Monday, 13 October 2014

अंधार क्षण - अलेक्सेई ब्रिस

इतिहास समजून घेण्यातली एक मोठी अडचण म्हणजे ऐतिहासिक घटना या एकेकट्या, स्वतंत्र आणि काळ्या दगडावरची रेघ अशा रीतीने पाहण्याची आपली सवय! रेड आर्मीने स्टॅलिनग्राडची लढाई जिंकली, चर्चिलने ब्रिटनला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढलं, हिटलर आणि नाझी दुस-या महायुद्धात पराभूत झाले - ह्या गोष्टी आज सूर्यप्रकाशाइतक्या सत्य वाटतात आणि आहेतही, पण त्या अनुभवलेल्या लोकांच्या मनातले विचार जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर या सत्य म्हणून आपण गृहीत धरत असलेल्या गोष्टी जेव्हा तेवढ्या स्पष्ट नव्हत्या, त्या वेळचा विचार आपल्याला करावा लागेल. आज जे आपण सत्य म्हणून स्वीकारतो, तो त्या वेळी काही लोकांनी घेतलेल्या निर्णयांचा परिणाम होता. काय होणार आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. समजा रेड आर्मीला जर्मन सैन्याने स्टॅलिनग्राडमध्ये धूळ चारली असती तर? चर्चिलची कारकीर्द ब्रिटनच्या पराभवाने संपली असती तर? आणि हिटलरने युद्ध जिंकलं असतं तर?

जेव्हा मी अलेक्सेई ब्रिसची मुलाखत घेतली तेव्हा मला असा विचार करण्याची गरज जाणवली. १९४१ च्या उन्हाळ्यात जेव्हा जर्मनीने सोविएत रशियावर आक्रमण केलं, तेव्हा अलेक्सेई १८ वर्षांचा विद्यार्थी  होता आणि   हे आक्रमण त्याच्या मातृभूमीसाठी, युक्रेनसाठी फायदेशीर ठरेल असं त्याला त्या वेळी वाटलं. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर - ' सोविएत राजवटीविरुद्ध केलेलं कुठलंही युद्ध हे चांगल्या कारणासाठीच असेल असं मला त्यावेळी वाटत होतं. नंतर मला कळलं की तसं समजणं ही माझी चूक होती.'

स्टॅलिनने आपल्या कारकीर्दीत युक्रेनवर अनन्वित अत्याचार केले. सत्तेवर आल्यावर त्याने सर्व सोविएत गणराज्यांमधल्या शेतीचं राष्ट्रीयीकरण आणि सामायिकीकरण केलं. त्यात उफाळलेल्या संघर्षात ७० लाख युक्रेनियन लोक मारले गेले. नंतरही रशियन दडपशाहीचा अनुभव युक्रेनला पदोपदी येतच होता ," स्टॅलिनच्या दहशतीचा अनुभव ज्यांनी घेतलेला नाही त्यांना त्याची कल्पनाच येणार नाही. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही असा तो
घुसमटवून टाकणारा अनुभव होता.  त्यामुळे जेव्हा जर्मन आक्रमण सुरु झालं, आम्हाला वाटलं की गोष्टी बदलतील, काहीतरी चांगलं होईल."

जर्मन आक्रमणाने सुधारणा होईल या विश्वासामागचं एक कारण हेही होतं की जर्मन सैन्याचा सुरूवातीचा दणका  जबरदस्त होता. तयारी नसलेल्या सोविएत सैन्याची पुरती दाणादाण उडाली होती. त्यामुळे युक्रेनमध्ये लोकांना असं वाटत होतं की आता सोविएत युनियनचे दिवस भरले. आता काही दिवसांतच लेनिनग्राड आणि माॅस्को पडतील आणि सोविएत युनियन इतिहासजमा होईल.

त्याने पुढे असं सांगितलं की नाझी आक्रमणानंतरचे सुरूवातीचे दिवस खूप वेगळे होते, " आम्ही थोडाफार मोकळा श्वास घ्यायला लागलो. पाहिजे त्या वस्तू विकत घेऊ शकत होतो. सतत कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे असं वाटत नव्हतं. लोक एकमेकांशी मोकळेपणाने बोलत होते."

