माद्रिद, स्पेन. १९६३ च्या ऑगस्ट महिन्यात एका कंपनीच्या ऑफिसमध्ये तिच्या मालकाला भेटायला दोघेजण आले होते. हा मालक ऑस्ट्रियन होता. त्यांनी स्वतःची ओळख नाटो (North Atlantic Treaty Organization) देशांच्या गुप्तचर संस्थांचे अधिकारी अशी करून दिली. ते त्याच्या माजी पत्नीच्या शिफारशीवरून त्याला भेटायला आले होते. त्यांच्याकडे त्याच्यासाठी एक ऑफर होती. अशी ऑफर, जी तो नाकारू शकतच नव्हता....
थोड्याच वेळात या पाहुण्यांना आपल्याविषयी बरंच काही माहित आहे, हे त्याला समजून चुकलं. त्याचं नाव तसं प्रसिद्ध होतंच. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीमध्ये आणि जर्मनीच्या शत्रूंमध्येसुद्धा त्याचा दबदबा होता. तो सैन्यात जाण्याआधी एक नावाजलेला अॅथलीट होता आणि एस.एस.च्या कमांडो सर्व्हिसमधल्या अत्यंत धाडसी कमांडोजपैकी एक म्हणून त्याचा नावलौकिक होता. या लौकिकाला साजेशी अफलातून कामगिरी त्याने करून दाखवली होती.
१९४३ मध्ये इटलीमध्ये दुसरं महायुद्ध, हिटलर आणि नाझी जर्मनी यांच्याविरुद्ध प्रचंड असंतोष उफाळला होता. त्याचं एक कारण इटालियन सैन्याची युद्धातली अत्यंत खराब कामगिरी हे होतंच, पण लोक २१ वर्षांच्या फॅसिस्ट राजवटीला आणि दडपशाहीला कंटाळले होते, हेही तितकंच खरं होतं. इटलीचे राजे व्हिक्टर इमॅन्युअल यांनी या सगळ्या असंतोषाचं लक्ष्य असलेल्या हुकूमशहा बेनितो मुसोलिनीकडून राजीनामा मागितला होता. मुसोलिनीने फॅसिस्ट पक्षाच्या ग्रँड कौन्सिलमध्ये स्वतःची बाजू मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण बाकीचे कोणीही त्याचं ऐकायला तयार नव्हते. त्याचा राजीनामा तिथल्या तिथे घेण्यात आला, आणि त्याला अटक करण्यात आली.
इटलीच्या उत्तर भागात त्यावेळी जर्मन सैन्य होतं आणि या सैन्याची तिथल्या जनतेमध्ये दहशत होती. त्यामुळे मुसोलिनीला इटलीच्या नवीन सरकारने एका वेगळ्याच ठिकाणी कैदेत ठेवलं - इटलीमधल्या अॅपेनाईन पर्वतराजीमधलं सर्वात उंच शिखर असलेल्या ग्रॅन सॅसो या पर्वतावर असलेल्या काम्पो इंपरेटर हॉटेलमध्ये. मुसोलिनीला सोडवण्याचा प्रयत्न जर्मन सैन्य करणार, हे उघड होतं, पण इथपर्यंत पोचणं आणि कडेकोट पहाऱ्यातून मुसोलिनीला बाहेर काढणं अवघड नव्हे, तर अशक्य कोटीतली गोष्ट होती. पण १२ सप्टेंबर १९४३ या दिवशी ग्लायडर्सच्या सहाय्याने या पर्वतशिखरावर आपल्या काही मोजक्या सहकाऱ्यांबरोबर उतरून या जर्मन कमांडोने मुसोलिनीची सुटका केली आणि तो त्याला हिटलरकडे घेऊन आला. या अचाट आणि अतर्क्य धाडसाच्या बातम्या जर्मनीतच नव्हे, तर जगभर सर्वत्र पसरल्या. आणि त्याचं नावही. एस.एस.कॅप्टन ओट्टो स्कोर्झेनी.
पुढे जून १९४४ मध्ये ब्रिटीश आणि अमेरिकन सैन्याने इंग्लिश खाडी ओलांडून नॉर्मंडी इथे जर्मनीविरुद्ध पश्चिम आघाडी उघडली. फ्रान्सच्या स्वातंत्र्याबरोबरच बेल्जियम आणि हॉलंड हे देश मुक्त करणं आणि तिथून जर्मनीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणं आणि जर्मनीचा औद्योगिक दृष्ट्या महत्वाचा –हुर हा भाग ताब्यात घेणं ही या सैन्यदलांची महत्वाच उद्दिष्टं होती. त्यासाठी त्यांनी डिसेंबर १९४४ मध्ये आर्देन्स या घनदाट अरण्यांनी भरलेल्या फ्रान्स-बेल्जियम सीमारेषेवरच्या प्रदेशातून बेल्जियममध्ये शिरायचा प्रयत्न केला. तेव्हा स्कोर्झेनी आणि त्याच्या ४० जणांच्या वाफेन एस.एस. पथकाने अमेरिकन सैनिकांसारखे गणवेश घालून अमेरिकन सैन्यावर हल्ला चढवला आणि गोंधळ माजवला. त्यामुळे ‘युरोपमधला सर्वात धोकादायक माणूस’ हा किताबही त्याला मिळाला होता आणि तोही त्याच्या शत्रूंकडून.
युद्धानंतर डाखाऊ छळछावणीमधल्या अधिकाऱ्यांवर भरलेल्या खटल्यामध्ये स्कोर्झेनीचाही समावेश होता, पण तो त्यातून निर्दोष सुटला. त्यानंतर तो स्पेनमध्ये स्थायिक झाला.
१९६३ मध्ये त्याला भेटायला आलेल्या या दोघाजणांना हा इतिहास पूर्णपणे माहित होता. त्यांनी फार वेळ न घालवता मुद्द्याच्या गोष्टी बोलायला सुरुवात केली.
“आम्ही नाटोकडून आलेलो नाही,” त्यांच्यातला एकजण म्हणाला, “इझराईलमधून आलोय.”
स्कोर्झेनीने त्यांच्याकडे रोखून पाहिलं. “मी रफी एतान,” तो माणूस म्हणाला, “आणि हा अॅव्हनर अहितुव, मोसाद स्टेशन चीफ, पश्चिम जर्मनी.”
स्कोर्झेनी बुचकळ्यात पडला. मोसादचं त्याच्यासारख्या पूर्वाश्रमीच्या नाझी सैनिकाकडे काय काम असू शकतं?
