Thursday 9 October 2014

अंधार क्षण - पाॅल माँटगोमेरी



कधी कधी मला असं वाटतं की माझ्याएवढं कोणीही सामूहिक मारेक-यांना भेटलेलं नाही किंवा त्यांच्यावर लिहिलेलंही नाही. या गोष्टीचा मला अजिबात अभिमान नाही आणि मी हे ठरवून केलेलं नाही. पण हेही तितकंच खरं आहे की त्यामुळे मला मानवी स्वभावाचं बरंच अवलोकन करता आलं आणि माझ्या लक्षात आलेली एक आश्चर्यकारक बाब अशी आहे की या सामूहिक मारेक-यांपैकी बहुसंख्य लोकांना आपल्या कृत्याचा कुठल्याही प्रकारे पश्चाताप होत नाही किंवा खंतही वाटत नाही. पाॅल माँटगोमेरी हा अशा माणसांपैकी एक.

१९९९ साली त्याच्या रँचवर मी त्याची मुलाखत घेतली. अत्यंत निसर्गरम्य वातावरणात त्याचं घर होतं. हिरव्यागार कुरणांना छेदत जाणा-या एका  रस्त्यावरून आम्ही त्याच्या घरी पोचलो. गेल्या अनेक वर्षांपासून तो आणि त्याची पत्नी तिथे राहात होते आणि घर मुला-नातवंडांनी आणि नातेवाईकांनी भरलेलं होतं. घरातलं वातावरण अत्यंत प्रसन्न होतं. खुद्द पाॅल माँटगोमेरीही अशाच वातावरणात वाढला. अशा माणसाने हजारो लोकांची हत्या केली असेल असा विचारही कोणी मनात आणू शकणार नाही.

पण हे खरं आहे. दुस-या महायुद्धात पाॅल अमेरिकन वायुदलात होता. जपानने पर्ल हार्बर या अमेरिकन नाविक तळावर ७ डिसेंबर १९४१ या दिवशी आकस्मिक हल्ला केला आणि युद्धाला ख-या अर्थाने जागतिक बनवलं. पर्ल हार्बरनंतर लगेचच पाॅल वायुदलात दाखल झाला आणि युद्धाचा पूर्ण काळ पर्ल हार्बरचा ' विश्वासघात ' ह्या एकाच विचाराने तो पछाडलेला होता. " हा जपान्यांचा भ्याडपणा होता," तो मला म्हणाला, "त्यांनी अमेरिकन मालमत्तेचं नुकसान केलंच पण आमच्या सैनिकांचेही काही कारण नसताना प्राण घेतले. माझ्या ओळखीचे काही जण पर्ल हार्बरच्या  हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आणि त्यांचा सूड घेणं ही मला माझी नैतिक जबाबदारी वाटत होती."

अमेरिकेविरुद्ध रीतसर युद्ध न पुकारता पर्ल हार्बरवर बाँबहल्ला करणं ही जपानची घोडचूक होती. जगातल्या कुठल्याही देशात अशा हल्ल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली असतीच पण अमेरिकेत त्याला अजून एक बाजू होती. न्याय आणि समान संधीच्या ज्या अमेरिकन कल्पना होत्या, त्याला या हल्ल्यामुळे तडा गेला. असंख्य अमेरिकन लोकांच्या मते हा जपानी हल्ला म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्यापेक्षाही घृणास्पद होता. त्यामुळे पाॅल माँटगोमेरी आणि त्याचे अनेक देशबांधव जपानचा सूड उगवणे या एकाच हेतूने लष्करात दाखल झाले. पाॅलला स्वतःला वैमानिक बनायचं होतंच आणि त्याचं सूड उगवण्याचं साधन होतं  चार इंजिनं असलेलं बोइंग बी 29 सुपरफोर्ट्रेस, दुस-या महायुद्धातलं सर्वात मोठं आणि सर्वात जास्त बाँबहल्ल्यांध्ये सहभागी असलेलं विमान.

सुरूवातीला तो वैमानिक म्हणून प्रशिक्षण घेत होता पण नंतर गरजेपेक्षा जास्त वैमानिक असल्यामुळे तो रेडिओ आॅपरेटर म्हणून प्रशिक्षण घ्यायला लागला. बी 29 विमानांसाठी वायुदलाचा तळ प्रशांत महासागरातील टिनियन नावाच्या एका बेटावर होता. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, पाॅल तिकडे दाखल झाला. 
वैमानिकाला त्याचं लक्ष्य शोधण्यासाठी मदत करणं आणि बाँब पाहिजे त्या ठिकाणी पडावेत म्हणून बाँबफेक्यांना मदत करणं या त्याच्या मुख्य जबाबदा-या होत्या. आयुष्यातला पहिला हल्ला त्याने जपानच्या योकोहामा बंदरातल्या तेलशुद्धीकरण केंद्रांवर केला होता - ' बाँबफेक करुन झाल्यावर मी जेव्हा विमानातून खाली पाहिलं तेव्हा ते संपूर्ण तेलशुद्धीकरण केंद्र धडाधडा जळत होतं. ते आगीचे लोळ पाहिले आणि मला काहीतरी केल्याचं समाधान वाटलं.'

