Sunday 7 February 2016

मोसाद

३ जानेवारी १९४६. न्यूरेम्बर्ग, जर्मनी. सगळ्या जगाला एका फटक्यात बदलून टाकणारं दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं होतं. संहार, व्याप्ती, क्रौर्य या सगळ्याच बाबतीत एकमेवाद्वितीय असलेल्या या युद्धानंतर तशीच एक अभूतपूर्व घटना घडली होती. अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स या विजेत्या राष्ट्रांनी नाझी जर्मनीच्या नेत्यांवर त्यांनी युद्धापूर्वी आणि युद्धादरम्यान केलेल्या अत्याचारांबद्दल खटला भरला होता. ११ उच्चपदस्थ नाझी अधिकारी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे होते. २० नोव्हेंबर १९४५ या दिवशी हा खटला सुरु झाला आणि आता नाताळच्या सुट्टीनंतर न्यायालयाचं कामकाज परत सुरु झालं होतं. न्यायमूर्ती फ्रान्सिस बिडल यांच्यासमोर सरकारी पक्षाचा साक्षीदार म्हणून डिटर विस्लीसेनी नावाचा एक एस.एस. अधिकारी उभा होता. स्लोव्हाकिया आणि हंगेरी इथून ज्यूंना पोलंडमधल्या ऑशविट्झ मृत्युछावणीपर्यंत पोहोचवणं ही त्याच्याकडे असलेली जबाबदारी होती. प्रॉसिक्युटर रॉबर्ट जॅक्सन त्याला प्रश्न विचारत होते. बोलता बोलता विस्लीसेनी म्हणाला, की त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्यूंना पाठवण्याचा हा जो आदेश आलेला होता, त्याच्या सत्यतेबद्दल शंका होती. तेव्हा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला एस.एस. प्रमुख हाइनरिक हिमलरने सही केलेलं एक पत्र दाखवलं. या पत्रात असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं: फ्युहररने ज्यूंच्या प्रश्नाचं अंतिम उत्तर (जर्मन भाषेत Endlosung der Judenfrage, इंग्लिश भाषेत Final Solution of the Jewish Question) कार्यान्वित करण्याचा आदेश दिलेला आहे. यावर जॅक्सनचा प्रतिप्रश्न होता: अंतिम उत्तर या शब्दांचा अर्थ तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितला होता का? त्यावर विस्लीसेनीने होकारार्थी उत्तर दिलं: युरोपातील सर्व ज्यू वंशीयांचा योजनाबद्ध संहार.

विस्लीसेनी पुढे हेही म्हणाला: “ या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे संपूर्ण युरोपातून येणाऱ्या ज्यूंना वेगवेगळ्या मृत्यूछावण्यांमध्ये पाठवण्याची जबाबदारी होती. जेव्हा मी त्याला या अंतिम उत्तराची व्याप्ती विचारली, तेव्हा त्याने मला थंडपणे असं सांगितलं – ‘ मी जेव्हा मरेन तेव्हा अत्यंत समाधानाने मरेन कारण ६० लाख ज्यूंच्या मृत्यूची जबाबदारी माझ्या डोक्यावर असेल. त्यामुळे अगदी हसत हसत मी माझ्या थडग्यात प्रवेश करेन.’ ”

हे ऐकून संपूर्ण न्यायालय सुन्न होऊन गेलं. जॅक्सनने विस्लीसेनीला या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव विचारलं. त्याने उत्तर दिलं – अॅडॉल्फ आइकमन!

या घटनेनंतर तब्बल ११ वर्षांनी मोसाद संचालक इसेर हॅरेलला इझराईलच्या पश्चिम जर्मनीमधल्या वकिलातीकडून एक अजब संदेश मिळाला. या संदेशात असं म्हटलं होतं, की पश्चिम जर्मनीमधल्या हेसे प्रांताचा अॅटर्नी जनरल डॉ. फ्रित्झ बॉवर याच्याकडे मोसादसाठी काही महत्वाची माहिती आहे आणि ती मोसादला देण्याची त्याची इच्छा आहे. हॅरेल अर्थातच बॉवरला ओळखत होता. १९३३ मध्ये हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर बनल्यावर नाझींनी ज्यूंसाठी छळछावण्या उभारायला सुरुवात केली. यातली पहिली छावणी म्हणजे डाखाऊ (Dachau). इथे जे ज्यू सर्वात पहिल्यांदा पाठवण्यात आले, त्यांच्यामध्ये डॉ.बॉवरचा समावेश होता. पण तिथून त्याने सुटका करून घेतली आणि तो प्रथम डेन्मार्कला आणि तिथून स्वीडनमध्ये गेला. युद्ध संपल्यावर जर्मनीमध्ये परत आल्यावर त्याची राजकीय कारकीर्द सुरु झाली. डॉ.बॉवरसाठी राजकारणात पडण्याचा एकमेव हेतू होता नाझी गुन्हेगारांना लोकांसमोर आणून त्यांच्यावर खटले भरून त्यांना त्यांच्या गुन्ह्यांप्रमाणे शिक्षा होईल अशी व्यवस्था करणं. या कमी पश्चिम जर्मन सरकार कमी पडतंय अशी त्याची तक्रार होती, जी काही प्रमाणात खरीही होती. त्याचं मुख्य कारण म्हणजे जर्मन जनतेला आणि सरकारलाही आपला काळा भूतकाळ परत परत उगाळायची इच्छा नव्हती. दुसरं कारण म्हणजे युद्धापूर्वी आणि युद्धादरम्यान नाझी पक्ष किंवा एस.एस. किंवा दोन्हींचे सभासद असलेल्या पण या ना त्या कारणाने अटक न झालेल्या अनेक जणांनी योजनापूर्वक पश्चिम जर्मनीच्या केंद्रीय आणि प्रांतिक सरकारांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शिरकाव केलेला होता. काही जण तर मंत्रिपदापर्यंत पोहोचले होते. पोलिस, सरकारी वकिलांचं ऑफिस, अंतर्गत सुरक्षा मंत्रालय – अशा अनेक ठिकाणी या पूर्वाश्रमीच्या नाझींनी जम बसवलेला होता. त्यामुळे पश्चिम जर्मनीमध्ये एखाद्या नाझी गुन्हेगारावर खटला भरून त्याला शिक्षा होणं ही खूप कठीण गोष्ट होती. याच कारणामुळे बॉवरची त्याच्याकडे असलेली माहिती पश्चिम जर्मन सरकारला देण्याची इच्छा नव्हती.

१९५७ च्या नोव्हेंबरमध्ये हॅरेलने शॉल दारोम नावाच्या एका मोसाद एजंटला डॉ.बॉवरला भेटण्यासाठी म्हणून जर्मनीला पाठवलं. तो आणि बॉवर फ्रँकफर्टमध्ये भेटले. तिथून परत आल्यावर दारोम हॅरेलला भेटला आणि त्याने बॉम्ब टाकला – डॉ.बॉवरच्या मते आइकमन जिवंत आहे आणि सध्या अर्जेन्टिनामध्ये दडून बसलेला आहे.

हॅरेलने त्याच्याकडे रोखून पाहिलं. अॅडॉल्फ आइकमन कोण आहे आणि कशा प्रकारे ५० ते ६० लाख पूर्व आणि पश्चिम युरोपियन ज्यूंच्या मृत्युला तो जबाबदार आहे, हे त्याला अगदी व्यवस्थित माहित होतं. युद्धानंतर आइकमन मरण पावला असा एक प्रवाद होता. काही जणांच्या म्हणण्यानुसार तो इजिप्त किंवा सीरियामध्ये होता. जगद्विख्यात नाझी शिकारी सायमन विझेन्थालच्या मते आइकमन दक्षिण अमेरिकेत होता. विझेन्थालने आइकमनच्या उर्वरित कुटुंबावर पाळत ठेवली होती. १९५२ मध्ये त्याचं कुटुंब ऑस्ट्रियामधून अचानक गायब झालं. त्यानंतर विझेन्थालने ते दक्षिण अमेरिकेमध्ये गेल्याचं शोधून काढलं होतं. पण नक्की कुठे हे त्यालाही माहित नव्हतं. आणि आता डॉ.बॉवरच्या मते आइकमन अर्जेन्टिनामध्ये होता.