“काळजी करू नकोस. आमच्याकडून तुला सध्यातरी काहीही धोका नाहीये,” एतान म्हणाला, “आम्हाला तुझी मदत हवी आहे. तुझ्या इजिप्तमध्ये बऱ्याच ओळखी आहेत असं ऐकलंय आम्ही.”
२१ जुलै १९६२ या दिवशी, म्हणजे योसेल शूशमाकर इझराईलमध्ये आल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दुल नासरने दोन क्षेपणास्त्रांचं अनावरण करून संपूर्ण जगाला धक्का दिला. यातल्या एका क्षेपणास्त्राचा पल्ला होता १७५ मैल तर दुसऱ्याचा ३५० मैल. पहिल्याचं नाव होतं अल झाफिर आणि दुसऱ्याचं अल काहिर. २३ जुलै हा इजिप्तमध्ये झालेल्या राज्यक्रांतीचा वर्धापनदिन. त्या दिवशी कैरोच्या रस्त्यांवरून या दोन्ही क्षेपणास्त्रांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कैरोमधल्या प्रसिद्ध तेहरीर चौकात भाषण करताना नासरने ही दोन्ही क्षेपणास्त्रं बैरूतच्या दक्षिणेला असलेलं कुठलंही लक्ष्य भेदू शकतात, हे जाहीर केलं आणि इझरेली नेत्यांचं धाबं दणाणलं. नासरच्या दाव्यामुळे नव्हे, तर या क्षेपणास्त्रांविषयी काहीही माहित नसल्यामुळे.
लोकांनी आणि राजकीय नेत्यांनी ताबडतोब मोसाद आणि खासकरून इसेर हॅरेलवर आगपाखड करायला सुरुवात केली. जेव्हा नासर आपली क्षेपणास्त्रं बनवत होता, तेव्हा हॅरेल काय करत होता? तर एका लहान मुलाला शोधण्यात गर्क होता. नासरने जरी स्पष्ट शब्दांत उल्लेख केला नसला, तरी बैरुतच्या दक्षिणेला याचा अर्थ उघड होता. जेव्हा नासर इझराईलच्या अस्तित्वालाच आव्हान देत होता, तेव्हा हॅरेलचे लोक त्याचा पाठपुरावा करण्याऐवजी एका येशिवामधून दुसऱ्या येशिवामध्ये योसेलच्या शोधात आपला वेळ आणि शक्ती वाया घालवत होते.
जेव्हा या टीकेचा सूर टिपेला पोचला, तेव्हा पंतप्रधान बेन गुरियननी हॅरेलला भेटायला बोलावलं आणि त्याने एका आठवड्याच्या आत याचा छडा लावायचं कबूल केलं आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे ऑगस्टमध्ये पंतप्रधानांसमोर त्याला मिळालेली माहिती ठेवली – इजिप्तमधली क्षेपणास्त्रं बनवण्यात जर्मन शास्त्रज्ञांचा सहभाग होता.
१९६० मध्ये नासरने इजिप्तचं शस्त्रागार नव्या, अपारंपरिक शस्त्रांनी सुसज्ज करायचा निर्णय घेतला. त्यात प्रामुख्याने जेट विमानं, रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रांचा समावेश असणार होता. त्याचबरोबर नासरला गुप्तपणे किरणोत्सारी आणि रासायनिक अस्त्रांचाही पर्याय वापरून पहायचा होता. या प्रकल्पाचा प्रमुख म्हणून त्याने जनरल महमूद खलील या माजी वायुदल प्रमुखाची नेमणूक केली. जेव्हा खलीलने पैशांबद्दल विचारलं, तेव्हा नासरचं उत्तर होतं – त्याची काळजी तू करू नकोस.
खलीलपुढे आता या प्रकल्पासाठी काम करायला तयार असणाऱ्यांना शोधायचं आव्हान होतं आणि त्याला हे लोक कुठे मिळतील ते माहित होतं. त्याच्या हस्तकांनी संपूर्ण युरोपात फिरून जर्मन शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांना इजिप्तमध्ये यायची आणि काम करायची ऑफर द्यायला सुरुवात केली. यातल्या बहुसंख्य लोकांनी महायुद्धापूर्वी आणि युद्धादरम्यान जर्मनीमध्ये असलेल्या अणुविज्ञान, अवकाशविज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक संशोधन केंद्रांमध्ये आणि प्रयोगशाळांमध्ये काम केलं होतं. बरेच जण नाझी पक्षाचे किंवा एस.एस. चे सदस्यही होते आणि ज्यू द्वेष्टेदेखील. त्यामुळे इजिप्तमध्ये येऊन काम करायला ते लगेचच तयार झाले. पैसा हा मुद्दा अडचणीचा नसल्यामुळे या लोकांना गलेलठ्ठ पगार आणि इतर सुखसुविधा पुरवण्यात येणार होत्या. त्याची भुरळ पडून अनेक शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ जर्मनीमधून इजिप्तमध्ये दाखल झाले आणि त्यांनी इजिप्तमध्ये गुप्तपणे ३ कारखाने उभारले. नासरच्या मंत्र्यांनाही याची कल्पना देण्यात आली नव्हती.
या ३ कारखान्यांपैकी पहिल्याचं नाव होतं फॅक्टरी ३६. विमानांच्या उभारणीसाठी जगद्विख्यात असलेला विली मेसरश्मिट इथे इजिप्तसाठी एक लढाऊ जेट विमान विकसित करत होता. त्याची रचना असलेली आणि त्याच्या नावाने ओळखली जाणारी मेसरश्मिट विमानं ही जर्मन वायुदल लुफ्तवाफची सर्वात धोकादायक विमानं होती.
दुसरा कारखाना १३५ या क्रमांकानेच ओळखला जात असे. तिथे फर्डिनांड ब्रॅडनर नावाचा तंत्रज्ञ मेसरश्मिटच्या विमानांसाठी जेट इंजिन्स बनवत होता. ब्रॅडनरने अनेक वर्षे रशियामध्ये काम केलं होतं, आणि तो जर्मनीत परत आल्यावर खलीलच्या हस्तकांशी त्याची भेट झाली होती आणि त्यांनी त्याला कैरोला येऊन खलीलला भेटण्याची विनंती केली होती. या दोघांच्या भेटीसाठी मध्यस्थी करणारा माणूस होता डॉ.एकार्ट, जो त्यावेळी डेम्लर-बेंझचा एक संचालक होता.
