Sunday 7 February 2016

मोसाद

आपल्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करण्यासाठी जेव्हा हॅरेल द बेस बंगल्यावर पोचला, तेव्हा सगळ्यांचे चेहरे बघून काय झालं असावं हे त्याच्या लक्षात आलं. आइकमनचं त्यांच्या एवढं जवळ असणं हे त्यांना घुसमटवत होतं. ज्याने आपल्या असंख्य धर्मबांधवांना थंडपणे गॅस चेंबरकडे पाठवलं, त्याची काळजी घेणं, त्याच्यासाठी स्वयंपाक करणं, त्याचे कपडे धुणं हे त्यांच्यासाठी अशक्य होतं. तो आत्महत्या करायचा प्रयत्न करेल म्हणून त्याच्या हातात रेझर किंवा कुठलंही धारदार हत्यार द्यायचं नव्हतं. म्हणजे त्याची दाढी करण्यापासून सगळ्या गोष्टी या एजंट्सना कराव्या लागत होत्या आणि ते संतापले होते.

शेवटी हॅरेलने त्यांना जबरदस्तीने शहरात फिरायला पाठवलं. आळीपाळीने एक एक गट जाऊन ब्युनोस आयर्स शहर बघून आला. ते १० दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यातले संपता न संपणारे प्रदीर्घ दिवस होते.

आइकमनला प्रश्न विचारून सगळी माहिती जमा करण्याची जबाबदारी आहारोनीकडे होती आणि तो दिवसाचे किमान १० तास आइकमनबरोबर घालवत असे. आइकमनने आपलं भवितव्य ओळखलं होतं, त्यामुळे त्याने कुठल्याही प्रकारे एजंट्सशी वाद घालण्याचा, भांडण करण्याचा किंवा त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला नाही.

आहारोनीच्या प्रश्नांमुळे मोसादला आइकमनने युद्ध संपल्यापासून ते आतापर्यंत काय केलं त्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती मिळाली.

मे १९४५ मध्ये जर्मनीने शरणागती पत्करल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मन सरकार बरखास्त केलं आणि नाझी अधिकाऱ्यांना युद्धगुन्हेगार म्हणून घोषित केलं. मृत्युछावण्या आणि छळछावण्या या एस.एस.च्या अधिकारात येत होत्या, त्यामुळे एस.एस.अधिकाऱ्यांना अटक करण्यावर जास्त भर दिला जात होता. हे ओळखून आइकमनने लुफ्तवाफ प्रायव्हेट अॅडॉल्फ कार्ल बार्थ हे नाव घेतलं आणि जर्मन वायुदलाचा गणवेश आणि कागदपत्रंदेखील मिळवली. पण त्याला वायुदलाविषयी तांत्रिक माहिती नव्हती, त्यामुळे पकडलं जाण्याचा धोका होता. त्यामुळे त्याने वाफेन-एस.एस. किंवा एस.एस.च्या लढाऊ युनिटमधल्या लेफ्टनंटची ओळख घेतली आणि ओट्टो एकमन या नावाने स्वतःला अटक करवून घेतली. जवळजवळ तीन महिने तो युद्धकैदी म्हणून तुरुंगात होता. जेव्हा त्याचा एकेकाळचा सहाय्यक डिटर
विस्लीसेनीने त्याच्या कृत्यांबद्दल साक्ष दिली, तेव्हा तो तुरुंगातून पळाला आणि ओट्टो हेनिन्गर हे नाव घेऊन जर्मनीच्या सॅक्सनी प्रांतात लपला. तिथे तो १९५० पर्यंत होता. १९५० मध्येच तो इटलीमार्गे अर्जेन्टिनाला पळून गेला.

