Wednesday 16 November 2016

गॅलरी

एस.एस.के.टी. हॉस्पिटल वरळी सीफेसच्या जवळ, पोचखानवाला रोडवर होतं. कफ परेड ते वरळी हे अंतर बरंच होतं, पण आत्ता रात्री रस्त्यांवर वर्दळ नव्हती, त्यामुळे आम्ही वेगाने चाललो होतो. राजनायक गाडी चालवता चालवता अव्याहतपणे फोनवर इतर एजंट्सशी, हाताखालच्या लोकांशी, वरिष्ठांशी असा चौफेर बोलत होता. हे सगळं प्रकरण कुठल्यातरी वेगळ्याच पातळीवर चाललं होतं. डॉ. त्रिवेदींना पाठवल्या गेलेल्या ईमेलने एका फटक्यात या साध्यासरळ वाटणार्‍या केसला सैतानी परिमाण दिलं होतं.
आम्ही केम्प्स कॉर्नर पार करून पेडर रोडवरून हाजी अलीच्या जवळ आल्यावर त्याने फोन बाजूला ठेवला, “आमची एक टीम हॉस्पिटलकडे जातेय. ते हॉस्पिटलमधल्या सेफमध्ये सीशियम सुरक्षित आहे की नाही हे बघतील.”
“कुठली टीम?”
“आम्ही त्यांना रॅट म्हणतो,” तो जाणवेल न जाणवेल असा हसला, “RAT – Radiological Attack Team."
“किती वाजेपर्यंत पोहोचतील ते तिथे?”
“आपल्या आधी. त्यांच्याकडे हेलिकॉप्टर आहे.”
अरे वा! याचा अर्थ एन.आय.ए.कडे एक तातडीने कामाला लागणारी टीम आहे. त्यांनाही माझ्याप्रमाणेच मध्यरात्री कॉल आला असणार.
“राज्य आणि केंद्र – दोन्हीही होम मिनिस्ट्रीज याकडे लक्ष ठेवून आहेत.” राजनायक समोर पाहत म्हणाला, “आणि संरक्षण मंत्रालयसुद्धा आणि कदाचित पी.एम.ओ.पण.” अच्छा! म्हणून त्याला इथे स्वतः यायचं होतं तर! बिचारी सुजाता!
“मला एक सांग,” मी विषय बदलला, “सीशियम हा काय प्रकार आहे?”
“तुला सुजाताने नाही सांगितलं त्याबद्दल?”
“फारसं नाही.”
“ओके. युरेनियम आणि प्लुटोनियम एकत्र आल्यानंतर त्या प्रक्रियेत सीशियम तयार होतं. चेर्नोबिलबद्दल ऐकलं आहेस का तू? रशियामध्ये अणुभट्टीचा स्फोट झाला होता...”
“हो, ऐकून माहीत आहे.”
“त्या स्फोटामध्ये सीशियमचा बराच मोठा साठा वातावरणात फेकला गेला होता. हा एक धातू आहे. तो चांदीसारखा दिसतो, पण थोडी राखाडी छटा असते. पावडर किंवा पट्ट्या – त्यांना पेलेट्स म्हणतात – यांच्या स्वरूपात येतो.”
“आणि त्यापासून कशा स्वरूपात धोका आहे आपल्याला?”
राजनायकने थोडा विचार केला, “ओके. या पट्ट्या एखाद्या खोडरबरसारख्या दिसतात. त्यांचा आकार तसाच असतो. ही पट्टी एका स्टेनलेस स्टील ट्यूबमध्ये ठेवली जाते. ही ट्यूब .४५ गनच्या गोळीसारखी दिसते. त्याचा उपयोग तर तू ऐकला असशीलच. ज्या स्त्रीच्या गर्भाशयात कॅन्सर आहे तिच्या शरीरात ही ट्यूब ठेवली जाते. एक औषध म्हणून हे खूप परिणामकारक आहे असं ऐकलंय. ज्या ठिकाणी कॅन्सर आहे, तो भाग सीशियममुळे किरणोत्सर्गाने प्रभावित होतो. ही ट्यूब किती वेळ ठेवायची ते ठरवणं हे डॉ. त्रिवेदीसारख्या लोकांचं काम असतं. जेव्हा अशा स्वरूपाची केस येते, तेव्हा त्रिवेदीसारखे लोक हॉस्पिटलच्या सेफमधून सीशियम काढतात, आणि जो ऑन्कॉलॉजिस्ट ऑपरेशन थिएटरमध्ये आहे, त्याला स्वतः नेऊन देतात, जेणेकरून त्या डॉक्टरला सीशियम कमीत कमी वेळ हाताळावं लागेल, कारण तो ऑपरेशन थिएटरमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रतिबंधात्मक पोशाख वगैरे घालू शकत नाही.”
“ओके,” मेडिकल फिजिसिस्ट म्हणजे नक्की काय असतो, याबद्दल माझ्या मनात असलेला संभ्रम दूर झाला होता, “पण मग जो सीशियम हाताळतो – डॉ. त्रिवेदीसारखे लोक – त्यांना काय प्रकारचं संरक्षण असतं?”
“सीशियम किंवा कुठल्याही किरणोत्सर्गी पदार्थातून जे गॅमा किरण बाहेर पडतात, त्यांना एकच गोष्ट अडवू शकते – शिसं. ज्या सेफमध्ये या सीशियमच्या पट्ट्या ठेवलेल्या असतात, त्या सेफला आतून शिशाचं आवरण असतं. ज्या साधनातून ते इकडे-तिकडे नेलं जातं, ते साधनही शिशाचंच बनवलेलं असतं.”
“ओके. मग जर हे सीशियम बाहेर गेलं आणि लोक त्याच्या संपर्कात आले, तर परिस्थिती कितपत वाईट होऊ शकते?”
“ते किती सीशियम आहे, कशा प्रकारे लोक त्याच्या संपर्कात येताहेत आणि कुठे – त्यावर अवलंबून आहे,” राजनायक शांतपणे म्हणाला, “सीशियमचा अर्धआयुष्य काळ हा ३० वर्षांचा आहे. असे १० अर्धंआयुष्य काळ म्हणजे सुरक्षित असं आजकाल मानलं जातं.”
हे माझ्या डोक्यावरून गेलं होतं. “म्हणजे?”
“म्हणजे त्याच्या किरणोत्सर्गापासून असलेला धोका दर तीस वर्षांनी अर्धा होतो. जर बर्‍यापैकी सीशियम एखाद्या बंद जागेत – रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट वगैरे – पसरवण्यात आलं, तर ती जागा पुढच्या तीनशे वर्षांसाठी पूर्णपणे निकामी होऊन जाईल.”
हे ऐकून कुणीतरी खाडकन मुस्कटात मारावी तसा सुन्न झालो मी.
“आणि लोक?” माझ्या तोंडातून कसाबसा आवाज आला.
“तेही मी सांगितलं त्या गोष्टींवर अवलंबून आहे – किती, कुठे आणि कसं. जर तुम्ही बर्‍याच सीशियमच्या संपर्कात आलात, तर काही तासांत तुमचं काम आटपू शकतं. पण IED वापरून एखाद्या जागेत जर सीशियम पसरवण्यात आलं तर ताबडतोब मरणारे लोक कमी असतील, पण त्याचा खरा परिणाम हा मानसिक असेल. विचार कर – असं काही घडलं आणि तेही मुंबईसारख्या शहरात – फार भयानक होईल ते. लोकांच्या मनात कायमची भीती बसेल.”
आम्ही एस.एस.के.टी. हॉस्पिटलच्या दरवाजातून आत शिरत असतानाच हेलिकॉप्टरचा घरघराट ऐकू आला आणि पाठोपाठ ते हॉस्पिटलच्या हिरवळीवर उतरतानाही दिसलं. त्याच्यातून चार जण उतरले आणि धावतच आमच्या दिशेने आले. चौघांच्याही अंगावर किरणोत्सर्ग प्रतिबंधक पोषाख किंवा रेडिएशन सूट होता. त्यांचा प्रमुख – त्याच्या सूटवर असीम असं लिहिलं होतं आणि त्याच्या हातात सुजाताकडे असलेल्या रेडिएशन मॉनिटरसारखाच पण थोडा मोठा मॉनिटर होता.