पण सर्वात गुप्त कारखाना होता फॅक्टरी ३३३. इजिप्तच्या वाळवंटात कुठेतरी दडवलेल्या या कारखान्यात एकेकाळी नाझी जर्मनीसाठी काम करणारे तंत्रज्ञ आता इजिप्तसाठी मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रं बनवत होते.
हॅरेलच्या माहितीनुसार इजिप्तमध्ये या प्रकल्पांवर डिसेंबर १९६० पासून युद्धपातळीवर काम सुरु झालं होतं आणि त्याचं कारण होतं इझराईल अण्वस्त्रसज्ज होत असल्याची बातमी. त्याच महिन्यात एका अमेरिकन यू-२ विमानाने
इझराईलमधील दिमोना इथे असलेल्या एका मोठ्या इमारतीचा गुपचूप फोटो काढला होता. या इमारतीची रचना पाहूनच ती अणुभट्टी आहे हे समजलं असतं. अमेरिका आणि इतर अण्वस्त्रधारी देशांमध्ये असलेल्या अणुभट्ट्या आणि या इमारतीमध्ये आश्चर्यकारक साम्य होतं.
जेव्हा ही बातमी जाहीर झाली, तेव्हा अरब राष्ट्रांनी अर्थातच आपला निषेध नोंदवला. अमेरिका आणि सोविएत रशिया यांनीही चिंता व्यक्त केली. पण इझराईलकडून काहीही प्रतिक्रिया आली नाही आणि हा प्रकल्प बंद करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता.
नासरने याचमुळे ही क्षेपणास्त्रं विकसित करून इझराईलला चोख प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं होतं.
इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञांचा प्रमुख होता प्रोफेसर युजीन सँगर. युद्धानंतर त्याने फ्रान्समध्ये व्हेरोनिक नावाच्या एका रॉकेट प्रकल्पावर काम केलं होतं. ही रॉकेट्स जर्मनीने महायुद्धाच्या अगदी शेवटी वापरलेल्या व्ही-१ आणि व्ही-२ या रॉकेट्सवर आधारित होती. तो इजिप्तला येताना आपल्या दोन सहाय्यकांना घेऊन आला होता – पॉल गोर्के आणि वुल्फगांग पिल्झ. गोर्के इलेक्ट्रॉनिक्स आणि क्षेपणास्त्रांमध्ये वापरण्यात येणारी दिशादर्शक प्रणाली (guiding system) या विषयांचा तज्ञ होता. पिल्झने तर विख्यात जर्मन शास्त्रज्ञ वेर्नर फॉन ब्राऊन याच्या हाताखाली व्ही-२ रॉकेटवर काम केलं होतं. इजिप्तमध्ये हान्स क्लाईनवाख्टर हा अजून एक शास्त्रज्ञ त्यांच्याबरोबर काम करत होता. त्याची स्वतःची सुसज्ज प्रयोगशाळा जर्मनीमध्ये लोराच या ठिकाणी स्वित्झर्लंडच्या सीमेजवळ होती. तिथे क्षेपणास्त्रांसाठी अत्याधुनिक दिशादर्शक प्रणाली बनवण्यावर संशोधन चालू होतं. रासायनिक विभागाचा प्रमुख होता डॉ. एर्मीन दादिऊ. तो युद्ध चालू असताना एस.एस. मध्ये होता.
या शास्त्रज्ञांनी इजिप्तच्या गुप्तचर संघटनांच्या मदतीने चार शेल कंपन्या स्थापन केल्या होत्या – इंट्रा, इंट्राहँडेल, पतवाग आणि लिंडा. या कंपन्या क्षेपणास्त्रांसाठी लागणारी सामग्री वेगवेगळ्या स्वरुपात खरेदी करत होत्या. इंट्राहँडेलचा प्रमुख होता डॉ. हाईन्झ क्रुग. या सर्व कंपन्यांमध्ये एक गोष्ट समान होती. प्रत्येकीच्या संचालकांमध्ये हसन कामिल हे नाव होतं. हा माणूस स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झालेला इजिप्शियन उद्योगपती होता. त्याचा अजून दोन शेल कंपन्यांमध्ये सहभाग होता – मेको आणि एमटीपी. या दोन कंपन्या सामग्री आणि मनुष्यबळाचा पुरवठा करत होत्या. कामिलव्यतिरिक्त ब्रॅडनर आणि मेसरश्मिट हे दोघे या कंपन्यांचे संचालक होते.
प्रत्यक्ष क्षेपणास्त्रांच्या उभारणीवर काम सुरु झालं होतं १९६१ मध्ये. पण त्या वर्षाच्या शेवटी पश्चिम जर्मन सरकारला युजीन सँगर आणि त्याच्या इजिप्तशी असलेल्या संबंधांबद्दल समजलं होतं आणि त्यांनी त्याला त्याचा पासपोर्ट रद्द करायची धमकी देऊन जर्मनीमध्ये परत बोलावून घेतलं होतं. आता वुल्फगांग पिल्झ हा या संपूर्ण प्रकल्पाचा प्रमुख होता.
जुलै १९६२ पर्यंत या प्रकल्पामधून ३० क्षेपणास्त्रं तयार झाली होती आणि त्यातली दोन कैरोमध्ये २३ जुलैच्या दिवशी दाखवण्यात आली होती.
ऑगस्टमध्ये जेव्हा हॅरेल पंतप्रधान बेन गुरियनना भेटला, तेव्हा त्याने आपल्याबरोबर एक पत्र आणलं होतं. हे पत्र पिल्झने कामिल अझ्झाब या इजिप्शियन सरकारच्या प्रतिनिधीला पाठवलेलं होतं आणि त्यात ९०० क्षेपणास्त्रांसाठी सुमारे सदतीस लाख स्विस फ्रँक्स एवढ्या प्रचंड रकमेची मागणी करण्यात आली होती. रफी एतानच्या लोकांनी हे पत्र मध्येच हस्तगत करून त्याची नक्कल केली होती.
९०० क्षेपणास्त्रांमध्ये इजिप्त डायनामाईट किंवा तत्सम पारंपारिक स्फोटक पदार्थ ठेवणार नाही यावर इझराईलच्या संरक्षण वर्तुळातल्या सर्वांचं एकमत होतं. नक्कीच त्यात रासायनिक अस्त्रं, जीवशास्त्रीय अस्त्रं, अणुबॉम्ब किंवा मग किरणोत्सर्गी कचरा अशा घातक गोष्टी असणार होत्या. जी गुप्तता पाळण्यात येत होती, त्यावरून तर हे उघड होतं.