दारोमने डॉ.बॉवरकडे ही बातमी कशी आली, ते हॅरेलला सांगितलं. काही महिन्यांपूर्वी डॉ.बॉवरला एक पत्र मिळालं होतं. लोथार हरमान नावाच्या एका माणसाने हे पाठवलं होतं. हरमानचे वडील ज्यू होते. नाझी जर्मनीमध्ये अशा लोकांनाही ज्यू म्हणूनच मानण्याचा कायदा असल्यामुळे हरमानचाही नाझींकडून छळ झाला होता. युद्धानंतर तो त्याची पत्नी आणि तरुण, सुस्वरूप मुलीबरोबर अर्जेन्टिनामध्ये स्थायिक झाला होता. या मुलीचं नाव होतं सिल्व्हिया.
एका डेटिंग एजन्सीमार्फत सिल्व्हियाला एका तरुणाचं नाव आणि पत्ता मिळाला होता. त्याला भेटून आल्यावर तिने आपल्या वडिलांना त्याचं नाव सांगितलं – निक आइकमन. हरमानला आश्चर्याचा धक्का बसला. हा मुलगा अॅडॉल्फ आइकमनशी संबंधित असू शकेल अशी शंका त्याच्या मनात आली आणि त्याने डॉ.बॉवरला पत्र पाठवलं.
सायमन विझेन्थालकडून आइकमनचं कुटुंब ऑस्ट्रियाहून दक्षिण अमेरिकेत पळून गेल्याचं डॉ.बॉवरला समजलं होतंच. आपले अधिकार आणि ओळखी वापरून डॉ.बॉवरने हे शोधून काढलं, की आइकमनची पत्नी व्हेरा आणि तिची तीन मुलं ऑस्ट्रियाहून अर्जेन्टिनाला पळून गेली आणि तिथे व्हेराने दुसरं लग्न केलं. हरमानच्या पत्रामुळे ते अर्जेन्टिनामध्ये कुठे आहेत, त्याची कल्पना बॉवरला आली होती – ब्युनोस आयर्स. अर्जेन्टिनाची राजधानी. व्हेरा अचानक ऑस्ट्रियामधून मुलांसकट पळून गेली, कारण आइकमनने तिच्याशी संपर्क साधला असणार आणि तिथे जाऊन तिने दुसरं लग्न वगैरे काहीही न करता दुसऱ्या नावाने राहात असलेल्या आइकमनशी लग्न केलं असणार असा डॉ.बॉवरचा अंदाज होता.

ही माहिती जर आपण पश्चिम जर्मन सरकारला दिली, तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, अशी सार्थ भीती डॉ.बॉवरला वाटत होती. शिवाय महायुद्ध संपल्यावर अनेक नाझी अर्जेन्टिनामध्ये स्थायिक झाले होते, आणि तिथल्या सरकारी विभागांमध्ये नोकऱ्या करत होते. त्यामुळे जरी पश्चिम जर्मन सरकारने अर्जेंटिनियन सरकारशी संपर्क साधून आइकमनच्या अटकेची आणि प्रत्यार्पणाची मागणी केली, तरी अर्जेन्टिनामधून त्याची अंमलबजावणी होईलच याची काही खात्री नव्हती. सर्वात वाईट म्हणजे जर आइकमनला कोणी त्याच्या मागावर असल्याची बातमी दिली, तर तो पुन्हा एकदा गायब होईल आणि मग त्याला पकडण्याची संधी परत येऊ शकणार नाही ही शक्यताही होतीच.

त्यामुळे बॉवरला ही कामगिरी इझराईलने, पर्यायाने मोसादने पार पाडावी असं वाटत होतं. ब्युनोस आयर्समधला हा माणूस खरोखर आइकमन आहे की नाही हे शोधून काढणं आणि जर तो आइकमन असेल, तर इझराईलने त्याच्या प्रत्यार्पणाची अर्जेन्टिनाकडे मागणी करणं किंवा आइकमनला तिथून उचलून इझराईलमध्ये आणणं आणि त्याच्यावर खटला भरणं – हे करावं, नव्हे, करायलाच पाहिजे, असं डॉ.बॉवरला वाटत होतं. अर्थात, बॉवर त्याच्या वैयक्तिक अधिकाराने हे बोलत होता. पश्चिम जर्मनीमधल्या एका प्रांताचा अॅटर्नी जनरल म्हणून नव्हे. तो मोसादच्या प्रतिनिधीला भेटतोय, हे फक्त हेसे प्रांताचा प्रेसिडेंट जॉर्ज ऑगस्ट झिन यालाच माहित होतं, आणि ते तसंच राहावं अशी बॉवरची इच्छा होती.

हॅरेलला ही माहिती दिल्यावर दारोमने त्याच्यासमोर एक कागद ठेवला. या कागदावर आइकमनचा ब्युनोस आयर्समधला संभाव्य पत्ता लिहिला होता – ४२६१, चकाब्युको स्ट्रीट, ओलीव्होस, ब्युनोस आयर्स.

१९५८ च्या जानेवारीत मोसाद एजंट एमॅन्युएल ताल्मोर ब्युनोस आयर्समध्ये आला. चकाब्युको स्ट्रीटवरून त्याने अनेक फेऱ्या मारल्या, आणि जे काही दिसलं, ते त्याला आवडलं नाही. ओलीव्होस हा ब्युनोस आयर्समधला निम्न मध्यमवर्गीय भाग होता. इथली वस्ती ही प्रामुख्याने कामगारांची होती. बैठी, बऱ्या स्थितीतल्या झोपड्या म्हणावं अशी घरं होती. ४२६१ क्रमांकाचं घरही असंच होतं. त्याच्या छोट्या आवारात ताल्मोरला एक लठ्ठ आणि विटके कपडे घातलेली स्त्री दिसली.

“हे आइकमनचं घर असेल असं मला वाटत नाही,” तेल अवीवला परतल्यावर ताल्मोर हॅरेलला म्हणाला, “आइकमन नक्कीच भरपूर पैसे घेऊन अर्जेन्टिनामध्ये आला असणार. जवळपास सगळ्या नाझी आणि एस.एस. अधिकाऱ्यांनी १९४४ मध्येच आपल्या पलायनाची तयारी सुरु केली होती. असल्या झोपडपट्टीत आइकमन राहात असेल असं मला वाटत नाही. ती बाईसुद्धा व्हेरा आइकमनसारखी दिसत नव्हती.”

सुदैवाने ताल्मोरच्या आक्षेपांना धूप न घालता हॅरेलने तपास तसाच चालू ठेवायचं ठरवलं, पण त्याला आता बॉवरला ही माहिती ज्याने दिली, त्याला भेटायची इच्छा होती. बॉवरने ताबडतोब लोथार हरमानची माहिती दिली. हरमान आणि त्याचं कुटुंब आता ब्युनोस आयर्सपासून ३०० मैल दूर असलेल्या कोरोनेल सुआरेझ या शहरात राहात होते.

फेब्रुवारी १९५८ मध्ये एफ्राइम हॉफस्टेटर कोरोनेल सुआरेझमध्ये जाऊन लोथार हरमान आणि त्याची मुलगी सिल्व्हिया या दोघांना भेटला. हॉफस्टेटर मोसादचा एजंट नव्हता, तर तेल अवीवचा पोलिसप्रमुख होता. पोलिसांची आंतरराष्ट्रीय संघटना इंटरपोलची एक कॉन्फरन्स त्यावेळी ब्युनोस आयर्समध्ये होती. हॉफस्टेटर त्याच्यासाठी आला होता, आणि त्याने मोसादसाठी एवढं एक काम करायचं कबूल केलं होतं.