राजनायक त्यांना घेऊन हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये गेला. माझ्यासाठी इथे करण्यासारखं काहीही नव्हतं आणि तसंही राजनायकचा हडेलहप्पीपणा इथे गरजेचा होता. त्याने तिथल्या रिसेप्शनिस्टला रीतसर धमकी वगैरे देऊन हॉस्पिटलच्या सिक्युरिटी इन चार्जला त्याच्या घरून बोलावलं आणि हॉस्पिटलची लॅब उघडायला लावली. सिक्युरिटी इन चार्जला यायला वेळ लागणार होता, पण राजनायक थांबायला तयार नव्हता. त्याने त्याच्याकडून लॅब प्रोटोकॉल्सची मागणी केली, आणि न दिल्यास त्याला घरी येऊन अटक करायची धमकी दिली.
प्रोटोकॉल्स मिळाल्यावर त्याने ते असीमला दिले. असीम आणि त्याच्या टीममधला आणखी एक असे दोघे जण लॅबमध्ये गेले. लॅबच्या दरवाज्याच्या वर आतल्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेरा होता आणि बाहेर लॉबीमध्ये असलेल्या स्क्रीनवर आम्ही लॅबमध्ये काय चाललंय ते बघू शकत होतो.
“तो सात वाजता आला होता इथे.” राजनायक हॉस्पिटलचा व्हिजिटर लॉग तपासत होता, “आणि इथे असंही नमूद केलेलं आहे – त्यानेच – की त्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये असलेल्या मिसेस आरती संकलेचा नावाच्या एका पेशंटसाठी सीशियमची एक ट्यूब नेलेली आहे, आणि आता या हॉस्पिटलच्या स्टॉकमध्ये ३१ ट्यूब्ज शिल्लक आहेत.”
दरम्यान असीम आणि त्याचा सहकारी लॅबमध्ये आलेले आम्ही मॉनिटरवर पाहिलं, आणि तिथला प्रॉब्लेम एका क्षणात माझ्या लक्षात आला. कॅमेरा अशा प्रकारे लावलेला होता, की सेफच्या दरवाज्यासमोर उभा असलेला माणूस सहजपणे कॅमेर्‍याला चकवू शकत होता. जर डॉ. त्रिवेदीने सेफमधून एखादी गोष्ट काढली असती, तर बाहेर मॉनिटरवर पाहत असलेल्या कुणाच्याही ते लक्षात येणं कठीण होतं. जवळपास अशक्यच.
आतमध्ये गेल्यापासून दोन मिनिटांनी असीम आणि त्याचा सहकारी बाहेर आले. असीमच्या चेहर्‍यावर भीती स्पष्टपणे दिसत होती, “रिकामी आहे सेफ, पण हे सापडलंय त्यात.”
त्याच्या हातात एक कागद होता.
मी राजनायकच्या बाजूला गेलो. त्या कागदावर काय लिहिलं होतं, ते नीट वाचता येत नव्हतं. राजनायकने एक-एक शब्द लावत ते मोठ्याने वाचलं, “माझ्यावर कोणीतरी पाळत ठेवून आहे. जर मी हे केलं नाही, तर ते माझ्या पत्नीला ठार मारतील. सीशियमच्या ३२ ट्यूब्ज... मला माफ करा....”
आम्ही सगळे तिथे स्तब्धपणे उभे होतो. आम्ही सगळे अशा व्यवसायात होतो, जिथे गुन्हे, गुन्हेगार, शस्त्रं, मृत्यू, मानवी स्वभावातल्या सगळ्या नकारात्मक आणि काळ्याकुट्ट गोष्टींशी आमचा दररोजचा सामना होत होता, आणि भीती ही एक अनिवार्य गोष्ट असली, तरी आम्ही तिला सामोरं जाऊ शकत होतो, पण ही भीती काहीतरी वेगळीच होती. डॉ. त्रिवेदींनी ३२ सीशियम ट्यूब्ज हॉस्पिटलच्या लॅबमधून बाहेर काढल्या होत्या आणि काही पूर्णपणे अनोळखी आणि खुनशी लोकांना दिल्या होत्या. त्याच लोकांनी मलबार हिलच्या गॅलरीच्या जवळ त्यांना ठार मारलं होतं.
“३२ ट्यूब्ज!” मला ही शांतता खायला उठली होती, "काय होईल त्यामुळे?”
“आपल्याला शास्त्रज्ञ लोकांना विचारायला हवं. पण जे होईल ते जबरदस्त असेल.” राजनायकने स्वतःच्या आवाजावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवलं होतं, “आपल्या कानाखाली काढलेला सर्वात मोठा आवाज!”
त्या क्षणी मला एक गोष्ट आठवली. एक विसंगती.
“एक मिनिट,” मी म्हणालो, “डॉ. त्रिवेदींच्या बोटांमध्ये त्या TLD रिंग्ज होत्या. त्या काळ्या पडल्या नव्हत्या. असं कसं शक्य आहे, की त्याने इथून सीशियमच्या ३२ ट्यूब्ज बाहेर काढल्या आणि तरी त्या रिंग्ज पांढर्‍या होत्या?”
राजनायकने नकारार्थी मान हलवली, “त्याने पिग वापरला असणार.”
“पिग?”
“या ट्यूब्ज इथून दुसरीकडे हलवण्यासाठी वापरतात. पूर्णपणे शिशाचा बनवलेला एक डबा किंवा बॉक्स असतो. दुरून तो एखाद्या ट्रॉलीवर ठेवलेल्या बादलीसारखा दिसतो. खाली चाकं असतात. त्याचं वजन खूप असतं आणि त्याचा आकार डुकरासारखा वाटतो. त्यामुळे त्याला पिग म्हणतात.”
“पण डॉ. त्रिवेदी इथून हा पिग आणि त्यामध्ये सीशियमच्या ३२ ट्यूब्ज घेऊन बाहेर पडला? इतक्या सहज?”
“एका हॉस्पिटलमधून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये सीशियम घेऊन जाणं हे नेहमीच होतं. त्याने एक ट्यूब नेतोय असं सांगितलं, पण प्रत्यक्षात ३२ घेऊन गेला. पण इथे कोण त्या पिगचं झाकण उघडून बघणार आहे?”
त्या वेळी मला डॉ. त्रिवेदींच्या गाडीच्या डिकीमधल्या लाल कार्पेटवर उमटलेल्या खुणा आठवल्या. चौकोनी आणि जड. नक्कीच हा पिग असणार. सगळ्या गोष्टी जुळत होत्या, आणि एक अभूतपूर्व संकट आ वासून उभं आहे, याची जाणीवसुद्धा.
“मला एक फोन करायला पाहिजे.” राजनायक तिथून जरा बाजूला गेला. मलाही एक फोन करायचा होता. अमोलला.
“अमोल, मी बोलतोय.”
“बोला सर. काही समजलं?”
“समजलं, पण चांगली बातमी नाहीये. डॉ. त्रिवेदींनी सेफमधून सीशियमच्या ३२ ट्यूब्ज बाहेर काढल्या आहेत.”
“बापरे!”
“आणि एखादा बाँब बनवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.”
“३२ ट्यूब्ज पुरेशा आहेत बाँबसाठी?”
“मी ज्या एन.आय.ए. एजंटबरोबर इथे आलोय, त्याच्या मते हो. बरं, तू आहेस कुठे?”
“मी मलबार हिलच्या जवळच आहे, आणि मला एक पोरगा सापडलाय. त्याने कदाचित काय घडलंय ते पाहिलंय.”
“काय?”
“हो. हा पोरगा कदाचित साक्षीदार आहे डॉ. त्रिवेदींच्या खुनाचा.”
“कदाचित साक्षीदार म्हणजे? कोण आहे कोण हा? तिथेच राहतो?”
“नाही. त्याची स्टोरी थोडी विचित्र आहे. या मलबार हिल गॅलरीजवळ काही बंगले आहेत, त्यातला एक बंगला प्रियांका चोप्राचा आहे.”
“अच्छा! मग?”
“मलाही हे माहीत नव्हतं, पण नक्कीच हे छापून आलं असणार, कारण या मुलाला ते बरोबर माहीत होतं. मी आणि पी.एस.आय. गायतोंडे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळीकडे चौकशी करत होतो. या बंगल्यामध्ये कुणीच नव्हतं, पण आउटहाउसमध्ये बंगल्याचा केअरटेकर राहतो. मी त्याच्याशी बोललो. त्यानेही इतर लोकांप्रमाणे काही पाहिलं वगैरे नव्हतं. त्याच्याशी बोलून आम्ही निघत होतो, तेवढ्यात एका झाडामागे हा मुलगा लपलेला आहे, हे मी पाहिलं. मला आधी वाटलं की ज्यांनी डॉ. त्रिवेदींना मारलं, त्यांच्यापैकी एखादा पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी इथे लपून बसलाय की काय? आम्ही त्याला घेरला आणि बाहेर यायला सांगितलं. तो जेमतेम २० वर्षांचा आहे आणि सुरतवरून इथे आलाय. त्याला असं वाटलं होतं, की प्रियांका चोप्रा इथेच राहते. तो भिंतीवर चढून तिच्या बंगल्याच्या आवारात गेला होता.”