यानंतर त्याने ओसाकामधल्या मित्सुबिशी कारखान्यासारख्या अनेक औद्योगिक केंद्रांवर बाँबहल्ले केले. पण अमेरिकन वायुदलाच्या जबरदस्त ताकदीमुळे अगदी थोड्या काळातच अशी परिस्थिती आली की नष्ट करायला जपानकडे काहीच औद्योगिक लक्ष्य उरलं नाही.

वायुदलाने आपलं लक्ष आता नागरी वस्त्यांवर केंद्रित करायचं ठरवलं. महायुद्धातल्या अनेक विवादास्पद निर्णयांपैकी हा एक निर्णय होता - ' आम्हाला असं वाटलं की नुसतं जपान्यांच्या युद्ध करण्याच्या क्षमतेचंच नव्हे तर त्यांच्या युद्ध करण्याच्या इच्छेचंही खच्चीकरण झालं पाहिजे. त्यामुळे मग आम्ही जपानच्या शहरांवर हल्ले करायला सुरूवात केली. 
टोकियो, नागोया, ओसाका ह्या शहरांपासून आम्ही सुरुवात केली आणि जे होतं नव्हतं ते सगळं जमीनदोस्त करुन टाकलं. पूर्ण विनाश. '
अग्निशामक दलाच्या तुकड्यांना आग विझवण्याच्या कामातून उसंत मिळू नये म्हणून अमेरिकन वायुदलाने वेगवेगळ्या वेळी स्फोट होणारे बाँब टाकले. अशा बाँबची, खरं सांगायचं तर, काही गरज नव्हती कारण जपानी लष्कराकडे अमेरिकन हल्ल्यांना तोंड देण्याची ताकदच उरलेली नव्हती. ना त्यांच्याकडे विमानविरोधी तोफा होत्या ना लढाऊ विमाने. त्यामुळे अमेरिकन विमानांना  बेछूट बाँबफेक करायला मोकळं रान मिळालं. पाॅल मला म्हणाला की आपलं विमान पाडलं जाऊन आपण मृत्यूमुखी पडू किंवा जपानचे युध्दकैदी बनू अशी भीती अमेरिकन वैमानिकांना कधीच वाटली नाही. जे कोणी या अग्निसंहारातून वाचले त्यांनी आगीचे लोळ आकाशातून कोसळत आहेत आणि लोक आगीने वेढले गेले आहेत अशी वर्णनं केली आहेत. जपानी लोकांची लाकूड आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेली घरं अशा परिस्थितीत टिकणं शक्यच नव्हतं. त्यामुळे कितीतरी लोक आपल्या घरांबरोबर जळून राख झाले. ९-१० मार्च, १९४५ या दोन दिवशी टोकियोवर अमेरिकन विमानांनी जो सतत बाँबवर्षाव केला त्यात एक लाख जपानी नागरिक ठार झाले - हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबाँब फेकल्यावर ताबडतोब जेवढे लोक ठार झाले, त्यापेक्षा हा आकडा जास्त आहे.  (या दोन्ही ठिकाणी अनेक लोक हे नंतर मुख्यतः  किरणोत्सर्जनामुळे झालेल्या कर्करोगाने मरण पावले.)

"स्पष्टपणे सांगायचं तर मला याविषयी अजिबात वाईट वगैरे वाटत नाही," पाॅल माँटगोमेरी म्हणाला, 
" मी त्या वेळी २१ वर्षांचा होतो आणि मला युद्ध लवकरात लवकर संपवून घरी जायचं होतं. आणि  माझ्या वरिष्ठांनी मला काही शहरांवर बाँब फेकायला सांगितले, मी फेकले. आता तिथे लहान मुलं आणि स्त्रिया होत्या. असणारच. पण मला जी जबाबदारी युद्धाचा एक भाग म्हणून सोपवण्यात आली होती ती मी पार पाडली. "

