आम्ही दोघेही उतरलो आणि धावतच त्या घराच्या दिशेने गेलो. घर म्हणजे एक बंगला होता आणि तो पूर्णपणे अंधारलेला होता. प्रकाशाचा अगदी एक किरणसुद्धा दिसत नव्हता. घराच्या दरवाजावर असलेला दिवासुद्धा बंद होता. मी जेव्हा दरवाजाजवळ येऊन दरवाजाला अगदी हळू धक्का दिला, तेव्हा दरवाजा उघडला.
त्याक्षणी प्रतिक्षिप्त क्रियेने आम्हा दोघांचीही सर्व्हिस वेपन्स आम्ही आमच्या हातात घेतली आणि मी अगदी हलक्या हाताने दरवाजा उघडला. आत अंधार होता. भिंतीवरून हात फिरवत मी लाइट स्विच शोधून काढला आणि दाबला. एक ट्यूब लाइट चालू झाला. आम्ही दोघांनी आजूबाजूला पाहिलं. एका श्रीमंत घराचा हॉल होता आणि वस्तू जागच्या जागी दिसत होत्या. एखादी झटापट वगैरे झाल्याची चिन्हं दिसत नव्हती.
“मिसेस त्रिवेदी!” सुजाताने जोरात हाक मारली. काहीही प्रतिसाद आला नाही. “डॉ. त्रिवेदी आणि त्यांची पत्नी एवढेच लोक घरात असतात ... असायचे,” ती मला हलक्या आवाजात म्हणाली, “मिसेस त्रिवेदी!” तिने परत एकदा हाक मारली. पण घराच्या कुठल्याही कोपर्यातून आवाज आला नाही. मी इकडेतिकडे पाहिल्यावर मला उजव्या बाजूला एक कॉरिडॉर दिसला. मी त्या दिशेने गेलो. तिथे आणखी एक स्विच होता. तो दाबल्यावर कॉरिडॉरमधला लाइट लागला आणि कॉरिडॉरमध्ये काय आहे ते दिसलं. चार बंद दरवाजे होते आणि एक बर्यापैकी मोठा कोनाडा होता. कोनाड्यात एक कॉम्प्युटर टेबल, खुर्ची, एक डेस्कटॉप कॉम्प्युटर आणि प्रिंटर ठेवलेले होते. हे डॉ. त्रिवेदींचं घरातलं ऑफिस असणार. सुजाता आणि मी त्या बंद दरवाजांच्या आड काय आहे ते बघायला सुरुवात केली. एक गेस्ट बेडरूम होती आणि एका दरवाजाच्या पलीकडे व्यायामाची उपकरणं – डम्बेल्स, ट्रेडमिल, सायकल वगैरे ठेवली होती. भिंतीवर व्यायाम किंवा योगासनं करताना वापरायच्या चटया टांगल्या होत्या. तिसरा दरवाजा म्हणजे बहुतेक गेस्ट बाथरूम होती.
“ही बहुतेक मास्टर बेडरूम असणार,” मी म्हणालो आणि चौथा दरवाजा उघडला. आतमध्ये अंधार होता. मी परत एकदा भिंतीवर हात फिरवून चाचपडत लाईट लावला आणि आमचे दोघांचेही डोळे विस्फारले. समोर एका मोठ्या किंगसाइज बेडवर एक स्त्री हातपाय बांधलेल्या अवस्थेत पडलेली होती. तिचे हात मागे ताणून पायांबरोबर बांधण्यात आले होते. त्याक्षणी माझ्या हेही लक्षात आलं की तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. ती पूर्णपणे नग्न होती. सुजाता ती जिवंत आहे की नाही हे बघायला धावली. या खोलीला आणखी एक दरवाजा होता. मी तो उघडायचा प्रयत्न केला, पण तो बंद होता. बहुतेक बाहेरून कुलूप लावलेलं असावं. मी वळल्यावर पाहिलं, तर सुजाताने या स्त्रीचे – मिसेस त्रिवेदीचे हात-पाय मोकळे केले होते. इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल साधनांच्या वायर्स बांधायला जे प्लास्टिकचे स्नॅप टाईज वापरतात, ते वापरून बांधलं होतं तिला. सुजाताने पलंगावरची चादर ओढून तिच्या अंगावर टाकली.
“जिवंत आहे?”
“हो. पण बेशुद्ध आहे. किती वेळ कोण जाणे.” सुजाता तिच्या मनगटांना मालिश करत होती. रक्तप्रवाह थांबल्यामुळे तिचे हात जवळपास जांभळे पडले होते. एक विचित्र वास – बहुतेक मूत्राचा – येत होता.
