जेसीपी साहेबांशी बोलून आम्ही मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या ग्रीन्स नावाच्या एका हॉटेलमध्ये रोहित खत्रीची व्यवस्था केली. हॉटेल ठीकठाक होतं. पोलीस स्टेशनच्या सीनियर इन्स्पेक्टरशी बोलून मी कुणीतरी दर २-३ तासांनी रोहितची खबरबात घेत राहील आणि काही संशयास्पद दिसलं, तर मला किंवा अमोलला फोन करेल याची व्यवस्था केली आणि आम्ही दोघेही ग्रीन्समधून निघालो. सकाळचे साडेसहा वाजले होते. आकाशात मळभ आलेलं होतं. रोहितला आम्ही राजीव कपूर या नावाखाली ठेवलं होतं. आत्ता तोच आमच्या हातातला हुकमाचा एक्का होता. जरी त्याने डॉ. त्रिवेदींच्या मारेकर्याचा चेहरा पाहिला नसला, तरी त्याने सांगितलेल्या घटनाक्रमावरून मलबार हिलच्या गॅलरीजवळ नक्की काय घडलं त्याची थोडीफार कल्पना आम्हाला आली होती.
“सर, तुम्हाला काय वाटतं?” अमोल म्हणाला.
“कशाबद्दल?”
“हा रोहित इथे राहील? पळून जाणार नाही?”
“कुठे जाणार तो?” मी म्हणालो, “त्याच्याकडे दुसरी जागाच नाहीये.”
जेसीपी साहेबांनी आम्हाला रोहितला चार दिवस ग्रीन्समध्ये ठेवायला सांगितलं होतं. तेवढ्या वेळात या केसची दिशा स्पष्ट झाली असती.
रोहितला सोडून आम्ही दोघेही निघालो. मी माझ्या फोनवरचे मेसेजेस आणि व्हॉइसमेल चेक केलं. सुजाताने अजून माझ्या मेसेजचं उत्तर दिलं नव्हतं, म्हणून मग मी राजनायकला फोन केला.
“बोल राजेंद्र.”
“काही विशेष नाही. ९ वाजताच्या मीटिंगबद्दल फोन केला होता मी. आहे ना ही मीटिंग?”
राजनायक थोडा घुटमळला, “मीटिंग... आहे, पण वेळ जरा पुढे ढकलली गेलीय.”
“अच्छा!”
“हो. ९ऐवजी १० वाजता आहे आता. मी सांगेन ना तुला.”
मी विचारल्याशिवाय त्याने मीटिंग १०ला आहे हे सांगितलं नव्हतं, त्यामुळे तो आपण होऊन मला काही सांगेल याची शक्यता अजिबातच नव्हती. पण तरी मला त्याच्याकडून माहिती हवी होती, म्हणून मी त्याला आणखी छेडायचं ठरवलं.
“कुठे आहे मीटिंग? एन.आय.ए.ऑफिसमध्ये?” एन.आय.ए.चं ऑफिस मुंबई पोलीस आयुक्तांच्या ऑफिसजवळच कुठेतरी असल्याचं मी ऐकलं होतं.
“नाही. सी.बी.आय.चं वरळी ऑफिस माहीत असेल ना तुला? तिथे. चौदावा मजला. एन.आय.ए. विचारलंस तर कोणीही सांगेल. बरं, तुला मिळालेला साक्षीदार – त्याच्याकडून काही कळलं?”
माझी नक्की काय परिस्थिती आहे, हे कळेपर्यंत राजनायकला मी काहीही सांगणार नव्हतो. पण तो कुठल्या ताणाखाली आहे, हे माहीत असल्यामुळे मी थोडीशी जुजबी माहिती द्यायचं ठरवलं.
“त्याने गोळीबार पाहिला, पण काही अंतरावरून. मग त्याने डॉ. त्रिवेदींच्या गाडीतून सीशियम दुसर्या गाडीत ठेवलेलं पाहिलं. तो म्हणाला की या दोन्हीही गोष्टी एकाच माणसाने केल्या. जो दुसरा माणूस होता, तो गाडीतच बसून होता आणि बाहेर आलाच नाही.”
“गाडीच्या नंबर प्लेट्स?”
“नाही. बहुतेक अलिशा त्रिवेदीची गाडी वापरण्यात आली असणार पिग नेण्यासाठी. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये सीशियम असल्याचा काहीही पुरावा मिळाला नसता.”
“त्याने ज्या माणसाला पाहिलं त्याचं काय?”
“मी बोललो ना तुला आत्ताच. तो त्या गोळीबार करणार्या माणसाचा चेहरा पाहू शकला नाही. तो अलिशाने सांगितल्याप्रमाणे मास्क घालून होता. बाकी काही नाही.”
राजनायकने पुढचा प्रश्न विचारण्याआधी जरा विचार केला, “तुम्ही काय केलं त्याचं?”
“काही नाही. जाऊ दिलं त्याला.”
“कुठे राहतोय तो?”
“सुरत.”
“मला काय म्हणायचंय ते तुम्हाला समजलंय देशमुखसाहेब.”
त्याच्या आवाजातला बदल मी टिपला. तो अचानक माझ्या नावावरून माझ्या आडनावावर आला, हेही.
“तो इथला नाहीये. इथे त्याच्या ओळखीचं कुणीही नाहीये. आम्ही त्याला सुरतचं तिकीट काढून दिलं आणि बाँबे सेंट्रल स्टेशनला सोडलं. थोडे पैसेही दिले. खायलाप्यायला.”
अमोल अवाक नजरेने माझ्याकडे बघत असल्याचं मला जाणवलं.
“एक मिनिट होल्ड कर राजेंद्र. दुसरा कॉल येतोय.”
“जरूर.”
त्याने कॉल होल्डवर ठेवला.
“सर, तुम्ही त्याला का...” अमोलने बोलायला सुरुवात केली. मी त्याला हातानेच थांबवलं.
राजनायक परत लाईनवर आला, “दिल्लीहून कॉल होता. आता ते तिथून सगळं नियंत्रित करताहेत.”
“म्हणजे?”
“आम्ही आर्मीची काही हेलिकॉप्टर्स वापरतोय. सीशियममुळे वातावरणात जर थोडासा किरणोत्सर्ग पसरला असेल, तर तो आम्हाला बघायचाय. त्या गॅलरीपासून सुरुवात करावी लागणार आहे. खरं सांगायचं तर सीशियम शोधण्यासाठी तो त्या पिगच्या बाहेर येणं आवश्यक आहे. पिगमध्येच राहिला, तर काहीही कळू शकणार नाही.”
मी काही बोलण्याआधीच त्याचा पुढचा प्रश्न आला – “आपल्या मीटिंगला थोडा वेळ आहे. तू काय करणार आहेस तोपर्यंत?”
मीही घुटमळलो पण थोडाच वेळ, “आता मी परत डॉ. त्रिवेदींच्या घरी जाऊन मिसेस त्रिवेदींशी बोलणार आहे. काही फॉलो अप करायचाय. नंतर डॉ. त्रिवेदींच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे काही मिळतंय का ते बघायचंय आणि त्यांच्या पार्टनरशी – डॉ. कामतांशी बोलायचंय.”
समोरून काहीही उत्तर किंवा प्रतिसाद आला नाही.
“हॅलो वर्धन...”
“मी आहे लाइनवर,” तो म्हणाला, “मला असं वाटतंय की तू डॉ. त्रिवेदींच्या घरी आणि ऑफिसमध्ये जायची गरज नाहीये.”
मी उद्वेगाने मान हलवली. मला माहीत होतं असं काहीतरी होणार आहे. “का? तुम्ही सगळं घेऊन गेलात की काय तिथून?”
“हे बघ, हा माझा निर्णय नव्हता. मला जी काही माहिती मिळालेली आहे, त्यावरून ऑफिसमध्ये काहीही नाहीये आणि डॉ. कामतांना आम्ही इथे आमच्या ऑफिसमध्ये आणलेलं आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोलतोय. सावधगिरीचा उपाय म्हणून आम्ही मिसेस अलिशा त्रिवेदींनाही आमच्या ऑफिसमध्ये आणलंय, आणि त्यांच्याशीही बोलणं चालू आहे.”
“जर हा तुझा निर्णय नव्हता, तर मग कोणाचा निर्णय होता? सुजाताचा?”
“मला त्याबद्दल काहीही सांगायचं नाहीये.”
“ठीक आहे,” मी म्हणालो, “मग आता मी आणि अमोल – आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येतो. कारण जेवढं मला माहीत आहे, त्यावरून ही अजूनही एका खुनाची केस आहे आणि आम्ही त्याचा तपास करतोय.”
समोरून उत्तर येण्याआधी एक निःश्वास ऐकू आला, “हे पाहा सुपरिंटेंडंट देशमुखसाहेब, ही केस आता फक्त एका खुनाची केस राहिलेली नाही. तुम्ही आणि तुमचे सहकारी – आम्ही दोघांनाही आमच्या मीटिंगला बोलावलेलं आहे. त्या वेळी डॉ. कामत आमच्याशी काय बोलले, ते तुम्हाला सांगितलं जाईल आणि मी स्वतः तुमची आणि त्यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करेन. मिसेस त्रिवेदींशीसुद्धा. पण एक गोष्ट मला इथे स्पष्ट करायला पाहिजे. या खुनाचा तपास आमच्यासाठी सीशियमच्या शोधाएवढा महत्त्वाचा नाही. सीशियम सापडणं महत्त्वाचं आहे, आणि ते गायब झाल्याला १२ तास होऊन गेलेले आहेत आणि आपल्याला त्याबद्दल काहीही माहित नाहीये.”
