Thursday 30 October 2014

अंधार क्षण - वुल्फगांग हाॅर्न

२२ जून १९४१. पहाटे ४.३० वाजता जर्मन तोफखान्याचा पहिला गोळा सोविएत हद्दीत आदळला आणि जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात संहारक आक्रमणाला प्रारंभ झाला. या तोफखाना दलाचं नाव होतं पँझर. तोपर्यंत जर्मनीने दुस-या महायुद्धात मिळवलेले सगळे नेत्रदीपक विजय हे पँझरचंच कर्तृत्व होतं.
एकामागोमाग एक तोफगोळे सोविएत सैनिकांवर आणि तटबंदीवर आदळत होते. ते दृश्य बघून २२ वर्षांचा वुल्फगांग हाॅर्न प्रचंड भारावून गेला होता. " आमच्या सैन्याची ताकद बघून जी भावना मनात आली तिचं शब्दांत वर्णन करता येणार नाही. मला अजून एका गोष्टीमुळे खूप आनंद झाला होता - आम्ही आमची ताकद आमच्या प्रच्छन्न शत्रूविरुद्ध वापरत होतो - अत्यंत धोकादायक आणि हलकट असा शत्रू."

यापुढचे ५ महिने वुल्फगांगने अशाच भारावलेल्या मन:स्थितीत काढले. जेव्हा मी त्याची मुलाखत घेतली तेव्हा मला हे जाणवलं की युद्धाची काळी बाजू त्याने पाहिलीच नसावी. त्याच्यासाठी युद्ध म्हणजे एखाद्या वाघसिंहांसारख्या मोठ्या प्राण्याची शिकार करण्यासारखंच होतं.

वुल्फगांग आणि त्याच्यासारख्या अनेक जर्मन सैनिकांनी मला सुरूवातीलाच हे सांगितलं होतं की ते कट्टर नाझी अजिबात नव्हते. १९३० च्या दशकात वुल्फगांग हिटलर युवा (जर्मन भाषेत Hitler Jugend किंवा HJ) या संघटनेचा सदस्य होता पण त्याला नाझीवादाचं काही खास आकर्षण नव्हतं , " मला असं वाटलं की जर मी हिटलर युवाचा सदस्य बनलो तर पुढे भविष्यात अनेक दरवाजे आपोआप उघडतील. मी आठवड्यातून एकदा त्यांच्या संध्याकाळच्या वर्गांना जायचो आणि दर रविवारी युद्धाचं प्रशिक्षणही घ्यायचो. त्यात व्यायाम आणि शिस्त या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. माझ्या घरीही त्यामुळे कोणी विरोध केला नाही. "
वायमार इथे झालेल्या एका समारंभात त्याला खुद्द अॅडाॅल्फ हिटलरला भेटायची संधी मिळाली पण हिटलरच्या व्यक्तिमत्त्वाने तो अजिबात प्रभावित झाला नाही, " तिथल्या स्थानिक नाझी पक्षाच्या नेत्यांबरोबर हिटलरने रस्त्यावर संचलनात भाग घेतला. त्याच्याबरोबर इतर उच्चपदस्थ नाझीही होते.
पण हिटलर एकदम निस्तेज, अतिसामान्य दिसत होता. मी तर त्याला पाहून निराश झालो. त्याच्या भाषणातही काही नवीन मुद्दे नव्हते. तेच तेच विचार तो परत परत मांडत होता. आम्हाला हे सगळं आधीच माहीत होतं."
पण विशेष बाब ही आहे की जरी वुल्फगांगला  हिटलर आणि नाझीवाद यांच्यात रस नव्हता तरी त्याचा जर्मनीने सोविएत रशियावर केलेल्या आक्रमणाला पाठिंबा होता. त्याच्यासाठी हिटलरपुढे स्वतःला पूर्णपणे समर्पित न करणं आणि तरीही त्याच वेळी कम्युनिस्टांना पूर्णपणे संपवलं पाहिजे असं मानणं हे शक्य होतं. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा मी त्याची मुलाखत घेतली तेव्हा तो म्हणाला की जर नाझी सोविएत रशियाविरूद्ध जिंकले असते तर पूर्व युरोपचं रशियाप्रणित साम्यवादापासून संरक्षण झालं असतं.
म्हणजे वुल्फगांगच्या मते नाझी जर्मनीने जंगली आणि असंस्कृत रशियनांपासून युरोपचं संरक्षण करण्यासाठी रशियावर आक्रमण केलं. त्यामुळे जेव्हा तो सैन्यात दाखल झाला तेव्हा त्यामागे एक नैतिक अधिष्ठान होतं. दुसरं कारण म्हणजे त्याला असं मनापासून वाटत होतं की रशियन लोक जर्मनांच्या तुलनेत हीन वंशाचे आहेत, " त्यांचं राहणीमान पाहूनच कोणालाही कळलं असतं. इतकी गलिच्छ घरं आणि इतकी गरिबी! आम्ही आमचा दारूगोळा अशा लोकांवर अजिबात वाया घालवला नाही. पूर्ण युरोप जर राहणीमानानुसार अ,ब आणि क या तीन भागात विभागला तर रशिया म्हणजे क विभाग. सर्वात गरीब आणि गलिच्छ." हे सगळं बोलत असताना त्याच्या चेह-यावर स्मित होतं. त्याचा असा ठाम विश्वास होता की जरी रशियन सैन्याने जर्मनांना पराभूत केलं असलं तरी त्यांचा दर्जा जर्मनांपेक्षा हलकाच होता.

