नाझींनी निःशस्त्र बायका आणि लहान मुलांवर गोळ्या कशा झाडल्या असतील? जपानी सैनिकांनी एवढ्या भयावह प्रमाणावर बलात्कार आणि हत्या कशा केल्या? नाझी मृत्युछावणीत लोक नक्की कशाच्या आधारावर जिवंत राहिले असतील?
जवळजवळ २० वर्षे मी ह्या आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचसाठी मी दुस-या महायुद्धात या ना त्या प्रकारे सहभागी असलेल्या शंभराहून अधिक लोकांना भेटलो. मला अत्याचार करणा-या लोकांना भेटण्यात आणि त्यांचं तर्कशास्त्र जाणून घेण्यात जास्त रस होता.
या माझ्या कामानिमित्त मी जपान, बाल्टिक देश, पोलंड, अमेरिका, जर्मनी, बोर्निओ, इटली आणि चीन अशा वेगवेगळ्या देशांत गेलो. बलात्कारी, खुनी - अगदी नरमांस खाल्लेल्या लोकांनाही भेटलो. धीरोदात्तपणे पराभवाला सामोरे गेलेल्या सैनिकांना भेटलो, आॅशविट्झसारख्या मृत्युछावणीतून जीव वाचवून आलेल्यांना भेटलो - लहान अर्भकांना थंडपणे गोळ्या घालणा-यालाही भेटलो. ही प्रत्येक भेट आम्ही चित्रित आणि ध्वनिमुद्रित केली. यातला बराचसा भाग मी माझ्या वृत्तचित्रांसाठी आणि पुस्तकांसाठी वापरला पण अजूनही बराच भाग शिल्लक होता. शेवटी मी ही सगळी जमवलेली माहिती परत एकदा तपासून बघितली आणि ३५ लोकांवर लिहायचं ठरवलं.
या ३५ लोकांचं आयुष्य तुम्हा-आम्हा सर्वांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. जेव्हा मी या लोकांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा नाही पण आत्ता परत त्याच्यावर काम करताना एक प्रश्न माझ्या मनात पुन्हा पुन्हा येत होता - अशीच परिस्थिती जर माझ्यावर आली असती तर मी काय केलं असतं? अर्थातच मी किंवा कोणीही या प्रश्नाचं समाधानकारकपणे उत्तर देऊ शकत नाही. जर असे प्रसंग माझ्यावर आले असते तर मी आज जसा आहे त्यापेक्षा खूपच वेगळा झालो असतो, कारण एक व्यक्ती म्हणून आपल्या जडणघडणीत आजूबाजूच्या घटना आणि काळाचा खूप मोठा सहभाग असतो.
असं जरी असलं तरी भूतकाळातलं जग हे आजच्या जगापेक्षा फार वेगळं नाही. कदाचित काही गोष्टी वेगळ्या असतील कारण परिस्थिती वेगळी होती, माणसं तीच होती. मानवी मनाची संरचना गेल्या हजार वर्षांत बदललेली नाही. त्यामुळे या पुस्तकातली माणसं ही असामान्य वगैरे अजिबात नाहीत. ती तुम्हा-आम्हा सारखीच सामान्य आहेत - आपले वडील, आजोबा आणि पणजोबा यांच्यासारखीच.
जेव्हा आम्ही या दुस-या महायुद्धातल्या साक्षीदारांना भेटलो आणि चित्रीकरण केलं तेव्हा दोन गोष्टींचा विचार आम्हाला करावा लागला - पहिली म्हणजे त्यांनी सांगितलेली कुठलीही कहाणी ही कितपत खरी आहे? तर कुठल्याही मुलाखतीआधी त्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सखोल संशोधन केलेलं आहे - युद्धाशी संबंधित असंख्य दस्तऐवज दोस्तराष्ट्रांनी जर्मनी आणि जपानच्या पराभवाच्या वेळी हस्तगत केले. यातले बरेचसे दस्तऐवज युद्धगुन्हेगारांच्या खटल्यांमध्ये वापरले गेले आहेत. अशा अनेक कागदपत्रांचा वापर करुन आम्ही या साक्षीदारांच्या कथनाची सत्यता आणि सुसंगती पडताळून पाहिली आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या वर्षांनंतर कुठल्याही साक्षीदाराला भूतकाळ किती स्पष्टपणे आठवण्याची शक्यता आहे? माझा अनुभव असा आहे की जर एखाद्या घटनेने त्या माणसाच्या किंवा त्याच्या कुटुंबियांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणला असेल तर कितीही काळ जरी लोटला तरी त्या घटनेचा किंवा त्यातल्या बारीकसारीक तपशीलांचा विसर त्याला पडणार नाही. मला कदाचित मी गेल्या आठवड्यात काय खाल्लं ते नाही आठवणार पण ३० वर्षांपूर्वी प्रदीर्घ आजाराने झालेला माझ्या आईचा मृत्यू अगदी तपशीलवार आठवेल.
अजून एक. या कथा प्रातिनिधिक नाहीत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा फक्त त्याचा किंवा तिचा स्वतःचा आहे.
मी या पुस्तकाची सात भागांत विभागणी केली आहे. या ३५ जणांमधले काही जण एकापेक्षा जास्त गटांमध्ये येऊ शकतात. पण त्यांच्या एकंदर अनुभवावरुन मी त्यांना कोणत्या गटात ठेवायचं तो निर्णय घेतला आहे.
हिंसा ही इतर प्राण्यांप्रमाणे माणसाचीही मूळ प्रवृत्ती आहे हे या कथांमधून अधोरेखित होतंच पण भोवतालची परिस्थिती माणसाला स्वतःलाच ओळखू न येण्याइतका कसा बदलवते, तेही समजतं. या लोकांना भेटल्यावर माझ्या जगाविषयीच्या आणि युद्धाविषयीच्या दृष्टिकोनात खूपच बदल घडून आला. मला आशा आहे की वाचकांच्या मनातही असाच बदल होईल.
No comments:
Post a Comment