“मला असं वाटतंय की जर आपण खुन्यांना शोधलं, तर आपल्याला सीशियमसुद्धा मिळेल.”
“कदाचित,” तो म्हणाला, “पण माझा जो काही अनुभव आहे आणि आम्हाला एफ.बी.आय.कडून जी काही माहिती मिळालेली आहे, त्यावरून सीशियम फार लवकर हस्तांतरित केलं जातं. ते कुणा चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडण्याचा वेग फार प्रचंड असेल. आम्हाला आमचा तपास त्याहीपेक्षा जास्त वेगाने करायचा आहे, आणि आत्ता तेच करतोय आम्ही.”
“बरोबर. आणि आम्ही तुमच्या मार्गातले अडथळे आहोत.”
“मी असं म्हटलेलं नाही.”
“ठीक आहे. मी तुम्हाला १० वाजता भेटतो एजंट राजनायक.” मी फोन बंद केला.
गाडी अमोल चालवत होता आणि आम्ही आता रिगल सिनेमाजवळ होतो.
“एक काम कर,” मी म्हणालो, “गाडी पार्क कर. काहीतरी खाऊन घेऊ या आपण.”
गाडी पार्क करून आम्ही नुकत्याच उघडलेल्या कॅफे माँडेगारच्या दिशेने चालत जात असताना अमोलने माझ्यावर प्रश्नांचा भडिमार केला, “सर, काय करताय तुम्ही? तुम्ही त्याला आपल्या साक्षीदाराबद्दल खोटं का सांगितलं? काय चाललंय काय नक्की?”
“एक मिनिट अमोल,” मी म्हणालो, “पोट रिकामं असताना मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही. आपण नाश्ता करून घेऊ आणि मग मी तुला नक्की काय चाललंय ते सांगतो.”
कॅफे माँडेगार म्हणजे मुंबईमधल्या सर्वात अप्रतिम ब्रेकफस्ट मिळणार्या जागांपैकी. दोन घास पोटात गेल्यावर मी जरा शांत झालो.
“तुला काय चाललंय हे विचारायचंय ना?” मी अमोलला म्हणालो, “आपला पत्ता कट होतोय.”
“कशावरून सर?”
“कारण एन.आय.ए.ने आपल्या आधी डॉ. त्रिवेदींच्या पार्टनरला आणि त्यांच्या पत्नीलाही ताब्यात घेतलंय, आणि मी खातरीने सांगू शकतो की आपल्याला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळणार नाही.”
“पण सर, असं कुठे कोण म्हणालंय? तुम्ही त्यांच्या तोंडून असं स्पष्टपणे ऐकलंय का? सर, गैरसमज करून घेऊ नका, पण तुमच्या मनात या लोकांविषयी थोडा पूर्वग्रह आहे.”
“अच्छा! पूर्वग्रह? ठीक आहे. जस्ट वेट अँड वॉच!”
“त्या ९ वाजताच्या मीटिंगला आपण जाणार आहोत ना अजूनही?”
“हो. पण आता ती मीटिंग पुढे ढकलण्यात आलेली आहे. १० वाजता. आणि १० वाजता जर ती मीटिंग झालीच, तर आपल्यासमोर काही तुकडे टाकण्यात येतील, आणि मग ते आपल्याला म्हणतील – धन्यवाद. आता यापुढचं काम आम्ही करू. सोड रे. इथे एका माणसाचा खून झाला आहे आणि मला कोणीही माझ्या केसवरून अशा प्रकारे बाजूला काढू शकत नाही.”
“त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवा सर.”
“माझा स्वतःवर विश्वास आहे. मला एक सांग – जेव्हा २००८चा हल्ला झाला होता, तेव्हा तू कुठे होतास?”
“ट्रेनिंगमध्ये होतो सर.”
“मी फील्डमध्ये होतो आणि आयबीच्या लोकांबरोबर काम करत होतो. आयबी म्हणा, एन.आय.ए. म्हणा – मूळ वृत्ती बदलत नाही. स्थानिक पोलिसांबद्दल या लोकांना कधीच विश्वास वाटत नाही. एकीकडे आपण म्हणू शकतो की काय फरक पडतो? करू दे त्यांना तपास. पण मला फरक पडतो. माझा त्यांच्यावर विश्वास नाही, कारण त्यांना सीशियम हवंय. मला ते हरामखोर हवेत ज्यांनी डॉ. त्रिवेदींना त्यांच्या पत्नीचा फोटो दाखवून घाबरवलं आणि नंतर त्यांना गुडघे टेकायला लावून गोळ्या घातल्या.”
“पण हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे सर.”
“जो माणूस तिकडे गॅलरीपाशी मरून पडला होता, तोही याच राष्ट्राचा नागरिक आहे अमोल आणि राष्ट्रीय सुरक्षेमध्ये त्याला ठार मारणार्यांना पकडणं आणि शिक्षा देणं या गोष्टीही येतात हे विसरू नकोस.”
अमोलने मुद्दा पटल्याप्रमाणे मान डोलावली, “पण सर, मला अजूनही वाटतं, की आपण त्यांना आपल्या या साक्षीदाराबद्दल खोटं सांगायला नको होतं. त्याच्याकडून त्यांना खूप महत्त्वाची माहिती मिळू शकते. त्याने आपल्याला जे सांगितलं, त्यावरून त्यांना सापडलेली एखादी गोष्ट कन्फर्म होऊ शकते. त्यांना ते सांगण्यात काय चुकीचं आहे, ते मला अजूनही कळत नाहीये.”
“नाही,” मी नकारार्थी मान डोलावली, “तो आपला साक्षीदार आहे आणि आपण त्याची माहिती कुणालाही सांगणार नाही आहोत. तोच आपला हुकमी एक्का आहे. जर त्यांना त्याच्याशी बोलायचं असेल, तर त्यांना आपल्याला सगळी माहिती द्यावी लागेल आणि या तपासात सहभागी करून घ्यावं लागेल.”
त्याक्षणी मला काहीतरी आठवलं, “एक काम कर. पटपट खा. राजनायकचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसलेला नसणार. माझाही बसला नसता, जर मी त्याच्या जागी असतो तर. त्याच्याकडे माझा नंबर आहे. तो माझा फोन ट्रॅक करून आपल्याला गाठण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. त्याआधी आपल्याला इथून निसटलं पाहिजे.”
सुदैवाने अमोलने अजून वाद घातला नाही आणि आम्ही पुढच्या १० मिनिटांत माँडेगारमधून बाहेर पडलो.
“कुठे?” अमोलने विचारलं.
“कफ परेड. डॉ. त्रिवेदींच्या घरी.”
“सर...”
“तुला यायचं नसेल तर आत्ता सांग. मी टॅक्सीने जाईन.”
“नाही सर. मी येतोय.” त्याने गाडी चालू केली.
अलिशा त्रिवेदी जरी एन.आय.ए.ची पाहुणी असली, तरी तिच्या पतीच्या ऑडीची चावी माझ्याकडे होती. त्याच प्लास्टिक पिशवीत तिच्या घराचीही चावी होती. मी आणि सुजाता तिथे गेल्यावर आम्हाला दरवाजा उघडाच मिळाला होता, त्यामुळे या चावीचा वापर झालाच नव्हता. पण आता ती कामाला येणार होती.
त्रिवेदींच्या घरापाशी पोहोचल्यावर मी पाहिलं, तर दोन गाड्या तिथे पार्क केलेल्या होत्या. पण गेट उघडं होतं. दोन्हीही गाड्यांकडे दुर्लक्ष करत मी घराच्या दरवाजाकडे गेलो आणि चाव्यांच्या जुडग्यातली मला जी वाटली, ती चावी लॅचमध्ये घातली.
“एन.आय.ए. जिथे आहात तिथेच थांबा” मागून आवाज आला.
मी चावी फिरवली. बरोबर चावी होती.
“दरवाजा उघडू नका.”
मी वळलो आणि आमच्या दिशेने येणार्या माणसाकडे पाहिलं.
“क्राइम ब्रँच. आम्ही आमचं इथलं काम संपवायला आलोय.”
“नाही,” तो एजंट म्हणाला, “आता हा संपूर्ण भाग एन.आय.ए.च्या ताब्यात आहे आणि आम्हीच यापुढचा सगळा तपास हाताळणार आहोत.”
“अच्छा?” मी शांतपणे म्हणालो, “सॉरी. मला तुमच्या किंवा माझ्या ऑफिसकडून तसं काहीही सांगण्यात आलेलं नाही.” आणि परत दरवाजाकडे वळलो.
“दरवाजा उघडू नका,” तो एजंट पुन्हा एकदा म्हणाला, “याचा तपास आता आम्ही करतोय. तुमच्या वरिष्ठ अधिकार्यांशी बोलून घ्या हवं तर.”
मी लक्ष दिलं नाही.
“सर,” अमोल म्हणाला, “मला वाटतं आपण...”
मी त्याला थांबवलं आणि त्या एजंटकडे वळलो, “एन.आय.ए. काय? काही आयडी कार्ड वगैरे असेलच ना तुमच्याकडे?”