रुसो-जर्मन युद्धाच्या नंतरच्या काळात त्याने सोविएत प्रतिकारकांविरुद्धच्या दग्धभू लढायांमध्ये भाग घेतला. सोविएत प्रतिकारक जर्मन सैन्याच्या मुख्य आक्रमणरेषेच्या मागे राहून जर्मन सैन्यावर हल्ला करत. दिवसा ते गावांमध्ये राहात, सर्वसामान्य शेतक-यांसारखे वावरत पण रात्री जर्मन सैन्याच्या मोर्च्यांवर गनिमी हल्ले चढवत. त्यामुळे त्यांना आश्रय देणारी गावं नष्ट करायला नाझींनी सुरूवात केली. याच त्या दग्धभू लढाया. अशाच एका लढाईत एक संपूर्ण गाव बेचिराख केल्याचं वुल्फगांगने मान्य केलं. या गावात प्रतिकारकांनी आश्रय घेतल्याचा नाझींना संशय होता. ऐन थंडीत नाझींनी सर्वांना घराबाहेर काढलं, पुरूषांची कत्तल केली आणि सगळ्या घरांना आग लावली. निम्म्याहून जास्त स्त्रिया आणि मुलं थंडीने गारठून मरण पावली.
मी जेव्हा त्याच्यासमोर या गोष्टीचा उल्लेख केला तेव्हा माझं बोलणं उडवून लावत तो म्हणाला, " हो! मान्य आहे असं झालं ते पण रशियनांना थंडीची सवय असते! " या कृत्याबद्दल खंत किंवा पश्चात्ताप वाटतो का या प्रश्नावर त्याने हसत हसत हे उत्तर दिलं, " नाही. मला तर उलट आनंद झाला की आमच्या युनिटने हे काम केलं. "

हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ही मनोवृत्ती वुल्फगांगच्या मनात युद्धामुळे निर्माण झाली नाही, तर तो युद्धात ही मनोवृत्ती घेऊनच उतरला, आणि त्याने आपल्या आधीच काढलेल्या निष्कर्षाचे पुरावे शोधण्याचे प्रयत्न केले. आणि त्याच्या या अशा पूर्वग्रहामुळे त्याने युद्धाचा आनंद उपभोगला. आपण आपल्यासारख्या इतर माणसांवर अत्याचार करतोय किंवा त्यांना ठार मारतोय असा विचारही न करता त्याने आणि त्याच्यासारख्या अनेकांनी युद्धाकडे एक सहल, एक आनंददायी अनुभव म्हणून पाहिलं आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धतंत्र यांनी हा आनंद द्विगुणित केला. तोपर्यंत जगाने इतकं तंत्रशुद्ध लष्करी आक्रमण पाहिलंच नव्हतं. युद्धाचं तंत्र अजूनही पारंपारिक होतं - क्रमवार आक्रमण हा नियम जवळजवळ सर्व राष्ट्रांची सैन्यदलं पाळत होती. प्रथम विमानदलाद्वारे बाँबहल्ला, नंतर रणगाडे आणि चिलखती दल आणि शेवटी भूदल हाच क्रम जगभरातल्या लष्करी महाविद्यालयांमध्ये अधिका-यांना शिकवला जात होता. पण नाझींच्या ब्लिट्झक्रीग किंवा विद्युद्वेगी युद्धतंत्राने हे सगळे पारंपारिक सिद्धांत एका क्षणात कुचकामी ठरवले.