त्यावेळी इझराईलच्या सैन्यदलांबरोबर काम करणारे तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञही नवोदित होते. या माहितीत खरी माहिती किती आणि अतिरंजित किती, याचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे मोसादनेही इजिप्त ९०० क्षेपणास्त्रं विकसित करतोय आणि त्यावरून इझराईलला कायमचं उध्वस्त आणि नष्ट करू शकेल अशा पदार्थांचा मारा होऊ शकतो, हे गृहीत धरून काम करायला सुरुवात केली.
लवकरच त्यांना या प्रकल्पातला एक कच्चा दुवा लक्षात आला. जर्मन शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ अजूनही दिशादर्शक प्रणालीवर अडकले होते. त्यांना पूर्णपणे निर्दोष आणि वातावरणातल्या बदलांशी जुळवून घेणारी आणि रडारला चकवू शकणारी अशी प्रणाली अजूनही विकसित करता आली नव्हती, आणि जोपर्यंत हे होणार नव्हतं, तोपर्यंत क्षेपणास्त्रं नुसती बनवून काहीही फायदा नव्हता, कारण ती त्यांच्या इच्छित ल्क्ष्यांपर्यंत पोहोचूच शकली नसती.
हे लक्षात आल्यावर हॅरेलने इजिप्तचा हा प्रकल्प उध्वस्त करायचं ठरवलं. पण इजिप्शियन गुप्तचर संस्थांनी प्रकल्पाचे वेगवेगळे भाग अशा प्रकारे विखरून ठेवले होते, की एकाच वेळी संपूर्ण प्रकल्प नष्ट करणं अशक्य होतं. आता हा प्रकल्प थांबवण्याचा एकच मार्ग होता. त्याच्यावर काम करणारे लोक जर सोडून गेले तर तो पुढे नेणं इजिप्शियनांसाठी अशक्य होतं.
आइकमनच्या अपहरणाच्या वेळी डॉ.फ्रित्झ बॉवरने सांगितलेली एक गोष्ट हॅरेलच्या मनात अजूनही होती. पश्चिम जर्मनीमध्ये एकेकाळी नाझी पक्ष आणि एस.एस. यांचे सभासद असलेल्या लोकांनी सरकारमध्ये शिरकाव केलेला असल्यामुळे डॉ.बॉवरने आइकमनबद्दल त्याला समजलेली माहिती इझराईलला पुरवली होती, कारण जर्मन सरकारने आइकमनच्या प्रत्यार्पणासाठी अर्जेन्टिनाकडे पाठपुरावा करणं हे खूप कठीण होतं. सरकारमध्ये असलेल्या नाझी पक्षाच्या हस्तकांनी ते कधीच यशस्वी होऊ दिलं नसतं.
नेमक्या याच मुद्द्यावर हॅरेलच्या मनात जर्मनीविषयी अढी निर्माण झाली होती. त्याचा हळूहळू या गोष्टीवर विशास बसायला लागला होता, की ज्या अर्थी जर्मन सरकार इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांना कुठल्याही प्रकारे अडवत नाहीये, याचा एकच अर्थ होऊ शकतो. जर्मन सरकारचीही इझराईलचा नाश व्हावा अशीच इच्छा आहे. त्याने पंतप्रधान बेन गुरियनना जर्मन राष्ट्राध्यक्ष कॉनराड अॅडेनॉवर यांच्याशी बोलून या मुद्द्यावर काहीतरी ठाम निर्णय घेण्याची विनंती केली. बेन गुरियननी नकार दिला. साधारणपणे त्याच वेळी जर्मनीकडून इझराईलला नेगेव्ह वाळवंटाच्या विकासासाठी ५०० कोटी अमेरिकन डॉलर्स एवढं प्रचंड कर्ज मिळालं होतं. त्याचबरोबर इझराईलला जर्मनीकडून विमानं, रणगाडे, तोफा, हेलिकॉप्टर्स अशी प्रचंड लष्करी मदतसुद्धा मिळत होती. इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञांचा मुद्दा उकरून काढून जर्मनीशी वाकडं घेण्याची बेन गुरियनची तयारी नव्हती. तरी हॅरेलला शांत करण्यासाठी त्यांनी त्यावेळी संरक्षण उपमंत्री असलेल्या शिमॉन पेरेस यांना जर्मन संरक्षणमंत्री फ्रान्झ जोसेफ स्ट्राउस यांच्याशी बोलणी करायला सांगितलं.
पण एवढ्यावर हॅरेलचं समाधान होण्यासारखं नव्हतं. ज्यूद्वेष्टे जर्मन शास्त्रज्ञ जर्मन सरकारच्या छुप्या पाठींब्याने इजिप्तशी हातमिळवणी करून इझराईलला नष्ट करण्याचा प्रयत्न करताहेत यावर आता त्याचा पूर्ण विश्वास बसला होता, जरी असं दाखवून देणारा कुठलाही पुरावा नव्हता, तरीही. त्याने स्वतःहून कारवाई करायचा निर्णय घेतला.
११ सप्टेंबर १९६२ या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास जर्मनीतल्या म्युनिक शहरातल्या शिलरस्ट्रास या रस्त्यावर असलेल्या इंट्रा नावाच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये एक अरब चेहरेपट्टी असलेला माणूस आला. त्याला कंपनीच्या संचालकांपैकी असलेल्या डॉ.हाईन्झ क्रुग यांना भेटायचं होतं. कंपनीमधला जो सहाय्यक या माणसाला डॉ. क्रुगकडे घेऊन गेला, त्याने क्रुगच्या ऑफिसचा दरवाजा बंद होता होता या माणसाचं जे बोलणं ऐकलं, त्यावरून त्याला जनरल खलीलचा सहाय्यक अधिकारी असलेल्या कर्नल नादिमने पाठवलं होतं. थोड्या वेळाने क्रुग आणि हा माणूस बाहेर पडले. नंतर क्रुग गायब झाला.
पोलिसांनी तपास केल्यावर त्यांना डॉ.क्रुग आणि तो माणूस यांना इजिप्तच्या सरकारी विमानसेवेच्या म्युनिक ऑफिसमध्ये जाताना पाहिलेली एक स्त्री भेटली. तिनेच त्यांना शेवटचं पाहिलं होतं हे लवकरच पोलिसांना समजलं.
दोन दिवसांनी क्रुगची पांढरी मर्सिडिस पोलिसांना सापडली. गाडीवर बराच चिखल आणि माती यांचे थर होते आणि तिच्या पेट्रोलच्या टाकीत पेट्रोलचा एक थेंबही नव्हता. त्याच दिवशी दुपारी म्युनिकमधल्या मध्यवर्ती पोलिस स्टेशनच्या बाहेरून पोलिसांना डॉ.क्रुग मरण पावलाय हे सांगणारा फोन आला. त्याचा मृतदेह किंवा इतर कुठलाही पुरावा मिळाला नाही.