अर्जेन्टिनामध्ये सुरुवातीला तो जुरमान या ब्युनोस आयर्सच्या एका उपनगरात राहिला. त्यानंतर रिपलर नावाच्या एका जर्मन व्यापाऱ्याच्या घरात त्याने ४ महिने काढले. तोपर्यंत त्याचा शोध थंडावला होता. मग तो ब्युनोस आयर्सपासून जवळजवळ ६०० मैल दूर असलेल्या तुकुमान नावाच्या छोट्या शहरात गेला. इथे काप्री नावाच्या एका बांधकाम क्षेत्रातल्या कंपनीमध्ये त्याला नोकरी मिळाली. काप्रीचा मूळ उद्देश पलायन केलेल्या नाझींना आश्रय आणि नोकऱ्या मिळवून देणं हाच होता. दरम्यान त्याने अर्जेन्टिनाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. तो मंजूर होऊन त्याला एप्रिल १९५२ मध्ये अर्जेन्टिनाचं नागरिकत्व मिळालं. त्यासाठी त्याने नाव घेतलं होतं रिकार्डो क्लेमेंट. अर्जेन्टिनामधल्या रेकॉर्ड्सनुसार क्लेमेंटचा जन्म इटलीमधल्या बोल्झानो शहरात झाला होता, तो व्यवसायाने मेकॅनिक होता आणि अविवाहित होता.

नागरिकत्व मिळाल्यावर आइकमनने त्याची पत्नी व्हेरा हिच्याशी पत्राद्वारे संपर्क साधला. त्यावेळी ती आपल्या मुलांसह जर्मनी सोडून ऑस्ट्रियामध्ये स्थायिक झाली होती. हे पत्र त्याने त्रयस्थ म्हणून लिहिलं होतं आणि त्यात असं म्हटलं होतं की तिच्या मुलांचा दूरचा काका रिकार्डो, जो मरण पावला आहे असं तिला वाटतंय, तो प्रत्यक्षात जिवंत आहे. व्हेरा आइकमनने त्याचं हस्ताक्षर ओळखलं आणि ऑस्ट्रियामधल्या भूमिगत नाझी कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. ऑस्ट्रियन सरकारमधल्या नाझी हस्तकांनी तिला आणि तिच्या मुलांना एक कायदेशीर पासपोर्ट मिळवून दिला आणि तिच्याविषयी रेकॉर्ड्समध्ये असलेली माहिती नष्ट केली. जून १९५२ मध्ये व्हेरा आणि तिची मुलं ऑस्ट्रियामधून गायब झाली. जुलै १९५२ मध्ये इटलीमधल्या जेनोआ बंदरातून ती आणि तिची मुलं अर्जेन्टिनासाठी रवाना झाली आणि ऑगस्टच्या मध्यावर तिची आणि आइकमनची तुकुमान येथे भेट झाली.

१९५३ मध्ये काप्री कंपनी दिवाळखोरीत निघाल्यावर आइकमनला नोकरी शोधावी लागली. पहिल्यांदा त्याने ब्युनोस आयर्समध्ये एक लाँड्री काढली, मग भागीदारीमध्ये शेती, पशुपालन, बागाईत असे अनेक व्यवसाय करून बघितले. पण यातलं काहीही या ना त्या कारणाने यशस्वी होऊ शकलं नाही. नंतर काही काळाने त्याला ब्युनोस आयर्सजवळ असलेल्या सुआरेझ या शहरात असलेल्या मर्सिडीज बेंझ कारखान्यात फोरमन म्हणून नोकरी मिळाली. आता आपलं आयुष्य सुरळीत जाईल आणि आपल्याला नैसर्गिकरीत्या शांतपणे मरण येईल असं त्याला वाटायला लागलं होतं, पण ११ मे १९६० या दिवशी सगळं बदलून गेलं.

दरम्यान आइकमनच्या मुलांनी त्याचा शोध चालू केला होता. हॉस्पिटल्स, मॉर्ग, पोलिस स्टेशन्स, रेल्वे स्टेशन्स – सगळीकडे त्यांचं शोधून झालं होतं. शेवटी त्यांनी अर्जेन्टिनाचा माजी अध्यक्ष हुआन पेरॉन याच्या समर्थकांनी काढलेल्या ताक्युआरा नावाच्या फॅसिस्ट संघटनेला मदतीची विनंती केली. सगळी पार्श्वभूमी ऐकल्यावर ताक्युआराच्या लोकांनी आपला निष्कर्ष आइकमनच्या मुलांना ऐकवला – तुमच्या वडिलांचं अपहरण ज्यू लोकांच्या संघटनांनी केलेलं असण्याची दाट शक्यता आहे. आइकमनच्या मुलांनी ताक्युआराच्या लोकांना इझरेली राजदूताचं अपहरण करून आइकमनच्या मोबदल्यात त्याचा सौदा करण्याचं आवाहन केलं, पण ताक्युआराच्या लोकांचे हेतू राजकीय असल्यामुळे त्यांना इतक्या उघडपणे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा गुन्हा करायचा नव्हता, त्यामुळे हा प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावला.