हे तंत्र त्यांनी प्रथम पोलंडविरुद्ध वापरलं आणि त्याला यशही मिळालं. नंतर बेल्जियम, लक्झेंबर्ग, नेदरलँडस् इथेही ब्लिट्झक्रीगचा जर्मनांनी यशस्वी वापर केला. पण त्याचं खरं यश त्यांना पहायला मिळालं फ्रान्समध्ये. संख्याबळाने कितीतरी अधिक असलेल्या फ्रान्सला अवघ्या १५ दिवसांत शरण आणून नाझींनी सगळ्या जगाला तोंडात बोटं घालायला लावली. पुढे ग्रीस आणि क्रीटवर ताबा मिळवून जर्मन सैन्याने बाल्टिकपासून भूमध्य समुद्रापर्यंत आख्खा युरोप आपल्या पायाशी आणला. याआधी कोणीही असा पराक्रम गाजवला नव्हता. हे श्रेय निर्विवादपणे ब्लिट्झक्रीग तंत्राचं होतं. त्यामुळे सोविएत रशियाविरूद्ध आघाडी उघडताना त्यांनी याच तंत्राचा वापर केला. क्रमवार आक्रमण या गोष्टीला नाझींनी पूर्णपणे फाटा दिला आणि एका छोट्या बिंदूवर - बरेच वेळा एखादा रस्ता - आपले सगळे प्रयत्न केंद्रित केले. बाँबफेकी विमानं, चिलखती दल, रणगाडे आणि तोफा हे सगळे एकाच वेळी त्या एका बिंदूवर एकवटलेले असत. यात खरं कौशल्य होतं ते या सगळ्या दलांमधल्या समन्वयाचं. जरा जरी त्यात चूक झाली असती तर एका सेनाविभागाने आपल्याच दुस-या विभागाला नष्ट केलं असतं. हे कौशल्य त्या वेळी फक्त जर्मन सेनानींकडे होतं आणि त्यांना त्याचा सार्थ अभिमानही होता. " आमच्या सर्व दलांमध्ये अप्रतिम समन्वय होता, " वुल्फगांग मला अभिमानाने म्हणाला, " आणि आम्हाला त्याचा फायदाही झाला. "

जेव्हा एकापाठोपाठ एक सोविएत शहरं नाझींच्या हातात पडायला लागली तेव्हा त्यांचा हा अभिमान शिगेला पोहोचला आणि त्यावेळी कोणालाही त्यात वावगं वाटलं नाही कारण सोविएत भूप्रदेशात नाझींनी अभूतपूर्व मुसंडी मारली होती. १९४१ चा शरदऋतू सुरु होण्याआधीच त्यांनी ३० लाख रशियन सैनिकांना कैद केलं होतं. ब्लिट्झक्रीग तंत्रामुळे नाझींना शत्रुसैन्याला दोन्ही बाजूंनी कोंडीत पकडणं शक्य होत असे. सप्टेंबर १९४१ मध्ये नाझी सैन्य ६५० किलोमीटर एवढं आत घुसलं होतं. फक्त ३ महिन्यांमध्ये त्यांनी जवळपास सगळा युक्रेन आणि त्याची राजधानी कीव्ह, सगळा बेलारुस (त्यावेळी त्याला श्वेत रशिया असं नाव होतं) आणि त्याची राजधानी मिन्स्क आणि तीन बाल्टिक राष्ट्रे - लिथुआनिया, लाटव्हिया आणि एस्टोनिया - एवढा सोविएत भूभाग पादाक्रांत केला होता. त्याशिवाय लेनिनग्राडला वेढा घातला होता आणि माॅस्कोही त्यांच्या दृष्टिपथात आलं होतं.