पाॅल माँटगोमेरीचे हे शब्द ऐकल्यावर एखाद्याला तो एकतर बथ्थड रेम्याडोक्या किंवा अत्यंत क्रूर असा माणूस वाटेल पण मी त्याचं जे काही निरीक्षण केलं त्यावरून मी सांगू शकतो की तो दोन्हीही नाही . माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तो विचारपूर्वक देत होता. आपण इतक्या लोकांच्या, ते पण प्रामुख्याने  स्त्रिया आणि मुलांच्या हत्येत सहभागी झालो होतो हे स्वीकारणं त्याला बहुधा कठीण जात असावं. तो एका अवाढव्य वायुदलाचा एक भाग असलेल्या बाँबफेकी विमानातल्या तुकडीमधला एक सैनिक होता. दुस-या शब्दांत सांगायचं तर त्याचा या सगळ्या संहाराशी व्यक्तिगत संबंध नव्हता. नंतर त्यानेच आपली अलिप्तता शब्दांकित केली, " मी एखादी बंदूक किंवा संगीन घेऊन युद्ध करायला जात नव्हतो. जर मी एखाद्या शत्रुसैनिकाच्या पोटात संगीन खुपसून त्याला ठार मारलं असतं तर कदाचित मला नंतर मानसिक त्रास झाला असता पण जेव्हा तुम्ही आकाशात, एवढ्या अंतरावर असता आणि तुम्ही आणि तुमचं लक्ष्य या दोघांनीही एकमेकांना पाहिलेलं नसतं तेव्हा तुम्हाला असा काही त्रास होत नाही. हातघाईची लढाई आणि ही अशी लढाई यात हाच तर फरक आहे. मी केली ती लढाई एखाद्या व्हिडिओ गेमसारखीच आहे. "

मला वाटतं, आपण स्वतः आणि आपण मारलेले लोक यांच्यात असं 'अंतर ' ठेवल्यामुळेच पाॅलसारखा मानसिक दृष्ट्या नाॅर्मल माणूस स्त्रिया आणि मुलांच्या हत्याकांडात सहभागी होऊ शकला. आपल्या पूर्वजांसाठी एखाद्याला दगडी किंवा लाकडी हत्याराने समोरासमोर मारणं जितकं कठीण होतं तितकंच पाॅल आणि त्याच्यासारख्यांसाठी असंख्य लोकांना एकाच वेळी मारणं सोपं आहे.

शत्रूला मारणं इतकं सोपं असल्यामुळे असेल कदाचित पण अमेरिकन बाँबफेकी तुकड्यांमधले सर्वचजण जपानवर सूड उगवल्याच्या भावनेने संतुष्ट होते. युद्धाला सुरूवात अमेरिकेने केली नव्हती, जपानकडे असलेली कुठलीही संपत्ती अमेरिकनांना नको होती आणि तरीही युद्ध त्यांच्यावर लादलं गेलं होतं त्यामुळे आपल्याला लढायलाच पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं होतं.  पर्ल हार्बरवर बाँब टाकून जपानने बीज पेरलं होतं. त्यातून आता जे उगवेल त्याची जबाबदारीही जपानचीच असेल ही भावना जवळपास प्रत्येक अमेरिकन सैनिकाची आणि अधिका-यांचीही होती. शिवाय, आपण वांशिक दृष्टीने कमअस्सल दर्जाच्या लोकांशी लढतो आहोत अशी अनेक अमेरिकन सैनिकांची समजूत होती. अमेरिकन वृत्तपत्रांमध्ये आणि नियतकालिकांमध्ये जपान्यांचा उल्लेख सरसकट ' माकडं ' असाच होत होता. पण पाॅलने मात्र वर्णद्वेषाची शक्यताच उडवून लावली. " माझ्या एका मुलाने जपानी मुलीशी लग्न केलंय. ती हवाईची आहे आणि त्याच्या आयुष्यात आलेली सर्वात सुंदर गोष्ट आहे. माझं जपानी किंवा जर्मन लोकांशी अजिबात वैर नाही. त्या वेळी जपानी आणि जर्मन सैन्याने आमच्यावर जे युद्ध लादलं होतं त्याच्याशी माझं शत्रुत्व होतं आणि मला युद्ध संपवून लवकरात लवकर घरी जायचं होतं. आणि जर शहरांवर बाँब टाकून ते लवकर संपत असेल तर माझी त्याला काहीही हरकत नव्हती. "