“पण त्याने डॉ. त्रिवेदींचा खून होताना पाहिलंय का?”
“तो म्हणाला की त्याने काहीही पाहिलेलं किंवा ऐकलेलं नाही, पण मला माहीत नाही सर. मला असं वाटतंय की जेव्हा मलबार हिलच्या गॅलरीच्या इथे डॉ. त्रिवेदींना मारण्यात आलं, तेव्हा तो तिथेच असणार. हे घडताना बघून तो घाबरला. मग लपून बसला आणि आम्हाला सापडला.”
मला लगेचच यातली विसंगती दिसली.
“पण लपला का तो? तो तिथून पळून जाऊ शकला असता. डॉ. त्रिवेदींना ८च्या सुमारास मारण्यात आलं, वायरलेस तिथून सव्वाअकरा वाजता गेली आणि त्यांना मृतदेह सापडला. तुम्हाला तो एक-दीडच्या सुमारास सापडला असेल. एवढा वेळ तो काय करत होता तिथे?”
“हो सर. हा भाग थोडा विचित्र आहे. पण मला असं वाटतंय की तो कदाचित घाबरला असेल की खून झाला आणि त्याला कुणी पाहिलं, तर त्यांना वाटेल की त्यानेच खून केलाय.”
हे शक्य होतं.
“तू गायतोंडेला त्याच्याविरुद्ध केस नोंदवायला सांगितलीस ना?”
“हो. ट्रेसपास केस. मी त्या केअरटेकरशीही बोललो. तो ऑफिशियल तक्रार वगैरे करायला तयार आहे. काळजी करू नका सर. हा पोरगा कुठेही जात नाही. काय झालंय ते आपण त्याच्याकडून व्यवस्थित काढून घेऊ.”
“गुड! एक काम कर, त्याला आपल्या कुलाबा ऑफिसला ने आणि आपल्या रूममध्ये ठेव.”
“चालेल सर.”
“आणि सीशियम किंवा मी आत्ता जे सांगितलं, त्याबद्दल कुणालाही सांगू नकोस.”
“हो सर.”
“आणि डॉ. त्रिवेदींच्या घराचा पत्ता मी तुला पाठवतोय. फोरेन्सिकच्या लोकांनी तिथे जमा केलेला सगळा पुरावा कुलाबा ऑफिसला घेऊन ये.”
“ठीक आहे सर.”
मी फोन बंद केला. राजनायक अजूनही फोनवर बोलत होता. तो ज्या पद्धतीने उभा होता, आणि बोलत होता, त्यावरून दुसर्‍या बाजूला त्याचा बॉस किंवा त्याच्याही वरचा कोणीतरी असावा हे कळत होतं. एकतर बराच वेळ तो न बोलता फक्त ऐकत होता, आणि दोन-तीन वेळा त्याचं वाक्य त्याला पूर्ण करता आलं नाही.
“हो सर,” तो शेवटी म्हणाला, “आम्ही सगळे आता परत जातोय.”
फोन बंद करून त्याने माझ्याकडे पाहिलं, “मी हेलिकॉप्टरमधून जातोय. मला दिल्ली ऑफिसबरोबर बोलायला पाहिजे. तू एक काम कर. माझी गाडी घेऊन जा.” त्याने माझ्या हातात गाडीची चावी दिली, “आणि कफ परेडला त्रिवेदींच्या बंगल्यात सुजाता आहे, तिला दे. ती माझी गाडी घेऊन येईल. तुझी गाडीही तिथेच आहे, बरोबर?”
“हो.”
“तुझ्या सहकार्‍याला कुणी साक्षीदार सापडलाय का? मी जे ऐकलं त्यावरून वाटलं मला!”
एकीकडे फोनवर बोलत असताना माझ्या बोलण्याकडेही लक्ष ठेवून होता हा माणूस! सहीच!
“बहुतेक. काही निश्चित कळलेलं नाहीये अजून. मी माझी गाडी घेऊन तिथेच जाणार आहे.” मी म्हणालो.
त्याने माझ्या हातात एक कार्ड दिलं, “माझे सगळे नंबर्स आहेत यावर. जर काही समजलं, कॉल कर. आणि हो, सकाळी ९ वाजता या केसचा आढावा घेण्यासाठी मीटिंग बोलावलेली आहे. तुला आणि तुझ्या सहकार्‍याला या मीटिंगमध्ये आम्ही सामील करून घेणार आहोत. तोपर्यंत काही झालं, तर बघू.”
त्याने सांगितल्याप्रमाणे मी डॉ. त्रिवेदींच्या बंगल्यात जाऊन राजनायकच्या गाडीची चावी सुजाताला दिली आणि माझी गाडी तिथून घेतली आणि क्राइम ब्रँचच्या कुलाबा ऑफिसच्या दिशेने निघालो. गेल्या एक-दीड तासांत गोष्टी काहीच्या काही बदलल्या होत्या. एन.आय.ए.ला सीशियम महत्त्वाचं होतं, पण मला हा खून कुणी केला ते शोधून काढायचं होतं. हा एका खुनाचा तपास आहे, याचा मला कुठल्याही परिस्थितीत विसर पडायला नको होता.
“जर खुनी सापडले, तर सीशियमसुद्धा सापडेल,” मी स्वतःशीच म्हणालो.

++++++++++++++++++++++++++++++++

क्राईम ब्रँचच्या कुलाबा ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मी अमोलला फोन केला. त्याने या मुलाला – त्याचं नाव रोहित खत्री होतं – आमच्या खास खोलीत ठेवलं होतं आणि तिथला एसी बंद करून ठेवला होता. या मुलाकडे एक मध्यम आकाराची हॅवरसॅक होती. मी आधी ती धुंडाळायचं ठरवलं. मला अर्थातच काही महत्त्वाचं मिळेल याची अपेक्षा नव्हतीच.
ती अपेक्षा १० मिनिटांतच पूर्ण झाली, कारण सॅकमध्ये खरोखर काहीही नव्हतं. दोन-तीन शर्ट, दोन जीन्स, एक टूथब्रश, एक टूथपेस्ट, एक पार्ले बिस्किटांचा पुडा आणि एक पाण्याची बाटली. त्याला ट्रेसपासिंगच्या आरोपावरून अटक केलेली असल्यामुळे, निदान तसं दाखवलेलं असल्यामुळे त्याच्याजवळ सापडलेलं बाकीचं सामान झिपलॉक बॅग्जमध्ये ठेवलं होतं. त्यात थोडे पैसे होते – जवळपास ७०० रुपये असतील, एक ड्रायव्हिंग लायसन्स होतं आणि सुरतमधल्या कुठल्यातरी कॉलेजचं आयडी कार्ड होतं.
मी जेव्हा रोहित खत्रीला ठेवलेल्या खोलीत गेलो, तेव्हा तिथे प्रचंड गरम होत होतं. अर्थात, तोच हेतू होता. बरेच वेळा एखादा संशयित माणूस या गरमीला कंटाळून आम्हाला हवं ते सांगून टाकायचा. आत जाण्याआधी मी बाहेरून त्याच्याकडे एक नजर टाकली होती. अगदीच पोरसवदा होता. अमोलने तो २० वर्षांचा आहे असं सांगितलं होतं, पण तो जेमतेम १७-१८ वर्षांचा दिसत होता. अंगावरचे कपडे मळलेले होते. बहुतेक एक-दोन दिवस आंघोळही केली नसेल. चेहर्‍यावरचे भाव धास्तावलेले होते. त्याला प्रचंड उकडत असावं, पण दोन्ही हात हातकड्यांमध्ये अडकलेले आणि त्या हातकड्या समोरच्या टेबलाला अडकवलेल्या असल्यामुळे त्याला घाम पुसताही येत नव्हता.
“काय म्हणतोस रोहित?” मी आत येत विचारलं.
त्याने माझ्याकडे पाहिलं, पण मी काय बोललो ते त्याला समजलं नव्हतं बहुतेक.
“खूप गरम होतंय इथे,” तो हिंदीत म्हणाला.