त्या एजंटने वैतागल्याचे भाव चेहर्यावर आणले आणि खिशातून आपलं वॉलेट बाहेर काढलं, त्याचा एक फ्लॅप उघडला आणि ते माझ्यापुढे धरलं. मी तयारच होतो. त्याचं मनगट गच्च धरून मी त्याला माझ्या दिशेने पण माझ्यापासून दूर खेचलं आणि माझ्या दुसर्या हाताने त्याचा चेहरा भिंतीवर दाबून धरला आणि त्याचा वॉलेट धरलेला हात मागे पिरगळला.
काय होतंय हे लक्षात आल्यावर त्या एजंटने वळायचा प्रयत्न केला, पण त्याआधीच मी माझ्या खांद्यांनी त्याला भिंतीवर दाबलं आणि माझ्या एका हाताने त्याच्या जॅकेटच्या खिशातल्या हातकड्या बाहेर काढल्या आणि त्याचे हात त्यात अडकवायला सुरुवात केली.
“सर! सर, काय करताय तुम्ही...” अमोल जवळजवळ ओरडलाच.
“मी बोललो होतो ना तुला. मला कुणीही माझ्या केसवरून असा झटकून टाकू शकत नाही.” मी हातकड्या लॉक केल्या आणि त्याचं वॉलेट त्याच्या हातून काढून घेतलं, आणि त्यावरचं नाव बघितलं. शशांक मेहरोत्रा. मग त्याला फिरवलं आणि तेच वॉलेट त्याच्या जॅकेटच्या एका खिशात टाकलं.
“तुझी करिअर संपली आता,” मेहरोत्रा शांतपणे म्हणाला.
“बरं.”
मेहरोत्राने अमोलकडे पाहिलं, “जर तू याला मदत केलीस, तर तुझीही करिअर बाराच्या भावात जाईल. विचार कर.”
“शट अप एजंट मेहरोत्रा,” मी म्हणालो, “बाराच्या भावात आम्ही नाही, तू जाशील, जर तू तुझ्या ऑफिसमध्ये जाऊन हे सांगितलंस की तू क्राइम ब्रँचच्या दोन अधिकार्यांना आत येऊ दिलंस.”
हे ऐकल्यावर तो गप्प बसला. मी दरवाजा उघडला आणि त्याला आत ढकललं आणि हॉलमध्ये एक खुर्ची होती, त्यावर बसवलं. “आता बस इथे आणि तोंड बंद ठेव.”
मेहरोत्राचं सर्व्हिस वेपन त्याच्या डाव्या कुशीवर असलेल्या होल्स्टरमध्ये होतं. त्याचे हात मागे अडकवलेले असल्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे मी त्याला हात लावला नाही पण त्याच्या पायांच्या जवळ त्याने दुसरी गन ठेवलेली नाहीये हे बघून घेतलं.
“आराम कर आता थोडा वेळ,”मी म्हणालो, “आम्हाला आमचं काम करू दे.”
अमोलला मी माझ्या मागे यायला सांगितलं, “तू ऑफिसमध्ये बघ आणि मी बेडरूममध्ये बघतो. जे काही सापडेल ते. आपण सगळ्या गोष्टींसाठी शोध घेतोय. जेव्हा आपल्याला ते दिसेल, तेव्हा समजेलच. कॉम्प्युटरही बघ. जर काही विचित्र दिसलं, तर मला सांग.”
“सर....”
मी मागे वळून पाहिलं. अमोल जागचा हलला नव्हता.
“आपण चूक करतोय सर. हे...हे असं करायला नको आपण...”
“मग कसं करायचं अमोल? तुझं असं म्हणणं आहे, की आपण थ्रू प्रॉपर चॅनेल जायला हवं, आपल्या बॉसने याच्या बॉसशी बोलायला हवं आणि मग त्यांच्या परवानगीची वाट पाहायला हवी? कशासाठी? आपलं काम करण्यासाठी?”
अमोलने मेहरोत्राकडे पाहिलं. तो आमच्याकडेच पाहत होता.
“सर, मला ते समजतंय, पण तुम्हाला वाटतं हा एजंट एवढ्या सुखासुखी हा सगळा प्रकार जाऊ देईल? तो तक्रार करेल आणि मग आपली नोकरीही जाऊ शकते. त्यासाठी माझी तयारी नाहीये.”
मी माझा आवाज हळू केला, “हे पाहा अमोल, असं काहीही होणार नाहीये. मला तुझ्यापेक्षा थोडा जास्त अनुभव आहे या गोष्टींचा आणि एन.आय.ए. किंवा आयबी कशा प्रकारे काम करतात, हे मला चांगलं ठाऊक आहे. त्यांच्या संपूर्ण ट्रेनिंगमध्ये एक मुद्दा त्यांच्या मनावर अगदी खोल बिंबवला जातो – काहीही झालं तरी चालेल, पण तुमच्या संस्थेची बदनामी होता कामा नये. आता मला एक सांग – एन.आय.ए.चे सगळे एजंट्स सीशियम शोधायला बाहेर आकाशपाताळ एक करताहेत, आणि हा इथे काय करतोय? तोही एकटा? इथला सगळा पुरावा तर ते घेऊन गेलेत. या घराची मालकीण त्यांच्या ताब्यात आहे. मग हा इथे या रिकाम्या घरावर पहारा का देतोय?”
अमोलच्या चेहर्यावर प्रश्नार्थक भाव आले.
“कारण त्याने याआधी काहीतरी गंभीर चूक केलेली असणार.” मी म्हणालो, “त्याची शिक्षा म्हणून त्याला एकट्याला इथे ठेवण्यात आलंय. आता मला सांग – तो परत त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगेल – की दोन क्राइम ब्रँच अधिकारी इथे आले, त्यांनी त्याची गठडी वळली आणि घराची तपासणी केली? नो वे. त्याची करिअर बाराच्या भावात जाईल त्यामुळे. तो असं काहीही करणार नाही.”
अमोल काहीच बोलला नाही.
“म्हणूनच मी म्हणतोय की ताबडतोब या घराची तपासणी करू या आणि लवकरात लवकर इथून बाहेर पडू या. जेव्हा मी पहाटे इथे आलो, तेव्हा अलिशा त्रिवेदी आम्हाला सापडली. त्यानंतर एस.एस.के.टी. हॉस्पिटलमध्ये धावावं लागलं. आता दिवसाच्या उजेडात मला या घराची नीट तपासणी करायची आहे आणि ज्या गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत, त्यांचा फेरविचार करायचा आहे. मी असंच काम करतो. लक्षात ठेवायची एक गोष्ट म्हणजे कोणताही पुरावा नसलेला क्राइम सीन ही गोष्ट अस्तित्वात नसते. गुन्हेगार जेव्हा क्राइम सीनवर वावरतो, तेव्हा काही ना काहीतरी पुरावा तो क्राइम सीनवर सोडतोच.”
“ठीक आहे सर.”
“ग्रेट!” मी त्याच्या खांद्यावर थाप मारली, “तू ऑफिसमध्ये बघ, मी बेडरूम बघतो.”
मी मास्टर बेडरूममध्ये, जिथे आम्हाला अलिशा सापडली होती तिथे गेलो. कुठलीही गोष्ट हलवलेली वाटत नव्हती. गादीजवळ गेल्यावर मूत्राचा वास येत होता.
पलंगाच्या डाव्या बाजूला असलेल्या टेबलापाशी जाऊन मी पाहिलं. तिथे फोरेन्सिकच्या लोकांनी टाकलेली काळी पावडर अजूनही होती. टेबलवर डॉ. त्रिवेदी आणि अलिशा यांचा एक फोटो होता. मी फोटोफ्रेम उचलली आणि फोटो निरखून पाहिला. दोघेही एका गुलाबाच्या झाडाच्या बाजूला उभे होते. झाडावरचे सगळे गुलाब फुललेले होते. अलिशाच्या चेहर्यावर माती लागलेली होती, पण ती हसत होती. अगदी एखाद्या आईने आपल्या बक्षीस मिळवलेल्या मुलाच्या बाजूला उभं राहून अभिमानाने हसावं तसं. हे झाड तिने लावलं आणि वाढवलं असल्याचं सांगायची गरज नव्हती. फोटो त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला घेतला असावा. या फोटोशिवाय आणखी दुसरा कोणताही फोटो तिथे सापडला नाही.
फोटो खाली ठेवून मी टेबलाचे ड्रॉवर्स तपासून पाहिले. त्यात वैयक्तिक स्वरूपाच्या अनेक गोष्टी होत्या. सगळ्या डॉ. संतोष त्रिवेदींच्या वाटत होत्या. चश्मे, पुस्तकं आणि काही औषधांच्या बाटल्या. खालचा ड्रॉवर रिकामा होता. अलिशाने संतोष इथेच आपली गन ठेवत असल्याचं सांगितलं होतं.
ड्रॉवर्स बंद करून मी बेडरूमच्या एका कोपर्यात गेलो. त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की जर तुलना करायची असेल, तर माझ्याकडे क्राईम सीनचे फोटो हवेत. ते फोटो माझ्या ब्रीफकेसमध्ये होते आणि ती आमच्या गाडीच्या डिकीमध्ये होती. फोटो आणण्यासाठी मी बाहेर आलो, तेव्हा मेहरोत्रा जमिनीवर पडलेला मी पाहिलं. तो त्याचे मागे बांधलेले हात पुढे आणण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे हातकड्या घातलेले हात त्याच्या पार्श्वभागापर्यंत आले होते, पण आता त्याचे हात आणि गुढघे काहीतरी विचित्र प्रकारे अडकले होते. माझी चाहूल लागताच त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा लाल झाला होता आणि प्रचंड घामेजला होता.