“अरे, असा उभा का राहिला आहेस? काहीतरी मदत कर. डॉक्टर वगैरे बोलाव.” सुजाता म्हणाली. मी जरा ओशाळलो आणि त्या खोलीच्या बाहेर जाऊन कंट्रोल रूमला फोन केला आणि इमर्जन्सीसाठी असलेल्या मेडिकल टीमला पाठवायला सांगितलं.
“दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पोहोचताहेत डॉक्टर,” मी आत येत म्हणालो.
माझ्या मनात आता विचारचक्र फिरायला लागलं होतं. आता आम्हाला एक साक्षीदार मिळाली होती. ती जेवढ्या लवकर शुद्धीवर येऊन आम्हाला काय घडलंय हे सांगेल, तेवढं आमच्यासाठी आणि या केससाठी चांगलं होतं.
मला कण्हण्यासारखा आवाज ऐकू आला आणि मी भानावर आलो. मिसेस त्रिवेदी शुद्धीवर येत होती.
तिने पहिल्यांदा डोळे उघडले आणि मग इकडे तिकडे पाहिलं.
“मिसेस त्रिवेदी, मी सुजाता,” सुजाता म्हणाली, “एन.आय.ए.मधून आले होते मी तुम्हाला भेटायला. आठवतंय का?”
“अं? हे..हे काय आहे? आणि संतोष... संतोष कुठे आहे?"
तिने उठून उभं राहायचा प्रयत्न केला. पण आपल्या अंगावर फक्त एक चादर असल्याची जाणीव तिला झाली असावी बहुतेक. तिने ती चादर अजून घट्टपणे स्वतःभोवती लपेटून घ्यायचा प्रयत्न केला. पण तिची बोटं आखडली असावीत. सुजाताने तिच्या अंगावरची चादर सारखी केली.
“संतोष कुठे आहे?”
सुजाताने माझ्याकडे पाहिलं.
“मिसेस त्रिवेदी, तुमचे पती इथे नाहीयेत,” मी म्हणालो, “मी सुपरिटेंडेंट राजेंद्र देशमुख, मुंबई क्राइम ब्रँच. आणि या सुजाता सप्रे, एन.आय.ए. आम्ही तुमच्या पतींना काय झालंय ते शोधून काढायचा प्रयत्न करतोय.”
तिने माझ्याकडे अनोळखी नजरेने पाहिलं, पण सुजाताकडे पाहिल्यावर तिच्या डोळ्यांत ओळख आली, “तुम्हाला ओळखते मी. तुम्ही आमच्या घरी सावधगिरीचा इशारा द्यायला आलेलात. काय चाललंय? संतोष इथे आलेल्या लोकांच्या ताब्यात आहे का?”
सुजाताने तिला जवळ घेतलं आणि अत्यंत शांत आणि प्रेमळ आवाजात ती म्हणाली, “मिसेस त्रिवेदी – अलिशा, बरोबर? तुम्ही – तू जरा शांत हो. आपण बोलू आणि आम्ही तुला मदत करू. तुला कपडे घालायचे असतील ना?”
अलिशा त्रिवेदीने होकारार्थी मान डोलावली.
“ठीक आहे. आम्ही इथून बाहेर जातो,” सुजाता म्हणाली, “तू कपडे बदल आणि आम्ही तुझ्यासाठी बाहेर थांबतो. मला एक सांग – तुला काही शारीरिक दुखापत वगैरे झाली...”
“कुणी तुमच्यावर बळजबरी वगैरे करायचा प्रयत्न केलेला नाही ना मिसेस त्रिवेदी?” सुजाता थेट प्रश्न विचारायला लाजत होती असं वाटल्यामुळे मी विचारलं.
“नाही,” ती मान खाली घालून म्हणाली, “त्यांनी फक्त मला माझे कपडे काढायला लावले.”
“ठीक आहे,” सुजाता म्हणाली, “आम्ही बाहेर थांबतो. आम्ही इकडे एक मेडिकल टीम बोलावली आहे. ते तुझी तपासणी करतील.”
“मी ठीक आहे,” अलिशा म्हणाली, “माझ्या नवर्याला काय झालंय?”
“त्याबद्दल खातरी नाहीये आमची,” मी म्हणालो, “तुम्ही कपडे बदलून बाहेर या. आम्ही तुम्हाला काय झालंय ते सांगतो.”
ती तिच्या अंगाभोवती असलेली चादर घट्ट लपेटून घेत अडखळत उभी राहिली. ती उभी राहिल्यामुळे गादीवर पडलेला डाग मला दिसला. एकतर तिला प्रचंड भीती वाटली असणार, किंवा मग निसर्गापुढे तिचा नाइलाज झाला असणार.
तिने तिच्या कपड्यांच्या कपाटाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आणि तिचा तोल गेला. सुजाताने पुढे होत तिला सावरलं.
“सांभाळ.” सुजाता म्हणाली.
“मी ठीक आहे. फक्त डोकं थोडं गरगरतंय,” ती म्हणाली, “किती वाजलेत?”