अच्छा, याला मराठी येत नाही तर. मग मला आठवलं की तो सुरतहून आलाय. मग मीही हिंदीत बोलायचं ठरवलं. तेव्हा माझं लक्ष त्याच्या हातांत अडकवलेल्या हातकड्यांकडे गेलं. हे एक अमोलने चांगलं केलं होतं. जर याला आपल्याला खरंच अटक झाली आहे असं वाटलं, तर तो कदाचित त्यातून सुटण्यासाठी खरं काय ते सांगेल. अर्थात हा एक धोका होता, की तो मला जे ऐकायचं आहे तेच सांगेल, पण तो एवढा बनेल वाटत नव्हता.
माझी नजर त्याच्या हातकड्यांवर पडलेली पाहून त्याने मला विनंती करायचं ठरवलं असावं, “सर, मी काही केलेलं नाहीये. मला का इथे आणण्यात आलंय?”
“कसं आहे ना रोहित,” मी शांतपणे म्हणालो, “तुझ्या एखाद्या गर्लफ्रेंडच्या घरात घुसणं वेगळं आणि एका सेलिब्रिटीच्या बंगल्यात घुसणं वेगळं. इथे नियम वेगळे आहेत. आम्ही आमच्या फिल्मस्टार्सची काळजी घेतो, समजलं? तू आज रात्री जे केलं आहेस, त्याची शिक्षा खूप मोठी आहे.”
“पण सर, प्रियांका चोप्रा तर तिथे राहातपण नाही.”
“त्याने काहीही फरक पडत नाही,” मी थंडपणे म्हणालो, “ तुला वाटलं की ती तिथे असेल, म्हणून तर तू तिथे गेलास, बरोबर?”
“पण सर, माझा खरंच तसा काही हेतू नव्हता....”
“असं प्रत्येक चोर, खुनी, गुन्हेगार म्हणतो.”
रोहितची नजर खाली गेली.
“मी काय म्हणतो,” मी म्हणालो, “एक चांगली गोष्ट आहे. तुला ऐकायची असेल तर सांगतो.”
त्याचे डोळे चमकले, “बोला सर.”
“तुझ्यावर ट्रेसपासचा म्हणजे दुसर्‍या कोणाच्या प्रॉपर्टीवर विनापरवानगी घुसण्याचा चार्ज लागलेला आहे. पण तू जर मला मदत केलीस, तर मी त्याबद्दल काहीतरी करू शकतो.”
“पण सर,” तो पुढे झुकायचा प्रयत्न करत म्हणाला, “मी त्या दुसर्‍या सरांनापण तेच सांगितलं की मी काहीही पाहिलेलं नाहीये.”
“तू त्याला काहीही सांगितलं असशील. मला खरं ऐकायचंय.”
“खरंच सांगतोय सर. देवाशपथ!”
“हे बघ बाळा,” मी त्याच्याकडे रोखून पाहात म्हणालो, “तुझं वय काय? एकोणीस? वीस? एवढ्या लहान वयात एवढं खोटं बोलू नये. आणि तू अमोलला जे सांगितलंस ना, त्यावर त्याचाही विश्वास बसलेला नाहीये. म्हणून तर त्याने मला तुझ्याकडे एकदा बघून घ्यायला सांगितलं. आता तुला मदत करायची माझी इच्छा होती, पण तू जर अडूनच बसला असशील, तर काय करणार?”
तो काहीच बोलला नाही.
“ओके,” मी माझं निर्वाणीचं अस्त्र काढलं, “मी अर्धं मिनिट देतोय तुला. जर तुला काही सांगायचं नसेल तर मग इथे थांबण्यात काही अर्थ नाही. तुझी केस मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये फाईल केलेली आहे. तिथे आम्ही तुला घेऊन जाऊ!”
तो काहीच बोलला नाही.
अर्धं मिनिट झाल्यावर मी जागेवरून उठलो, “ठीक आहे. तुझी मर्जी. तिथे पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा तुझी चामडी सोलून काढतील, तेव्हा तुला कळेल. तिथे एक गावडे म्हणून हवालदार आहे. त्याचा हात लागला, की कोणीही असो, पोपटासारखा बोलायला लागतो. तुला बहुतेक तेच हवं आहे!”
“नाही सर! प्लीज नको! माझं ऐका....”
“काय ऐका? काहीही ऐकायचं नाहीये मला....”
“ठीक आहे सर. मी.. मी सांगतो. मी सगळं पाहिलंय.”
मी त्याच्याकडे रोखून पाहिलं, “कशाबद्दल बोलतोयस तू?”
“मला त्या दुसर्‍या सरांनी त्या मर्डरबद्दल विचारलं होतं. मी त्यांना म्हणालो की मला काही माहीत नाही आणि मी काही पाहिलं नाही. पण तसं नाहीये. मी...मी..”
“कुठला मर्डर?”
“तो गॅलरीच्या तिथे झालेला मर्डर. सगळे पोलीस आणि त्यांच्या गाड्या त्याच्यासाठी आल्या होत्या...”
“तू पाहिलास तो?”
“हो सर!”
“आणि तू हे आम्हाला – पोलिसांना स्वतःहून सांगायला तयार आहेस?”
“हो सर.”
“ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव. जर तू खोटं बोलतो आहेस असा मला संशय जरी आला, तरी मी तुला स्वतः मलबार हिल पोलीस स्टेशनला नेईन आणि हवालदार गावडेच्या ताब्यात देईन.”
त्याने एक आवंढा गिळला.
“तुझे हात वरती कर,” मी म्हणालो आणि त्याने तसं केल्यावर त्याच्या हातातल्या हातकड्या मी सोडवल्या. त्याने लगेचच त्याची मनगटं चोळायला सुरुवात केली. अलिशा त्रिवेदीला मी असंच करताना पाहिलं होतं, त्याची मला आठवण झाली.
“ओके. आता सांग. अगदी सुरुवातीपासून. तू इथे मुंबईला का आलास?”
“सर, प्रियांका चोप्राला भेटायला!”
“का?”
“मला ती खूप आवडते. मला तिला आयुष्यात एकदा भेटायचंय.”
त्याने त्याची सगळी रामकहाणी सांगितली. तो सुरतहून मुंबईला फक्त प्रियांका चोप्राला भेटायला आला, हे मला पटत नव्हतं, पण ते मी सोडून दिलं. मला त्यात काही रस नव्हता. त्याने काय पाहिलं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. त्याने सांगितलं, की तो बसने आदल्या दिवशी सकाळी मुंबईला आला. बसने त्याला दादरला सोडलं. तिथे त्याने कुणाला तरी मलबार हिलला कसं जायचं ते विचारलं. त्या माणसाने त्याला का कुणास ठाऊक, पण महालक्ष्मी स्टेशनवर उतरायला सांगितलं. इथली लोकलची गर्दी पाहून तो प्रचंड भांबावला आणि गर्दी कमी होण्याची वाट पाहत राहिला. ते होईपर्यंत अर्थातच रात्र झाली आणि महालक्ष्मीवरून चालत चालत मलबार हिलजवळ जेव्हा तो पोहोचला, तेव्हा अंधार पडला होता. तो जेव्हा त्याला हवं तिथे पोहोचला, तेव्हा त्याला तिथे कुणीही दिसलं नाही. त्याला वाटलं की प्रियांका चोप्रा कदाचित थोड्या वेळाने तिथे येईल. तो तिच्या बंगल्याच्या एका भिंतीला टेकून बसला आणि दिवसभरच्या श्रमांनी दमलेला असल्यामुळे त्याला झोप लागली. पण नंतर त्याला अचानक जाग आली.
“कशामुळे?” मी विचारलं.
“माहीत नाही. मी अचानक झोपेतून उठलो. मला वाटतं मला आवाज ऐकू आले, त्यामुळे.”
“तू त्या गॅलरीपासून किती दूर होतास?”
“माहीत नाही. फार लांब पण नव्हतो. मला दूरवरून दिवे दिसत होते. तो नेकलेस की काय म्हणतात त्याचे.”
त्याच्या सांगण्यावरून मी अंदाज केला, की तो जवळपास १५० ते २०० मीटर्स एवढ्या अंतरावर असावा.
“तू जागा झाल्यावर काय ऐकलंस?”
“नाही. काही नाही. आवाज थांबले.”
“ठीक आहे. मग?”
“मला तीन गाड्या पार्क केलेल्या दिसल्या. एक ऑडी होती. बाकीच्या दोन कोणत्या गाड्या होत्या ते नाही समजलं.”