नाझी सैन्य त्यावेळी खरोखर आपल्या शिखरावर होतं.  " रेड आर्मी आता कधीच नाझी सैन्याला आव्हान देऊ शकणार नाही " असं हिटलरने बर्लिन स्पोर्टपालास्टमध्ये जाहीर केलं होतं. साधारण त्याच सुमारास वुल्फगांग हाॅर्नने त्याचा वैयक्तिक उन्मादाचा क्षण अनुभवला. माॅस्कोच्या पश्चिमेला १५० मैलांवर व्याझमा इथे जर्मन पँझर आर्मी ३ आणि ४ या युनिट्सनी रशियन सैन्याच्या पाच मोठ्या तुकड्यांना कोंडीत पकडलं. पाचावर धारण बसलेले रशियन सैनिक या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी सैरावैरा पळत होते. काहीजण तर सरळ जर्मन सैन्याच्याच दिशेने गेले, तेही हातात बंदूक किंवा इतर कुठलंही शस्त्र न घेता. " रशियन सैन्याच्या लाटांमागून लाटा आमच्या दिशेने येत होत्या. जेव्हा पहिल्या ओळीतल्या सैनिकांना आम्ही कापून काढलं, मागच्या ओळीतल्या सैनिकांनी मेलेल्या सैनिकांच्या बंदुका उचलल्या आणि त्या घेऊन ते आमच्यावर चाल करून आले. आम्ही त्यांनाही गोळ्या घातल्या. कुठलाही जर्मन सैनिक शत्रूवर नि:शस्त्र हल्ला करणार नाही पण रशियन सैनिकांना काही फरक पडत नसावा. "
एका रात्री व्याझमाजवळ वुल्फगांग आणि त्याच्या सहका-यांची पळून जाणा-या रशियन सैनिकांबरोबर गाठ पडली.  वुल्फगांग नुकताच एका रशियन हातबाँबमुळे जखमी झालेला होता. त्यामुळे त्याला रागही आलेला होता. पळून जाणारे सैनिक पाहिल्यावर त्याने त्यांच्यावर हातबाँब फेकायला आणि गोळीबार करायला सुरूवात केली. " काही सैनिकांच्या बंदुकांना संगिनी लावलेल्या होत्या. अशा लोकांना मी त्याक्षणी गोळ्या घातल्या. "

त्याने आणि त्याच्या सहका-यांनी रशियन सैनिकांनी भरलेल्या एका ट्रकवरही हल्ला केला. हा ट्रक या सगळ्या गोंधळात सटकू पाहात होता. " रशियन सैनिक इतके भित्रे होते की आम्ही हल्ला केल्यावर त्या ट्रकमधले काही सैनिक ट्रकमागे जाऊन जमिनीवर मेल्यासारखे पडून राहिले पण आमच्याशी लढले नाहीत. वुल्फगांग आणि त्याचे सहकारी या सैनिकांजवळ गेले आणि ' हात वर करा ' असं रशियन भाषेत ओरडले. " जेव्हा त्यांनी काही उत्तरच दिलं नाही तेव्हा आम्ही त्यांना गोळ्या घातल्या. ते थोडे थरथरले, आणि शांत झाले. तसंही अशा भित्रट लोकांची हीच लायकी होती." हे सर्व सांगत असताना त्याच्या चेह-यावरचं हास्य कायम होतं, " आम्हा सगळ्यांच्या मनात हाच विचार होता की आम्ही असं कधीच केलं नसतं. " त्या रात्री आपण २०-३० रशियन सैनिकांना ठार मारल्याचं त्याने सांगितलं. त्याच्यासाठी हा त्याचा परमोच्च क्षण होता.

वुल्फगांग हाॅर्न हा कोणी बथ्थड डोक्याचा माणूस व्हता. युद्धानंतर तो शिक्षणक्षेत्रात गेला आणि बुद्धिमत्तामापन चाचण्यांवर त्याने संशोधन केलं. असं असूनही मी जेव्हा त्याला विचारलं की त्याच्यासाठी युद्ध हा थरारक अनुभव का होता, तेव्हा त्याने शांतपणे आणि अभिमानाने हे उत्तर दिलं - ' कारण मी अनेक रशियन सैनिकांना हातबाँब आणि रायफल यांनी मारू शकलो. '

वुल्फगांग हाॅर्नला भेटण्याआधी युद्ध हा भयंकर आणि क्वचितच समाधानकारक असा अनुभव असतो असं मला वाटलं होतं. त्याला भेटल्यावर मला समजलं की काही लोकांना युद्ध, त्यातली हिंसा आणि रक्तपात यांनी आनंदही वाटू शकतो.

 

No comments:

Post a Comment