तिच्या पलंगाजवळ असलेल्या डिजिटल घड्याळाकडे माझं लक्ष गेलं. त्याच्या स्क्रीनवर काहीही दिसत नव्हतं. बंद केलं असावं किंवा मग त्याची वायर काढून ठेवली असेल. मी माझ्या मनगटी घड्याळाकडे पाहिलं, “रात्रीचा एक.”
तिचं अंग ताठरलं, “ओ माय गॉड! अनेक तास उलटलेत! संतोष कुठाय?”
“तू कपडे बदल,” सुजाता म्हणाली, “मग आपण त्याबद्दल बोलू.”
ती त्या कपड्यांच्या कपाटाकडे गेली आणि तिने कपाटाचा दरवाजा उघडला आणि हँगरला लावलेला एक पांढर्या रंगाचा रोब हातात घेतला.
मी बाहेर आलो. सुजाताही दरवाजा बंद करत बाहेर आली.
“काय वाटतंय तुला?” तिने मला आम्ही बाहेर हॉलमध्ये आल्यावर विचारलं.
“आपल्या सुदैवाने आपल्याला एक साक्षीदार मिळालेली आहे.” मी म्हणालो, “ती आपल्याला काय घडलंय ते सांगू शकेल.”
“हो. अशी आशा करू शकतो.”
अलिशा कपडे बदलून बाहेर येईपर्यंत मी तिच्या घरात आणि घराभोवती एक चक्कर मारायचं ठरवलं. आत्तापर्यंत पाहिलेल्या सगळ्या खोल्या, घराची मागची बाजू आणि गराज. गराज दोन गाड्या राहू शकतील एवढं मोठं होतं, पण रिकामं होतं. जर डॉ. त्रिवेदींच्या ऑडीव्यतिरिक्त आणखी एखादी गाडी यांच्याकडे असेल, तर ती इथे नव्हती. मी परत एकदा कंट्रोल रूमला फोन केला आणि एक फोरेन्सिक टीम इथे पाठवायला सांगितलं. नंतर मी जेसीपी साहेबांना फोन केला आणि त्यांना आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या.
“ओके. म्हणजे मला आता माझ्या वरच्या लोकांना उठवायला पाहिजे,” ते म्हणाले,” या एन.आय.ए., आयबी वगैरे लोकांशी बोलताना एक गोष्ट लक्षात ठेव. जेव्हा ते तुला जे ऐकायला हवं असेल ते सांगायला सुरुवात करतात, तेव्हा सावध राहा.”
“येस सर. मी तुम्हाला अपडेट करत राहीन सर!”
मी घरात परत आलो आणि पाहिलं तर सुजाता फोनवर बोलत होती आणि मी यापूर्वी न पाहिलेला एक माणूस हॉलमधल्या सोफ्यावर बसला होता. मला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला आणि त्याने आपला हात पुढे केला, “हाय राजेंद्र! मी वर्धन. वर्धन राजनायक. सुजाता माझी पार्टनर आहे.”
तो ज्या पद्धतीने हे म्हणाला, त्यावरून मला जे काही समजायचं ते समजून गेलं. तो मला हे सांगायचा प्रयत्न करत होता, की आता तो आल्यामुळे सगळे निर्णय वगैरे त्याचा सल्ला घेऊनच होतील. मग ते तिला मान्य असो वा नसो.
“अरे वा! तुम्ही एकमेकांची ओळख करून घेतलीत!” सुजाताचं फोनवरचं बोलणं संपलं होतं.
“काय आहे लेटेस्ट अपडेट?” राजनायकने विचारलं.
“मी इथल्या आयबी ऑफिसशी बोलत होते. तेही आपल्याबरोबर आहेत यात. ते तीन टीम्स पाठवताहेत. या टीम्स डॉ. त्रिवेदी ज्या कोणत्या हॉस्पिटल्समध्ये जायचे, त्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन चेक करतील की ते आज तिथल्या हॉट लॅब्जमध्ये गेले होते किंवा नाही.”
“हॉट लॅब्ज? म्हणजे जिथे हे किरणोत्सर्गी पदार्थ ठेवले जातात तिथे?”
“बरोबर.” राजनायक म्हणाला, “डॉ. त्रिवेदी मुंबईमधल्या जवळपास सगळ्या महत्त्वाच्या हॉस्पिटल्समध्ये जायचे. त्यामुळे ते त्यातल्या नक्की कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेले होते, ते शोधून काढायला पाहिजे.”