लोथार हरमान आंधळा होता. नाझी सत्तेवर आले, तेव्हा तो एक पोलिस अधिकारी होता, पण नाझींच्या ज्यूंना जर्मनीमधल्या सार्वजनिक जीवनातून हद्दपार करण्याच्या धोरणामुळे त्याची नोकरी गेली आणि त्याला डाखाऊ छळछावणीत टाकण्यात आलं. तिथे त्याची दृष्टी गेली. युद्धानंतर त्याची सुटका झाली आणि मग तो आपल्या पत्नी आणि मुलीबरोबर अर्जेन्टिनामध्ये आला.

त्याने हॉफस्टेटरची आपल्या मुलीशी ओळख करून दिली आणि तिने आता पुढची गोष्ट सांगायला सुरुवात केली.
जवळजवळ दीड वर्षांपूर्वी ती आणि तिचं कुटुंब ब्युनोस आयर्सच्या ओलीव्होस भागात राहात होतं. तिथे तिची आणि निक आइकमनची भेट झाली होती. दोघेही एकत्र फिरायला जात असत. तिने आपण ज्यू आहोत हे त्याला सांगितलं नव्हतं, पण निकच्या मनात ज्यूंबद्दल असलेले विचार तिच्या लक्षात आले होते. एकदा असंच बोलताना तो म्हणाला होता, की जर्मनांनी ज्यूंचा पूर्ण निकाल लावून मगच शरणागती पत्करायला हवी होती. नंतर एकदा त्याने त्याच्या वडिलांनी दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्यातले अधिकारी म्हणून काम केल्याचं आणि जर्मनीप्रती आपलं कर्तव्य पार पाडल्याचं सांगितलं होतं.

निक आणि सिल्व्हिया इतके वेळा भेटले होते, पण त्याने एकदाही तिला त्याच्या घरी बोलावलं नव्हतं. ती ब्युनोस आयर्स सोडून कोरोनेल सुआरेझला राहायला गेल्यावरही त्यांचा पत्रव्यवहार होता, पण तिची पत्रं तो स्वतःच्या घराच्या पत्त्यावर स्वीकारत नव्हता. तिला तिची पत्रं निकच्या एका मित्राच्या पत्त्यावर पाठवावी लागत.

निकच्या या विचित्र वागण्यामुळे लोथार हरमानला संशय आला आणि त्याने सिल्व्हियाबरोबर ब्युनोस आयर्सला जाऊन याचा छडा लावायचं ठरवलं. तिथे तिने काही मित्रांकडून निकचा पत्ता शोधून काढला आणि ती त्याच्या घरी गेली. निक घरी नव्हता, पण तिचं स्वागत एका चष्मा घातलेल्या, टक्कल पडलेल्या आणि बारीक मिशी असलेल्या माणसाने केलं. त्याने तिला निक त्याचा मुलगा असल्याचं सांगितलं.

हरमानची परत एकदा ब्युनोस आयर्सला जाऊन तो माणूस नक्की कोण आहे, ते शोधून काढायची तयारी होती. सिल्व्हियाही त्याच्याबरोबर असणार होती. हॉफस्टेटरने त्याला शोधून काढायच्या गोष्टींची यादी दिली – त्या माणसाचा फोटो, सध्याचं नाव, कुठे काम करतो तो पत्ता, एखादं अधिकृत कागदपत्र आणि त्याचे बोटांचे ठसे.

काही महिन्यानंतर हरमानचा रिपोर्ट मोसाद हेडक्वार्टर्समध्ये आला. त्याच्यात त्याने आपण आइकमनबद्दल सगळं शोधून काढल्याचं म्हटलं होतं. चकाब्युको स्ट्रीटवरचं ते घर फ्रान्सिस्को श्मिड नावाच्या एका ऑस्ट्रियन माणसाने दहा वर्षांपूर्वी बांधलं होतं आणि दोन कुटुंबांना भाड्याने दिलं होतं – दागुतो आणि क्लेमेंट. हरमानने श्मिड हाच आइकमन असल्याचं ठासून सांगितलं होतं. त्याच्या मते दागुतो आणि क्लेमेंट ही दोन्ही नावं म्हणजे आइकमनची खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न होता.

हॅरेलने मोसादच्या ब्युनोस आयर्समधल्या प्रतिनिधीला या माहितीची शहानिशा करून घ्यायला सांगितलं. काही दिवसांनी या प्रतिनिधीने त्याला कळवलं – फ्रान्सिस्को श्मिड हा आइकमन असल्याचा कुठलाही पुरावा नाही. तो चकाब्युको स्ट्रीटवरच्या घरात याआधी कधीही राहिलेला नाही.

हॅरेलने यावरून लोथार हरमान विश्वासार्ह नसल्याचा निष्कर्ष काढला आणि हे शोधकार्य थांबवलं.

हॅरेलचा हा निर्णय म्हणजे एक मोठी चूक होती पण हे त्याला तेव्हा समजलं नाही. दीड वर्षांनी, जानेवारी १९६० मध्ये जेव्हा डॉ.फ्रित्झ बॉवर इझराईलला आला, तेव्हा तो प्रचंड संतापलेला होता. त्याला हॅरेलचं तोंड पाहण्याचीही इच्छा नव्हती. त्याने आपली तक्रार सरळ पंतप्रधान बेन गुरियनकडे नेली आणि इझराईलला जर एका नाझी युद्धगुन्हेगाराला पकडण्याच्या संधीचा फायदा घेण्याची इच्छा नसेल, तर आपल्याला हे प्रकरण पश्चिम जर्मनीच्या सरकारकडे द्यावं लागेल, अशी धमकी दिली. बेन गुरियननी इझराईलचा अॅटर्नी जनरल हाईम कोहेनला या प्रकरणात लक्ष घालायची विनंती केली, आणि कोहेनच्या ऑफिसमध्ये बॉवर आणि हॅरेल समोरासमोर आले. बॉवरने हॅरेलवर हे सगळं शोधकार्य अत्यंत बालिशपणे, अव्यावसायिक रीत्या आणि पुरेशा गांभीर्याने न हाताळल्याचा आरोप केला. हॅरेल निर्विकार चेहऱ्याने सगळं ऐकून घेत होता. बॉवरने बोलता बोलता सांगितलेल्या एका माहितीवर तो चमकला आणि त्याने बॉवरला तो मुद्दा परत सांगायची विनंती केली. तो मुद्दा होता आइकमनच्या अर्जेन्टिनामधल्या नावाचा. हे नाव होतं रिकार्डो क्लेमेंट.

एका क्षणात हॅरेलला आपली चूक लक्षात आली. चकाब्युको स्ट्रीटवर असलेल्या त्या घराचा मालक जरी फ्रान्सिस्को श्मिड असला, तरी तिथे दोन भाडेकरू होते, असं हरमानने सांगितलं होतं. त्यातल्या एकाचं नाव क्लेमेंट होतं, हेही त्याने शोधून काढलं होतं. याचा अर्थ आइकमन त्या घराचा मालक नव्हता, निदान कागदोपत्री तरी. तो तिकडे भाडेकरू म्हणून राहात होता. हरमानला आइकमनने रिकार्डो क्लेमेंट हे नाव घेतलेलं माहित नव्हतं आणि त्याने श्मिड हा आइकमन असावा असा निष्कर्ष काढला होता, जो चुकीचा निघाल्यावर हॅरेलने सगळा तपास थांबवला होता.

हॅरेलने आपली चूक मान्य केली आणि हा तपास पुन्हा चालू करण्याचं आश्वासन दिलं. एवढंच करून तो थांबला नाही तर त्याने शाबाकचा एक अत्यंत हुशार एजंट झ्वी आहारोनीला आइकमनबद्दलच्या माहितीची शहानिशा करून घेण्यासाठी ब्युनोस आयर्सला पाठवलं.