“कोणी माणसं दिसली तुला?”
“नाही. तिकडे खूप अंधार होता. पण मग मी आणखी एकदा आवाज ऐकला. अंधारात. कोणीतरी जोराने ओरडल्यासारखा. त्याच वेळी लाइट चमकले – दोनदा आणि आवाजपण आले. गोळ्यांचे आवाज. त्या लाइटच्या प्रकाशात मला कुणीतरी गुडघ्यांवर बसलेलं दिसलं. पण हे सगळं इतक्या पटकन घडलं, की मला फक्त एवढंच दिसलं. सॉरी.”
“नाही, काही हरकत नाही. तू जे सांगितलंस, त्याने बर्‍याच गोष्टी स्पष्ट झाल्या. आता एकदा परत या गोष्टी सांग मला. तू बराच वेळ चालत प्रियांका चोप्राच्या बंगल्यापाशी पोहोचलास. मला एक सांग – तो तिचाच बंगला आहे, हे तुला कसं समजलं?”
“सर, त्याच्याबद्दल छापून आलं होतं. त्याचा फोटोपण आला होता. तिने तिच्या ट्विटर अकाउंटवरपण टाकले होते दोन-तीन फोटो. त्यामुळे मला तिचा बंगला कसा दिसतो ते माहीत होतं. आणि तिथून समुद्र दिसतो असंपण लिहिलेलं त्यात. त्यावरून मी शोधलं सर.”
वा! डोकं होतं या मुलाला!
“ठीक आहे. तू झोपला होतास, मग काहीतरी आवाज ऐकून तू उठलास आणि बघितलंस तर तुला तीन गाड्या दिसल्या. त्यातली एक ऑडी होती. बरोबर?”
“हो सर.”
“ठीक आहे. मग तू परत कुणाचा तरी आवाज ऐकलास आणि गॅलरीच्या दिशेने पाहिलंस. त्याच वेळी गोळीबार झाला.”
“हो सर.”
पण माझा अजूनही त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला नव्हता. तो कदाचित मला जे ऐकायचं असेल, तेच सांगत असला तर? त्याची थोडी परीक्षा पाहायची असं मी ठरवलं.
“आता मला एक सांग – गोळीबाराचा आवाज झाला, नंतर त्या प्रकाशात तू एका माणसाला त्याच्या गुडघ्यांवर खाली पडताना पाहिलंस, बरोबर?”
“नाही सर. मी त्या माणसाला पडताना नाही पाहिलं. मला वाटतं तो गुडघ्यांवरच बसला होता.”
मी मान डोलावली. या मुलाने माझी परीक्षा पास केली होती.
“ओके. आता मला एक सांग – कोणीतरी जोराने ओरडलं आणि त्याचा आवाज तुला ऐकू आला, असं तू म्हणालास. काय ओरडला तो माणूस?”
रोहितने थोडा वेळ विचार केला आणि मग नकारार्थी मान हलवली.
“नक्की नाही सांगू शकत.”
“ठीक आहे. एक काम कर. तुझे डोळे बंद कर.”
“काय?”
“डोळे बंद कर,” मी म्हणालो, “आणि जे तुला आठवतंय त्याबद्दल विचार कर. जे बघितलंस, ते आठव आणि त्याच्याबरोबर जो आवाज होता, तोही तुला आठवेल. तू त्या तीन गाड्यांकडे बघतो आहेस आणि मग एका आवाजाने तुझं लक्ष गॅलरीच्या दिशेने वेधलं गेलं. काय होता तो आवाज?”
त्याने मी सांगितल्याप्रमाणे केलं.
“नक्की नाही सांगू शकत,” तो डोळे उघडून म्हणाला, “मला वाटतं की तो अल्ला असं काहीतरी म्हणाला, आणि मग त्याने गोळ्या झाडल्या.”
माझे डोळे विस्फारले.
“अल्ला? म्हणजे मुस्लीम लोक म्हणतात तसं?”
“नाही माहीत. मला तसं वाटलं.”
“अजून काही ऐकलंस का तू?”
“नाही. गोळ्यांच्या आवाजाने हे ओरडणं मध्येच थांबलं. अल्ला असा आवाज मी ऐकला आणि तो बाकी जे काय बोलला असेल, ते गोळ्यांच्या आवाजात दबून गेलं.”
“अल्लाहू अकबर असं काही म्हणत होता तो माणूस?”
“असू शकेल सर. मी फक्त अल्ला एवढाच आवाज ऐकला.”
मी जरा विचार केला, “मला एक सांग रोहित, तुला या खोलीत बंद करण्याआधी इन्स्पेक्टर अमोलने तुला काही सांगितलं होतं?”
“नाही सर.”
“या केसमध्ये आम्हाला काही सापडलंय त्याबद्दल?”
“नाही सर.”
“तू जेव्हा त्या बंगल्यात अमोलला सापडलास, त्याच्यानंतर तो फोनवर बोलत होता?”
“नाही सर. माझ्यासमोर कधीच नाही. मला इथे आणेपर्यंत ते कोणाशीही फोनवर बोलले नाहीत आणि गाडीमध्येही कोणी बोललं नाही.”
“ओके. मग काय झालं?”
“गोळीबार झाल्यानंतर मी पाहिलं की कोणीतरी गाड्यांच्या दिशेने पळालं. तो दुसर्‍या एका गाडीत बसला आणि त्याने ती गाडी ऑडीच्या जवळ आणली. अगदी जवळ आणि मग बाहेर येऊन ऑडीची डिकी उघडली. आणि...”
“एक मिनिट. हे सगळं चालू असताना तो दुसरा माणूस कुठे होता?”
“कोण दुसरा माणूस?”
“जो या गोळ्या मारणार्‍या माणसाच्या बरोबर होता. तीन गाड्या होत्या, बरोबर? एक गाडी मेलेल्या माणसाची, एक गाडी त्याला गोळी घालणारा माणूस चालवत होता. पण तिसरी गाडी होती ना.”
“नाही सर. मी एकच माणूस पाहिला – म्हणजे गोळ्या घालणारा एकच माणूस होता. जो त्याच्याबरोबर होता, त्याला मी नाही पाहिलं. त्या तिसर्‍या गाडीत – तुम्ही म्हणताय तसा कोणीतरी असणार – पण तो बाहेर आलाच नाही.”
“तू पाहिलंस तेवढा संपूर्ण वेळ तो गाडीतच होता?”
“हो. गोळीबारानंतर ती गाडी निघून गेली.”
“आणि त्या गाडीत जो माणूस होता, तो या संपूर्ण घटनेच्या दरम्यान एकदाही बाहेर आला नाही?”
“नाही सर.”
मी जरा विचारात पडलो. ही जरा अजब प्रकारची श्रमविभागणी झाली होती, आणि अलिशा त्रिवेदीने सांगितलेल्या घटनाक्रमाशी हे जुळतही होतं. एक जण तिला प्रश्न विचारत होता, आणि नंतर तेच भाषांतरित करून दुसर्‍याला सांगत होता आणि त्याला आदेशही देत होता. कदाचित तोच गाडीमध्ये बसून राहिला होता.
“ओके रोहित. मग काय झालं?”
“मग त्या माणसाने ऑडीच्या डिकीतून काहीतरी बाहेर काढलं. खूप जड असणार, कारण त्याला ते बाहेर काढताना खूप त्रास होत होता. चाकांवर असलेलं काहीतरी होतं आणि त्याला बाजूने कड्या होत्या आणि ढकलायला एक दांडापण होता.”
पिग. सीशियम एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवायला वापरलं जाणारं साधन.
“मग?”
“ते त्याने आपल्या गाडीच्या डिकीत ठेवलं आणि मग ऑडीची डिकी तशीच उघडी ठेवून तो आपल्या गाडीत बसून निघून गेला.”
“आणि तू अजून कुणालाही पाहिलेलं नाहीस?”
“नाही सर.”
“तू ज्याला पाहिलंस त्याचं वर्णन कर.”
“नाही करू शकत सर. त्याने एक स्वेटशर्ट घातला होता आणि त्याचं हूड डोक्यावर ओढून घेतलं होतं. त्याचा चेहरा मला दिसलाच नाही. एक सेकंदासाठीही नाही. मला वाटतं त्या हूडखाली त्याने एक मास्कपण चढवला होता चेहर्‍यावर.”
“मास्क?”
“हो. फिल्ममधले दरोडेखोर घालतात तसा.” मला परत अलिशा त्रिवेदीने केलेलं वर्णन आठवलं.