त्यांचं काम मी सोपं करू शकलो असतो. जेव्हा डॉ. त्रिवेदींचा खून झाला, तेव्हा एस.एस.के.टी. हॉस्पिटलचं आयडी कार्ड त्यांच्या गळ्यात होतं. सुजाता आणि राजनायकला हे अजून माहीत नव्हतं, आणि मीही त्यांना हे योग्य वेळ आल्याशिवाय सांगणार नव्हतो. या केसची दिशा एका खुनाच्या तपासावरून किरणोत्सर्गी पदार्थांकडे बदलायला लागली होती, आणि जर मी ही माहिती आत्ता सांगितली असती, तर या तपासातून माझा पत्ता कट झाला असता, हे उघड होतं. मी एक चान्स घ्यायचं ठरवलं.
“क्राइम ब्रँचचं काय?”
“क्राइम ब्रँच?” सुजाताच्या आधी राजनायक बोलला, "म्हणजे तुला म्हणायचंय की तुझं काय, बरोबर?”
“हो. तसं म्हण. माझा काय रोल आहे या सगळ्यात?”
“काळजी करू नकोस राजेंद्र,” तो माझ्याकडे रोखून पाहात म्हणाला, “तू आमच्याबरोबर आहेस. शेवटी आपण एकाच टीममधले लोक आहोत, बरोबर?”
“धन्यवाद. हेच ऐकायचं होतं मला,” मी म्हणालो. जेमतेम ५ मिनिटांपूर्वी जेसीपी सरांनी सांगितलेल्या गोष्टीचा प्रत्यय येत होता.
राजनायक काहीतरी बोलणार, तेवढ्यात अलिशा त्रिवेदी हॉलमध्ये आली. तिच्या अंगावर तोच पांढरा रोब होता. तिने बहुतेक केस विंचरले होते आणि चेहराही धुतला होता. ती दिसायला सुंदर असल्याची जाणीव मला तेव्हा झाली. उंच सुजाता आणि धिप्पाड राजनायकपुढे ती अगदीच छोटी वाटत होती. तिच्या चेहर्याच्या ठेवणीवरून ती बहुतेक हिमाचल किंवा उत्तराखंडसारख्या पहाडी भागातली असावी असा मी अंदाज केला. ती आत आल्यावर सुजाताने तिची आणि राजनायकची ओळख करून दिली.
“माझा नवरा कुठे आहे?” तिने बसल्यावर पहिला प्रश्न विचारला. मगाशी आमच्याशी बोलताना जो तिचा आवाज होता, त्यापेक्षा हा आवाज वेगळाच होता. तेव्हा परिस्थितीही वेगळी होती. सुजाता तिच्या शेजारी बसली आणि राजनायक एक खुर्ची घेऊन त्यावर बसला. मी मात्र उभाच राहिलो. तसंही मला प्रश्न विचारताना बसायला आवडत नाहीच.
“मिसेस त्रिवेदी”, मी सुरुवात केली, “मी एक पोलीस अधिकारी आहे. मी इथे आलोय कारण आम्हाला एक मृतदेह मिळालाय, आणि तो तुमच्या पतींचा आहे. आय अॅम सॉरी!”
हे ऐकल्यावर एक सेकंद तिने माझ्याकडे पाहिलं. बहुतेक मी काय बोलतोय ते तिच्या मेंदूपर्यंत पोहोचलं नसावं. पण तिचं डोकं पुढे झुकलं आणि आपले हात चेहर्यावर ठेवून ती हमसून हमसून रडायला लागली. सुजाताने तिच्या पाठीवर हात ठेवला आणि तिला थोपटायला सुरुवात केली. राजनायक आतमध्ये जाऊन पाण्याचा ग्लास घेऊन आला. ती पाणी पीत असताना मी तिचं निरीक्षण करत होतो. तिच्या डोळ्यांमधून अश्रू ओघळत होते. मी आजवर किमान १०० जणांना तरी त्यांच्या निकटवर्तीय लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी दिली असेल, पण प्रत्येक वेळी मला ते सर्वात कठीण गोष्टींपैकी वाटत आलेलं आहे. माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी मला जेव्हा समजली होती, तेव्हा मीही बधीर आणि सुन्न होऊन गेलो होतो.
बराच वेळ आम्ही कोणीच काही बोललो नाही. त्याच वेळी दरवाजावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला. मेडिकल टीमचे लोक बाहेर उभे होते. त्यांना आत घेऊन मी त्यांची अलिशाशी ओळख करून दिली आणि राजनायक आणि सुजाताला आत बोलावलं.
“काही सजेशन्स?”
“तू प्रश्न विचार,” राजनायक म्हणाला, “तुला अनुभव आहे. आम्हाला काही वाटलं तर आम्ही विचारू.”
“ठीक आहे.” मी म्हणालो. सुजाता काहीच बोलली नाही.
आम्ही तिघेही बाहेर आलो. डॉक्टरांनी अलिशाला एक गोळी दिल्याचं मी पाहिलं. एक नर्स तिच्या हातांवरच्या जांभळ्या पडलेल्या व्रणांवर क्रीम लावत होती आणि दुसरी नर्स तिचं ब्लड प्रेशर बघत होती. तिच्या मानेवर आणि एका उजव्या हाताच्या मनगटावर बँडेज लावलेलं मी पाहिलं.