“मला सोडव.” तो म्हणाला, “मी अडकलोय.”
मी जोरात हसलो, “एक मिनिट थांब.”
बाहेर जाऊन मी फोटो घेऊन आलो. अलिशाचा ईमेलमधला फोटोही त्यात होता. मी आत आल्यावर मेहरोत्राने परत एकदा मला आवाज दिला, “सोडव मला.”
मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि बेडरूमकडे गेलो. जाता जाता पाहिलं तर अमोल डॉ. त्रिवेदींच्या ऑफिसमधले ड्रॉवर्स धुंडाळत होता, आणि काही फाइल्स त्याने टेबलवर रचून ठेवलेल्या होत्या.
बेडरूममध्ये गेल्यावर मी तो ईमेलमधला फोटो बाहेर काढला आणि त्याची आणि खोलीची तुलना करायला सुरुवात केली. कपड्यांच्या कपाटापाशी जाऊन त्याचा दरवाजा फोटोत दाखवला होता, त्याप्रमाणे उघडला. मग मी पाहिलं, तर फोटोमध्ये एक पांढरा रोब कोपर्यात असलेल्या एका खुर्चीवर ठेवला होता. मी कपाट उघडून त्यामध्ये असलेला रोब बाहेर काढला आणि तो त्या खुर्चीवर फोटोमध्ये जसा टाकला होता, तसा टाकला.
नंतर मी खोलीमध्ये ईमेलमधला फोटो जिथून काढला असेल, असं मला वाटत होतं, तिथे उभा राहिलो. आजूबाजूला पाहिलं. काही विसंगत दिसतंय का ते पाहायचा प्रयत्न केला. तेव्हा माझं लक्ष त्या डिजिटल घड्याळाकडे गेलं. ते बंद होतं. मी फोटोमध्ये पाहिलं. त्यातही ते बंद होतं.
मी घड्याळाजवळ जाऊन त्याचं निरीक्षण केलं. त्याचा प्लग काढून ठेवला होता. मी प्लग परत सॉकेटमध्ये घालून घड्याळ चालू होतंय का ते पाहिलं. ते चालू झालं. अर्थातच त्यावरची वेळ चुकीची होती. ते परत सेट करायची गरज होती.
अलिशाला हा अजून एक प्रश्न मला विचारायचा होता. जर ती मला भेटली असती तर. त्या हल्लेखोरांपैकी कुणीतरी हे केलं असणार. पण का? बहुतेक किती वाजलेत किंवा ती किती वेळ बांधलेल्या परिस्थितीत आहे हे त्यांना अलिशाला कळू द्यायचं नसेल.
मी बाकीच्या फोटोंकडे पाहायला सुरुवात केली. त्यामध्ये कपाटाचा दरवाजा थोड्या वेगळ्या प्रकारे उघडलेला होता आणि तो रोब नव्हता, कारण तो अलिशाच्या अंगावर होता. मी परत कपाटाचा दरवाजा या फोटोत होता, त्याप्रमाणे केला आणि परत एकदा सगळ्या बेडरूमकडे पाहिलं. पण कुठलीच विसंगती वाटली नाही. कुठेतरी काहीतरी चुकत होतं. ते याच खोलीत होतं, पण माझ्या लक्षात येत नव्हतं.
मी घड्याळाकडे पाहिलं, तर साडेसात वाजले होते. ती १० वाजताची मीटिंग – झालीच तर – अडीच तासांनी होती. बेडरूममधून बाहेर पडून मी किचनच्या दिशेने गेलो. जाता जाता प्रत्येक खोलीत जाऊन तिथे काही मिळतं का तेही पाहिलं.
व्यायामाची साधनं ठेवलेल्या खोलीत असलेल्या कपाटात अनेक लोकरी आणि थर्मल कपडे होते. अलिशा चेहर्यावरून हिमाचल किंवा उत्तराखंडसारख्या थंड, पहाडी प्रदेशातून आलेली असणार हा माझा तर्क बरोबर होता बहुतेक. इथे मुंबईमध्ये असल्या गरम कपड्यांची काहीही गरज नव्हती. पण या तिच्या आठवणी असणार.
कपाटाचा दरवाजा बंद करून मी आजूबाजूला पाहिलं आणि एका भिंतीकडे माझं लक्ष गेलं. भिंतीवर असलेल्या हूक्सना रबरी मॅट्स टांगलेल्या होत्या आणि त्याच्याच बाजूला एक रिकामा चौकोनी भाग होता. तिथे नक्कीच काहीतरी चिकटवलेलं असणार. चार बाजूंना असलेल्या टेपच्या खुणाही नीट ओळखू येत होत्या. एखादं पोस्टर किंवा मोठं कॅलेंडर वगैरे असणार.
तिथून मी परत हॉलमध्ये आलो, तेव्हा मेहरोत्रा अजून जमिनीवरच पडलेला होता. त्याने एक पाय सोडवला होता, पण दुसरा पाय सोडवणं काही त्याला जमलं नव्हतं. त्यामुळे त्याचे हातकड्या घातलेले हात आता त्याच्या पायांच्या मध्ये आले होते.
“आमचं काम संपतच आलंय एजंट मेहरोत्रा!” मी त्याला म्हणालो. त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
किचनच्या दरवाज्यातून मी बाहेर बागेत गेलो. अलिशाला बागकामाची प्रचंड आवड होती आणि तिला ते जमतही होतं, हे बाग बघून कळत होतं. आत्ता दिवसाच्या प्रकाशात बागेकडे पाहणं आणि रात्रीच्या किंवा पहाटेच्या अंधारात पाहणं यात फरक होताच.
किचनमध्ये परत येऊन मी दुसरा दरवाजा उघडला. हा दरवाजा गराजमध्ये उघडत होता. गराजच्या मागच्या भिंतीवर असलेल्या कपाटांमध्ये बागकामाची हत्यारं, घरकामाच्या काही वस्तू, खतांच्या पिशव्या, बियाण्यांची पाकिटं वगैरे गोष्टी होत्या. त्याच कपाटांच्या खाली एक कचर्याचा डबा ठेवलेला होता. मी तो उघडला. आतमध्ये एक प्लास्टिकची पिशवी होती आणि त्यात किचनमधला कचरा होता. पण एका बाजूला काही पेपर टॉवेल होते. त्यांच्यावर काही जांभळे डाग पडले होते. मी वास घेतला तर कसलातरी गोडसर आणि ओळखीचा वास आला. मग मला आठवलं की तो द्राक्षाच्या ज्यूसचा वास होता.
मी परत किचनमध्ये आलो तर अमोलही तिथेच होता.
“तो हात पुढे आणायचा प्रयत्न करतोय,” तो म्हणाला.
“करू दे. तुझं ऑफिसमधलं काम संपलं का?”
“जवळपास हो. मी तुम्हाला बघायला आलो.”
“ठीक आहे. तुझं काम संपव. मग आपण इथून बाहेर पडू.”
अमोल गेल्यावर मी किचनमधल्या कपाटांमध्ये पाहिलं. काहीही वेगळं असं सापडलं नाही. तेवढ्यात मला आठवलं आणि मी गेस्ट बेडरूममधल्या बाथरूममध्ये गेलो. पांढर्या टॉयलेट टँकवर जळत्या सिगरेटमुळे डाग पडला होता. जवळपास अर्ध्या सिगरेटएवढा असेल.
मला सिगरेट सोडून दहापेक्षा जास्त वर्षं होऊन गेली होती, पण अशा प्रकारे मी कधी सिगरेट ओढल्याचं मला आठवत नव्हतं. जर टॉयलेटमध्ये कुणी सिगरेट ओढत असेल, तर शक्यतो सिगरेटचं थोटूक फ्लश करण्याकडे त्या माणसाचा कल असतो. ही सिगरेट नक्कीच विसरली गेली असणार. पण सिगरेट विसरावी असं काय घडलं असेल?
तिथून निघून मी परत हॉलमध्ये आलो आणि अमोलला हाक मारली, “अमोल, झालंय का तुझं काम? निघू या आता.”
मेहरोत्रा अजूनही जमिनीवर होता पण आता तो शांत पडला होता. बहुतेक थकला असणार.
“हात सोडव माझे,” तो ओरडला.
“चावी कुठे आहे या हातकड्यांची?” मी विचारलं.
“माझ्या जॅकेटच्या डाव्या खिशात,” तो म्हणाला.
त्याच्या जॅकेटच्या खिशात हात घालून मी चाव्यांचा एक जुडगा बाहेर काढला. त्यात हातकड्यांची चावी कोणती होती ते शोधून काढलं आणि हातकड्यांच्या मधली साखळी पकडून वर ओढली.
“आता जास्त आरडाओरडा करू नकोस मी तुझे हात सोडल्यावर,” मी म्हणालो.
“साल्या xxxxxx! मी xx मारणार आहे तुझी!”
मी त्याक्षणी ती साखळी सोडून दिली. मेहरोत्राचे हात जमिनीवर आदळले.
“काय करतो आहेस तू?” तो ओरडला, “हात सोडव माझे.”