“तो अंगकाठीने कसा होता? उंच, धिप्पाड, बारीक, बुटका?”
“मध्यम उंचीचा असेल सर.”
“कसा वाटत होता? नॉर्थ इंडियन? साउथ इंडियन?”
“नाही सांगता येत सर. मी खूप दूर होतो आणि त्याने हूड ओढून घेतलं होतं, आणि चेहर्‍यावरही मास्क होता.”
“त्याचे हात कसे होते? जी गोष्ट त्याने ऑडीमधून स्वतःच्या गाडीत हलवली, त्याला बाजूला कड्या होत्या असं तू म्हणालास. त्याने ते हलवताना तू त्याचे हात पाहिले असशील. कसे होते त्याचे हात?”
रोहितने एक क्षणभर विचार केला आणि त्याचे डोळे चमकले, “त्याने ग्लोव्ह्ज घातले होते. दोन्ही हातांत. मी कधीकधी वेल्डर लोकांना हात जळू नयेत म्हणून तसले ग्लोव्हज घातलेलं पाहिलंय.”
ग्लोव्हज. संरक्षण करण्यासाठी. कदाचित किरणोत्सर्गी पदार्थांपासून संरक्षण करण्यासाठी. हे मी अलिशाला विचारलं नव्हतं. कदाचित सुजाताला तिने सांगितलं असल्याची शक्यता होती.
“ओके. ठीक आहे. हा गोळ्या मारणारा माणूस ज्या गाडीत बसला ती कोणती गाडी होती?”
“बहुतेक टॅव्हेरा होती. तशीच वाटली मला. अंधारात नीट दिसली नाही.”
मी विचार करायला सुरुवात केली. अलिशा त्रिवेदीची टॅव्हेरा होती आणि तिची चावी तिने तिच्या हल्लेखोरांना दिली होती. ते तिच्या घरी ६ ते ६.३० या वेळात गेले होते आणि त्यांनी डॉ. संतोष त्रिवेदींना मलबार हिल गॅलरीपाशी सीशियम घेऊन ८ वाजता बोलावलं होतं. हे सांगणारा ईमेल त्यांनी ६ वाजून २० मिनिटांनी पाठवला होता. डॉ. त्रिवेदींनी एस.एस.के.टी. हॉस्पिटलमधून ७च्या सुमारास सीशियम बाहेर काढलं होतं. त्रिवेदींचा खून ८ वाजता झाला असा अंदाज होता, त्याला रोहितच्या या सांगण्यामुळे दुजोरा मिळत होता. आत्तापर्यंत सगळं जुळत होतं.
“मला एक सांग रोहित,” मला एक मुद्दा आठवला, “गोळीबार झाल्यावर जी गाडी निघून गेली, ती कुठे गेली, काही कल्पना आहे?”
“सर, ती गाडी यू टर्न घेऊन गेली. बंगल्याच्या विरुद्ध दिशेने.”
“आणि ही गाडी? ज्या गाडीत तो गोळ्या झाडणारा होता ती?”
“तीही त्याच दिशेने गेली सर.”
“मग काय झालं?”
“काही नाही सर. एवढंच.”
“”तू काय केलंस नंतर?”
“मी? काही नाही. मी तिथेच बसून राहिलो.”
“तुला भीती नाही वाटली?”
“वाटली ना सर. माझ्या डोळ्यांसमोर... कुणाचा तरी खून होताना पाहून मला भीती तर वाटली ना!”
“तू त्या माणसाजवळ जाऊन पाहिलं नाहीस की तो नक्की मेलाय की अजून त्याच्यात थोडी धुगधुगी आहे?”
त्याने माझी नजर चुकवली, “नाही सर. मला भीती वाटली.”
“ओके. ते ठीक आहे. तू तसंही काही करू शकला नसतास. त्याला एवढ्या जवळून दोन गोळ्या आणि त्याही डोक्यात मारल्या गेल्या होत्या. तो जिवंत असण्याची काहीही शक्यता नव्हती. पण मला हे कळत नाहीये, की तू इतका वेळ थांबून का राहिलास? पोलिसांना का नाही बोलावलंस?”
“माहीत नाही सर. मी घाबरलो होतो. एकतर मला रस्ता माहीत नव्हता. मी ज्या रस्त्याने आलो होतो, तोच एक रस्ता मला माहीत होता. परत जायचं, तर मला तो माणूस जिथे पडला होता, तिथून जावं लागलं असतं. आणि जर तेव्हा पोलीस आले असते तर? त्यांनी मलाच खुनी ठरवलं असतं. आणि मला वाटलं की हे कुणा भाईने केलेलं असेल तर?”
“कुणी?”
“भाई – मुंबईत भाईच म्हणतात ना? त्यांनी केलेलं असेल आणि त्यांना मी सगळं पाहिलंय असं समजलं, तर ते मलाही उडवतील.”
“तू खूप फिल्म्स आणि टीव्ही पाहतोस असं दिसतंय. हरकत नाही. तुला कुणीही हात लावणार नाही ही जबाबदारी आमची आहे आता. अच्छा, तुझं वय काय आहे?”
“वीस.”
“प्रियांका चोप्रा थोडी मोठी नाहीये तुझ्यासाठी?”
“नाही सर. माझ्या बहिणीसाठी आलो मी इथे. तिला मिस इंडिया व्हायचं होतं. पण माझ्या घरच्यांना ते पसंत नव्हतं. त्यांनी तिचं लग्न करून दिलं. तिला प्रियांका चोप्रा खूप आवडते. म्हणून मला वाटलं होतं, की मी प्रियांकाला भेटेन आणि तिच्या फोटोवर तिची सही घेईन आणि माझ्या बहिणीला तो फोटो पाठवीन. तिला खूप बरं वाटलं असतं सर!”
“ओके,” मला हेही जरा विचित्र वाटत होतं, पण मी विषय सोडून द्यायचं ठरवलं, “तू मुंबईमध्ये राहतोस कुठे?”
“माहीत नाही सर. मी आज इथेच कुठेतरी झोपायचं ठरवलं होतं. मी तिथून निघून गेलो नाही त्याचं एक कारण हेही आहे. जाणार कुठे?”
“ठीक आहे,” मी उठून उभा राहिलो, “मला काही फोन करायचेत. त्यानंतर कदाचित तुझी ही स्टोरी तुला मला परत ऐकवावी लागेल. तुझ्या राहण्याची व्यवस्थापण करू या आपण.”
त्याने मान डोलावली.
“मी परत येईपर्यंत त्या तीन गाड्या आणि या घटनेबद्दल पुन्हा विचार कर. बघ तुला काही आठवतंय का.”
मी बाहेर गेलो आणि ए.सी. चालू केला.
माझं लक्ष माझ्या घड्याळाकडे गेलं. पहाटेचे साडेचार वाजले होते. राजनायक ज्या मीटिंगबद्दल बोलला होता, ती अजून साडेचार तासांनंतर होती.
अमोल शेळके एका टेबलवर काम करत होता. मी बघितलं, तर तो त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होता. त्याच्या टेबलच्या एका बाजूला या केसमधले फोरेन्सिक आणि पोलिसांनी जमा केलेले पुरावे ठेवले होते.
माझी चाहूल लागल्यावर त्याने वर पाहिलं, “काही बोलला तो पोरगा?”
“बरंच. सांगतो तुला. पण त्याआधी मला जेसीपी साहेबांना अपडेट देऊ दे. अच्छा, डॉ. त्रिवेदींच्या गनबद्दल काही समजलं?”
“हो सर. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी ही गन विकत घेतली होती. त्यांच्याकडे लायसन्सपण आहे. .२२ गन आहे.”
“ओके. .२२. म्हणूनच बहुतेक exit wound नाहीये.”
म्हणजे महिन्यांपूर्वी सुजाता आणि तिच्या पार्टनरने डॉ. संतोष त्रिवेदींना त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली होती. त्याला प्रतिसाद म्हणून त्यांनी गन विकत घेतली. आणि आता तीच गन त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली होती. बहुतेक एका मुस्लीम दहशतवाद्याने अल्लाच्या नावाने त्यांच्या डोक्यात त्यांच्याच गनने गोळ्या झाडल्या होत्या.
“डॉ. त्रिवेदींना फार वाईट प्रकारे मरण आलं.” अमोल म्हणाला.
“तुला एक सांगतो अमोल,” मी म्हणालो, ”मरण हे वाईट प्रकारेच येतं. चांगल्या प्रकारे कुणालाही मरण येत नाही.”