तेवढ्यात मला फोन आला आणि मी परत बाहेर गेलो. राजनायक आणि सुजाता कुठेतरी गायब झाले होते. काय खलबतं करत असतील दोघे? फोन बघितला तर अमोलचा होता.
“बॉडी नेली का तिथून?”
“हो. पोस्टमॉर्टेमसाठी. फोरेन्सिकवालेही काम संपवून गेले.”
मी त्याला मला आत्तापर्यंत कळलेल्या गोष्टी सांगितल्या. एन.आय.ए.ला या केसमध्ये वाटत असलेला रस आणि डॉ. संतोष त्रिवेदी हाताळत असलेल्या किरणोत्सर्गी पदार्थांबद्दल त्याला सांगितल्यावर तोही विचारात पडला.
“एक काम कर. या गॅलरीच्या आजूबाजूला चौकशी करायला सुरुवात कर. कुणीतरी काहीतरी पाहिलेलं असेल.”
“आत्ता? एवढ्या रात्री? लोक झोपलेले असतील.”
“मग त्यांची झोपमोड कर. काही फरक पडत नाही.”
अमोलने थोडं कुरकुरत फोन ठेवला. पण तसंही क्राइम सीनवरच्या फ्लडलाईट्समुळे, जनरेटरमुळे आणि तिथे पोलिसांच्या एवढ्या गाड्या पाहून तिथे राहणार्यांची झोप थोडीफार उडाली असणारच होती. आणि आत्ताच, लोकांची स्मरणशक्ती शाबूत असताना त्यांना विचारणं कधीही चांगलं.
मी परत जेव्हा हॉलमध्ये आलो, तेव्हा मेडिकल टीम आपलं काम आवरून निघायच्या बेतात होती. त्यांनी मला सांगितलं की अलिशा शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित आहे आणि तिला झालेल्या जखमा किरकोळ आहेत. त्यांनी तिला एक गोळी दिलेली मी पाहिलं होतंच. त्यामुळे आता घाई करणं गरजेचं होतं, कारण जर तिला त्या गोळीमुळे झोप आली असती, तर मग माझ्या तपासाला खीळ बसली असती.
सुजाता अलिशाच्या शेजारी बसली होती आणि राजनायक त्याच्या खुर्चीवर. मीही आणखी एक खुर्ची घेतली आणि अलिशाच्या समोर बसलो.
“मिसेस त्रिवेदी, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. तुम्ही आत्ता कुठल्या मनःस्थितीत आहात, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण हे ज्याने कुणी केलंय त्याला किंवा त्यांना पकडणं आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही बोलण्याच्या मनःस्थितीत येईपर्यंत थांबणं आम्हाला खरंच शक्य नाही, आणि त्याबद्दल मी परत एकदा तुमची माफी मागतो. पण आम्हाला तुम्हाला आत्ताच प्रश्न विचारायचे आहेत.”
तिने समजल्याप्रमाणे मान डोलावली.
“ठीक आहे,” मी म्हणालो, “तुम्ही सुरुवातीपासून सांगा.”
“दोन माणसं,” ती हुंदका आवरत म्हणाली, “मी त्यांचे चेहरे कधीच पाहिले नाहीत. दरवाजा वाजला. मी दरवाजा उघडला तेव्हा कुणीच नव्हतं. मग मी जेव्हा दरवाजा बंद करायला गेले, तेव्हा ते अचानक आले. त्यांच्या चेहर्यावर मास्क्स होते आणि डोक्यावरही स्वेटशर्टला असतं तसं हूड होतं. त्यांनी मला आत ढकललं आणि दरवाजा लावून घेतला. त्यातल्या एकाने माझ्या गळ्यावर धारदार चाकू ठेवला आणि मी जर त्यांच्या सांगण्याप्रमाणे केलं नाही, तर माझा गळा कापून मला ठार मारण्याची धमकी दिली.”
अच्छा. तिच्या मानेवर झालेली जखम याच्यामुळे होती.
“हे सगळं किती वाजता घडलं?” मी विचारलं.
“संध्याकाळी ६-६.३० वाजता,” ती आठवण्याचा प्रयत्न करत होती, “मी जेवणाची तयारी करत होते. संतोष साधारणपणे ७ वाजता घरी येतो आणि जर काही जरुरी काम असलं आणि उशीर होणार असेल तर फोन करतो.”
ती परत आपला चेहरा हातांच्या ओंजळीत धरून रडायला लागली. तिचा आवाज जडावत असल्याचं मला जाणवत होतंच. लवकरात लवकर पुढचे प्रश्न विचारायचे होते मला.