१८ मे १९६०. लॉड एअरपोर्ट, तेल अवीव.

सकाळचे ११ वाजले होते आणि लॉड एअरपोर्ट माणसांनी भरून गेला होता. इझरेली शिष्टमंडळ आज अर्जेन्टिनाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्जेन्टिनाला जाणार होतं. या विमानात इझरेली शिष्टमंडळाच्या सदस्यांशिवाय इतर सामान्य प्रवाशांचाही समावेश होता. या विमानाला १९ तारखेला पोचायचं असल्यामुळे ते सरळ ब्युनोस आयर्सला जाणार नव्हतं. विमानाचा पहिला थांबा होता रोम. इथे तीन नवे प्रवासी विमानात आले आणि थोड्या वेळाने त्यांनी एल अॅलचे गणवेश चढवले. तिघेही मोसाद एजंट्स होते आणि आइकमनला अर्जेन्टिनामधून बाहेर काढण्यासाठी ते या विमानात चढले होते. त्यांच्यातला एक होता येहुदा कार्मेल. तो आपल्या निवडीबद्दल खुश नव्हता. त्याचं कारण म्हणजे त्याची निवड ही त्याच्या कुठल्याही कौशल्यामुळे नव्हे, तर चेहरेपट्टी आणि अंगकाठीने तो आइकमनशी बऱ्यापैकी मिळताजुळता असल्यामुळे झाली होती. त्याला अर्जेन्टिनामध्ये आणायचं, त्याचा एल अॅल गणवेश आइकमनला घालायचा आणि तसं त्याला अर्जेन्टिनाच्या बाहेर काढायचं अशी हॅरेलची योजना होती. विमानात कार्मेल झीव्ह झीकरोनी या नावाच्या पासपोर्टवर आला होता.

दरम्यान अर्जेन्टिनामध्ये १६ मे या दिवशी हॅरेलने अजून एक योजना कार्यान्वित केलेली होती. मायर बार-हॉन नावाचा एक तरुण इझरेली नागरिक त्याच वेळी ब्युनोस आयर्समध्ये त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता. त्याने १६ मे या दिवशी एका हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि तिथल्या डॉक्टरांना आपण एका गाडीच्या अपघातातून बालंबाल बचावलो आहोत पण आपल्याला आता चक्कर येणं, मळमळणं आणि अशक्तपणा यांचा त्रास होतोय असं सांगितलं. ही सगळी लक्षणं त्याला डॉ. योना एलीयानने व्यवस्थित समजावून सांगितली होती. मायर बार-हॉन १६ मेच्याच दिवशी ब्युनोस आयर्समधल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल झाला. १९ मे या दिवशी सकाळी त्याने आपल्याला आता पुष्कळच बरं वाटतंय असं सांगून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळवला. तो हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर लगेचच हॅरेलला भेटला आणि त्याने आपले डिस्चार्ज पेपर्स हॅरेलला दिले. आता हॅरेलकडे ब्युनोस आयर्समधल्या एका प्रतिष्ठित हॉस्पिटलचे अस्सल डिस्चार्ज पेपर्स होते. जर आइकमनला विमानाकडे नेताना कुणी हटकलं तर हे पेपर्स कामाला येणार होते.

१९ मे १९६० या दिवशी अर्जेन्टिनियन प्रमाणवेळेनुसार दुपारी बारा वाजता एल अॅलचं विमान ब्युनोस आयर्स एअरपोर्टवर उतरलं. विमान उतरल्यानंतर दोन तासांनी हॅरेल आणि विमानाचा पायलट झ्वी तोहर भेटले. दोघांनी इझराईलकडे परत जाण्याची वेळ निश्चित केली – २० मेची मध्यरात्र.