“तुला एक सल्ला देतो मी एजंट मेहरोत्रा,” मी शांतपणे म्हणालो, “पुढच्या वेळेला जेव्हा तू मला माझी xx मारायची धमकी देशील ना, तेव्हा मी तुझे हात सोडवेपर्यंत वाट पाहा.”
मी उठून उभा राहिलो आणि चाव्यांचा जुडगा खोलीच्या दुसर्या कोपर्यात भिरकावला, “तूच सोडव स्वतःला!”
अमोल माझ्यापुढे बाहेर पडला होता. मी बाहेर पडता पडता एकदा मेहरोत्राकडे पाहिलं. त्याचा चेहरा ट्रॅफिक सिग्नलसारखा लाल झाला होता.
“मी वचन देतो तुला,” तो गुरकावला, “मी धमक्या देत नाही. तुझी xx मी मारेनच. बघशीलच तू!”
मी दरवाजा लावून घेतला आणि येऊन गाडीत बसलो. अमोल आमच्या गाडीतून प्रवास करणार्या आमच्या काही पाहुण्यांसारखाच हादरलेला दिसत होता.
पुढची पाच-एक मिनिटं आम्ही कोणीच काही बोललो नाही. अमोल बहुधा आपली नोकरी आता जाणार आणि ती गेली तर काय करावं याचा विचार करत होता. मी त्याला त्यातून बाहेर काढायचं ठरवलं.
“जशी अपेक्षा होती, त्याप्रमाणे काही मिळालं नाही,” मी म्हणालो, “तुला ऑफिसमध्ये काही मिळालं?”
“नाही. तिथला कॉम्प्युटर तर ते लोक घेऊन गेले असणार.”
“मग तिथल्या डेस्कमध्ये आणि ड्रॉवरमध्ये काही होतं की नाही?”
“डॉ. त्रिवेदींच्या आणि त्यांच्या कंपनीच्या इन्कमटॅक्स रिटर्न्सची एक कॉपी होती. शिवाय एक मृत्युपत्र होतं.”
“कोणाचं?”
“डॉ. त्रिवेदींच्या वडलांचं. हा बंगला त्यांनी बांधलेला होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर तो डॉ. संतोष त्रिवेदींना मिळाला.”
“ओके.” माझ्या मनातली एक शंका यामुळे दूर झाली होती. डॉ. त्रिवेदी मेडिकल फिजिसिस्ट होते वगैरे सगळं ठीक होतं, पण कफ परेडसारख्या मुंबईमधल्या अत्यंत महागड्या आणि पॉश भागात बंगला असण्याएवढी त्यांची कमाई असेल असं मला वाटलं नव्हतं. पण जर हा बंगला वडिलोपार्जित असेल, तर मग गोष्ट वेगळी होती.
“आणि काही?”
“त्यांचा बंगला त्यांच्या नावावर आहे, पण बाकी अनेक गोष्टी कंपनीच्या नावावर आहेत, आणि कंपनीत त्रिवेदींचा हिस्सा ५२% आहे. डॉ. कामत उरलेल्या ४८%चे मालक आहेत.”
“ओके. म्हणजे त्यांचा पार्टनर हा अजूनही संशयाच्या जाळ्यात आहे. बरं, त्यांच्या रिटर्न्सवरून त्यांनी गेल्या वर्षी किती कमावले ते समजलं का?”
“कंपनीची गेल्या वर्षीची उलाढाल जवळपास ७० कोटी रुपयांची आहे. डॉ. त्रिवेदींनी जवळपास ५ कोटी रुपये गेल्या वर्षी कमावले असतील.”
“आणि अलिशा त्रिवेदी?”
“ती गृहिणी आहे. स्वतःचं उत्पन्न काही नाही.”
“ठीक आहे. आता जरा गाडी थांबव. मला एक कॉल करायचाय.”
“कोणाला?”
“जेसीपी साहेबांना.”
अमोलचा चेहरा पांढराफटक पडला, “म्हणजे आपण आत्ता जे केलं, ते तुम्ही त्यांना सांगणार?”
“सांगावंच लागेल. त्यांना बाहेरून कुठूनही कळण्यापेक्षा आपण सांगितलेलं कधीही चांगलं.” मी शांतपणे म्हणालो, “आणि काळजी करू नकोस. याची जबाबदारी माझी. तुला कुणीही हात लावणार नाही.”
अमोल काही बोलायच्या आत मी जेसीपी सरांचा नंबर लावला. त्यांनी लगेचच उचलला.
पुढची पाच मिनिटं मी बोललो. मग त्यापुढची पंधरा मिनिटं फक्त ऐकून घेतलं. अमोलसाठी मी फोन स्पीकरवर ठेवला होता.
“तुमच्यासारख्या सीनियर ऑफिसर्सनी असं वागावं हे कदापि क्षम्य नाही मिस्टर देशमुख.”
“सर, त्यांनी मला पर्याय ठेवला नव्हता. मलाही असं करावं लागलं, त्याबद्दल वाईट वाटतंय पण नाइलाज होता सर.”
“आता तुम्ही हे मला सांगितल्यावर काय अपेक्षा आहे तुमची?”
“सर, कमिशनर साहेबांना जर हे बाहेरून समजलं तर...”
“मी सांगावं अशी इच्छा आहे तुमची?”
मी काहीच बोललो नाही. अशा वेळी न बोलण्यात शहाणपणा असतो, हे मला अनुभवाने माहीत होतं.
“ओके. माझ्याकडेही एक बातमी आहे तुमच्यासाठी.”
“येस सर,” आम्ही दोघेही एकदम अॅलर्ट झालो.
“आज सकाळी ६च्या सुमारास वॉर्डन रोडच्या जवळ असलेल्या वॉर्डन व्ह्यू नावाच्या इमारतीबाहेर एक गाडी सापडलीय. टॅव्हेरा. पांढरी.”
“अलिशा त्रिवेदीची गाडी?”
“येस, आणि त्या इमारतीत तळमजल्यावर राहणार्या एका माणसाचा मृतदेहसुद्धा सापडलाय. त्याचाही खून कालच झाला असावा असं डॉक्टरांना प्रथमदर्शनी वाटतंय.”
“अजून एक खून?”
“हो. त्याचं नाव आहे अजित कालेलकर.”
“काय? अजित कालेलकर? म्हणजे ...”
“येस. द सेम अजित कालेलकर.”
माझं विचारचक्र फिरायला लागलं. सीशियम चोरीला जाणं, नंतर डॉ. त्रिवेदींचा खून, त्या वेळी तिथे टॅव्हेरा असणं, त्रिवेदींचा खून करणार्या माणसाने ‘अल्ला’ म्हणून ओरडणं आणि आता अजित कालेलकरचा खून. कालेलकर ‘हिंदू राष्ट्र’ नावाच्या कट्टर हिंदुत्ववादी साप्ताहिकाचा संपादक होता. कट्टर हिंदुत्ववादीपेक्षाही इस्लामविरोधी. त्याच्या साप्ताहिकात छापून येणारे लेख आणि बातम्या यांच्यासाठी एकच शब्द होता – प्रक्षोभक. त्याला खुनाच्या धमक्या आलेल्या होत्या हे सर्वश्रुत होतं, आणि कालेलकर असा माणूस होता, की त्याने त्याचीही बातमी बनवली होती. त्याच्यावर आणि त्याच्या साप्ताहिकावर बदनामीकारक आणि प्रक्षोभक मजकूर छापल्याबद्दल आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याबद्दल किमान तीनतरी खटले चालू होते.
या सगळ्या गोष्टी ही केस दिसते तशी साधी किंवा फक्त खुनाची नाही याकडे निर्देश करत होत्या आणि मला वाटतं आयुष्यात पहिल्यांदा मला एन.आय.ए. किंवा त्यासारख्या कुठल्यातरी केंद्रीय संस्थेचा हस्तक्षेप योग्य वाटत होता. जर ज्या लोकांनी डॉ. त्रिवेदींचा खून केला त्यांनीच अजित कालेलकरचाही खून केला असेल, तर यात दहशतवाद आणि आण्विक हल्ल्याचा अँगल होताच. पण कालेलकर एवढा मोठा माणूस होता का की इस्लामी अतिरेक्यांनी त्याचा खून करावा? का त्यांना सर्वांना दाखवून द्यायचं होतं की जर कोणी इस्लामविरोधी लिहिलं, तर त्याची काय गत होईल?
“The only reason we have put up with your cowboy methods Mr. Deshmukh, is because you have got results!” जेसीपी साहेबांच्या बोलण्याने मी भानावर आलो.
“मी सीपी सरांशी बोलेन आणि तुम्हाला डॉ. कामत आणि मिसेस त्रिवेदी यांच्याशी बोलता यावं म्हणून काय करता येईल, ते पाहीन. पण मी कोणतीही खातरी देऊ शकत नाही. विशेषतः तुम्ही एजंट मेहरोत्राशी जसे वागला आहात त्यामुळे.”
“सॉरी सर.”
“जय हिंद!” त्यांनी फोन ठेवून दिला.
अमोलने रोखून धरलेला श्वास सोडल्याचं मला ऐकू आलं, “चिअर अप अमोल,” मी म्हणालो, “आपल्या दोघांच्याही नोकर्या आहेत अजूनही.”
