Thursday, 9 October 2014

अंधार क्षण - प्रास्ताविक

देव आणि सैतान खरोखरच अस्तित्वात आहेत किंवा नाहीत यावर विचारवंतांनी हजारो वर्षे खर्च केली आहेत.  जवळपास प्रत्येक धर्मामध्ये या संकल्पना आहेत. आणि एका बाबतीत एकमतही आहे - प्रत्येक माणसामध्ये देवाचा आणि सैतानाचाही अंश असतो, जो त्याच्या कृतीमध्ये दिसतो - आणि जेव्हा एखाद्या माणसासमोर टोकाची, यापूर्वी कधीही न आलेली, संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणारी परिस्थिती येते - तेव्हा तो काय रतो, त्यावरून त्याचं खरं रुप इतरांसमोर आणि कधी कधी खुद्द त्या  माणसासमोरही येतं.

दुस-या महायुद्धाने अशीच वेळ आणि असे प्रसंग असंख्य लोकांवर आणले. त्याआधीचे इतर सर्व संघर्ष सामान्य लोकांच्या आयुष्याशी खेळले नाहीत असं नाही पण दुस-या महायुद्धात दोन्हीही बाजूंनी सामान्य माणसांचा ज्या निर्घृणपणे आणि थंडपणे वापर केला, त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.
लाॅरेन्स रीज या विख्यात वृत्तचित्रकार आणि लेखकाने याच विषयावर प्रचंड काम केलं आहे. साधारणपणे कुठल्याही युद्धाचा इतिहास म्हणला की इतिहासकार निर्णय घेणा-यांना जास्त महत्त्व देतात. सामान्य माणूस - ज्याच्यावर या निर्णयांचा परिणाम होतो - त्याचा विचार क्वचितच केला जातो. रीजच्या कामाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. त्याने मुलाखत घेतलेले हे लोक राज्यकर्ते नाहीत, अधिकारी नाहीत किंवा सेनानीही नाहीत. युद्ध सुरु करण्यात त्यांचा काहीही हात नाही. काही जण तर केवळ चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते, काही जणांना तर केवळ एखाद्या देशात किंवा वंशात जन्माला आल्यामुळे अनेक अत्याचार सहन करावे लागले.

रीजचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने निव्वळ ज्यांनी हे सगळं भोगलं त्यांचाच नाही तर ज्यांचा अत्याचारांमध्ये सहभाग होता अशा लोकांनाही बोलतं केलं आहे. ज्या ३५ जणांच्या मुलाखतींचा हा स्वैर अनुवाद आहे त्या प्रत्येकाने हा अंधार क्षण अनुभवलेला आहे.

भारतीय सैनिक ब्रिटिश साम्राज्याचा भाग म्हणून दुस-या महायुद्धात लढले होते. इंफाळ-कोहिमापर्यंत जपानी सैन्याने धडक मारली होती. स्वातंत्र्यानंतरही चीनविरुद्ध एक आणि पाकिस्तानविरुद्ध चार युद्धे झाली आहेत. असं जरी असलं तरी सीमेवरचे नागरिक सोडले तर युद्धाच्या दाहकतेचा, बीभत्सतेचा आणि संहारकतेचा आपल्याला अनुभव नाही. युध्दस्य कथाः रम्याः असं आपण म्हणतो पण युद्धस्य कथाः भयंकराः कशा असतात त्याचं प्रत्यंतर आणून देणा-या या सत्यकथा आहेत.

रीजच्या या पुस्तकाचा स्वैर अनुवादकरण्यामागे अनेक कारणे आहेत. पण सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रीजची वस्तुनिष्ठ, तटस्थ आणि कुठलाही नैतिक अभिनिवेश नसलेली विषयाची मांडणी आणि या कथनातून जाणवणारा त्याचा प्रामाणिकपणा!

No comments:

Post a Comment