हॅरेलची योजना अशी होती – आइकमनला एल अॅलचा आजारी पडलेला कर्मचारी म्हणून विमानामध्ये आणायचं. त्याचा ‘ डबल ’ येहुदा कार्मेल उर्फ झीव्ह झीकरोनी अर्जेन्टिनामध्ये पोचलेला होताच. त्याने आपला गणवेश आणि कागदपत्रं हॅरेलकडे दिली होती. शालोम डॅनीने अत्यंत कौशल्याने या कागदपत्रांमध्ये आइकमनच्या अनुषंगाने फेरफार केले होते आणि येहुदा कार्मेलसाठी नवीन कागदपत्रंही बनवली होती. ती वापरून तो काही दिवसांनी इझराईलला परत जाणार होता.

२० मेच्या मध्यरात्री निघायचं ही बातमी द बेस वर समजताच तिथल्या एजंट्सची सगळी मरगळ निघून गेली. डॉ.एलीयानने आइकमनला झोपेचं इंजेक्शन दिलं. त्यानंतर एजंट्सनी सगळा बंगला स्वच्छ केला. सगळ्या वस्तूंवरचे बोटांचे ठसे पुसून टाकले. तिथे आणलेल्या सगळ्या यंत्रांचे भाग सुटे करून ठेवले आणि आपापलं व्यक्तिगत सामान भरून ठेवलं. कॅसल आणि हाईट्समधल्या एजंट्सनीही आपापली घरं अशीच ‘ साफ ’ केली.

२० मे १९६०

हॅरेल सकाळपासूनच कामात व्यस्त होता. आज तो ज्या कॅफेमध्ये जाणार होता, ते सगळे एअरपोर्टजवळ होते. सकाळीच त्याने आपल्या हॉटेलमधून चेक आऊट केलं आणि आपलं सामान घेऊन तो पहिल्या कॅफेमध्ये गेला. त्याला सर्वात पहिल्यांदा भेटणाऱ्यांमध्ये एल अॅलच्या लोकांचा समावेश होता.

दुपारी या सगळ्या नाटकाचा शेवटचा अंक सुरु झाला. हॅरेलने शेवटच्या कॅफेमधून बाहेर पडल्यावर सरळ एक टॅक्सी घेतली आणि तो एअरपोर्टवर गेला. आता मध्यरात्री विमानाने उड्डाण करेपर्यंत तो इथूनच सगळ्याचं नियंत्रण करणार होता. एअरपोर्टवरचा कॅफेटेरिया लाउंज बऱ्यापैकी उबदार होता आणि बाहेर मरणाची थंडी होती. त्यामुळे लाउंजमध्ये सतत लोकांची वर्दळ होती. हॅरेलला त्याच्या लोकांना भेटून हलक्या आवाजात चर्चा करण्यासाठी अत्यंत सोयीची जागा होती.

रात्रीचे ९.०० – द बेस मध्ये सगळेजण तयार होते – आइकमनसकट. त्याला एल अॅलचा गणवेश आणि झीव्ह झीकरोनीची कागदपत्रं देण्यात आली होती. झ्वी मॉल्किनने आपला हौशी रंगभूमीवरचा सगळा अनुभव पणाला लावून आइकमनचा मेक अप केला होता. आइकमनप्रमाणे डॉ.एलीयान आणि अजून दोन एजंट्ससुद्धा एल अॅलच्या गणवेशात होते. निघण्यापूर्वी डॉ.एलीयानने आइकमनला थोडं कमी तीव्रतेचं गुंगीचं औषध दिलं. त्यामुळे आइकमनला गाढ झोप लागली नसती, पण तो ग्लानीच्या अवस्थेत राहिला असता.

एल अॅल गणवेशातल्या एजंट्सपैकी एक झ्वी आहारोनी होता. त्याने गाडी चालवायची असं ठरलेलं होतं. त्याच्या शेजारी एक एजंट बसला आणि मागे आइकमन दोघांच्या मध्ये बसला. या दोघांपैकी एक डॉ. एलीयान होता.
त्याच वेळी शहरातल्या दोन प्रसिद्ध हॉटेल्समधून खऱ्याखुऱ्या एल अॅलच्या लोकांना घेऊन दोन गाड्या निघाल्या. सगळ्या लोकांचं सामान घेऊन अजून एक वेगळी गाडी तिथे पोचली.