एक निःश्वास सोडून मी जेसीपी साहेबांना फोन लावला आणि त्यांना आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटना ऐकवल्या. मला आणखी एका गोष्टीसाठी त्यांच्याकडून परवानगी हवी होती – रोहित खत्रीसाठी हॉटेलची खोली. त्याला एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवणं अत्यंत महत्त्वाचं होतं. निदान ९ वाजताच्या त्या मीटिंगपर्यंत. एन.आय.ए.ला आणि आयबीला क्राईम ब्रँचला या तपासात सहभागी करून घ्यायचं आहे की नाही याचा पत्ताही तेव्हाच लागला असता. त्यांना अर्थातच आमच्या साक्षीदाराशी बोलायचं असणार. तेव्हा मी मग त्याच्या मोबदल्यात त्यांच्या तपासात सहभागी होण्याची मागणी केली असती.
आपल्याला वाटलं त्यापेक्षा ही केस खूपच जास्त महत्त्वाची आहे, हे जेसीपी साहेबांनी मान्य केलं, आणि आम्हाला क्राईम सीनवर मिळालेला पुरावा तपासायला सांगितलं. ते अर्थातच मी करणार होतोच.
माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता डॉ. त्रिवेदींचा फोन, आणि त्यासाठी मला अमोलची मदत लागली असती. त्याला मोबाइल या प्रकारातलं खूपच जास्त कळायचं. मी मोबाइलवर बोलणं, मेसेज पाठवणं, फोटो काढणं वगैरे जुजबी कामं करू शकायचो पण त्याच्यापलीकडे काही करणं म्हणजे माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती, पण दर ३-४ महिन्यांनी मोबाइल बदलणार्‍या अमोलसाठी तो डाव्या हाताचा मळ होता. आत्ताही त्यानेच ते हातात घेतलं. पहिल्यांदा त्याने डॉ. त्रिवेदींना आलेला तो ईमेल स्वतःच्या लॅपटॉपवर घेतला आणि त्याचा प्रिंटआउट काढला.
“डॉ. त्रिवेदींना आज दिवसभरात किती आणि कोणाकडून कॉल्स आले ते बघ.” मी अमोलला सांगितलं.
त्याने सुरुवात केली, “सकाळी ८ वाजल्यापासून कॉल्स सुरू झालेले आहेत. सकाळचे बरेचसे कॉल्स हे त्यांच्या फोनमध्ये असलेल्या नंबर्सवर केलेले आहेत, किंवा तिथून आलेले आहेत. हे कॉल्स एकतर इतर डॉक्टरांना केलेले आहेत, किंवा त्यांनी डॉ. त्रिवेदींना केलेले आहेत. काही कॉल्स हॉस्पिटल्सना केलेले आहेत. अगदी लंच टाईमपर्यंत हे असंच आहे. त्यानंतर डॉ. त्रिवेदी आणि त्यांच्या पार्टनरमध्ये तीन कॉल्स झालेले आहेत.”
“पार्टनरबद्दल तुला कसं समजलं?”
“त्यांच्या ब्रीफकेसमध्ये काही व्हिजिटिंग कार्डस होती. त्यातली काही डॉ. त्रिवेदींची एकट्याची होती, आणि काही त्यांच्या कंपनीच्या नावाने होती – त्यात त्यांच्या पार्टनरचं नावही आहे – डॉ. प्रसन्न कामत. टी अँड के. के म्हणजे कामत असणार.”
अजय नेवाळकरने टी म्हणजे त्रिवेदी असणार असं सांगितल्याचं मला आठवलं.
“या पार्टनरशी सकाळी बोलायला हवंय आपल्याला,” मी म्हणालो, “मग पुढे?”
“डॉ. कामतांबरोबर शेवटचा कॉल दुपारी ४च्या सुमारास आलेला आहे आणि त्यानंतर सुमारे अडीच तास काहीही नाही. ६.२५पासून ते ६.३०पर्यंत त्यांनी त्यांच्या घरच्या फोनवर आणि त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर सुमारे १५ कॉल्स केलेले आहेत. ५ मिनिटांत १५ कॉल्स. पण कुठलाही कॉल उचलला गेलेला नाहीये. हे सगळे कॉल ईमेल मिळाल्यानंतर केलेले आहेत.”
“ओके. म्हणजे आज नेहमीप्रमाणेच डॉ. त्रिवेदी आपल्या कामात गर्क होते. सगळे कॉल्स हे हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, त्यांचा स्वतःचा पार्टनर अशा ओळखीच्या लोकांकडून आलेले आहेत. नंतर त्यांच्या पत्नीच्या ईमेल आयडीवरून हा ईमेल आला. त्यांनी तो फोटो पाहिला आणि घरी फोन करायला सुरुवात केली.” मी आत्तापर्यंत जे काही कळलं होतं, त्याची उजळणी करायला सुरुवात केली, “मग ते एस.एस.के.टी. हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांनी तिथून सीशियमच्या ३२ ट्यूब्ज बाहेर काढल्या आणि ते त्या ट्यूब्ज मलबार हिलच्या गॅलरीपाशी घेऊन आले. पण मला एक गोष्ट कळत नाहीये.”
“कोणती सर?”
“एवढं सगळं त्यांनी केलं, या दहशतवाद्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकलं, तरीही त्यांनी डॉ. त्रिवेदींना ठार मारलं. का? काय कारण आहे?”
“त्यांनी कदाचित त्या दहशतवाद्यांचा चेहरा पाहिला असेल.”
“रोहित खत्री आणि अलिशा त्रिवेदी – दोघेही म्हणाले की त्यांनी चेहर्‍यावर मास्क्स घातले होते.”
“मग कदाचित डॉ. त्रिवेदींना ठार मारणं हाच त्यांचा उद्देश असेल. त्यांनी तो सायलेन्सर बनवला – कोका कोलाच्या बाटलीपासून. आणि जर हा मारेकरी आपल्या साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार ‘अल्ला’ म्हणाला असेल, तर मग आपण खातरीने म्हणू शकतो की त्यांची अशीच योजना होती.”
“पण जर तसं असेल,” माझ्या मनातली शंका मी बोलून दाखवली, “तर मग एकट्या डॉ. त्रिवेदींना का मारलं? अलिशा त्रिवेदीला का जिवंत सोडलं? साक्षीदार का जिवंत ठेवली?”
“कदाचित त्यांचा काहीतरी नियम वगैरे असेल. या अतिरेक्यांचेपण नियम असतात ना काहीतरी? स्त्रिया आणि मुलांवर हात न उचलण्याचे? तसं असेल काहीतरी.”
“एक काम कर,” मी म्हणालो, “त्या ईमेलमधला जो तिचा फोटो आहे, त्याचा ब्लो अप प्रिंट काढ आणि मला दे.”
अमोलने प्रिंट देईपर्यंत मी माझ्या खिशात नेहमी असणारी एक गोष्ट बाहेर काढली होती - मॅग्निफाइंग ग्लास. यावरून माझी आत्तापर्यंत बरीच चेष्टा झाली होती. अमोलला हे माहीत असावं, कारण मी ग्लास बाहेर काढल्यावर त्याने आपलं हसू दाबलेलं मी पाहिलं.
तिचा फोटो मी मॅग्निफाइंग ग्लासमधून बघत असताना माझं लक्ष सर्वात पहिल्यांदा गेलं ते तिच्या एकत्र बांधलेल्या हात आणि पायांकडे. तिचे हात मागे खेचून मग ते पायांना बांधण्यात आले होते. हल्लेखोरांनी एकूण ७ स्नॅप टाईज वापरले होते. तिच्या दोन्ही मनगटांभोवती या टाईजच्या गाठी होत्या आणि त्या दोन्ही टाईजच्या गाठी परत एका टायने एकमेकांत गुंतवलेल्या होत्या. पायांनाही तसंच होतं. शेवटचा – सातवा टाय जो होता, त्याने तिचे हात आणि तिचे पाय यांना एकत्र ठेवणारे टाईज जोडले होते. त्यामुळे तिच्या संपूर्ण शरीराला धनुष्याचा आकार आला होता.
फार गुंतागुंतीचा प्रकार वाटत होता हा. मला जर कुणाला बांधायचं असतं, तर मी नक्कीच साधी-सरळ पद्धत वापरली असती. तिला हे असं बांधायला तिच्या हल्लेखोरांना वेळ नक्कीच लागला असणार. तिने थोडा तर विरोध केला असेल. किंवा कदाचित केला नसेलही. जे काही असेल ते. तिच्या जांभळ्या पडलेल्या मनगटांवरून हे तर स्पष्ट होतं, की जेवढा वेळ ती बांधलेल्या स्थितीत होती, तो वेळ तिच्यासाठी वेदनामय होता. त्याचबरोबर मला हेही जाणवलं, की त्याबद्दल आणखी जास्त माहिती तिच्याकडूनच मिळू शकेल. सकाळी डॉ. त्रिवेदींच्या पार्टनरबरोबरच अलिशालाही भेटणं गरजेचं होतं.
“तू फोरेन्सिकच्या लोकांनी डॉ. त्रिवेदींच्या घरात गोळा केलेला पुरावा आणला आहेस का?” मी अमोलला विचारलं.
“हो,” तो जरा घुटमळला, “पण त्यांनी मला एकच प्लास्टिकची पिशवी दिली.”
“म्हणजे? आख्ख्या घरात फक्त एक पिशवी एवढाच पुरावा मिळाला त्यांना?”
गुन्हे किंवा आणखी स्पष्टपणे सांगायचं तर खुनासारखे गुन्हे हाताळायचा माझा जो काही अनुभव होता, त्यानुसार एकही पुरावा नसलेला क्राइम सीन हा प्रकार अस्तित्वात नसतो या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास होता आणि आहे. जेव्हा गुन्हेगार एखाद्या ठिकाणी वावरतो, तेव्हा त्याच्या अस्तित्वाच्या खुणा तिथे राहतातच आणि तो शोधून काढणं अत्यंत आवश्यक असतं.
अमोलने माझ्या हातात त्याला फोरेन्सिकवाल्यांनी दिलेली यादी दिली. त्यात बर्‍याच गोष्टी होत्या. केस, कपड्यांचे धागे, स्नॅप टाईज, निकॉन कॅमेर्‍याची लेन्स कॅप, ऑफिसमधल्या कॉम्प्युटरचं माउस पॅड वगैरे बर्‍याच फुटकळ गोष्टी होत्या. सर्वात शेवटी जी गोष्ट होती, त्याने माझं लक्ष वेधून घेतलं – सिगरेटची राख.
“कोण होतं तू तिथे गेलेलास तेव्हा?” मी अमोलला विचारलं.
“यंदेसाहेब होते.”
सुरेश यंदे म्हणजे फोरेन्सिकमधले एकदम जुने. त्यांच्या नजरेतून एकही गोष्ट सुटणं अशक्यच. पुरावा म्हणून जर त्यांनी सिगरेटची राख जमा केली असेल, तर त्यामागे काहीतरी कारण असणारच. विचारायला हवं.
माझ्याकडे यंद्यांचा नंबर होता. मी लगेचच त्यावर कॉल केला, “यंदेसाहेब, नमस्कार. राजेंद्र देशमुख बोलतोय.”
“बोला सर.”
मी लगेचच मुद्द्यावर आलो, “तुम्ही आत्ता जिथे गेला होतात, कफ परेड भागातल्या डॉ. त्रिवेदींच्या घरी – तिथे सिगरेटची राख सापडली आहे...”
“हो. तिथे ती एन.आय.ए. एजंट होती – सुजाता – तिने मला ती जमा करायला सांगितलं. त्रिवेदींच्या घरातली जी गेस्ट बेडरूम होती, तिच्या बाथरूममध्ये जो टॉयलेट टँक होता, त्याच्यावर ही राख पडलेली होती. कुणीतरी तिकडे बाथरूम वापरायला आला आणि तिथे उभा असताना तो सिगरेट ओढत होता. त्याने कदाचित ती सिगरेट तिथे ठेवली, आणि तो घाईघाईने बाहेर गेला. सिगरेट पूर्णपणे जळली, त्यामुळे टँकला भोकपण पडलं आणि ही राख तिथे राहिली. ती मला म्हणाली की एन.आय.ए.च्या लॅबमध्ये त्याबद्दल बाकी माहिती कळू शकेल.”
“एक मिनिट यंदेसाहेब. तुम्ही तिला ती राख घेऊन जाऊ दिली?”
“हो.”
“यंदेसाहेब,” मी महत्प्रयासाने माझ्या आवाजावर नियंत्रण ठेवलं होतं, “तुम्ही माझ्या केसमध्ये – माझ्या – जमा केलेला पुरावा एका एन.आय.ए. एजंटच्या हातात दिलात?”
“हो सर,” यंदे शांतपणे म्हणाले, “कारण तिने मला सांगितलं की त्यांच्या लॅबमध्ये त्याच्यावर तातडीने काम होईल आणि त्यावरून त्यांना सिगरेटची तंबाखू आणि त्यावरून कुठल्या देशातून ती आलेली आहे वगैरे गोष्टी शोधून काढता येतील. ती हेही म्हणाली की कदाचित या केसचा देशाबाहेरून आलेल्या दहशतवाद्यांशी संबंध असू शकतो.”
“आणि तुमचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला?”
“म्हणजे?” यंदे वैतागलेले होते हे कळत होतं, “काय म्हणायचंय तुम्हाला?”
“काही नाही यंदेसाहेब. तुम्ही म्हणण्यासारखं काही ठेवलेलंच नाही. माझ्या केसमधला पुरावा तुम्ही तिच्या हातात दिलात. मला एकदाही न विचारता. काय म्हणणार आता मी यावर?”
“पण एन.आय.ए.सुद्धा त्या लोकांनाच शोधायचा प्रयत्न करताहेत ना? त्यांची लॅब जास्त आधुनिक आणि सुसज्ज आहे. आमच्या लॅबपेक्षा.”
“ठीक आहे यंदेसाहेब!” मी फोन ठेवून दिला.
अमोल हे सगळं ऐकत होता, “सर, आपल्या फोटोग्राफरने काढलेले सगळे फोटो माझ्या लॅपटॉपवर आहेत. तुम्हाला हवे असतील तर...”
“हो. तू त्यांचे प्रिंट काढून दे मला. आत्ता.”
“आत्ता? सर, पन्नास तरी फोटो असतील.”
“हरकत नाही अमोल,” मी त्याच्याकडे रोखून पाहात म्हणालो, “पन्नास आहेत. पन्नास हजार नाहीयेत.”
त्याने मुकाट्याने पन्नास प्रिंट्स काढायला सुरुवात केली.
या लोकांनी – हल्लेखोरांनी – डॉ. त्रिवेदींना ठार का मारलं हा प्रश्न माझ्या डोक्यातून जायला तयार नव्हता. त्यांना मारलं आणि त्यांच्या पत्नीला जिवंत ठेवलं. का?
अमोलने सगळे पन्नास प्रिंट्स माझ्यासमोर ठेवले आणि मी माझ्या विचारातून भानावर आलो. त्याने आणि मी सगळे फोटो लक्षपूर्वक पाहायला सुरुवात केली. टॉयलेटचा फोटो होता, त्यात टॉयलेटची सीट उंचावलेली दिसत होती. याचा अर्थ कुठल्यातरी पुरुषाने वापर केला होता. सिगरेटच्या राखेचा फोटोही पाहिला. फोटोग्राफरने एक छोटी फूटपट्टी त्याच्या बाजूला ठेवून फोटो काढला होता. राख जवळपास दोन इंच लांब होती. एका पूर्ण सिगरेटच्या लांबीएवढी. याचा काय अर्थ होता?
वैतागून मी माझा फोन बाहेर काढला. त्यात सुजाताचा नंबर होता. जवळपास ७-८ वर्षांपूर्वी तिचा हाच नंबर होता. मी माझे फोन जरी बदलले असले, तरी हा नंबर मी न विसरता नव्या फोनमध्ये टाइप करायचो. इतक्या वर्षांत कधीही तिच्याशी फोनवर बोलण्याचा प्रसंग आला नव्हता. इच्छा बरेच वेळा झाली होती, आठवण तर कधीही पुसली गेली नव्हती. हा नंबर ती आत्ता वापरते आहे की नाही हेही मला माहीत नव्हतं. पण तरीही मला माझा राग आणि वैताग कुठेतरी काढायलाच हवा होता. मी तिचा नंबर डायल केला. फोन वाजला आणि व्हॉइसमेलवर गेला.
“मी बोलतोय. राजेंद्र देशमुख,” मी आवाजात आणता येईल तेवढा राग आणला होता, “मला तुझ्याशी बोलायचंय आणि माझी सिगरेटची राख मला परत हवी आहे. ही माझी केस आहे.”

No comments:

Post a Comment