आम्ही त्याची मुलाखत होरोकिव्ह या त्याच्या मूळ गावी असलेल्या त्याच्या छोटेखानी घरात घेतली. जेव्हा त्याने हे वर्णन केलं तेव्हा माझ्या मनात हा विचार आला की कदाचित असं होऊ शकलं असतं. प्रत्यक्षात सोविएत युनियन इतिहासजमा व्हायला १९९१ साल उजाडावं लागलं. पण हे ५० वर्षे आधी होऊ शकलं असतं. रशियाविरुद्ध पूर्व आघाडी उघडताना हिटलरचा आणि त्याच्या लष्करी सल्लागारांचा आत्मविश्वास इतका जबरदस्त होता की त्यांनी सैनिकांना हिवाळी कपडेच दिले नव्हते. त्याच्याआधीच युद्ध संपेल अशी त्यांची खात्री होती.
त्याशिवाय नाझींनी पोलंडमध्ये रेड आर्मीच्या सैनिकांना पाहिलं होतं. पोलिश सैन्याने नाझींसमोर जरी नांगी टाकली असली तरी रशियनांना चांगली लढत दिली होती. नंतरच्या फिनलंडबरोबरच्या हिवाळी युद्धातही रेड आर्मीला फिनिश सैन्याने कडवा प्रतिकार केला होता. त्यामुळे रेड आर्मीविषयी नाझी निश्चिंत होते. हिटलरचे हे उद्गार प्रसिद्धच आहेत - ' आम्ही एक लाथ मारण्याचा अवकाश, हा सगळा पोकळ आणि भ्रष्ट  डोलारा एका क्षणात कोसळून पडेल. '

पण प्रत्यक्षात मात्र असं झालं नाही आणि त्याचं एक अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे स्टॅलिन आणि त्याचे साथीदार यांच्याविषयी सोविएत नागरिकांच्या मनात जो तिरस्कार होता त्याचा नाझींनी वापर केला नाही, आणि त्याचं कारण म्हणजे नाझींची असमावेशक आणि नकारात्मक विचारसरणी. पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा नाझींचा उदय झाला तेव्हापासून नाझींनी ' आपण कोण आहोत ' हे लोकांसमोर मांडण्याऐवजी ' आपण कोण नाही ' अशा असमावेशक विचारांनीच लोकांना भुरळ घालायचा प्रयत्न केला. तो यशस्वीही झाला कारण त्या वेळी लोक पहिल्या महायुद्धातल्या पराभवाने चिडले होते आणि अशा वेळी नाझींनी त्यांच्यासमोर एक बळीचा बकरा दिला - ज्यू.

१९२१ मध्ये हिटलर नाझी पक्षाचा सर्वेसर्वा झाला. त्याला हे बरोबर समजलं होतं की पक्षाचं धोरण नकारात्मक तत्वांवर ठेवणं ही जास्त सोपी गोष्ट आहे. त्यामुळे नाझींनी ज्यू विद्वेष, कम्युनिस्टांना विरोध, समाजवाद्यांना विरोध, व्हर्सायच्या कराराला विरोध अशा नकारात्मक मुद्द्यांवर भर दिला. जर नाझींना त्यांच्या आर्थिक धोरणांवर कोणी प्रश्न विचारले तर त्यांची तारांबळ उडत असे. त्यामुळे हिटलरने सकारात्मक मुद्दे जेवढे संदिग्ध ठेवता येतील तेवढे ठेवले; उदाहरणार्थ एकात्म, सशक्त आणि वांशिक दृष्ट्या शुद्ध जर्मनी. पण नकारात्मक विचार मात्र अत्यंत काटेकोरपणे मांडले कारण समाज त्याच्याकडे लवकर आकृष्ट होतो हे त्याला पक्कं ठाऊक होतं.

१९३० च्या दशकात हिटलरने नाझी पक्षाची लोकप्रियता शिगेला पोहोचवली कारण हे सगळे विचार स्वतःला अपमानित समजणा-या आणि स्वाभिमान दुखावला गेलेल्या जर्मनांना भावले. हिटलरचा शुद्ध आर्यन वंशाचा आग्रह आणि ज्यू विद्वेष हा त्यांच्या अहंगंडाला पोषकच होता. जपानमध्ये अशा प्रकारचं पुनरुत्थान जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी झालं होतं आणि त्यावरून हे सिद्धही झालं होतं की जोपर्यंत या विचारसरणीचा प्रसार हा एका विशिष्ट भूभागापर्यंतच मर्यादित असतो आणि बहुतेक लोकसंख्या ही वांशिक दृष्ट्या एकाच प्रकारची असते, तोपर्यंत असमावेशक विचार लोकांना पसंत  पडतात. पण ज्या क्षणी नाझींनी जर्मनीच्या सरहद्दीपार आपलं साम्राज्य उभारायचं स्वप्न पहायला सुरूवात केली, त्यांना त्यांच्या नकारात्मक विचारसरणीचा अडसर यायला लागला.

हिटलरचा राग हा ज्यूंच्या खालोखाल पूर्व युरोपातल्या स्लाव्ह आणि इतर संबंधित वंशांवर होता. ' ते उंदरांसारखी पिलावळ जन्माला घालतात आणि फक्त गुलाम बनण्याच्या लायकीचे आहेत ' असं त्याचं मत होतं. त्याने असं लिहून ठेवलेलं आहे की - ' जर्मनांसारख्या उच्च वंशाच्या लोकांनी जमिनीच्या एका छोट्या तुकड्यावर आपली गुजराण करावी आणि या कमअस्सल आणि भुईला भार असणा-या लोकांच्या वाट्याला युक्रेनसारखी जगातली सर्वात सुपीक जमीन यावी ही निसर्गाच्या अन्यायाची परिसीमा आहे. '
नाझी सैन्याने युक्रेन पादाक्रांत केल्यावर हिटलरने त्याचा सर्वात जुना आणि निष्ठावंत सहाय्यक एरिक काॅख याची नेमणूक युक्रेनचा राईश कमिशनर म्हणून केली आणि त्याने तेवढ्याच उत्साहाने ' फ्युहरर ' चं स्वप्न पूर्ण करायला सुरूवात केली. युक्रेनची राजधानी कीव्ह इथे एका भाषणात त्याने जाहीर केलं - '' आम्ही जर्मन्स वांशिक दृष्टीने स्लाव्ह लोकांपेक्षा श्रेष्ठ आहोत आणि हे प्रत्येकाने लक्षात ठेवलंच पाहिजे की अगदी एखादं क्षुद्र काम करणारा जर्मन मजूरही वांशिक दृष्ट्या इथल्या सगळ्या जनतेपेक्षा अधिक महत्वपूर्ण आहे. " याचा प्रत्यक्षातला अर्थ हा होता की काॅखने नाझी कायद्यांची अत्यंत कडक अंमलबजावणी युक्रेनमध्ये चालू केली. सर्वात पहिलं म्हणजे त्याने युक्रेनियन मुलांचं शिक्षण थांबवलं. शाळा आणि महाविद्यालये बंद केली. ' जे काही इथल्या लोकांना शिकायची गरज आहे, ते त्यांचे जर्मन मालक त्यांना शिकवतील. त्यांना शाळेत जायची गरज नाही .'

या सगळ्या घडामोडींचा अलेक्सेई ब्रिसच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम झाला. तो त्या वेळी नाझींसाठी दुभाषाचं काम करत होता. तिथल्या स्थानिक नाझी पक्षाच्या शाखेत काम करणा-या एका मुलीशी त्याची मैत्रीही झाली होती. पण लवकरच त्याला तो आणि त्याचे जर्मन वरिष्ठ यांच्यात दुरावा जाणवायला लागला. जेव्हा त्याला कळलं की जर्मन आणि युक्रेनियन - मग ते अगदी निष्ठावंतपणे नाझींना मदत करणारे युक्रेनियन असले तरी - जर एकत्र आले तर ते धोकादायक आहे, तेव्हा त्याची त्या मुलीबरोबर असलेली मैत्रीही तुटली. पण त्याची नाझींकडे पाहण्याची दृष्टी पूर्णपणे आणि कायमची बदलली ती एका संभाषणामुळे. अर्न्स्ट एरिक हाएर्टर हा होरोकिव्हचा कमिशनर होता. अलेक्सेईने त्याला विचारलं की त्याला आपला वैद्यकीय शाखेचा अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण करता येईल का? तसाही दुभाषाऐवजी डाॅक्टर म्हणून तो नाझींसाठी जास्त उपयुक्त आहे. हाएर्टर यावर खूप हसला आणि म्हणाला - " आम्हाला तुमची डाॅक्टर म्हणून गरज नाही. तुम्ही गुरं वळण्याच्या कामासाठी हवे आहात आम्हाला! "

हा अलेक्सेईसाठी फार मोठा धक्का होता. तो तरुण होता, हुशार होता, महत्वाकांक्षी होता. गुरं वळण्याची कल्पनाही त्याने केली नव्हती. पण त्यावेळी जर्मनांची युक्रेनवर सत्ता होती. तो असहाय्य होता.