“त्या माणसांनी काय केलं मिसेस त्रिवेदी?”
“त्यांनी मला फरफटत बेडरूममध्ये नेलं आणि पलंगावर ढकललं. त्यांच्यातल्या एकाने मला माझ्या अंगावरचे कपडे काढायला लावले आणि मग त्यांनी – त्यांच्यातल्या एकाने मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी घाबरले होते. मला वाटतं मी काहीतरी बोलले आणि मग त्याने मला थप्पड मारली आणि तो माझ्यावर ओरडला. मी रडायला लागले. त्याने मला शांत होऊन त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितली.”
“काय विचारलं त्याने तुम्हाला?”
“नाही, मला आठवत नाहीये. मी...मी खूप घाबरले होते.”
“आठवायचा प्रयत्न करा मिसेस त्रिवेदी. आम्हाला त्यांचा शोध घ्यायला मदत होईल.”
“त्याने मला विचारलं... घरात गन आहे का आणि...”
“एक मिनिट,” मी तिला थांबवलं, “आपण हळूहळू पुढे जाऊ. त्याने तुम्हाला विचारलं, की घरात गन आहे का. तुम्ही काय उत्तर दिलं त्याला?”
“मी हो म्हणाले,” तिने हुंदका दिला, “मी... मी खूप घाबरले होते. त्याने मला विचारलं की गन कुठे ठेवली आहे आणि मी सांगितलं की पलंगाच्या बाजूला जो ड्रॉवर आहे, तिथे. तुम्ही आम्हाला सावधगिरीचा इशारा दिल्यावर संतोषने ती गन घेतली होती.” ती सुजाताकडे पाहत म्हणाली.
“पण ते तुम्हाला त्याच गनने ठार मारतील अशी भीती तुम्हाला वाटली नाही का?” मी विचारलं, “तुम्ही का सांगितलंत त्यांना?”
“मला खूप भीती वाटत होती,” ती खाली मान घालून म्हणाली, “मी तिथे पलंगावर बसले होते. अंगावर काहीही नव्हतं. मला वाटलं की ते माझ्यावर बलात्कार करतील. मला त्याक्षणी काय वाटत होतं हे मला आत्ता आठवत नाहीये.”
मी मान डोलावली, “त्यांनी तुम्हाला आणखी काय विचारलं?”
“गाडीच्या चाव्या कुठे आहेत. मी तेही सांगितलं त्यांना.”
“तुमची गाडी?”
“हो. टॅव्हेरा. गराजमध्ये होती. चावी किचन काउंटरवर असते.”
“मी गराजमध्ये पाहिलं. रिकामं आहे.”
“ते घेऊन गेले असणार.”
राजनायक उभा राहिला, “तुमची गाडी आपल्याला शोधायला हवी मिसेस त्रिवेदी. गाडीचा नंबर सांगा मला.”
“मला असा आठवत नाहीये. गाडीच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये लिहिलेला असेल.”
“गाडी कोणाच्या नावावर आहे?”
“माझ्याच.”
“ठीक आहे. आम्ही शोधून काढू,” असं म्हणून तो फोन करण्यासाठी किचनमध्ये गेला.
“आणखी काय विचारलं त्यांनी तुम्हाला?” मी आमची प्रश्नोत्तरं परत चालू केली.
“त्यांना आमचा कॅमेरा हवा होता. माझ्या नवर्याला फोटोग्राफीची खूप आवड आहे...होती. तो फोटो काढायचा आणि त्याच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड करायचा. मी त्यांना सांगितलं की कॅमेरा त्याच्या ऑफिसमध्ये असेल. मी एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिल्यावर ते प्रश्न विचारणारा माणूस ते उत्तर दुसर्या माणसाला कुठल्यातरी दुसर्या भाषेत भाषांतरित करून सांगायचा. मग तो दुसरा माणूस बाहेर जायचा.”
“कुठल्या भाषेत प्रश्न विचारले त्याने तुम्हाला?”
“हिंदी आणि इंग्लिश. जास्तकरून इंग्लिश.”
सुजाता अचानक उठली आणि बाहेर जायला लागली.
“कुठल्याही गोष्टीला हात लावू नकोस.” मी म्हणालो, “माझी फोरेन्सिक टीम येतेय.”
तिने हात उंचावून समजल्याचा इशारा केला. ती गेली आणि राजनायक आत आला, “आम्ही तुमच्या गाडीसाठी सगळीकडे अॅलर्ट जारी केलाय.”
“मग काय झालं मिसेस त्रिवेदी?”
तिच्या डोळ्यांमधून परत अश्रू वाहायला लागले, “त्यांनी...त्यांनी मला बांधलं. माझे हात माझ्या पायांबरोबर बांधले आणि माझ्या तोंडात माझ्या नवर्याचा टाय बोळा करून कोंबला. मग जो माणूस कॅमेरा घ्यायला गेला होता, त्याने माझा फोटो काढला.” तिचा चेहरा लाल झाला होता.
