Thursday 9 October 2014

अंधार क्षण भाग १ - सामूहिक हत्या

दुस-या महायुद्धात सहा कोटींहून जास्त लोक मारले गेले - आजवरच्या सर्व संघर्षांमध्ये सर्वात जास्त. हे शक्य होण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा माणसांना मारण्यासाठी झालेला वापर. या भागात एकूण तीन मुलाखती आहेत. त्यावरुन तुमच्या हे लक्षात येईलच की विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात माणसं मारणं हे  अगदीच सहजसुलभ झालं होतं - तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आणि मानसशास्त्रीय दृष्टीनेही. आॅस्कर ग्रोएनिंग आणि पाॅल माँटगोमेरी - ज्यांच्या मुलाखती या भागात आहेत - या दोघांनीही तंत्रज्ञानामुळे आपण कसे स्वतःला आपल्या बळींपासून वेगळे ठेवू शकलो त्याचं वर्णन केलं आहे.
मुलाखतींधला हा भाग खूपच क्लेशदायक आहे कारण माणूस किती सहजपणे दुस-याचा जीव घेऊ शकतो हे आपल्याला कळतं. जरा विचार करा - तुमचा परमशत्रू, साता जन्माचा दावेदार - फक्त एक बटन दाबून तुम्ही नष्ट करु शकाल. कुठलीही अप्रिय आठवण नाही, कुठलीही विषण्णता नाही, ना खंत ना खेद. तुम्हाला कदाचित असं वाटेल की तुम्ही कोणाला मारलंच नाही. पाॅल माँटगोमेरीने अत्यंत समर्पक शब्दांत त्याचं वर्णन केलंय - व्हिडिओ गेम.
या सर्व अत्याधुनिक तंत्राने निव्वळ माणसं मारणं सोपं केलेलं नाही तर गुन्हा आणि त्याचं उत्तरदायित्व यांच्याविषयी मूलभूत प्रश्नही उपस्थित केलेले आहेत.
या भागातल्या तीन व्यक्तींपैकी पेट्रास झोलिओंका हा सरळसरळ दोषी होता कारण त्याने हातात बंदूक घेऊन आपल्यासमोर उभ्या लोकांवर गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळेच त्याला युद्धानंतर वीस वर्षांची शिक्षा झाली. पण आॅस्कर ग्रोएनिंगचं काय? तो नाझींची कुप्रसिद्ध मृत्युछावणी आॅशविट्झमध्ये एक व्यवस्थापक होता. जरी त्याने प्रत्यक्षात कोणालाही ठार मारलं नाही तरी मृत्यूचा कारखाना असलेल्या आॅशविट्झमध्ये ज्यूंच्या नरमेधाला त्याने थोडा तरी हातभार लावला होता.
शुत्झ स्टाफेल (एस्. एस्.) या नाझी संघटनेकडे नाझी राजवटीतल्या सर्व छळछावण्या आणि मृत्युछावण्यांची जबाबदारी होती. युद्धानंतर विजेत्या दोस्तराष्ट्रांनी नाझी पक्ष आणि त्याच्याशी संबंधित सर्व संघटना - एस्.एस्., गेस्टापो, हिटलर यूथ आणि  इतर अनेक - या गुन्हेगारी संघटना असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे या संघटनांचं निव्वळ सदस्यत्व हाही गुन्हा होता. तरीही ग्रोएनिंगसह जवळजवळ ८५% शुत्झ स्टाफेल सदस्यांना - जे आॅशविट्झमध्ये काम करत होते - कुठलीही शिक्षा झाली नाही, अगदी एक दिवसाचाही तुरुंगवास भोगावा लागला नाही कारण प्रत्येक विजेत्या राष्ट्रातल्या न्यायमंडळांनी असं ठरवलं की आॅशविट्झमधल्या बहुतांश एस्.एस्. सदस्यांनी स्वतः व्यक्तिगतरीत्या कुणाचीही हत्या केलेली नाही. या हत्या तंत्रज्ञानामुळे झालेल्या आहेत आणि तुम्ही गॅस चेंबरवर खटला कसा भरणार? हे ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो - जर उद्या एखाद्या राजवटीने असं तंत्रज्ञान विकसित केलं की ज्यामुळे मानवी सहभागाशिवाय तुम्हाला शत्रूच्या असंख्य नागरिकांना ठार मारता येईल, तर काय कोणीच त्याला जबाबदार असणार नाही?
यानंतरचा महत्वाचा प्रश्न म्हणजे कोण दोषी आणि कोण निर्दोष हे ठरवण्याचा. नाझींनी आणि अनेक दोस्तराष्ट्रांमधल्या नागरिकांनीसुद्धा असा मुद्दा मांडला आहे की नाझींनी गॅस चेंबरमध्ये लोकांची विषारी वायूने हत्या करणं आणि दोस्तराष्ट्रांच्या हवाईदलांनी बाँबफेक करुन जर्मन आणि जपानी नागरिकांना मारणं यात तसा काहीच फरक नाही. ग्रोएनिंगनेही हा मुद्दा आपल्या मुलाखतीत उपस्थित केला आहे. आता नाझींनी ज्या लोकांना गॅस चेंबर्समध्ये मारलं ते सर्वजण नाझींनी आपल्या राक्षसी महत्वाकांक्षेपायी जगावर लादलेल्या युद्धाचे बळी होते आणि दोस्तराष्ट्रांनी जर्मनी आणि जपानवर केलेले बाँबहल्ले हे आक्रमणाचा नाही तर प्रतिकाराचा भाग होते हे जरी कितीही खरं असलं तरी ह्या मुद्द्याने उपस्थित केलेला प्रश्न महत्वाचा आहे आणि मी ग्रोएनिंगच्या मुलाखतीच्या शेवटी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे.
या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधणं सोपं नाही पण हे प्रश्न मूलभूत स्वरूपाचे आहेत आणि कुठलंही युद्ध हे कितपत वैध आणि नैतिक आहे हे ठरवण्यासाठी ही उत्तरं शोधणंही आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment