या भागातल्या कथा ह्या आक्रमकांच्या अत्याचारांविरुद्ध उभ्या राहाणा-या आणि त्यांचा प्रतिकार करणा-यांच्या कथा आहेत. दुस-या महायुद्धातल्या प्रतिकार चळवळींचा इतिहास पाहिला तर आपल्याला दोन प्रकारचे लोक भेटतील - एक म्हणजे आपल्या तत्वांवर ठाम असलेले आणि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी कुठलीही तडजोड न करणारे; आणि दुसरे कुंपणावर बसलेले आणि थोड्याफार स्वार्थी किंवा व्यक्तिगत हेतूंपायी प्रतिकार चळवळीत आलेले. माझा असा विश्वास आहे की पहिल्या प्रकारचे लोक दुर्मिळ होते. अशा चळवळी मुख्यत्वेकरून दुस-या प्रकारच्या लोकांनीच भरलेल्या होत्या.
फ्रान्सचंच उदाहरण घ्या. लोकांना आज जसं वाटतं तसा फ्रेंच प्रतिकार काही नाझींनी फ्रान्सचा पाडाव केल्यावर ताबडतोब सुरु झाला नाही. एक चार्ल्स डी गाॅलचा अपवाद सोडला तर कोणी जर्मनांविरूद्ध एक चकार शब्ददेखील काढला नाही. जानेवारी १९४३ मध्ये जेव्हा स्टॅलिनग्राडला जर्मन सैन्याने शरणागती पत्करली आणि युद्धाचं पारडं फिरू शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा फ्रेंच प्रतिकार ख-या अर्थाने सुरू झाला. नंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झालेल्या फ्रान्स्वा मितराँ यांचं उदाहरण एक नमुना म्हणून घेता येईल. नाझींनी फ्रान्स जिंकल्यावर मार्शल फिलिप पेताँ यांच्या नेतृत्वाखाली कळसूत्री सरकार स्थापन केलं. या सरकारची राजधानी व्हिशी या ठिकाणी होती. मितराँनी या व्हिशी सरकारसाठी काम केलं पण दुसरीकडे डी गाॅलच्या फ्री फ्रेंच या प्रतिकारक संघटनेसाठी हेरगिरी पण केली. १९४२-४३ मध्ये स्टॅलिनग्राड आणि एल् अलामेन असे दोन मोठेपण पराभव जर्मनांना स्वीकारावे लागले आणि अमेरिकाही पूर्ण ताकदीने युरोपमधल्या युद्धात उतरण्याची शक्यता निर्माण झाली. मग मितराँनी प्रतिकार चळवळीत उडी घेतली. जर यदाकदाचित नाझींनी युद्ध जिंकलं असतं तर? तर कदाचित मितराँ व्हिशी सरकारमध्येच राहिले असते.
माणसं असं वागतात यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. या भागात ज्यांच्या कथा आहेत त्यापैकी अलेक्सेई ब्रिसच्या नाझीविरोधाचं मुख्य कारण म्हणजे त्याला डाॅक्टर बनण्यापासून थांबवण्यात आलं. जर तो डाॅक्टर बनला असता तर कदाचित त्याने नाझींविरुद्ध शस्त्र उचललं नसतं.
त्यामुळेच या भागातल्या अलाॅयस फाॅलर आणि व्लादिमीर कँटोव्हस्की यांच्या कथा वेगळ्या आहेत. हे दोघेही हिशेबी, सावध, स्वकेंद्रीत वृत्तीने वागलेच नाहीत. ज्या वेळी असं वागणं संयुक्तिक ठरलं असतं त्या वेळीही त्यांनी आपली तत्वं आणि मूल्यं सोडली नाहीत. अशी मनोवृत्ती एक तर ख-या क्रांतिकारकाची असू शकते किंवा मग एखाद्या संताची. दोघांचेही देश वेगळे आहेत पण दोघेही तडजोड करुन निभावून नेणारे नाहीत. युद्धानंतरही त्यांच्या वागण्यात काही फरक पडला असेल अशी शक्यता नाही. दोघंही आपल्या वरिष्ठांची एखादी आज्ञा पाळायला, ती चुकीची आणि अन्यायकारक आहे म्हणून नकार देत असतील, मग जिवावर बेतलं तरी चालेल. अशी मनोवृत्ती एखाद्या माणसाची एकतर असते किंवा नसते. ती शिकवता येत नाही. माझ्या कामाच्या निमित्ताने मी अशा अनेक लोकांना भेटलोय ज्यांनी युद्धाच्या काळात उत्साहाने नाझींना किंवा त्यांच्यासारख्या जुलमी राजवटींना मदत केली आणि युद्ध संपण्याची वेळ आल्यावर सोयीस्कररीत्या टोपी फिरवली. अशा लोकांपुढे फाॅलर आणि कँटोव्हस्की हे मला फारच वेगळे वाटतात आणि त्यांच्यासारख्या लोकांविषयी कृतज्ञताही वाटते.
No comments:
Post a Comment