२७ नोव्हेंबर १९६२ या दिवशी फॅक्टरी ३३३ मधल्या ऑफिसमध्ये वुल्फगांग पिल्झची सेक्रेटरी हॅनेलोर वेंडी त्याचा पत्रव्यवहार बघत असताना पिल्झसाठी आलेलं एक पार्सल तिला मिळालं. त्यावर पाठवणारा म्हणून हँबुर्ग शहरातल्या एका प्रसिद्ध वकिलाचं नाव होतं. तिने ते पार्सल उघडल्यावर आतमधल्या बॉम्बचा कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. वेंडीचा चेहरा आणि हातपाय भाजले आणि ती आंधळी आणि बहिरी झाली.
दुसऱ्याच दिवशी BOOKS असं लिहिलेलं अजून एक पार्सल तिथे आलं. त्यावर जर्मनीमधल्या स्टुटगार्ट शहरातल्या एका नामांकित प्रकाशकाचं नाव आणि पत्ता होता. तिथल्या एका सहाय्यकाने ते उघडल्यावर आतमधल्या बॉम्बचा स्फोट होऊन पाच लोक ठार झाले.
फॅक्टरी ३३३ आणि इतर कारखान्यांमध्ये पार्सल्स येणं ही सामान्य गोष्ट होती. त्यामुळे दोन प्रसंग होऊनही तिथे काम करणारे लोक सावध झाले नाहीत. ही पार्सल्स वेगवेगळ्या ठिकाणांहून पाठवण्यात येत होती – जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड. काही तर इजिप्तमधूनही पाठवण्यात आली होती. सगळीच पार्सल्सचा स्फोट झाला नाही. काही वाटेतच फुटली, काही स्फोटाआधीच सुरक्षा यंत्रणेच्या हातात पडली. जरी ही पार्सल्स कोण पाठवतंय ते कधीच उघड झालं नाही, तरी याच्यामागे मोसादचा हात आहे असा संशय इजिप्शियन गुप्तचर संघटनांना आणि पाश्चात्य पत्रकारांना आला होताच.
बऱ्याच वर्षांनी जेव्हा इजिप्शियन गुप्तचर संघटनांनी यातल्या काही स्फोटांमागे असलेल्या एका माणसाला कैरोमध्ये अटक केली. त्याचं नाव होतं वुल्फगांग लुट्झ. त्याचा रेसच्या घोड्यांची पैदास करण्याचा व्यवसाय होता आणि कैरोच्या जवळ त्याचा स्टडफार्म होता. महायुद्धादरम्यान तो एस.एस. मध्ये होता, आणि ज्यू या शब्दाचाही त्याला तिरस्कार वाटत असे. कैरोमधल्या उच्चभ्रू वर्तुळात त्याचा अत्यंत सहज वावर होता. त्याला पकडल्यावर इजिप्तला हे समजलं की तो झीव्ह गुर अॅरी नावाचा मोसाद एजंट होता.
पण हे सगळं नंतर घडलं. इकडे या स्फोटांमुळे जर्मन शास्त्रज्ञ हादरले होते. त्यांना आपल्या जीवाची भीती वाटायला लागली होती. अनेक जणांना त्यांच्या घरी निनावी धमकीचे फोन यायला सुरुवात झाली होती. धमकी अत्यंत निःसंदिग्ध भाषेत होती. नासरच्या प्रकल्पावर काम केलंत तर तुमची आणि तुमच्या कुटुंबाची खैर नाही. तिन्ही कारखान्यांची सुरक्षा वाढवण्यात आली. हे शास्त्रज्ञ जेव्हा कधी युरोपमध्ये जात, तेव्हा ते एकत्र आणि सुरक्षारक्षकांच्या सोबत जायला लागले.
मोसादच्या दृष्टीने ही परिस्थिती अजून चिंताजनक होती. या शास्त्रज्ञांचा एखादा कच्चा दुवा शोधून काढण्यासाठी मोसादने त्यांच्या पत्रव्यवहारावर नजर ठेवायला आणि ते ज्या हॉटेल्समध्ये उतरतील, तिथल्या खोल्यांमध्ये गुप्त मायक्रोफोन्स ठेवायला सुरुवात केली.
हे मायक्रोफोन्स मोसादच्या हातात कसे आले, तो एक किस्साच आहे. रफी एतानने अमेरिकेला भेट दिलेली असताना सी.आय.ए.ला हे मायक्रोफोन्स वापरताना पाहिलं होतं. पण इझराईलच्या हातात ते पडणं कठीण होतं. एकदा वर्तमानपत्र वाचत असताना एतानला एक बातमी दिसली. ती मियामीच्या गुन्हेगार जगाचा बादशहा मेयर लान्स्कीबद्दल होती. लान्स्की ज्यू आहे, हे एतानला समजल्यावर त्याने मोसादच्या अमेरिकेतल्या प्रतिनिधीला लान्स्कीशी संपर्क करून द्यायला सांगितलं. जेव्हा लान्स्की स्वतः फोनवर आला, तेव्हा एतानने त्याला तो ज्यू असल्याची आठवण करून दिली आणि इझराईलप्रती त्याच्या असलेल्या कर्तव्याबद्दल त्याला फोनवर एक भलं मोठं प्रवचन दिलं आणि शेवटी या मायक्रोफोन्सची मागणी केली. लान्स्कीनेही त्याचे काँटॅक्ट्स वापरून एतानपर्यंत हे मायक्रोफोन्स पोचवले.
इझराईलमधल्या तंत्रज्ञांनी ताबडतोब त्या मायक्रोफोन्सच्या तंत्रज्ञानावर आधारित मायक्रोफोन्स बनवले, जे मोसादने वापरायला सुरुवात केली.
या टेहळणीतून मोसादच्या हाताला एक नाव लागलं - डॉ.ओट्टो योक्लिक. त्याच्याबद्दल जी माहिती मिळालेली होती, त्यानुसार योक्लिक ऑस्ट्रियन होता, किरणोत्सर्गी पदार्थ या विषयातला तज्ञ होता आणि इजिप्तचा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याची नेमणूक झालेली होती. इजिप्शियन गुप्तचरांनी त्याच्यासाठी ऑस्ट्रा नावाची एक कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी संशोधनाच्या नावाखाली किरणोत्सर्गी पदार्थ विकत घेत होती आणि इजिप्तच्या राजनैतिक कागदपत्रांसोबत हे पदार्थ इजिप्तमध्ये पाठवण्यात येत होते. योक्लिकवर इजिप्तसाठी दोन अण्वस्त्रचाचण्या करण्याची आणि क्षेपणास्त्रांवर बसवता येतील असे छोटे अणुबॉम्ब बनवण्याची जबाबदारी होती.