“मग?”
“मग ते दोघेही निघून गेले. माझ्याशी बोलणार्या माणसाने मला सांगितलं की माझा नवरा येऊन माझी सुटका करेल. आणि तो गेला.”
“ते दोघेही ताबडतोब निघून गेले?”
तिने नकारार्थी मान डोलावली, “मी त्यांचा आवाज थोडा वेळ ऐकला. ते एकमेकांशी बोलत होते. मग गराजच्या दरवाजाचा आवाज ऐकू आला. दोनदा. मग काही नाही.”
“मी आत असताना मला तुम्ही सांगितलेली एक गोष्ट ऐकू आली.” राजनायक म्हणाला, “एक माणूस दुसर्या माणसाला दुसर्या भाषेत काहीतरी सांगत होता. कुठली भाषा होती काही सांगू शकाल?”
“नाही. माझ्याशी बोलणारा माणूस वेगळ्या पद्धतीने इंग्लिश आणि हिंदी बोलत होता. ते एकमेकांशी कुठल्या भाषेत बोलत होते ते समजलं नाही. अरेबिकसारखी वाटत होती. पण मला त्यातलं काही कळत नाही.”
आधीच माहीत असलेली कुठलीतरी गोष्ट सिद्ध झाल्याप्रमाणे राजनायकने मान डोलावली.
“त्यांनी मास्क्स घातले होते असं तुम्ही म्हणालात,” मी म्हणालो, “कशा प्रकारचे मास्क्स?”
तिने थोडा विचार केला, “फिल्ममधले दरोडेखोर घालतात तसे.”
“ओके. आणखी काही सांगू शकाल त्याबद्दल?”
“त्यांचे डोळे मी पाहू शकले नाही, कारण डोळ्यांच्या ठिकाणी छोट्या खाचा होत्या,” तिला आठवलं, “आणि तोंडाच्या ठिकाणी हे मास्क उघडे होते. हा इंग्लिश आणि हिंदी बोलणारा माणूस जेव्हा दुसर्या भाषेत बोलत होता, तेव्हा मी तो काय बोलतोय हे समजून घ्यायचा प्रयत्न करत होते.”
“ग्रेट मिसेस त्रिवेदी. तुम्ही खरंच खूप चांगली माहिती दिलीत. मी तुम्हाला काय विचारायचं राहिलंय?”
“म्हणजे?”
“म्हणजे तुम्हाला असं काही आठवतंय का जे मी तुम्हाला विचारलं नाही?”’
“नाही. मला वाटतं मी तुम्हाला मला आठवतंय ते सगळं सांगितलंय.”
माझा अर्थातच यावर विश्वास बसला नाही. मी तिला तिने सांगितलेल्या गोष्टी परत सांगायची विनंती केली. मला त्यातून काही नवीन गोष्टी समजतात का ते बघायचं होतं. माझ्या इतक्या वर्षांच्या कारकीर्दीत हे तंत्र – एखाद्या व्यक्तीला पुन्हापुन्हा त्याच गोष्टी सांगायला सांगणं – माझ्यासाठी नेहमीच परिणामकारक ठरलं होतं. आत्ताही त्याने मला दगा दिला नाही. अलिशाला तीच गोष्ट परत सांगताना आठवलं की तिच्याशी बोलणार्या त्या माणसाने तिला तिच्या ईमेल अकाउंटचा पासवर्ड मागितला होता.
“का?” माझा प्रश्न.
“मी नाही विचारलं,” ती म्हणाली, “मी फक्त त्यांना जे हवं होतं ते दिलं.”
ती तिची कहाणी दुसर्यांदा सांगून संपवत असताना फोरेन्सिक टीमचे लोक आले आणि मी प्रश्न विचारण्यापासून जरा ब्रेक घेतला. फोरेन्सिकवाल्यांनी मास्टर बेडरूममध्ये त्यांचं काम सुरू केलं. मी अमोलला फोन केला. त्याने सांगितलं की अजूनतरी काही पाहिलेला किंवा ऐकलेला साक्षीदार त्याला सापडलेला नाही.
“डॉ. संतोष त्रिवेदीच्या मालकीची गन होती. त्याबद्दल आपल्याला शोधून काढायला पाहिजे.”
“बरोबर,” तो म्हणाला, "बहुतेक त्याच्या स्वतःच्या गननेच त्याला मारलं असावं.”
मी फोन बंद केल्यानंतर मला सुजाताने बोलावलं. ती आणि राजनायक डॉ. त्रिवेदींच्या ऑफिसमध्ये उभे होते आणि तिथल्या कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहत होते.
“हे बघ,” ती मला म्हणाली.