फेब्रुवारी १९६० मध्ये आहारोनी ब्युनोस आयर्समध्ये उतरला आणि त्याने चकाब्युको स्ट्रीटवरच्या त्या घराबद्दल एका स्थानिक ज्यू इस्टेट एजंटकडून माहिती काढली. सध्या त्या घरात कोणीही राहात नव्हतं. घराचे दोन भाग होते. दोन्हीही सध्या रिकामे होते, आणि क्लेमेंट कुटुंब जिथे राहात होतं, त्या भागाची सध्या रंगरंगोटी आणि साफसफाई चालू होती आणि बरेच रंगारी, गवंडी आणि इतर कामगार तिकडे काम करत होते. क्लेमेंट कुटुंब दुसरीकडे कुठेतरी राहायला गेलं होतं, पण नक्की कुठे ते माहित नव्हतं.

मार्च १९६० च्या सुरुवातीला कुरियर कंपनीच्या गणवेशातला एक तरुण चकाब्युको स्ट्रीटवरच्या या घरी आला. त्याच्या हातात निकोलस क्लेमेंटसाठी एक एकदम भारी सिगरेट केस आणि लायटर या भेटवस्तू होत्या. दोन्हीही अगदी छान पॅक केलेल्या होत्या. निकोलस क्लेमेंटला ओळखणाऱ्या पण स्वतःची ओळख न देऊ इच्छिणाऱ्या एका मुलीने ही भेट त्याच्या वाढदिवसानिमित्त पाठवलेली होती.

या कुरियरवाल्या तरुणाने क्लेमेंट कुटुंब राहात असलेल्या भागात जाऊन चौकशी करायला सुरुवात केली. पण तिथे काम करणाऱ्या कामगारांना त्याबद्दल काहीही माहित नव्हतं. त्यांच्यापैकी एकाला निकोलस क्लेमेंटचा भाऊ जवळच कुठेतरी काम करतो आणि कधीतरी इथे देखरेख करण्यासाठी येतो एवढं माहित होतं. या माहितीवरून हा कुरियरवाला तरुण निकोलस क्लेमेंटच्या भावाच्या कामाच्या ठिकाणी गेला.

हे ठिकाण म्हणजे एक मध्यम आकाराचा कारखाना होता. या भावाचं नाव होतं डिटर. त्याच्याकडून या कुरियरवाल्याला निकोलस क्लेमेंटचा पत्ता मिळाला नाही, पण बोलण्याच्या ओघात त्याने आपले वडील थोडे दिवस तुकुमान नावाच्या एका शहरात काम करत आहेत, आणि लवकरच ते काम सोडून ब्युनोस आयर्सला परत येणार आहेत हे सांगितलं.

हा कुरियरवाला तरुण तिथून चकाब्युको स्ट्रीटवरच्या घरी गेला, आणि त्याने तिकडे त्या कामगारांसमोर सरळ रडायला सुरुवात केली. कशी त्याला या नोकरीची गरज आहे आणि ही भेटवस्तू जर पोहोचवली नाही तर कशी त्याची नोकरी जाईल आणि त्याच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येईल याचं रसभरीत वर्णन त्याने केल्यावर त्याची दया येऊन एका कामगाराने जरा चौकशी केली आणि क्लेमेंट कुटुंबाचा नवीन पत्ता शोधून काढला, “ तू ट्रेनने सान फर्नान्डो स्टेशनला जा,” तो म्हणाला, “मग २०३ नंबरची बस पकड आणि अॅविहेन्डाच्या स्टॉपवर उतर. त्याच्या समोर एक छोटं दुकान आहे. त्या दुकानाच्या उजवीकडे, इतर घरांपासून थोडं दूर असं एक विटांचं छोटेखानी घर आहे. तिथे हे लोक सध्या राहात आहेत.”

आहारोनीला ही माहिती मिळाल्यावर त्याने आणि तिथल्या मोसाद एजंट्सनी डिटर क्लेमेंटच्या हालचालींवर नजर ठेवली. डिटरच्या मागावर असलेल्या एजंटने असं घर प्रत्यक्षात असल्याचं कळवताच आहारोनी स्वतः तिकडे जाऊन आला आणि त्याने ते घर पाहिलं. तिथे असलेल्या एका छोट्या दुकानात त्याने रस्त्याचं नाव विचारलं. “गॅरिबाल्डी स्ट्रीट.” दुकानदाराने उत्तर दिलं.

मार्चच्या मध्यावर आहारोनीने गॅरिबाल्डी स्ट्रीटला परत एकदा भेट दिली. पण यावेळी तो भपकेबाज सूट घालून फिरत होता. क्लेमेंट कुटुंबाच्या घरासमोर असलेल्या घराचा दरवाजा त्याने वाजवला. एका स्त्रीने दरवाजा उघडला. आपण एका शिवणयंत्रं बनवणाऱ्या अमेरिकन कंपनीचे प्रतिनिधी आहोत आणि या भागात आपल्याला एक फॅक्टरी चालू करायची आहे, आणि त्यासाठी म्हणून त्या भागातली काही घरं विकत घ्यायची आहेत, असं त्याने तिला सांगितलं.

तिच्याशी बोलता बोलता आहारोनी त्याच्या हातात असलेल्या छोट्या बॅगचं बटन सतत दाबत होता. पाहणाऱ्याला हा चाळा वाटला असता, पण प्रत्यक्षात तो एका छोट्या कॅमेऱ्याने क्लेमेंट कुटुंबाच्या घराचे फोटो घेत होता.

या भेटीच्या दुसऱ्या दिवशी आहारोनीने ब्युनोस आयर्स म्युनिसिपल रेकॉर्ड्समधून हे शोधून काढलं, की ज्या जमिनीवर क्लेमेंट कुटुंबाचं घर आहे, ती व्हेरा लीबल आइकमन नावाच्या स्त्रीच्या नावावर आहे. अर्जेन्टिनामधल्या पद्धतीनुसार व्हेरा आइकमनने आपलं लग्नापूर्वीचं आणि नंतरचं अशी दोन्हीही आडनावं दिली होती. याचा अर्थ तिच्या दुसऱ्या लग्नाची बातमी खोटी होती. तिने आइकमनशीच परत लग्न केलेलं होतं. या सगळ्या कागदपत्रांमध्ये रिकार्डो क्लेमेंट हे नाव मात्र कुठेही नव्हतं.

आहारोनी अनेक वेळा, वेगवेगळ्या वेशांत गॅरिबाल्डी स्ट्रीटवर गेला, पण त्याला तिथे आइकमन दिसला नाही. व्हेरा आइकमन आणि तिची मुलं होती, पण स्वतः अॅडॉल्फ आइकमन नव्हता. पण आहारोनीची थांबायची तयारी होती. त्याच्याकडे असलेल्या फाईलमध्ये २१ मार्च हा आइकमनच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचं लिहिलेलं होतं. त्या दिवशी आइकमन ब्युनोस आयर्समध्ये नक्की येईल अशी आहारोनीची अटकळ होती.

२१ मार्चच्या दिवशी दुपारी आहारोनी तिथे गेला आणि इतके दिवसांची त्याची प्रतीक्षा संपली. एक मध्यम उंचीचा, बारीक चणीचा, टक्कल पडलेला माणूस घराच्या आवारात येरझाऱ्या घालत होता. त्याच्या डोळ्यांवर चष्मा होता. आहारोनीने त्याचे अनेक फोटो काढले, आणि नंतर आइकमनच्या फाईलमध्ये असलेल्या फोटोंशी ते पडताळून पाहिले आणि नंतर मोसादच्या हेडक्वार्टर्सला एक संदेश पाठवला.

२२ मार्चच्या दिवशी हॅरेल स्वतः पंतप्रधान बेन गुरियनच्या निवासस्थानी गेला. “आइकमन अर्जेन्टिनामध्ये असल्याचा खात्रीलायकरीत्या समजलेलं आहे,” तो म्हणाला, “माझ्या मते आपण त्याला तिथून उचलून इथे आणू शकतो.”
बेन गुरियननी ताबडतोब उत्तर दिलं, “त्याला जिवंत किंवा मृत – कसाही आण,” आणि एक क्षणभर थांबून ते म्हणाले, “ जिवंत आणलंस तर बरं. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे.”

पंतप्रधानांकडून हिरवा कंदील मिळाल्यावर हॅरेलने कामाला सुरुवात केली. सर्वात महत्वाचं काम म्हणजे आइकमनला अर्जेन्टिनामध्ये उचलण्यासाठी आणि तिथून इझराईलमध्ये परत आणण्यासाठी टीम बनवणं. हॅरेलच्या या टीममध्ये १२ जणांचा समावेश होता:

रफी एतान – शाबाकच्या अत्यंत हुशार आणि घातकी एजंट्सपैकी एक असलेला एतान इझराईलच्या निर्मितीआधी शाईमध्ये होता. तेव्हा ब्रिटीशांच्या डोळ्यांत धूळ झोकून इतर देशांमधल्या ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये सुखरूप पोचवणं हे त्याचं काम होतं, आणि एकदाही तो पकडला गेला नव्हता. या संपूर्ण ऑपरेशनच्या प्रमुखपदी हॅरेलने त्याची निवड केली होती.

झ्वी उर्फ पीटर मॉल्किन – वेषांतर आणि अभिनय यांची आवड असलेला मॉल्किन शाबाकमधला उगवता तारा होता. तो दरवर्षी एक सोविएत एजंट पकडतो असा त्याचा लौकिक होता. त्याचं या मोहिमेवर येण्याचं वैयक्तिक कारणसुद्धा होतं. त्याचा जन्म पोलंडमधल्या ग्रास्निक लुबेल्स्की नावाच्या खेड्यात झाला होता. दुसरं महायुद्ध सुरु होताना नाझी जर्मनी आणि सोविएत रशिया यांनी पोलंडवर अनुक्रमे पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून हल्ला चढवला होता. तेव्हा मॉल्किनचं गाव रशियनांच्या ताब्यात गेलं, पण त्याचे कुटुंबीय तिथून पॅलेस्टाईनला जाण्यात यशस्वी झाले. दुर्दैवाने त्याची मोठी बहिण फ्रुमा आणि तिचं संपूर्ण कुटुंब मागे राहिलं आणि नंतर १९४१ मध्ये नाझींनी जेव्हा सोविएत रशियावर आक्रमण केलं तेव्हा त्या सर्वांची रवानगी ऑशविट्झला करण्यात आली आणि तिकडेच फ्रुमाचा आणि तिच्या लहान मुलांचा मृत्यू झाला. त्यांना तिथे पाठवणं हे अर्थातच आइकमनचं काम होतं.

अॅव्हरम शालोम – मध्यम उंचीचा, दणदणीत शरीरयष्टी असलेला शालोम हा विध्वंसक पदार्थ आणि स्फोटकं यामधला तज्ञ होता. तो पुढे शाबाकचा संचालकही झाला.

याकोव्ह गाट – इझराईलच्या निर्मितीआधी फ्रान्समध्ये राहात असलेला गाट युद्धादरम्यान फ्रेंच प्रतिकारकांच्या नाझीविरोधी मोहिमांमध्ये सक्रीय सहभागी होता.

मोशे ताव्होर – इझराईलच्या निर्मितीआधी ताव्होर ब्रिटीश सैन्यात होता, आणि त्याने टोब्रुक आणि एल अलामेन या लढायांमध्ये भाग घेतलेला होता. तो ब्रिटीश सैन्यातल्या ‘ अॅव्हेंजर्स ‘ नावाच्या गुप्त तुकडीत होता, आणि या तुकडीने युद्धानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक नाझी अधिकाऱ्यांना पकडलं आणि ठारदेखील मारलं होतं.

शालोम डॅनी – खोटी कागदपत्रं बनवण्यात उस्ताद असलेला डॅनी एक उत्कृष्ट चित्रकारही होता. त्याने टॉयलेट पेपरवर एस.एस.ची ओळखपत्रं बनवून १० जणांसह नाझी छळछावणीमधून पलायन केलं असल्याची आख्यायिका होती. (जी खरी असल्याचं नंतर सिद्ध झालं.)

एफ्राईम इलानी – इलानीला ब्युनोस आयर्स शहर अगदी तिथल्या गल्लीबोळांसकट पूर्णपणे माहित होतं. त्याला स्पॅनिश भाषाही अस्खलित रीत्या बोलता येत होती आणि तो कुठलंही कुलूप मोजून १० सेकंदांमध्ये उघडू शकत असे. शिवाय त्याचा चेहरा हा कोणाच्याही मनात विश्वास निर्माण करू शकतो असं एतान आणि हॅरेल या दोघांचं मत होतं.

येहुदिथ निसियाहू – या टीममधली एकमेव स्त्री असलेली येहुदिथ मोसादच्या सर्वश्रेष्ठ एजंट्सपैकी एक होती. एखाद्या प्रेमळ मध्यमवयीन स्त्रीप्रमाणे दिसणाऱ्या येहुदिथचाही कोणाला संशय आला नसता.

डॉ. योना एलीयान – व्यवसायाने भूलतज्ञ (anaesthetist) असलेल्या डॉ.एलीयान याची निवड करण्यामागचं कारण उघड होतं. आइकमनला इझराईलला आणायचं तर उघडपणे आणता येणारच नव्हतं, आणि तज्ञ नसलेल्या दुसऱ्या कोणी भूल दिली, तर चूक होण्याचा संभव होता. त्यामुळे डॉ.एलीयानचा समावेश अपरिहार्य होता.

झ्वी आहारोनी – आइकमनबद्दल असलेली सगळी माहिती पडताळून पाहून रिकार्डो क्लेमेंट हाच आइकमन आहे, हे सिद्ध करणाऱ्या आहारोनीचा त्या कामगिरीचं बक्षीस म्हणून या मोहिमेत समावेश करण्यात आला होता.

याकोव्ह मिदाद – इझराईलच्या निर्मितीआधी मिदाद बिटीश सैन्यात होता. त्याचंही संपूर्ण कुटुंब मृत्यूछावणीमध्ये नष्ट झालेलं होतं.

स्वतः इसेर हॅरेल – बारावा सदस्य म्हणून जेव्हा हॅरेलने स्वतःचं नाव सांगितलं, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, पण हॅरेलच्या सहभागाचं एक अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे या संपूर्ण मोहिमेत अनेक वेळा असे प्रसंग येणार होते, जेव्हा अगदी उच्च पातळीवर निर्णय घेण्याची गरज भासणार होती. अशा वेळी मोसादचा संचालक तिथे असल्यामुळे वेळ वाचला असता आणि निर्णय ताबडतोब घेता आले असते.

एप्रिल १९६० च्या शेवटी चार एजंट्सनी वेगवेगळ्या दिशांनी अर्जेन्टिनामध्ये प्रवेश केला. त्यांनी आपल्या सामानात अनेक आवश्यक गोष्टी लपवून आणल्या होत्या. शालोम डॅनीने तर आपली जवळपास सगळी प्रयोगशाळा अर्जेन्टिनामध्ये आणली होती.

ब्युनोस आयर्समध्ये आल्यावर या चौघांनी एक फ्लॅट भाड्याने घेतला. या ठिकाणाचं सांकेतिक नाव होतं द कॅसल. बाकीचे सदस्य आल्यावर त्यांच्या राहण्यासाठी म्हणून ही व्यवस्था होती. या फ्लॅटची व्यवस्था लावल्यावर हे सगळेजण एक गाडी भाड्याने घेऊन गॅरिबाल्डी स्ट्रीट आणि आइकमनचं घर पाहायला गेले. तिथे ते पोहोचले, तेव्हा संध्याकाळचे ७.४० झाले होते. त्यांची गाडी अगदी कमी वेगाने रस्त्यावरून चालली होती. तेव्हा त्यांना तिथल्या बसस्टॉपवर एक बस थांबलेली दिसली. त्या बसमधून एक माणूस उतरला. तो आइकमन उर्फ रिकार्डो क्लेमेंट आहे, हे समजल्यावर त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. आइकमनचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. तो स्वतःच्याच तंद्रीत होता. त्याच्या घरापाशी तो वळला आणि घरात गेला.