पण लवकरच त्याच्या मनात या असहायतेबद्दल आणि आपल्या देशाच्या अपमानाबद्दल कोंडलेला जो राग होता, त्याला वाट मिळाली. १९४२ च्या शरदऋतूत एका दिवशी काही लोक एका भांड्यांच्या दुकानासमोर रांगेत उभे होते आणि भांडी विकत घेत होते. अचानक काही जर्मन पोलिस तिथे आले आणि त्यांच्यातल्या एकाने या लोकांवर लाठीमार करायला सुरूवात केली. ते बघत असताना अचानक अलेक्सेईचा राग उफाळून आला, " आमच्या देशबांधवांचा अपमान होत होता. आणि आम्ही काही करु शकत नव्हतो. त्याने मला जास्त राग आला. मी पुढे गेलो, त्या जर्मन पोलिसाचं बखोट धरलं आणि त्याला चार ठोसे लगावून दिले. " बाकीच्या जर्मन पोलिसांनी ताबडतोब आपल्या बंदुका सरसावल्या पण त्यांनी काही करायच्या आत अलेक्सेई तिथून पळाला. आता पोलिस त्याच्या शोधात होतेच, त्यामुळे तो त्याच पावली युक्रेनियन प्रतिकारक दल (Ukrainska Povstanska Armiia) मध्ये भरती झाला.

पुढील दोन वर्षं त्याने आतापर्यंतच्या सर्वात पाशवी अशा प्रतिकार संघर्षात भाग घेतला. युक्रेनियन प्रतिकारक नाझींच्या जोडीला स्टॅलिनच्या प्रतिकारकांशीही लढत होते. या तिघांचाही शत्रूला कैद करण्यावर विश्वास नव्हता. अलेक्सेईच्या मते,     " स्टॅलिनचे प्रतिकारक जास्त खुनशी होते. पकडल्या गेलेल्या जर्मन आणि युक्रेनियन कैद्यांची जिभा आणि कान कापलेली मुंडकी ते झाडांवर लटकवत असत. त्यामानाने नाझी ठीक होते. ते सरळ तुम्हाला फासावर लटकवत असत, कुठलेही हाल न करता. "

अलेक्सेईसारखे इतर अनेक सुशिक्षित तरुण  युक्रेनियन लोक प्रतिकार युद्धात सहभागी होते. त्यांनाही सुरूवातीला नाझी हे युक्रेनचे मुक्तिदाते वाटले होते पण जेव्हा वस्तुस्थिती समजली तेव्हा निमूटपणे सहन करण्याऐवजी ते नाझींच्या विरोधात उभे राहिले. त्यामुळे सोविएत-जर्मन युद्धाच्या निकालावर फार मोठा परिणाम झाला कारण नाझींना
अजून एका शत्रूला तोंड द्यावं लागलं. त्यांची बरीचशी साधनसामग्री आणि वेळ हा प्रतिकारकांशी लढण्यात जायला लागला, ज्याचा रेड आर्मीला पुढे फायदा झाला.

कुणीही आता हा प्रश्न विचारेल की हिटलरने मुत्सद्दीपणा दाखवून युक्रेनियन जनतेचं मन जिंकायचा प्रयत्न का केला नाही? तसं केलं असतं तर युक्रेन काय, पूर्ण सोविएत युनियन त्याच्या ताब्यात आलं असतं कारण स्टॅलिनच्या दहशतीला  सगळेचजण कंटाळले होते. पण या बाबतीत असा समजूतदारपणा दाखवणं हिटलरसाठी अशक्य होतं. त्याच्या मनात जर्मन वंशश्रेष्ठत्वाचे आणि इतर वंश कमअस्सल असल्याचे विचार एवढे भिनलेले होते की त्यापासून जरासुद्धा फारकत घेणं म्हणजे त्याच्यासाठी श्वास न घेण्यासारखंच होतं.

इतिहासापासून नाझी काहीही शिकले नाहीत आणि हे आपलं सुदैव म्हणायला पाहिजे. नाझींच्या २००० वर्षे आधी रोमन साम्राज्य आकाराला येत होतं. पण या साम्राज्याची तत्वं वेगळी होती. रोमनांनी नाझींच्या बरोबर उलटी कृती केली. जो भूभाग त्यांनी जिंकला, तिथल्या लोकांना त्यांनी रोमन नागरिक बनवलं. स्थानिक राजांचं स्वातंत्र्य पूर्णपणे हिरावून न घेता त्यांना मांडलिक बनवून रोमची लष्करी ताकद वाढवली. परदेशी लोकांनाही सहजपणे रोमचं नागरिक होता येत असे. त्यामुळे कला, साहित्य, व्यापार यामध्येही रोमची भरभराट झाली. त्याउलट नाझींनी जिंकलेल्या प्रदेशांमधल्या लोकांमध्ये आणि जर्मन लोकांमध्ये जाणीवपूर्वक दुजाभाव केला. त्याचा परिणाम पहायचा तर एकच उदाहरण पुरेसं आहे - रोमन साम्राज्य ५०० हून जास्त वर्षे टिकलं, नाझी थर्ड राईश फक्त १२ वर्षे!

No comments:

Post a Comment