याचा अर्थ इझराईलसाठी योक्लिक हा अत्यंत धोकादायक माणूस होता. कदाचित सर्व जर्मन शास्त्रज्ञांमध्ये सर्वात धोकादायक. त्यामुळे त्याला ताबडतोब शोधून काढण्याचे आदेश हॅरेलने दिले.
पण सत्य हे कादंबरीपेक्षाही अकल्पनीय असतं असं म्हणतात, ते काही खोटं नाही. २३ ऑक्टोबर १९६२ या दिवशी इझराईलच्या ब्रुसेल्स, बेल्जियम इथल्या दूतावासात एक माणूस आला. त्याच्याकडे इझराईलसाठी अत्यंत महत्वाची माहिती होती – इजिप्शियन क्षेपणास्त्र प्रकल्पाचा पूर्ण लेखाजोखा. जेव्हा तिथल्या अधिकाऱ्याने त्याला त्याचं नाव विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं – ओट्टो योक्लिक.
या घटनेनंतर दोन आठवड्यांनी वेषांतर करून, अत्यंत गुप्तपणे योक्लिक इझराईलमध्ये आला. इतिहासकार आणि पत्रकारांचा असा अंदाज आहे, की योक्लिक आणि डॉ.क्रुग हे एकत्र काम करत होते. डॉ.क्रुगनेच योक्लिकला या प्रकल्पात आणलं होतं. जेव्हा डॉ.क्रुग गायब झाला, तेव्हा आपले दिवस भरल्याची योक्लिकला जाणीव झाली. मोसाद एजंट्सपुढे कुठलाही युक्तिवाद चालणार नाही हे त्याला समजून चुकलं, त्यामुळे त्यांच्या हातून पळवलं किंवा मारलं जाण्यापेक्षा आपणच इझराईलला जाऊन भेटावं असा विचार त्याने केला असण्याची शक्यता आहे.
योक्लिकने मोसादला जी माहिती दिली, त्यानुसार तो दोन प्रकल्पांवर काम करत होता – ऑपरेशन आयबीस आणि ऑपरेशन क्लिओपात्रा. आयबीस हा प्रकल्प स्फोटानंतर किरणोत्सर्ग पसरवणारं एक अस्त्र विकसित करण्यासाठी होता, तर क्लिओपात्रा प्रकल्पात दोन अणुबॉम्ब बनवायचे होते. पहिल्या प्रकल्पासाठी योक्लिक त्याच्या ऑस्ट्रा नावाच्या कंपनीद्वारे कोबाल्ट ६० हे किरणोत्सर्गी समस्थानिक (radioactive isotope) खरेदी करत होता, दुसऱ्या प्रकल्पासाठी तो एक वेगळीच पद्धत वापरणार होता. युरोप किंवा अमेरिकेतून २०% समृद्ध युरेनियम (enriched Uranium) विकत घेऊन ते काही खास यंत्रसामग्री वापरून ९०% पर्यंत समृद्ध करण्याची ही योजना होती. त्यासाठी लागणारी उपकरणं जर्मनी आणि हॉलंडमध्ये डॉ.विल्हेल्म ग्रॉथ, डॉ.जेकब किस्टमाकर आणि डॉ. गरनॉट झिप यांनी बनवलेली होती. खरेदी केलेलं कोबाल्ट ६० कैरोमध्ये डॉ.लैला खलील नावाच्या एका स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या पत्त्यावर पाठवलं जात असे. ती या प्रकल्पाचा प्रमुख असलेल्या जनरल खलीलची बहीण होती.
योक्लिकने मोसादच्या लोकांना जे सांगितलं, ती माहिती अनेक तज्ञ लोकांकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आली, पण या लोकांनी त्याच्यावर जे मत व्यक्त केलं त्यावर मात्र फार लक्ष दिलं गेलं नाही. या तज्ञांच्या म्हणण्यानुसार क्लिओपात्रा हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण होणं अशक्य होतं. योक्लिकला २०% समृद्ध युरेनियम मिळणं ही अत्यंत कठीण, जवळपास अशक्य गोष्ट होती. समजा मिळालं, तरी ते ९०% समृद्ध करण्यासाठी कमीतकमी १०० सेंट्रीफ्यूजेस हवे होते, जे इजिप्तकडे नव्हते. असे १०० सेंट्रीफ्यूजेस वापरूनसुद्धा इजिप्तला बॉम्ब बनवायला कमीतकमी २-३ वर्षे लागली असती. आणि सर्वात कहर म्हणजे एवढं सगळं करूनसुद्धा बॉम्ब बनला असता, तरी योक्लिकची काही गणितं आणि गृहितकं चुकीची असल्यामुळे त्याचा स्फोट झालाच नसता. आयबीसवर तर या तज्ञांनी फुली मारली होती. त्यांच्यामते आयबीस हा एखाद्या सामान्य बॉम्बपेक्षा जास्त प्रभावी असणं शक्यच नव्हतं.
पण इझराईलचे नेते हे ऐकल्यावर शांत झाले नाहीत. त्यांची अस्वस्थता अजून वाढली, कारण आता इजिप्तकडे रासायनिक अस्त्रं असल्याची बातमी आली होती. ती मात्र खरी होती कारण त्याच वर्षी येमेनमधल्या युद्धात इजिप्तने विषारी वायूंचा वापर केला होता. इझराईलच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री (आणि नंतर पंतप्रधान) गोल्डा मायर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.केनेडी यांची भेट घेऊन त्यांच्याशी इजिप्तच्या या शस्त्रांबद्दल चर्चा केली, पण त्यातून फार काही निष्पन्न होऊ शकलं नाही.
अमेरिकेला इजिप्तच्या क्षेपणास्त्र प्रकल्पात रस नाही, हे बघितल्यावर मोसादने बॉम्बच्या दिशादर्शक प्रणालीवर काम करणारे जे लोक होते, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं.