आता काय करायचं त्याबद्दल माझा निर्णय पक्का होत नव्हता. “एक काम कर अमोल,” मी म्हणालो, “तू मला आता इथेच सोड, आणि सरळ कालेलकरांच्या घरी जा. तिथे काही पुरावा मिळतो का ते बघ.”
“आणि सर, तुम्ही...”
“मी एन.आय.ए.च्या लोकांना भेटायला जातो. बघू या, काय होतं ते. मला फोनवर ‘तुम्हाला या लोकांना भेटता येणार नाही’ असं सांगणं वेगळं आणि मी तिथे गेल्यावर त्यांनी मला न भेटू देणं वेगळं.”
“आणि मी १० वाजताच्या त्या मीटिंगसाठी येऊ?”
“हो. तू कालेलकरांच्या घरी काही मिळालं तर मला फोन कर.”
“ओके.”
++++++++++++++++++++++++++++++++
आत्ता सकाळच्या वेळी दक्षिण मुंबईतून उपनगरांकडे जाणार्या रस्त्यांवर फारशी गर्दी नव्हती, पण तरी मला वरळीला पोहोचायला थोडा वेळ लागला. तिथल्या क्राइम ब्रँच ऑफिसमध्ये जाऊन मी एक गाडी घेऊन सी.बी.आय.च्या ऑफिसकडे निघालो. जाता जाता सुजाता आणि राजनायक या दोघांच्याही फोनवर कॉल करायचा प्रयत्न केला, पण दोघांनीही फोन उचलले नाहीत.
इमारत जरी अधिकृतरित्या सी.बी.आय. ऑफिस म्हणून ओळखली जात असली, तरी इतर केंद्रीय संस्था – आयबी आणि एन.आय.ए. यांचीही ऑफिसेस तिथे आहेत. २००८मध्ये आयबीबरोबर काम करत असताना या इमारतीबद्दल मी ऐकलं होतं, पण यायची संधी कधी मिळाली नव्हती.
खाली सिक्युरिटीवर असलेल्या माणसाने माझं आयडी कार्ड नीट तपासलं आणि मला चौदाव्या मजल्यावर जायला सांगितलं. लिफ्टचा दरवाजा उघडतो न उघडतो तोच राजनायक समोर आला. सिक्युरिटीकडून फोन गेला असणार.
“तुला निरोप मिळाला नाही असं दिसतंय,” तो म्हणाला.
“कसला निरोप?”
“ती मीटिंग रद्द झालीय त्याचा.”
“सुजाता माझ्या क्राइम सीनवर आली, त्याच वेळी खरं तर तो निरोप मला मिळाला होता. असली कोणतीही मीटिंग होणार नव्हती, बरोबर ना?”
राजनायकने माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, “तुला नक्की काय हवंय?”
“सुजाता. तिच्याशी बोलायचंय मला.”
“मी तिचा पार्टनर आहे. जे तू तिला सांगणार आहेस, ते मला सांगितलंस तरी चालेल.”
“सॉरी. फक्त तिच्याशी बोलायचंय मला.”
त्याने माझ्याकडे निरखून पाहिलं, “माझ्याबरोबर ये.” तो म्हणाला.
त्याने आपलं आयडी कार्ड वापरून एक दरवाजा उघडला आणि आम्ही आत गेलो. एक भरपूर लांब पण अरुंद कॉरिडॉर होता. राजनायकच्या मागून मी चालत होतो.
“तुझा सहकारी कुठे आहे?” त्याने विचारलं.
“क्राइम सीनवर,” मी म्हणालो. हे खोटं नव्हतं. कुठल्या क्राईम सीनवर, हे मी सांगितलं नाही, एवढंच. “शिवाय, तो इथे नाहीये हे एक प्रकारे बरंच आहे, कारण माझ्यावरचा राग तुम्ही त्याच्यावर काढणं मला आवडणार नाही.”
राजनायक अचानक वळला आणि त्याने मला थांबवलं, “तुला माहीत आहे तू काय करतो आहेस राजेंद्र? तू आमच्या तपासात अडचणी आणि अडथळे आणतो आहेस. याचे परिणाम भयंकर होणार आहेत. तुझा साक्षीदार कुठे आहे?”
मी खांदे उडवले, “अलिशा त्रिवेदी कुठे आहे? आणि डॉ. प्रसन्न कामत? ते कुठे आहेत?”
त्याने उद्वेगाने मान हलवली आणि एका पुढे जाऊन एका खोलीचा दरवाजा उघडला. अमोलने रोहितला ठेवलं होतं, त्यापेक्षा थोडी मोठी खोली होती. अचानक पाठीमागून मला कोणीतरी ढकललं आणि मी धडपडून आत पडलो. स्वतःला सावरून मागे वळलो, तेव्हा राजनायक दरवाजा बंद करताना दिसला. मी उठून दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, पण तो बंद झाला होता. मी दरवाजा जोरात वाजवला, पण दुसर्या बाजूने कोणीही दरवाजा उघडला नाही.
दरवाजा कुणीतरी उघडेल याची मी वाट पाहिली, पण पुढची १० मिनिटं कोणीही दरवाजा उघडला नाही. शेवटी मी तिथल्या एका खुर्चीवर बसून टेबलवर डोकं ठेवलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला ताबडतोब झोप लागली.
नक्की किती वेळ झाला ते मला समजलं नाही, पण कुणीतरी जोरात हलवल्यामुळे मी जागा झालो. पाहिलं तर सुजाता समोर उभी होती.
“तू काय करतो आहेस इथे?”
“चांगला प्रश्न आहे,” मी विचारलं, “तुम्ही पोलीस अधिकार्यांनासुद्धा डांबून ठेवता हे मला माहीत नव्हतं. कुठल्या कलमाखाली अटक केलीय ते मला कळेल का?”
“काहीतरी बोलू नकोस. अटक?”
“हो. तुझ्या पार्टनरने, राजनायकने मला डांबून ठेवलंय इथे.”
“मी जेव्हा आले, तेव्हा दरवाजा बंद केलेला नव्हता.”
“सोड. या फालतूगिरीसाठी वेळ नाहीये माझ्याकडे. तुमचा तपास कुठपर्यंत आलाय?”
तिने लगेचच उत्तर दिलं नाही, “तू आणि तुझी क्राइम ब्रँच एखाद्या हिर्यांच्या दुकानात घुसलेल्या चोरांसारखे वागताय. दिसेल ती काच तुम्हाला हिरा वाटतेय. झालंय असं की त्यामुळे जमिनीवर काचांचा खच पडलाय आणि आता हिरे कुठले आणि काचा कुठल्या हे कळेनासं झालंय.”
“कशाबद्दल बोलते आहेस तू?”
“अजित कालेलकर नावाच्या माणसाचा खून झालाय आणि अलिशा त्रिवेदीची गाडी त्याच्या घरासमोर सोडून दिलेली आहे, आणि पोलिसांचं म्हणणं आहे – क्राइम ब्रँचचं टू बी स्पेसिफिक – की ही हत्या दुसर्या कुठल्यातरी कारणाने झालेली असल्याची शक्यता विचारात घ्यायला पाहिजे. याचा दहशतवादाशी कुठल्याही पुराव्याशिवाय संबंध जोडणं चुकीचं आहे. तुमचे जेसीपी अमित रॉय पत्रकार परिषदेत म्हणालेत असं.”
अच्छा. म्हणजे अजित कालेलकरच्या खुनाची आणि तिथे अलिशा त्रिवेदीची गाडी मिळाल्याची बातमी एन.आय.ए.पर्यंत पोहोचली तर.
“तुला काय वाटतंय?”
“तुझ्या अजून लक्षात येत नाहीये? एवढ्या उघडपणे दिसतंय, तरीसुद्धा? अजित कालेलकर इस्लामविरोधी लिहायचा. त्याच्या ब्लॉगवर, त्याच्या साप्ताहिकात. त्याचा बदला आहे हा. जे इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी फ्रान्समध्ये चार्ली हेब्दोच्या लोकांना अद्दल घडवण्यासाठी केलं, तेच इथेही झालेलं आहे.”
“मला नाही वाटत तसं. मला वाटतं त्यांचा यामागे काहीतरी वेगळा हेतू आहे.”
“वेगळा हेतू?”
“मला एक सांग – यात तू म्हणते आहेस, तसा दहशतवादाचा अँगल असेल, तर ते स्वतःकडे लक्ष वेधून का घेताहेत? त्यांनी डॉ. त्रिवेदींना मारलं, पण अलिशाला जिवंत ठेवलं. ती पोलिसांना सांगेल याचा विचारही केला नाही?” माझ्या मनातल्या शंका एकापाठोपाठ एक बाहेर येत होत्या, “आणि आता कालेलकरला मारून अलिशाची त्यांनी चोरलेली गाडी तिथे ठेवली. म्हणजे सगळ्या जगाला कळावं की त्यांनी कालेलकरला मारलंय? २६/११च्या वेळी मुंबईमध्ये दहशतवादी घुसून त्यांनी गोळीबार करेपर्यंत पोलिसांना कळलंही नव्हतं की दहशतवादी मुंबईत शिरलेत. कुठे ते दहशतवादी आणि कुठे हे मुंबईत शिरून सीशियम असलेला IED बनवून त्याचा स्फोट घडवण्याची योजना आखणारे दहशतवादी? ज्यामुळे सगळ्या पोलीस यंत्रणेचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जाईल इतक्या पोरकट चुका ते करतील यावर तुझा विश्वास बसतो?”