“मी तुला सांगितलं होतं की फोरेन्सिकच्या लोकांचं काम होईपर्यंत कशालाही हात लावू नकोस.”
“तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे,” ती म्हणाली, “कॉम्प्युटर चालू होता, आणि तिचाच ईमेल अकाउंट उघडलेला आहे इथे. मी sent mailsमध्ये बघितलं. तिच्या ईमेल आयडीवरून डॉ. संतोष त्रिवेदीच्या ईमेल अकाउंटवर ६ वाजून २० मिनिटांनी मेल पाठवला गेलेला आहे.”
तिने एक क्लिक करून तो मेल पडद्यावर आणला. मेलच्या सब्जेक्ट लाईनमध्ये HOME EMERGENCY: READ IMMEDIATELY असं म्हटलं होतं.
मेलची अटॅचमेंट म्हणून अलिशा त्रिवेदीचा हात-पाय एकमेकांना एखाद्या धनुष्याप्रमाणे बांधलेला विवस्त्र फोटो होता. तो बघून कुणीही हादरला असता.
त्याच्या खाली इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं - WE HAVE YOUR WIFE. RETRIEVE FOR US ALL CESIUM SOURCES AVAILABLE TO YOU. BRING THEM IN SAFE CONTAINMENT TO MALABAR HILL GALLERY AT 8 O’CLOCK. WE WILL BE WATCHING YOU. YOU TELL ANYONE OR MAKE A CALL, WE WILL KNOW. THE CONSEQUENCE WILL BE YOUR WIFE BEING RAPED, TORTURED AND LEFT IN MANY PIECES TO COUNT. USE ALL PRECAUTIONS WHILE HANDLING SOURCES. DO NOT BE LATE OR WE WILL KILL HER.
मी हे दोनदा वाचलं. डॉ. त्रिवेदींना वाटलेली दहशत मलाही जाणवली.
“हे ज्याने कुणी लिहिलंय,” सुजाता म्हणाली, “त्याचं इंग्लिश एवढं चांगलं नाहीये, किंवा मग जाणूनबुजून हे वाचणार्यांच्या डोळ्यांत धूळ झोकायला केलेलं असावं.”
“त्यांनी हा मेल इथून पाठवलाय,” राजनायक म्हणाला, “आणि डॉ. त्रिवेदींना तो त्यांच्या ऑफिसमध्ये मिळाला. किंवा ते जिथे कुठे होते तिथे मिळाला.”
“हो. त्यांच्या वस्तूंमध्ये एक आयफोनही होता, बरोबर?” सुजाता माझ्याकडे पाहत म्हणाली.
“हो. आणि त्यांनी हा फोटोही पाहिला असणार.”
आम्ही काही वेळ तसेच स्तब्ध राहून त्या ईमेलचा डॉ. त्रिवेदींवर झालेला परिणाम समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो.
शेवटी मी माझ्याजवळ असलेली माहिती द्यायचं ठरवलं. हे प्रकरण फारच पुढे गेलं होतं.
“मला एक गोष्ट आठवली. डॉ. त्रिवेदींच्या वस्तूंमध्ये एक आयडी कार्ड होतं. एस.एस.के.टी. हॉस्पिटलचं. हे वरळीच्या जवळ असलेलं हॉस्पिटल आहे.”
राजनायक माझ्या दिशेने वळला, “तुला हे आत्ता आठवलं? एवढी महत्त्वाची गोष्ट? आत्ता?” तो चिडला होता.
“हो. मी विसरलो...”
“त्याने काहीही फरक पडत नाही,” सुजाता म्हणाली, “एस.एस.के.टी. स्त्रियांसाठी आणि विशेषतः त्यांना होणार्या कॅन्सरवर उपचार आणि संशोधन यासाठी प्रसिद्ध आहे आणि सीशियमचा वापर जास्त करून गर्भाशय आणि गर्भाशयमुखाच्या कॅन्सरसाठी होतो.”
मी होकारार्थी मान डोलावली, “मग आपल्याला ताबडतोब निघायला पाहिजे.”
“ठीक आहे.” राजनायक म्हणाला, “सुजाता, तू इथेच थांब. अलिशाकडून अजून काही माहिती मिळते का बघ. मी आणि राजेंद्र – आम्ही एस.एस.के.टी.मध्ये जातो आणि सीशियमची काय परिस्थिती आहे, ते बघतो.”
तिला बोलायची संधी न देता तो बाहेर गेला. मीही त्याच्यापाठोपाठ धावलो. माझी गाडी घ्यायचा माझा विचार होता, पण राजनायक माझ्या गाडीतून आला नसता. त्यामुळे मी तो विचार सोडून दिला, आणि त्याच्या गाडीतून गेलो.
Wednesday, 16 November 2016
गॅलरी
Labels:
भाग २
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment