असलेल्या बावीस ट्यूब्ज पळवल्या. या पदार्थाचा वैद्यकीय आणि कायदेशीर वापर हा स्त्रियांच्या कॅन्सरसाठी होतो. एफ.बी.आय.ला अजूनही या चोरीचे काही धागेदोरे मिळालेले नाहीत. पण त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आपल्या देशातल्या या समस्थानिकाच्या वापराबद्दल सावधगिरी बाळगायचा सल्ला दिला. आपल्या देशात फक्त चार-पाच शहरांमधल्या हॉस्पिटल्समध्ये या पदार्थाचा वापर केला जातो. मुंबई, दिल्ली, चेन्नई, पुणे आणि बेंगळूरू. हा पदार्थ वापरणारे मेडिकल फिजिसिस्ट्ससुद्धा कमी आहेत. एफ.बी.आय.चा असा संशय होता, की काही अतिरेकी गट हे समस्थानिक आपल्या देशातून मिळवायचा प्रयत्न करतील, कारण आपल्या देशात या समस्थानिकाचा वापर वाढायला लागलेला आहे.”
“ओके.”
“तुला जी माहिती हवी होती, ती दिलीय मी. आता आपण निघू या का इथून?”
मी अजिबात हललो नाही, “अच्छा. म्हणजे तू त्याला सावधगिरीचा इशारा द्यायला गेली होतीस आणि म्हणून आत्ता त्याचा खून झाल्याचं कळल्यावर तू इथे आलीस.”
“हो. आम्ही मुंबईतल्या मेडिकल फिजिसिस्ट्सना सावध केलं होतं. आणि मी इथे आले नाही, मला इथे येऊन सगळं व्यवस्थित आहे ना हे पाहायला सांगण्यात आलंय. मला आणि माझ्या पार्टनरला.”
मी गाडी चालू केली, “हे सगळं तू मला आधीच का नाही सांगितलंस?”
“ग्रीन्सबरोमध्ये कुणाचाही खून झाला नव्हता. इथे झालाय. त्यामुळे हा सगळा प्रकार कदाचित पूर्णपणे वेगळा असू शकेल अशी एक शक्यता होती. त्यामुळे मला हे सांगण्यात आलं होतं, की कुणालाही यातलं काहीही कळता कामा नये. त्यामुळे मी तुझ्याशी खोटं बोलले आणि त्याबद्दल सॉरी.”
“ते ठीक आहे. पण मला एक सांग – एफ.बी.आय.ला तिथे चोरीला गेलेलं सीशियम परत मिळालं?”
तिने नकारार्थी मान डोलावली, “नाही. बहुतेक ते काळ्याबाजारात विकलं गेलंय. त्याची किंमत भरपूर असते, आणि त्याचा वापर करून केले जाणारे उपचारही महागडे आहेत. त्यामुळेच तर आम्हाला इथे नक्की काय प्रकार आहे, ते शोधून काढायचंय.”
आम्ही आता योग्य पत्त्याच्या जवळ आलो होतो. “हे डावीकडचं घर,” सुजाता म्हणाली.

No comments:

Post a Comment