“कदाचित त्यांना हे दाखवून द्यायचं असेल की मुंबईच्या संरक्षणासाठी सरकारने काहीही केलं, तरीही आम्ही आम्हाला जे हवंय ते साध्य करू शकतो,” सुजाता शांतपणे म्हणाली, “दहशतवादी जी गोष्ट करतात, त्यामागे त्यांचं काहीतरी तर्कशास्त्र असतं. आपल्याला जरी ते वेडेपणा किंवा पोरकटपणाचं वाटलं, तरी त्यांच्या नजरेत ते महत्त्वाचं असतं.”
“तू अशक्य आहेस सुजाता,” मी तिला कोपरापासून नमस्कार केला, “आपण चुकू शकतो, हे मान्य करायलाच तयार होत नाही तुम्ही लोक!”
“ते जाऊ दे. अजित कालेलकरच्या खुनाबद्दल आम्हाला समजण्याआधी तू जे काही चालवलं आहेस त्याचं काय?”
“मी ही खुनाची केस सोडवण्याचा प्रयत्न करतोय सुजाता...”
“आणि ते करताना संपूर्ण शहराला आपल्या स्वार्थी मनोवृत्तीने वेठीला धरतोयस तू.”
“तुला असं वाटतं? मला समजत नाहीये का की तुम्ही लोक काय शोधायचा प्रयत्न करताय ते?”
“अजिबात वाटत नाहीये मला असं. तुला तपास कुठल्या दिशेने चाललाय हे माहीतच नाहीये, कारण तू साक्षीदार लपवणं आणि एन.आय.ए. एजंट्सना बदडणं हेच करतो आहेस आज पहाटेपासून.”
“अच्छा. एजंट मेहरोत्राने हे शब्द वापरले का? मी त्याला बदडला वगैरे नाही...”
“तो काय म्हणाला ते महत्त्वाचं नाहीये. आम्ही इथे या शहराचं अस्तित्व धोक्यात आणणारी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करतोय आणि तू पूर्णपणे विसंगत वागतो आहेस. का करतो आहेस तू असं?”
“तुम्ही जर माझा पत्ता कट केलात, तर असले प्रश्न तुम्हाला पडणारच.” मी थंडपणे म्हणालो.
“ठीक आहे राजेंद्र,” तिचा आवाज शांत होता, “एक एन.आय.ए. एजंट म्हणून नाही, एक मित्र आणि एकेकाळचा सहकारी म्हणून मला सांग. नक्की काय करतो आहेस तू?”
“तुला ऐकायचंय? ठीक आहे. पण मी इथे, या खोलीत सांगणार नाही तुला. आपण बाहेर जाऊ या.”
“ओके” तिने अजिबात आढेवेढे घेतले नाहीत.
आम्ही दोघेही बाहेर पडलो. राजनायक आणि आणखी एक एजंट तिथे उभे होते.
“आम्ही जरा बोलायला बाहेर जातोय,” ती राजनायकला म्हणाली, आणि त्याच्या प्रतिक्रियेची वाट न पाहता पुढे गेली. मला तसंही राजनायकशी बोलायचं नव्हतंच. मीही पुढे गेलो.
आम्ही लिफ्टच्या जवळ गेलो आणि लिफ्टची वाट पाहात होतो, तेवढ्यात माझ्या मागून आवाज आला, “देशमुखसाहेब!”
कोण आहे हे पाहायला मी वळणार, तेवढ्यात माझ्या पोटात आणि चेहर्यावर दोन गुद्दे बसले. डोळ्यांपुढे एक क्षण अंधारी आली, पण एजंट मेहरोत्राला मी ओळखलं. मला काही कळण्याच्या आत त्याने मला भिंतीकडे ढकललं आणि माझ्या गालांवर दोन उलट्या हातांच्या थपडा बसल्या.
“शशांक,” सुजाता कडाडली, “काय करतो आहेस तू?”
मीही भानावर आलो होतो. त्याचा माझ्या चेहर्याकडे येणारा गुद्दा मी अडवला आणि त्याचा हात पकडून त्याला उलटं फिरवायचा प्रयत्न केला. पण सुजाता मध्ये पडली आणि तिने आम्हाला दोघांना वेगळं केलं.
“तुझ्या ऑफिसमध्ये जा,” ती मेहरोत्राला म्हणाली, “आत्ता. ताबडतोब.”
“माझ्या ऑफिसमधनं चालता हो xxxxx!” मेहरोत्रा ओरडला. हे काय चाललंय ते बघायला बरेच एजंट्स बाहेर आले.
“चला, आपापल्या कामाला जा,” सुजाता थंडपणे म्हणाली, “सिनेमा संपलाय.”
तेवढ्यात लिफ्ट आली आणि आम्ही दोघेही आत गेलो.
“ठीक आहेस तू?” तिने विचारलं.
“हो.”
“शशांक मेहरोत्रा वेड्यासारखा वागतो कधीकधी. मॅच्युरिटी नावाची गोष्ट नाहीच आहे त्याच्याकडे,” माझ्याकडे रोखून पाहत सुजाता म्हणाली.
“मला आश्चर्य वाटतंय की त्याने मी त्याला हातकड्या घातल्याचं तुमच्या ऑफिसमध्ये सांगितलं.”
“का?”
“कारण त्याला एकट्याला त्या घरात ठेवलं होतं, त्यावरून मी असा अंदाज केला होता, की त्याने नक्कीच काहीतरी मोठी चूक केली असणार आणि त्याची शिक्षा म्हणून तो तिथे आहे. त्यात आम्ही तिथे येऊन त्याच्या नाकावर टिच्चून घरात घुसल्याचं तो का कुणाला सांगेल?”
“तुला एक समजत नाहीये,” ती म्हणाली, “मेहरोत्राने चुका केल्या असतील, पण त्याला कुणीही शिक्षा म्हणून तिथे ठेवलं नव्हतं. एकतर हे सगळं प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, त्याला काहीही फरक पडत नाही, की त्याच्या नाकावर टिच्चून तुम्ही त्रिवेदींच्या घरात घुसलात. त्याने जे घडलं ते सांगितलं, कारण आमच्या तपासात त्यामुळे अडथळा येऊ नये हा त्याचा हेतू होता.”
“ओके.”
आम्ही इमारतीच्या गच्चीवर आलो होतो.
“पण तेही महत्त्वाचं नाहीये राजेंद्र. सीशियमच्या १-२ नाही, ३२ ट्यूब्ज गायब आहेत, आणि मला नाही वाटत की तुला या प्रकरणाचं गांभीर्य समजतंय. तू याकडे एक खून म्हणून बघतो आहेस. प्रत्यक्षात ही चोरीची केस आहे. पण किरणोत्सर्गी पदार्थाची चोरी. त्यांना सीशियम हवं होतं, ते त्यांना मिळालं. त्यामध्ये डॉ. त्रिवेदींचा अडथळा येईल असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी त्यांना मारलं. आता जर हे पाहिलेल्या एकमेव साक्षीदाराशी आम्हाला बोलता आलं, तर या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाऊ शकतो. कुठे आहे तो आत्ता?”
“तो सुरक्षित आहे. अलिशा त्रिवेदी आणि डॉ. कामत कुठे आहेत?”
“तेही सुरक्षित आहेत. डॉ. कामतांशी आम्ही इथे बोलतोय आणि अलिशाला आम्ही पोलीस कमिशनर ऑफिसजवळ जे एन.आय.ए. ऑफिस आहे, तिथे ठेवलंय. जोपर्यंत तिच्याकडून आम्हाला सगळी माहिती मिळत नाही तोपर्यंत.”
“ती तुम्हाला काय मदत करणार? तिने फार काही...”
“इथेच चुकतो आहेस तू. तिने आम्हाला खूप महत्त्वाची माहिती दिली आहे.”
आता मला आश्चर्याचा धक्का बसला.
“काय सांगितलं तिने? तिने तर त्यांचे चेहरेसुद्धा पाहिले नव्हते.”
“चेहरे नाही पाहिले तिने. पण एक नाव ऐकू आलं होतं तिला. ते एकमेकांशी बोलत असताना.”
“कोणतं नाव? आधी तर तसं काही बोलली नाही ती.”
सुजाताने होकारार्थी मान डोलावली, “म्हणूनच तर मी म्हणतेय की तुझ्या साक्षीदाराला आमच्या ताब्यात दे. आमच्याकडे साक्षीदारांकडून सगळी माहिती इत्यंभूत काढून घेणारे लोक आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी काढून घेता आल्या नाहीत, त्या आम्ही काढून घेऊ शकतो. जशा आम्ही त्या तिच्याकडून काढून घेतल्या.”
“काय नाव मिळालं तुम्हाला तिच्याकडून?”
तिने नकारार्थी मान हलवली, “मुळीच नाही राजेंद्र. आम्ही कोणाचंही नाव जाहीर करणार नाही आहोत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. तू इथे उपरा आहेस. आणि तू तुझ्या जेसीपी आणि सीपींच्या द्वारे या तपासात घुसण्याचा कितीही प्रयत्न केलास तरीही तुला आम्ही काहीही सांगणार नाही.”
अच्छा. म्हणजे मी जेसीपी साहेबांना जे सांगितलं, ते त्यांनी सीपी साहेबांना सांगितलं आणि त्यांनी एन.आय.ए.कडे मला अलिशा आणि डॉ. कामत यांच्याशी बोलू देण्याची विनंतीसुद्धा केली, पण या लोकांनी ती फेटाळून लावली.