याचा अर्थ आइकमन दररोज साधारण याच वेळी घरी येत होता, आणि बसस्टॉपपासून ते त्याच्या घरापर्यंत असलेल्या रस्त्यावर त्यावेळी चिटपाखरूही नव्हतं, म्हणजे या भागातून त्याला उचलणं शक्य होतं.

त्याच रात्री या एजंट्सनी इझराईलला संदेश पाठवला – काम होऊ शकतं.

आइकमनला कसं, कुठे आणि केव्हा उचलायचं हा प्रश्न निकालात निघाला होता. आता सर्वात महत्वाचा मुद्दा होता त्याला अर्जेन्टिनाच्या बाहेर कसं काढायचं. त्यावेळी नशिबाने हॅरेलची साथ दिली. त्याच वर्षी म्हणजे १९६० मध्ये अर्जेन्टिनाच्या स्वातंत्र्याला १५० वर्षे पूर्ण होत होती आणि दिवस होता २० मे. संपूर्ण जगातून अनेक परदेशी पाहुणे या समारंभात भाग घेण्यासाठी अर्जेन्टिनामध्ये येणार होते. शिक्षणमंत्री अब्बा एबानच्या नेतृत्वाखाली इझरेली शिष्टमंडळही जाणार होतं. हे शिष्टमंडळ ब्युनोस आयर्सपर्यंतचा प्रवास सरकारी विमान कंपनी एल अॅलच्या नवीन जम्बो जेटने करणार होतं. या विमानाचं नाव होतं the Whispering Giant..

११ मे १९६० या दिवशी या शिष्टमंडळाची फ्लाईट होती. हॅरेल स्वतः मोर्देचाई बेन अरी आणि एफ्राईम बेन अर्त्झी या एल अॅलच्या अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटला आणि त्याने त्यांना सगळी कल्पना दिली. मुख्य पायलट झ्वी तोहरला बाकी काहीही माहिती देण्यात आली नाही, फक्त एखादा अनुभवी मेकॅनिक बरोबर घेण्याची सूचना देण्यात आली. जर विमानाला अर्जेन्टिनामधून तिथल्या एअरपोर्ट स्टाफच्या मदतीशिवाय उड्डाण करावं लागलं, तर काही प्रश्न उद्भवू नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती.

१ मे १९६० या दिवशी वेगळ्याच पासपोर्टवर इसेर हॅरेल ब्युनोस आयर्सच्या विमानतळावर उतरला. अर्जेन्टिना दक्षिण गोलार्धात असल्यामुळे मे महिन्यात हिवाळा होता. त्याच्यानंतर जवळपास एक आठवड्यानंतर ९ मे या दिवशी ब्युनोस आयर्सच्या मध्यभागात असलेल्या एका उंच इमारतीमधल्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये टीमच्या सर्व १२ सदस्यांची बैठक होती. सर्वजण वेगवेगळ्या मार्गांनी ब्युनोस आयर्समध्ये शिरले होते. या फ्लॅटचं सांकेतिक नाव होतं हाईट्स.

अर्जेन्टिनामध्ये येण्याआधी हॅरेलने ब्युनोस आयर्समधल्या जवळजवळ ३०० कॅफे आणि बार्स यांची एक यादी बनवली होती. त्यांचे पत्ते आणि ते चालू असण्याच्या वेळासुद्धा त्यात होत्या. दररोज सकाळी तो निघत असे आणि पायी वेगवेगळ्या कॅफेमध्ये जात असे. कुठल्या कॅफेमध्ये तो कधी असेल याचं एक वेळापत्रक त्याने बनवलं होतं आणि त्यामुळे तो दिवसाच्या कुठल्याही वेळी कुठे असेल हे त्याच्या टीमला अगदी व्यवस्थित माहित असायचं. या मोहिमेच्या शेवटी गोडमिट्ट अर्जेंटिनियन कॉफी पिऊन पिऊन आपलं डोकं दुखायला लागल्याचं हॅरेलने लिहून ठेवलेलं आहे.

हॅरेल आल्यावर त्याने स्वतः ब्युनोस आयर्स विमानतळापासून जवळ असलेला एक बंगला आइकमनला उचलल्यापासून ते त्याला इझराईलला जाणाऱ्या विमानात बसवेपर्यंत ठेवण्यासाठी म्हणून निवडला होता. या जागेचं सांकेतिक नाव होतं द बेस. इथे येहुदिथ निसियाहू आणि याकोव्ह मिदाद हे पर्यटक जोडपं म्हणून राहणार होते. या बंगल्यात इझरेली एजंट्सनी अनेक लपण्याच्या जागा बनवल्या होत्या. आइकमनला उचलल्यावर त्याच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली, आणि जर स्थानिक पोलिस तपासासाठी आले, तर त्यांना आइकमन सापडू नये हा त्यामागचा उद्देश होता. या बंगल्याजवळ असलेला दुसरा एक बंगला पर्यायी व्यवस्था म्हणून भाड्याने घेण्यात आला होता.

आता सगळी तयारी झाली होती. १० मेला आइकमनला उचलायचं, ११ मेचा एक दिवस ‘ द बेस ’ वर ठेवायचं, आणि १२ तारखेला जेव्हा ११ तारखेला आलेलं विमान परत जाईल तेव्हा त्याच्यातून इझराईलला पाठवायचं असं ठरलेलं होतं, पण ऐनवेळी माशी शिंकली.

अर्जेन्टिनाच्या १५०व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभामुळे ब्युनोस आयर्स आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक जमले होते, की अर्जेंटिनियन पोलिस आणि सुरक्षा यंत्रणेला इतक्या लोकांना सांभाळणं जड जात होतं. त्यामुळे अर्जेन्टिनाच्या परराष्ट्र मंत्रालयाने इझरेली शिष्टमंडळाला ११ मेऐवजी १९ मे या दिवशी येण्याची विनंती केली. त्यानुसार आता इझरेली शिष्टमंडळाची फ्लाईट १८ मे या दिवशी इझरेली प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता निघणार होती.

हॅरेलपुढे आता दोन पर्याय होते – आइकमनला ठरल्याप्रमाणे १० मेला उचलायचं आणि मग २० मेपर्यंत वाट पहायची किंवा मग त्याला १९ मेला उचलायचं आणि २० तारखेला इझराईलला पाठवायचं. दोन्हीमध्ये धोके होते. जर आइकमनला उचलल्यावर त्याच्या कुटुंबाच्या विनंतीवरून पोलिसांनी शोधकार्य सुरु केलं, आणि त्याच्यात जर इझरेली एजंट्स सापडले, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर इझराईलची आणि मोसादची नाचक्की झाली असती. पण जर त्याला १९ मेला उचललं असतं, तर त्यावेळी अत्यंत कडक झालेल्या सुरक्षाव्यवस्थेतून त्याला बाहेर काढणंही तितकंच कठीण होतं.
शेवटी हॅरेलने पहिलीच योजना – आइकमनला १० मे या दिवशी उचलायची – नक्की केली. फक्त एक बदल केला. १० मे ऐवजी आता तारीख ठरली ११ मे आणि वेळ संध्याकाळी ७.४० वाजता.