एका अशा ' कामगिरी ' च्या वेळी मात्र ही परिस्थिती थोडीशी बदलली. जपान हा बेटांनी बनलेला देश आहे, ज्यातलं हाॅन्शू हे सर्वात मोठं बेट आहे. क्युरे हे शहर या बेटाच्या नैऋत्य किना-यावर आहे. पाॅलवर याच शहराला बेचिराख करण्याची कामगिरी होती. त्याचं विमान या कामगिरीवर गेलेल्या ताफ्यातलं शेवटचं विमान होतं. खाली क्युरे शहर जळत होतं आणि पाॅलचं विमान नेहमीपेक्षा ब-याच कमी उंचीवर होतं - " आम्ही इतक्या कमी उंचीवर होतो आणि आग एवढी भयंकर होती की खाली जळणा-या वस्तूंचे वास आम्हाला वरपर्यंत येत होते. घरांच्या तुळया आणि इतर लाकडी सामान आगीने तडकत होतं आणि मला वाटतं मानवी मांस आणि मलमूत्र एकत्रित जळत असल्याचा अत्यंत घाणेरडा वास यायला लागला. मला त्याक्षणी भडभडून आलं."
"त्यावेळी तुला काय वाटलं?" मी विचारलं. 
" नाही माहीत. सहानुभूती नक्कीच नाही वाटली. मी त्यावेळी तरुण होतो आणि मला अशा कामगि-यांचा ब-यापैकी अनुभवही होता. त्यामुळे मला काहीच वाटलं नाही. "

पाॅलने कितीही जरी म्हटलं तरी त्याच्यावर या घटनेचा परिणाम झाला होता हे निश्चित. एक तर ही घटना इतक्या वर्षांनंतर त्याला स्पष्टपणे आठवत होती. आणि माझ्यासमोर त्याचं वर्णन करताना कुठेतरी त्याच्या अलिप्ततेला तडा जात होता. त्याच्या डोळ्यांनी, कानांनी आणि  नाकाने त्याच्या मनाला दिलेला संदेश - या सगळ्याला तो जबाबदार असल्याचा - दडपण्याचा तो प्रयत्न करत होता पण ते त्याला जमत नव्हतं.

असं काहीतरी होईल ही शक्यता अमेरिकन सैन्यदलांनी विचारात घेतली होतीच. त्यामुळे जेव्हा हा सगळा ताफा टिनियन बेटावरच्या तळावर परतला, तेव्हा तिथल्या सार्जंटने प्रत्येक विमानातल्या प्रत्येकाला जर कुठली गोष्ट ताबडतोब दिली असेल तर एक ग्लास एकदम कडक दारू. " मी पीत नाही असं मी सार्जंटला सांगितलं," पाॅल म्हणाला, " त्यावर तो म्हणाला ' तरीसुद्धा पी.' वरिष्ठांचा आदेश म्हणून मी तो ग्लास रिकामा केला. आणि त्यानंतर मी लगेचच झोपी गेलो. तसंही सार्जंटने सांगितलं होतंच - तुला रात्री शांत झोप लागावी आणि कुठलीही वाईट स्वप्नं पडू नयेत म्हणून पी. आणि तसंच झालं. ती माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची वेळ असेल मी दारूला हात लावायची."
या सर्व बाँबफेकी दलांच्या मानसिक आरोग्यासाठी अमेरिकन सैन्याचे विशेष मानसोपचारतज्ज्ञ रात्री  त्यांच्या तळावर चक्कर मारत असत - सर्वजण शांत झोपले आहेत की नाहीत हे बघायला. 
" त्यांनी आम्हाला नंतर हे सांगितलं की अशा कामगिरीनंतर ताबडतोब गाढ झोपी जाणं अत्यंत आवश्यक आहे. जागे राहिलात तर आपल्या हातून घडून गेलेल्या गोष्टींचा विचार कराल आणि मग तुम्हाला त्रास होईल. आणि त्यांचं म्हणणं खरं होतं. मी जेव्हा जागा झालो तेव्हा एकदम ताजातवाना होतो आणि मेलेल्या जपानी लोकांबद्दल मला कुठलीही सहानुभूती वाटत नव्हती."

एखाद्याला हे उद्गार कठोर वाटतील पण मी पैज लावू शकतो की जर आज कोणी पाॅल माँटगोमेरीला भेटला तर त्याला हा माणूस आवडेलच. जेव्हा आम्ही परत निघालो तेव्हा त्याने आमच्या कुटुंबियांसाठी खास घरी बनवलेले पदार्थ आणि भेटवस्तू दिल्या. परत जात असताना माझ्या मनात हा विरोधाभास राहून राहून येत होता - एक कुटुंबवत्सल, प्रेमळ माणूस; ज्याने युद्धात शत्रूची हजारो माणसं अलिप्तपणे मारली!



No comments:

Post a Comment