हॅरेलपासून दोन टेबल्स सोडून शालोम डॅनी बसला होता. तो काय करतोय हे कुणी जर लक्षपूर्वक पाहिलं असतं, तर त्यांना धक्काच बसला असता. तो प्रत्येक मोसाद एजंटसाठी बनवलेल्या नवीन पासपोर्टवर व्हिसा, अर्जेन्टिनामध्ये आल्याचे, परत जातानाचे वगैरे जे सहीशिक्के असतात, त्यांची नक्कल करत होता.

रात्रीचे ११ – रफी एतान हॅरेलला भेटला आणि त्याने सगळेजण पोचल्याचं सांगितलं. हॅरेलने पार्किंगमध्ये प्रत्येक गाडीपाशी जाऊन त्यांना त्यांचे पासपोर्ट आणि पुढच्या सूचना दिल्या. तिसऱ्या गाडीत त्याने डोकावून पाहिलं, तेव्हा त्याला एल अॅलच्या गणवेशातला आइकमन दोघांच्या शेजारी बसलेला दिसला. तो गाढ झोपेत होता. तिन्ही गाड्या विमानाच्या दिशेने निघाल्या आणि हॅरेल कॅफेटेरियामध्ये परतला.

एल अॅलचं विमान धावपट्टीजवळ येऊन थांबलं होतं. या तिन्ही गाड्या आता अर्जेंटिनियन पोलिस असलेल्या शेवटच्या अडथळ्यापाशी पोचल्या होत्या. “हाय, एल अॅल!” गाडीतला एक जण पोलिसांना म्हणाला. पोलिसांनी तिन्ही गाड्यांमधल्या लोकांकडे लक्षपूर्वक पाहिलं, पण त्यांना काहीही वावगं आढळलं नाही. पहिल्या आणि दुसऱ्या गाडीमधले लोक हसत खिदळत होते आणि तिसऱ्या गाडीमधले लोक शांत झोपलेले होते.

अडथळा पार करून या तिन्ही गाड्या विमानाच्या दिशेने गेल्या. आता आइकमनला विमानात चढवायचा प्रश्न होता. आहारोनी, इलानी आणि शालोम या तिघा धटिंगणांच्या आडून आइकमनला विमानात चढवण्यात आलं आणि एजंट्स त्याला सरळ फर्स्ट क्लासमध्ये घेऊन गेले. तिथे त्याला एका खिडकीपाशी बसवून डॉ. एलीयान त्याच्या शेजारी बसला. बाकीच्या एजंट्सनीही आपापल्या जागा घेतल्या.

रात्रीचे ११.३० – विमानाने धावपट्टीवर जाण्याआधी दिव्यांची उघडझाप केली. हा हॅरेलसाठी इशारा होता. तो स्वतःचं सामान उचलून निघाला. अजून चार-पाच एजंट्स आपापल्या सामानासह तिथे उभे होते. हॅरेलला बघताच न बोलता तेही निघाले. शालोम डॅनीच्या कौशल्यामुळे पासपोर्ट तपासणीच्या वेळी काहीही प्रश्न उद्भवला नाही.

रात्रीचे ११.४५ – कस्टम आणि इमिग्रेशन तपासणी पार पडल्यावर सगळे विमानाच्या दिशेने गेले. सर्वात शेवटी हॅरेल विमानात आला. लगेचच विमानाचा दरवाजा बंद झाला.

मध्यरात्र – विमान उड्डाण करणार तेवढ्यात कंट्रोल टॉवरकडून त्याला थांबण्याचा आदेश आला. सगळ्यांच्या मनात परत एकदा शंकांचं मोहोळ उठलं. शेवटच्या क्षणी दगाफटका झाला की काय? कुणाला संशय आलाय? पण सुदैवाने तांत्रिक मुद्दा होता. सुमारे २० मिनिटांनी विमानाला उड्डाणाचा इशारा देण्यात आला. विमानाने उड्डाण केलं आणि हॅरेलने सुटकेचा निःश्वास सोडला.