आता आइकमनच्या अपहरणाची योजना अगदी तपशीलवार तयार झाली होती: आइकमन दररोज संध्याकाळी ७.४० वाजता येणाऱ्या बसने येतो आणि बसस्टॉपवर उतरतो. तिथून तो जवळजवळ ५०० मीटर्स एवढं अंतर गॅरिबाल्डी स्ट्रीटवरून चालत आपल्या घराकडे जातो. रस्त्यावर या वेळी अगदी अंधुक प्रकाश असतो. वाहतूक अगदी तुरळक असते. त्याचं अपहरण करण्यासाठी दोन गाड्या आणि आठ एजंट्स असणार होते. चार एजंट्सची एक टीम प्रत्यक्ष अपहरण करणार होती आणि दुसरी टीम टेहळणी आणि अपहरण करणाऱ्या टीमचं संरक्षण या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणार होती. अपहरण करणारी टीम एकदा तो त्यांच्या ताब्यात आला, की त्याला त्यांच्या गाडीत घालून तिथून ताबडतोब निघणार होती आणि दुसरी टीम लगेचच त्यांच्या मागून येणार होती. भूलतज्ञ डॉक्टर एलीयान दुसऱ्या गाडीत असणार होता.

“जर तुम्हाला पोलिसांनी हटकलं तर कुठल्याही परिस्थितीत आइकमनला सोडू नका,” हॅरेलने सर्वांना बजावून सांगितलं, “जर पोलिसांनी तुम्हाला अटक केली, तर खरं काय ते सांगा.”

१० मेच्या दिवशी येहुदिथ आणि मिदाद ‘ द बेस ‘ मध्ये राहायला गेले. दिवसाच्या शेवटी बाकी एजंट्सही त्यांच्या हॉटेल्समधून बाहेर पडून कॅसल आणि हाईट्समध्ये राहायला गेले.

११ मेच्या सकाळपासून सगळे एजंट्स कामात होते. मुख्य काम होतं सगळ्या ‘ पाऊलखुणा ‘ पुसून टाकायचं. दोन गाड्या सोडून बाकी सगळ्या भाड्याने घेतलेल्या गाड्या परत करण्यात आल्या. १२ जणांच्या टीमने आपलं नवीन वेषांतर केलं आणि जुनी कागदपत्रं नष्ट केली. आता प्रत्येकाकडे त्यांच्या नवीन वेषांतराला अनुरूप अशी कागदपत्रं होती.
हॅरेलनेही त्याच्या हॉटेलमधून चेक आऊट केलं आणि आपलं सामान ब्युनोस आयर्सच्या मुख्य रेल्वे स्टेशनच्या क्लोकरूममध्ये नेऊन ठेवलं. आजही तो एका कॅफेमधून दुसऱ्या कॅफेमध्ये जात होता. आज त्याचा दौरा ब्युनोस आयर्सच्या बिझिनेस आणि थिएटर्स यांच्या भागात होता. त्यामुळे इथले सगळे कॅफे एकमेकांपासून खूप जवळ होते.
दुपारचा १.०० – हॅरेल, रफी एतान आणि इतर काही एजंट्स शेवटच्या ब्रीफिंगसाठी भेटले. हा कॅफे शहरातल्या मोठ्या आणि प्रसिद्ध कॅफेपैकी एक होता. २ वाजता सगळे आपापल्या दिशेने गेले.

दुपारचे २.३० – शहराच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या गॅरेजमधून एजंट्सनी अपहरण करण्यासाठी जी गाडी वापरण्यात येणार होती, ती ताब्यात घेतली. त्याच वेळी दुसऱ्या एका गटाने दुसरी गाडी ताब्यात घेतली. अपहरण करणाऱ्या गटाने आणि या दुसऱ्या गटाने नंतर गाड्यांची अदलाबदल केली.

दुपारचे ३.३० – दोन्हीही गाड्या द बेस या बंगल्यापाशी पोचल्या.

दुपारचे ४.३० – शेवटचं ब्रीफिंग. दोन्ही गटांनी कपडे बदलले आणि आपली कागदपत्रं घेऊन निघण्याची तयारी केली.

संध्याकाळी ६.३० – दोन्ही गाड्या द बेस वरून निघाल्या. अपहरण करणाऱ्या गाडीमध्ये – झ्वी आहारोनी (ड्रायव्हर), रफी एतान, मोशे ताव्होर आणि झ्वी मॉल्किन. दुसऱ्या गाडीत अॅव्हरम शालोम, याकोव्ह गाट, डॉ. एलीयान आणि एफ्राईम इलानी (ड्रायव्हर). दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच ठिकाणाहून निघाल्या, पण नंतर त्यांचे मार्ग बदलले आणि त्या परत एकमेकींना क्लेमेंटच्या घराच्या जवळच असलेल्या एका चौकात भेटल्या. येताना दोन्हीही गाड्यांनी पोलिस आणि गस्ती किंवा नाकाबंदी असलेले भाग आपल्या नकाशावर नोंद करून ठेवलेले होते.

संध्याकाळी ७.३० – दोन्ही गाड्या गॅरिबाल्डी स्ट्रीटवर, आपल्या नियोजित ठिकाणी आणि नियोजित वेळी पोहोचल्या. रस्त्यावर अजिबात कुठल्याही प्रकारचा प्रकाश नव्हता. अपहरणासाठी वापरली जाणारी गाडी काळ्या रंगाची शेवरलेट सेडान होती. आहारोनीने ती फुटपाथच्या अगदी जवळ, क्लेमेंटच्या घराकडे तोंड करून उभी केली. मॉल्किन आणि ताव्होर बाहेर पडले. आहारोनी ड्रायव्हरच्या जागेवरच बसून राहिला. रफी एतान गाडीच्या आत दबा धरून बसला. ताव्होरने गाडीचं हूड उघडलं आणि आतमध्ये बघायला सुरुवात केली. मॉल्किन त्याच्या उजव्या हाताला उभा होता. दोघांचीही नजर आळीपाळीने रस्त्यावर आणि थोड्या अंतरावर असलेल्या बसस्टॉपवर फिरत होती.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला, काही अंतरावर दुसरी गाडी उभी होती. ही काळ्या रंगाची ब्यूक गाडी होती. ती क्लेमेंटच्या घराकडे पाठ करून उभी होती. डॉ.एलीयान मागच्या सीटवर आणि इलानी ड्रायव्हरच्या जागेवर होते. शालोम आणि गाट यांनी उतरून गाडीचं हूड उघडलं. इशारा मिळताच इलानी गाडीचे प्रखर दिवे चालू करून आइकमनला गोंधळवणार होता.

सापळा आणि शिकारी तयार होते. आता फक्त सावज यायचं बाकी होतं.

संध्याकाळचे ७.४० – २०३ क्रमांकाची बस स्टॉपपाशी आली, थांबली पण त्यातून कोणीही उतरलं नाही.

संध्याकाळचे ७.५० – अजून दोन बसेस येऊन गेल्या पण कोणीही उतरलं नाही. आता एजंट्सच्या मनात नाही नाही त्या शंका यायला लागल्या. काय झालं असावं? आइकमनला संशय आलाय की काय? आज तो वेळेच्या आधीच तर नाही आला? किंवा काही कामानिमित्त आपल्या ऑफिसमध्येच तर थांबला नसेल?

संध्याकाळचे ८.०० – हॅरेलने दुपारच्या ब्रीफिंगमध्ये जर आइकमन ८ वाजेपर्यंत आला नाही, तर तिथून निघून जायला सांगितलं होतं. पण रफी एतानने मिशन कमांडर म्हणून आपला अधिकार वापरत सगळ्यांना अजून अर्धा तास थांबायला सांगितलं.

संध्याकाळचे ८.०५ – अजून एक बस स्टॉपवर थांबली. बहुतेक शेवटची बस. पहिल्यांदा तर एजंट्सना कोणीच दिसलं नाही, पण दुसऱ्या टीममध्ये असलेल्या शालोमला एक आकृती चालताना दिसली. आइकमनच्या चालीचा त्याने अभ्यास केलेला होता. त्याने इलानीला इशारा केला आणि इलानीने गाडीचे प्रखर दिवे चालू केले.