“माझ्याकडे माझा साक्षीदार हीच एकमेव गोष्ट आहे,” मी म्हणालो, “तू मला अलिशाने सांगितलेलं नाव सांग, मी तुला त्याचा ठावठिकाणा सांगतो.”
“तुला त्याचं नाव का हवंय पण? तू त्याच्या जवळपासही जाऊ शकणार नाहीस.”
“मला नाव हवंय.”
तिने जरा विचार केला, “ठीक आहे. आधी तू सांग.”
“मी माझ्या घरी ठेवलंय त्याला,” मी म्हणालो, “दादरला. तुला माहीत असेलच मी कुठे राहतो ते!”
तिने लगेचच तिच्या ब्लेझरच्या खिशातून एक मोबाईल काढला.
“एक मिनिट. अलिशाने सांगितलेलं नाव काय आहे?”
“सॉरी राजेंद्र.”
“मी तुला सांगितलंय आमचा साक्षीदार कुठे आहे ते. आता कबूल केल्याप्रमाणे तू मला ते नाव सांग.”
“राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. सॉरी.”
माझा अंदाज बरोबर होता तर.
“मी खोटं बोललो,” मी थंडपणे म्हणालो, “तो माझ्या घरी नाहीये.”
तिने तिचा फोन ब्लेझरच्या खिशात ठेवून दिला. ती संतापली होती.
“काय चाललंय हे तुझं?” तिचा आवाज टिपेला गेला. तिला एवढं संतापलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं, “१३ तास झालेत ते सीशियम गायब होऊन. त्या अतिरेक्यांनी कदाचित ते IEDमध्ये ठेवलंही असेल...”
“मला नाव सांग, मी तुला आमच्या साक्षीदाराचा पत्ता सांगतो.”
“ओके,” ती धुसफुसत म्हणाली. आज मी दोनदा तिचं खोटं पकडल्याचा तिला जास्त राग आला होता बहुतेक.
“ती म्हणाली की तिने मुबीन हे नाव ऐकलं आहे. तिने आपण तिच्याबरोबर होतो, तेव्हा याबद्दल विचार केला नाही, कारण हे कुणाचं नाव असू शकेल असा विचारच तिच्या मनात आला नाही.”
“कोण आहे हा मुबीन?”
“हा पाकिस्तानी तालिबानशी संबंधित दहशतवादी आहे. तो मूळचा ताजिक आहे – रशीद मुबीन फातिम हे त्याचं खरं नाव. तो भारतात आहे, असा एफ.बी.आय.ला आणि मोसादला संशय आहे. त्यांनी आमच्याकडे त्याचे डीटेल्स पाठवले आहेत आणि आम्ही ते तपासतो आहोत. एफ.बी.आय.ला तर हाही संशय आहे, की ग्रीन्सबरोमध्ये जे सीशियम चोरीला गेलं, त्यातही मुबीनचा हात असावा, कारण त्या वेळी तो अमेरिकेत होता. तो कदाचित सीशियम काळ्या बाजारात विकत असेल, आणि ते पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरत असेल, किंवा मग सीशियमचा वापर बाँब बनवण्यासाठी करणार असेल. त्याला थांबवणं गरजेचं आहे. झालं समाधान? आता तुझ्या साक्षीदाराचा पत्ता दे.”
“एक मिनिट. तू दोन वेळा खोटं बोलली आहेस माझ्याशी.”
मी माझा मोबाइल काढला आणि इंटरनेट चालू आहे का ते पाहिलं. नंतर गूगलमध्ये रशीद मुबीन फातिम हे नाव टाकलं. त्याच्याशी संबंधित अनेक बातम्या माझ्या मोबाइलच्या स्क्रीनवर आल्या. सर्वात जुनी बातमी ८ वर्षं जुनी होती. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये या माणसाचा सहभाग असल्याचा संशय होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो भारतात असल्याचा उल्लेख कुठेही नव्हता.
“कुठेही तो भारतात असल्याचा उल्लेख नाहीये,” मी म्हणालो.
“अर्थात. हे आमच्याशिवाय कुणालाही माहीत नाहीये. त्याचमुळे तिने दिलेली माहिती खरी आहे हे आम्हाला समजलं.”
“काय? तिच्यावर तुमचा एवढा विश्वास आहे? आपल्यासमोर तिला हे काहीही आठवलं नव्हतं, आणि तुम्ही तिच्याकडून हे नाव ऐकल्यावर हा निष्कर्ष काढून मोकळे झालात की तो या देशात आहे आणि या सगळ्या प्रकरणात त्याचा सहभाग आहे?”
“एक मिनिट. तो आपल्या देशात आहे हे आम्हाला खातरीलायक माहीत आहे. त्याला आयबीच्या चेकपोस्टवर स्पॉट केलेलं आहे. नेपाळमधून तो उत्तर प्रदेशातल्या सुनौलीमध्ये आणि तिथून गोरखपूरला आला आणि तिथून लखनौला गेला, तिथून दिल्लीला गेला आणि मग तिथून विमानाने मुंबईला आला. त्याच्याबरोबर दुबईचा नागरिक असलेला अली सकीब नावाचा दुसरा माणूस आहे. तो अल कायदाशी संबंधित आहे असा दुबई पोलिसांना संशय आहे. मोसादने आम्हाला ही टिप दिली. या दोघांनाही मोसादच्याच एजंट्सनी काठमांडूला स्पॉट केलं होतं.”
“आणि त्यांच्याकडे सीशियम आहे, असा तुम्हाला संशय आहे?”
“ते नक्की माहीत नाही, पण सकीब डनहिल सिगरेट्स ओढतो अशी खातरीलायक माहिती आहे आणि....”
“अच्छा. म्हणून तुम्ही ती सिगरेटची राख तपासताय.”
“हो.”
मला अचानक प्रचंड ओशाळल्यासारखं झालं.
“सॉरी. आधी माहिती न सांगितल्याबद्दल,” माझी मान खाली होती, “त्याला आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनजवळ असलेल्या ग्रीन्स नावाच्या हॉटेलमध्ये ठेवलाय. रूम नंबर ३०२. राजीव कपूर या नावाने. त्याचं खरं नाव रोहित खत्री आहे.”
“धन्यवाद!”
“आणि आणखी एक.”
“काय?”
“त्याने आम्हाला हे सांगितलंय की गोळ्या झाडण्याआधी तो मारेकरी अल्ला असं ओरडला होता.”
तिने उद्वेगाने मान हलवत फोन ब्लेझरच्या खिशातून बाहेर काढला आणि एक नंबर डायल केला आणि ही माहिती सांगितली.
कॉल संपवून जेव्हा तिने माझ्याकडे पाहिलं, तेव्हा तिच्या नजरेत मला संतापाऐवजी निराशा आणि कीव अशा भावना दिसल्या.
“काही होण्याआधी या लोकांना आपल्याला थांबवायला पाहिजे.” ती म्हणाली, “मी जाते आता. सीशियम मिळेपर्यंत मी एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन्स आणि मॉल्ससारख्या जागांपासून लांब राहीन.”
ती वळली आणि जायला लागली. तिच्या पाठमोर्या आकृतीकडे मी बघत असताना माझा फोन वाजला.
मी पाहिलं, तर अनोळखी नंबर होता. मी फोन उचलला.
“राजेंद्र देशमुख बोलतोय.”
“सर, मी राजश्री शेळके बोलतेय.”
मला पटकन लक्षात आलं नाही. मग एकदम ट्यूब पेटली. अमोलची पत्नी.
“बोला.”
“सर, अमोल तुमच्याबरोबर आहे का? त्याचा फोन उचलत नाहीये तो.”
“नाही. तो दुसरीकडे आहे. काही निरोप द्यायचा आहे का?”
“हो सर. मला आज लवकर ड्युटीवर रिपोर्ट करायला सांगितलंय.”
अमोलची पत्नी जसलोक हॉस्पिटलमध्ये नर्स होती, हे मला माहीत होतं.
“त्यामुळे मी निघाले आहे. काहीतरी इमर्जन्सी आहे बर्न वॉर्डमध्ये. कुणीतरी ARS असलेला पेशंट आलाय म्हणे. त्यामुळे कदाचित माझा फोन त्याला लागू शकणार नाही, कारण किती वेळ लागू शकेल ते माहीत नाही.”
“अच्छा.”
“हो सर. रेडिएशन बर्न्सचं काहीच सांगता येत नाही. अमोलला सांगाल ना...”
“एक मिनिट,” माझ्या आजूबाजूचे आवाज ऐकू येणं अचानक बंद झालं. निदान मला तसं वाटलं.
“तुम्ही काय म्हणालात? रेडिएशन बर्न्स?”
“हो सर. मला डॉक्टरांनी जे सांगितलं, त्यावरून केस क्रिटिकल आहे खूप.”
“तुम्ही अजूनही जसलोकमध्येच काम करता ना?”
“हो सर, पण...”
“ARS म्हणजे काय?”
“Acute Radiation Syndrome, पण ...”
“थँक्स. मी सांगेन अमोलला.” मी फोन ठेवून दिला.
मी जेव्हा सुजाताला गाठलं, तेव्हा ती लिफ्टमध्ये शिरतच होती.
No comments:
Post a Comment