२२ मे १९६०
इझरेली प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.३० वाजता एल अॅलचं विमान लॉड एअरपोर्टवर उतरलं. बरोबर सकाळी १० वाजता इसेर हॅरेल पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियनला भेटला आणि त्याने आइकमन इझराईलमध्ये आल्याची बातमी सांगितली आणि आइकमनला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी परवानगी मागितली.

“तुझी खात्री आहे?” बेन गुरियननी विचारलं.

“कशाबद्दल?”

“हा माणूस आइकमनच आहे याबद्दल? तू कसं पडताळून पाहिलंस की हा माणूस आइकमनच आहे?”

हॅरेलला धक्काच बसला. त्याने आइकमनची फाईल, त्यामध्ये असलेलं वर्णन, झ्वी आहारोनीने आइकमन आणि रिकार्डो क्लेमेंट यांच्या फोटोंची केलेली तुलना या सगळ्या गोष्टी सांगितल्या.

“शिवाय त्याने स्वतः कबूल केलेलं आहे की तो आइकमन आहे,” हॅरेल म्हणाला.

पण बेन गुरियन ऐकायला तयार नव्हते. शेवटी हॅरेलने मोसादच्या लोकांना कामाला लावलं आणि आइकमनशी प्रत्यक्ष बोललेल्या दोन ज्यूंना शोधून काढलं. त्या दोघांनी तुरुंगात जाऊन आइकमनशी संभाषण केलं आणि तोच एस.एस. अधिकारी अॅडॉल्फ आइकमन आहे असं सांगितलं.

इकडे फ्रँकफर्टमध्ये जेव्हा डॉ.फ्रित्झ बॉवरला आइकमनच्या अपहरणाची आणि त्याला इझरेली पोलिसांनी रीतसर अटक केल्याची बातमी समजल्यावर त्याने ती बातमी सांगणाऱ्या मोसाद एजंटला मिठी मारली. डॉ.बॉवरने जर नेटाने प्रयत्न केले नसते, तर आइकमनला अटक होणं आणि त्याच्यावर इझराईलमध्ये खटला भरला जाणं या गोष्टी अशक्यच होत्या.

त्याच दिवशी नेसेटचं, इझराईलच्या संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. या अधिवेशनाला पत्रकारांना – इझराईलमधल्याच नव्हे तर उर्वरित जगातल्याही – बोलावण्यात आलं होतं. सर्व प्रतिनिधी हजर होते. अशी कोणती गोष्ट जाहीर होणार आहे, याची उत्सुकता सर्वांनाच होती.

बरोबर दुपारी ४ वाजता पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन उभे राहिले आणि त्यांनी सभापतींना बोलण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यावर त्यांनी आपलं वक्तव्य वाचून दाखवायला सुरुवात केली

“मला सभागृहाला ही माहिती द्यायची आहे की इझराईलच्या गुप्तचर संस्थांनी एका अत्यंत मोठ्या नाझी युद्धगुन्हेगाराला अटक केलेली आहे. हा गुन्हेगार इतर नाझींसमवेत ज्यूविषयक प्रश्नाचं अंतिम उत्तर म्हणजेच योजनाबद्ध रीतीने करण्यात आलेल्या जवळजवळ ६० लाख ज्यूंच्या संहारासाठी जबाबदार आहे. त्याचं नाव आहे अॅडॉल्फ आइकमन. आइकमन या क्षणी इझराईलमध्ये आहे. त्याला इझरेली पोलिसांनी अटक केलेली असून त्याच्यावर नाझी युद्धगुन्हेगारांसंदर्भात असलेल्या कायद्यानुसार खटला चालवण्यात येईल.”

एक क्षणभर लोकांचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना आणि नंतर संपूर्ण सभागृह उस्फूर्तपणे उठून उभं राहिलं आणि टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला. त्या एका क्षणाने मोसादची प्रतिमा बदलवून टाकली – इझरेली नागरिकांच्या नजरेत, इझराईलच्या मित्रांच्या नजरेत, संपूर्ण जगाच्या नजरेत!

क्रुश्चेव्हच्या भाषणाच्या प्रसंगामुळे जगात मोसादविषयी कौतुकाची आणि आदराची भावना होती. आइकमन प्रकरणानंतर त्या भावनेचं आदरयुक्त भीती आणि दरारा यांच्यात रूपांतर झालं.