१९६३ च्या हिवाळ्यात डॉ.हान्स क्लाईनवाख्टर जर्मनीमध्ये होता. तो लोराचमधल्या प्रयोगशाळेतून घरी येत असताना त्याच्यावर गोळीबार झाला. क्लाईनवाख्टर बचावला आणि पोलिसांनी हल्लेखोरांची गाडी शोधून काढली. त्यात त्यांना इजिप्शियन गुप्तचर संघटनेचा प्रमुख जनरल अली सामीरचा पासपोर्ट मिळाला. मजा म्हणजे सामीर त्या दिवशी कैरोमध्ये होता, आणि त्याने संबोधित केलेल्या पत्रकार परिषदेला बरेचसे पत्रकार हजर होते. हे हल्लेखोर जरी मिळाले नसले, तरी वृत्तपत्रांमध्ये हे मोसादचंच काम आहे, असं मत व्यक्त करण्यात आलं होतं.
क्लाईनवाख्टर बचावला म्हटल्यावर मोसादने इतरांकडे मोर्चा वळवला. पॉल गोर्के सुद्धा दिशादर्शक प्रणालीवरच काम करत होता. मोसादच्या मते डॉ.क्रुग आणि डॉ.योक्लिक यांच्यानंतर तोच एक महत्वाचा शास्त्रज्ञ होता. त्याची मुलगी हायडी ही जर्मनी आणि स्वित्झर्लंड यांच्या सीमेजवळ असलेल्या फ्रायबुर्ग या ठिकाणी राहात होती.
क्लाईनवाख्टरवरच्या हल्ल्यानंतर काही दिवसांनी योक्लिकने हायडीला फोन केला आणि आपण त्याला ओळखत असल्याचं सांगितलं. बोलता बोलता सहजपणे योक्लिकने विषय इझराईलवर आणला आणि हायडीला तिच्या वडिलांना इजिप्त सोडून परत यायची विनंती करायला सांगितलं. तो हेही म्हणाला, की असं जर तिच्या वडिलांनी केलं नाही, आणि त्यांचं काही बरंवाईट झालं, तर त्याची जबाबदारी त्यांच्यावरच असेल.
“जर तुझं तुझ्या वडिलांवर खरोखर प्रेम असेल,” योक्लिक संभाषण संपवता संपवता तिला म्हणाला, “तर या शनिवारी संध्याकाळी ४ वाजता बासलमधल्या थ्री किंग्ज हॉटेलमध्ये ये. मी माझ्या एका मित्राशी तुझी ओळख करून देईन.”
हायडी हे ऐकून प्रचंड बेचैन झाली आणि तिने हान्स मान नावाच्या माणसाशी संपर्क साधला. मान पूर्वाश्रमीचा एस.एस. अधिकारी होता, आणि शास्त्रज्ञांच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्याच्यावर होती. मानच्या फ्रायबुर्ग पोलिसांमध्ये ओळखी होत्या. त्याने त्यांच्याशी बोलणं केलं आणि फ्रायबुर्ग पोलिसांनी स्विस अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. त्या शनिवारी, २ मार्च या दिवशी जेव्हा योक्लिक आणि त्याचा ‘ मित्र ’ जोसेफ बेन गाल थ्री किंग्ज हॉटेलमध्ये आले, तेव्हा संपूर्ण परिसराला साध्या वेशातल्या पोलिसांनी वेढा घातला होता. हायडी ज्या टेबलापाशी बसली होती, त्याच्याजवळ संभाषण रेकॉर्ड करायला टेपरेकॉर्डर्स ठेवले होते.
बेन गाल आणि योक्लिक यांना कशाचाही संशय आला नाही. ते हायडी घाबरली असेल, असं गृहीत धरून तिला धमकी द्यायला आले होते. तिच्याशी बोलता बोलता बेन गालने आइकमनचा उल्लेख करून कशा प्रकारे त्याला मोसादने अर्जेन्टिनामधून उचलला याचं वर्णन केलं.
हायडीबरोबरची भेट संपवून बेन गाल आणि योक्लिक आपल्या वाटेने गेले आणि त्याच संध्याकाळी दोघांनाही अटक करण्यात आली. त्याचवेळी जर्मन पोलिसांनी स्विस सरकारला या दोघांनाही जर्मनीच्या सुपूर्द करण्याची मागणी केली.
हॅरेलने त्याचे स्वित्झर्लंडमधले काँटॅक्ट्स वापरून स्विस सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण जर्मन पोलिसांनी बेन गाल आणि योक्लिक यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केलेली असल्यामुळे स्विस अधिकारी त्यांना इझराईलच्या ताब्यात द्यायला तयार होईनात.
हॅरेल पंतप्रधान बेन गुरियनना भेटला आणि त्याने त्यांच्याकडे बेन गाल आणि योक्लिक यांच्या सुटकेसाठी जर्मन सरकारकडे रदबदली करायची विनंती केली. बेन गुरियनना या संपूर्ण प्रकरणातल्या काही गोष्टी पहिल्यांदाच समजत होत्या. हॅरेलचा युक्तिवाद असा होता, की जर बेन गाल आणि योक्लिक यांची अटक आणि त्यांनी जे काय केलंय ते जाहीर झालं, तर इजिप्त जर्मन तंत्रज्ञांच्या मदतीने रॉकेट्स बनवतोय, हेही जाहीर होईल आणि मोसादने या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांना धमकावण्यासाठी जे प्रकार केले तेही जगजाहीर होईल. इजिप्तमधून ही माहिती इझराईलपर्यंत कशी पोचली त्याची चौकशी होईल. थोडक्यात, सगळ्या ऑपरेशनची वाट लागेल.
पण बेन गुरियननी यात हस्तक्षेप करायला नकार दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मोसादने स्वतःबद्दल फाजिल आत्मविश्वास बाळगून हे संपूर्ण प्रकरण हाताळलेलं होतं, आणि त्यामुळे ते निस्तरण्याची जबाबदारीही मोसादचीच होती.
१५ मार्च १९६३ या दिवशी संध्याकाळी योक्लिक आणि बेन गाल यांच्या अटकेची बातमी जाहीर करण्यात आली.
पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यामुळे हॅरेल खवळला होता. त्याने इझराईलमधल्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांच्या संपादकांची एक बैठक बोलावली आणि त्यांना बेन गाल आणि योक्लिक यांच्या अटकेची पूर्ण पार्श्वभूमी सांगितली. त्याचबरोबर इजिप्तने कशा प्रकारे आपला क्षेपणास्त्रांचा आणि अण्वस्त्रांचा प्रकल्प जर्मन शास्त्रज्ञांच्या मदतीने चालवलेला आहे, याच्याबद्दलही त्यांना सांगण्यात आलं.