समोरचा माणूस रिकार्डो क्लेमेंट उर्फ अॅडॉल्फ आइकमनच होता. तो आपल्या घराकडे चालत येत होता. अचानक डोळ्यांवर पडलेल्या प्रखर प्रकाशामुळे त्याने चेहरा बाजूला केला. दुसरी गाडी ओलांडून तो पुढे गेल्यावर त्याला अजून एक गाडी दिसली. तिचं हूड उघडलेलं होतं, आणि लोक आत बघून काही दुरुस्तीचा प्रयत्न करत होते. तो गाडीच्या जवळ येताच तिथे उभ्या असलेल्या माणसाने त्याला थांबवलं आणि तो म्हणाला – Momentito, senor! तो झ्वी मॉल्किन होता, आणि त्याला स्पॅनिश भाषेचे फक्त एवढेच शब्द येत होते.

क्लेमेंटने खिशातून टॉर्च काढण्यासाठी खिशात हात घातला. पुढच्या घटना डोळ्याचं पातं लवतं ना लवतं तोच घडल्या. मॉल्किनला क्लेमेंट खिशातून पिस्तुल किंवा काही शस्त्र काढेल अशी भीती वाटली, म्हणून त्याने क्लेमेंटवर झेप घेतली आणि त्याला जमिनीवर पाडलं. क्लेमेंट जोरात ओरडला. तो परत ओरडायच्या आत गाडीतून एक आणि बाहेर उभा असलेला एक असे दोघेजण त्याच्या दिशेने आले आणि त्यांनी त्याला उचलला, गाडीत टाकला, आणि पाठोपाठ गाडीत उडी मारून गाडीचे दरवाजे बंद करून गाडी चालू केली. क्लेमेंट गाडीच्या बाजूने गेला आणि त्याला उचलून गाडी निघाली यांच्या दरम्यान जेमतेम अर्ध्या मिनिटाचा वेळ गेला असेल.

ही गाडी गेलेली बघताच दुसरी गाडीही तिच्या पाठोपाठ निघाली.

इकडे पहिल्या गाडीत एतान आणि मॉल्किनने क्लेमेंटचे हात आणि पाय बांधले आणि त्याच्या तोंडात एक बोळा कोंबला. त्याच्या डोळ्यांवरचा चष्मा काढून टाकला आणि एकदम जाड भिंगांचा काळा चष्मा त्याच्या डोळ्यांवर चढवला. हे सगळं झाल्यावर एतान त्याच्या कानांत जर्मनमध्ये कुजबुजला – जरा आवाज किंवा हालचाल केलीस, तर मरशील! त्याक्षणी तो शांत झाला. दरम्यान एतानने त्याच्या पोटावर उजव्या बाजूला आणि डाव्या काखेच्या थोडं खाली असलेल्या शस्त्रक्रियेच्या व्रणांना तपासून पाहिलं होतं. आइकमनच्या फाईलमध्ये हे व्रण ज्या ठिकाणी आहेत असा उल्लेख होता, त्याच ठिकाणी ते सापडले होते. सगळ्यांनी एकमेकांशी हात मिळवले. अखेरीस आइकमन त्यांच्या ताब्यात आला होता.

आपल्या भावना आपल्या पूर्ण नियंत्रणात आहेत असं मॉल्किन आणि एतानला वाटत होतं, पण जेव्हा आहारोनीने त्यांना गप्प बसायला सांगितलं तेव्हा आपण ज्यू क्रांतिकारकांचं नाझीविरोधी गाणं गुणगुणतो आहोत हे त्यांच्या लक्षात आलं.

गाडी वेगाने द बेस च्या दिशेने चालली होती आणि अचानक ती थांबली. समोर रेल्वे फाटक होतं आणि एक लांबच्या लांब मालगाडी चालली होती. झ्वी मॉल्किनच्या मते हा या संपूर्ण अपहरण नाट्यातला सर्वात महत्वाचा क्षण होता. त्यांची गाडी इतर अनेक गाड्यांच्या मध्ये उभी होती. आइकमनने अशा वेळी हालचाल केली असती आणि ते जर कुणाच्या लक्षात आलं असतं तर सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडलं असतं पण सुदैवाने तसं काही घडलं नाही आणि मालगाडी निघून गेल्यावर बाकीच्या गाड्यांप्रमाणे ही गाडीही पुढे निघाली.

रात्रीचे ८.५५ – दोन्हीही गाड्या द बेस पाशी पोचल्या. एजंट्सनी आइकमनला भरभर चालवत आतमध्ये आणलं. तिथे आणल्यावर सर्वप्रथम त्यांनी त्याचे सगळे कपडे त्याच्या अंगावरून उतरवले आणि त्याने कुठे काही शस्त्र, बॉम्ब वगैरे लपवलेलं आहे का, याची तपासणी केली. नंतर त्यांनी त्याला तोंड उघडायला सांगितलं आणि त्याने आपल्या तोंडात किंवा दाढांमध्ये सायनाईड किंवा दुसऱ्या एखाद्या विषाची कुपी लपवलेली नाही याचीही तपासणी केली. त्याच्या डोळ्यांवर अजूनही तो काळा चष्मा होता.

अचानक त्याच्यावर जर्मन भाषेत एक आवाज कडाडला – तुझ्या बुटांची आणि डोक्याची साईझ? तुझी जन्मतारीख? आईचं नाव? वडिलांचं नाव?

यांत्रिकपणे त्याने या प्रश्नांची उत्तरं दिली. एजंट्स ही सगळी माहिती फाईलमधल्या माहितीबरोबर पडताळून पाहात होते.

तुझा नाझी पार्टी सदस्य क्रमांक? “४५३२६.” त्याने उत्तर दिलं.

आणि तुझा एस.एस.क्रमांक ६३७५०, बरोबर? इथे तो थोडा वेळ थांबला आणि मग म्हणाला:"नाही तो ६३७५२ असा आहे. "

ठीक आहे. आता नाव सांग तुझं. “रिकार्डो क्लेमेंट.” तो म्हणाला.

नाव? “ओट्टो हेनिन्गर” तो थरथरत म्हणाला.

खरं नाव? “Ich bin Adolf Eichmann.”

त्याच्या आजूबाजूला शांतता पसरली. त्यानेच त्या शांततेचा भंग केला, “माझं नाव अॅडॉल्फ आइकमन,” तो म्हणाला, “मी इझरेली लोकांच्या कैदेत आहे याची मला कल्पना आहे. मला थोडीफार हिब्रू भाषा येते. वॉर्सामध्ये एका राब्बायने मला ही भाषा शिकवली होती.”

तो हिब्रू प्रार्थना म्हणायला लागल्यावर सगळे एजंट्स निःस्तब्ध झाले.

इकडे इसेर हॅरेलचा एका कॅफेमधून दुसऱ्या कॅफेत असा दौरा चालू होता. रात्री जवळजवळ साडेनऊ वाजता तो दिवसातल्या शेवटच्या कॅफेत जाऊन खुर्चीत बसला आणि त्याला झ्वी आहारोनी आणि रफी एतान येताना दिसले.
“तो आता आपल्या ताब्यात आहे,” आहारोनी म्हणाला, “आपण त्याची ओळख पटवली आहे, आणि त्याने स्वतःसुद्धा आपण अॅडॉल्फ आइकमन आहोत हे मान्य केलेलं आहे.” हॅरेलने त्यांचं अभिनंदन केलं आणि ते निघून गेले.
हवेत थंडी होती, पण हॅरेलचा मूड इतका छान होता, की तिथून रेल्वे स्टेशनपर्यंत तो चालत गेला, तिथून त्याने आपलं सामान काढलं आणि एका नव्या हॉटेलमध्ये नव्या नावाने चेक इन केलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी पंतप्रधान बेन गुरियनपर्यंत पोचवण्यात आली.

No comments:

Post a Comment