उपसंहार:

आइकमनच्या अटकेनंतर त्याच्याविरुद्ध असलेले पुरावे गोळा करून त्याच्यावर रीतसर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. यामध्ये ९ महिने गेले. इझरेली सरकारला केवळ कागदपत्रांच्या आधारे हा खटला चालवायचा नव्हता त्यामुळे दररोज आइकमनला पोलिस अधिकारी प्रश्न विचारत. अपेक्षेप्रमाणे त्याने आपल्यावरच्या आरोपांना नाकारलं. त्यामुळे त्याच्यावर खटला चालणार हे निश्चित होतं. पण आइकमनचा वकील म्हणून कोण उभं राहणार, हा प्रश्न होता, कारण इझराईलमधला एकही वकील त्यासाठी तयार नव्हता. शेवटी न्यूरेंबर्ग खटल्यांमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या जर्मनीतल्या रॉबर्ट सर्वेशियसला इझरेली सरकारने विनंती केली आणि तो आइकमनचं वकीलपत्र घ्यायला तयार झाला.

हा सर्व काळ आइकमनला इझरेली सरकारने उत्तर इझराईलमधील यागुर या ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात ठेवलं होतं.
अर्जेन्टिनामध्ये आइकमनचं अपहरण झाल्यानंतर बरोबर ११ महिन्यांनी – ११ एप्रिल १९६१ या दिवशी त्याच्यावरचा खटला जेरुसलेमच्या न्यायालयात सुरु झाला. सरकारी वकील म्हणून काम पाहणाऱ्या गिडिऑन हॉसनरने १५ गुन्ह्यांचा उल्लेख असलेलं आरोपपत्र न्यायालयासमोर सादर केलं. या गुन्ह्यांमध्ये ज्यू वंशाविरुद्ध गुन्हेगारी कारस्थान आणि प्रत्यक्ष गुन्हे आणि मानवतेविरुद्ध गुन्हे (Crimes against Humanity) या मुद्द्यांचाही समावेश होता.

१५ डिसेंबर १९६१ या दिवशी न्यायालयाने आइकमनला प्रत्येक गुन्ह्याबद्दल दोषी असल्याचा निर्णय देऊन मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. आइकमनने या निर्णयाविरुद्ध अपील केलं पण ते नाकारण्यात आलं. त्याने राष्ट्राध्यक्षांकडे केलेला दयेचा अर्जसुद्धा फेटाळण्यात आला.

३१ मे १९६२ च्या मध्यरात्री/ १ जून १९६२ च्या पहाटे रामला येथील तुरुंगात खास बनवण्यात आलेल्या वधस्तंभावर आइकमनला फासावर लटकवण्यात आलं. त्याचा मृतदेह ताबडतोब जाळण्यात आला. तेव्हा विद्युतदाहिनीमधून येणाऱ्या धुराकडे पाहून ऑशवित्झमधल्या शवदाहिन्यांची आठवण तिथे हजर असलेल्या पत्रकारांना आली.

साठ लाख ज्यूंच्या मृत्यूला जबाबदार असल्याच्या आनंदात हसत हसत मरू इच्छिणाऱ्या अॅडॉल्फ आइकमनची राख इझरेली तटरक्षक दलाच्या जहाजांनी भूमध्य समुद्रात विखरून टाकली.

जेव्हा रेडिओवर ही बातमी प्रसारित झाली, तेव्हा झ्वी मॉल्किन त्याच्या मरणासन्न आईचा हात हातात घेऊन हॉस्पिटलमध्ये तिच्या बाजूला बसला होता.
“मी आइकमनला पकडलं आई. फ्रुमाच्या आणि तिच्या मुलांच्या मृत्यूचा बदला घेतला आपण!” तो तिला म्हणाला.
“तू तुझ्या बहिणीला विसरणार नाहीस याची मला खात्री होती बाळा!” त्याची आई म्हणाली.

सी.आय.ए.च्या प्रतिहेरखात्याचा प्रमुख जेम्स अँगलटनने आपल्या डायरीत लिहिलं – The way Israel ensured justice with Adolf Eichmann proves that everything is NOT fair in love and war!

No comments:

Post a Comment