हॅरेलने अजून एक चाल खेळली. त्याने ज्या संपादकांना ही माहिती सांगितली होती, त्यांना युरोपमध्ये जाऊन त्याची शहानिशा करून घ्यायला सांगितलं आणि मोसादच्या एजंट्सना संपूर्ण युरोपभरच्या वर्तमानपत्रांमध्ये इझराईलबद्दल सहानुभूती असलेल्या पत्रकारांना भेटून त्यांना ही माहिती द्यायला पाठवलं.
१७ मार्चपासून संपूर्ण युरोप आणि इझराईल इथे वर्तमानपत्रांच्या पानांवर माध्यमांचा आक्रोश सुरु झाला. जर्मन शास्त्रज्ञ; त्यांच्यातले अनेकजण पूर्वाश्रमीचे ज्यूद्वेष्टे आणि नाझी; त्यांनी इजिप्तला केलेली मदत; त्यांचं इझराईलला कायमचं उध्वस्त करण्यासाठी रचलेलं कारस्थान; इजिप्तचा जीवशास्त्रीय, रासायनिक आणि किरणोत्सर्गी अस्त्रं मिळवण्यासाठी चाललेला आटापिटा वगैरे सगळे विषय माध्यमांनी चघळायला सुरुवात केली, आणि पाहतापाहता या बातम्या अतिरंजित आणि सनसनाटी पातळीवर गेल्या. इजिप्तचा मृत्यूकिरण बनवण्याचा, इझराईलला पुढच्या हजारो वर्षांसाठी बेचिराख करण्याचा डाव; किरणोत्सर्गी कचऱ्याने भरलेले अणुबॉम्ब; प्लेगचे विषाणू बॉम्बद्वारे पसरण्याचं इजिप्शियन कारस्थान आणि सर्वात कहर म्हणजे नाझी जर्मनीच्या ज्यूविरोधी कारवाया आणि कसं सध्याचं पश्चिम जर्मन सरकार त्यापेक्षा वेगळं वागत नाहीये; १९३३ चा जर्मनी आणि १९६३ चा जर्मनी हे कसे एकाच माळेचे मणी आहेत वगैरे बातम्यांनी आगीत तेल टाकण्याचं काम अगदी चोख बजावलं.
इकडे बेन गाल आणि योक्लिक याच्यावर स्विस सरकारने भरलेला खटला दोघांना दोन महिन्यांच्या साध्या कैदेच्या शिक्षेने संपुष्टात आला. त्यामधून त्यांनी अगोदरच तुरुंगात घालवलेले दिवस वगळण्यात आले होते. हा खटला चालू असताना एक विलक्षण गोष्ट घडली.
ऐन खटल्यात न्यायाधीशांच्या लक्षात आलं की न्यायालयात एक माणूस बरोबर गन घेऊन आलेला आहे. संतापलेल्या न्यायाधीशांनी जेव्हा त्याला खडसावून विचारलं तेव्हा त्याने आपण इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असल्याचं आणि आपल्याकडे गनसाठी लागणारा परवाना असल्याचं सांगितलं. या माणसाचं नाव होतं हान्स मान. तोच हान्स मान ज्याच्याशी हायडी गोर्केने तिला योक्लिकचा फोन आल्यावर लगेचच संपर्क साधला होता.
खटला चालू असताना मोसाद एजंट्स प्रेक्षकांमध्ये बसलेले होतेच. त्यांच्यातल्या एकाने गुप्तपणे हान्स मानचा फोटो काढला आणि सरळ ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथे जाऊन सुप्रसिद्ध नाझी शिकारी सायमन विझेन्थालची भेट घेतली. विझेन्थालने मानला लगेचच ओळखलं, आणि त्याने महायुद्धात ओट्टो स्कोर्झेनीच्या युनिटमध्ये काम केल्याचं सांगितलं. या एजंटने ही माहिती रफी एतान आणि अॅव्हनर अहितुव यांना सांगितली.
स्कोर्झेनीची मदत घ्यायची कल्पना अहितुवची होती. स्कोर्झेनीच्या माजी पत्नीशी संपर्क साधून त्यांनी स्कोर्झेनीचा पत्ता मिळवला आणि ते त्याला भेटायला माद्रिदमध्ये आले.
हान्स मान आणि त्याच्याबरोबर काम करणारे इतर सुरक्षा कर्मचारी हे पूर्वाश्रमीचे एस.एस. अधिकारी आणि सैनिक होते. त्यांच्यातल्या बहुतेकांनी स्कोर्झेनीच्या हाताखाली काम केलेलं होतं. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेण्याची एतानची इच्छा होती. पुढच्या काही महिन्यांतच स्कोर्झेनीद्वारे इजिप्तच्या प्रकल्पामध्ये काम करणारे लोक, त्यांची व्यावसायिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांना मिळणारा पगार वगैरे संपूर्ण माहिती मोसादकडे आली. त्याचबरोबर त्यांनी बनवलेले रिपोर्ट्स आणि त्यावरून इजिप्तच्या प्रकल्पाची नेमकी परिस्थितीही मोसादच्या लक्षात आली.
पण हे सगळं होण्याआधी इझरेली प्रसारमाध्यमांनी घातलेला धुमाकूळ आणि उडवलेला धुरळा खाली बसायचं नाव घेत नव्हता. अरब आणि जर्मन असे ज्यूंचे दोन शत्रू एकत्र आलेले असून ते एका नवीन हॉलोकॉस्टची तयारी करत आहेत असं चित्र रंगवलं जात होतं. नेसेटमध्ये विरोधी पक्षनेता मेनॅचम बेगिन यांनी पंतप्रधानांवर “ एकीकडे तुम्ही जर्मनांना आपण बनवलेली उझी मशीन पिस्तुलं विकताय आणि ते इजिप्तला आपल्याला समूळ नष्ट करण्यासाठी घातक रोगांचे जंतू विकताहेत “ असा सनसनाटी आरोप केला होता.
हा सगळा वाद अनावश्यक होता आणि वस्तुस्थिती त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. पण जर्मनीबद्दलचा राग आणि तिरस्कार इसेर हॅरेलच्या मनात इतका खोलवर रुजला होता, की त्याच्याशी या मुद्द्यावर शांतपणे बोलणं हे कुणालाही शक्य नव्हतं. काहीही करून जर्मनीची बदनामी करणं आणि जर्मन नेत्यांवर आंतरराष्ट्रीय दबाव आणणं हा हॅरेलचा एककलमी कार्यक्रम बनला होता.
संरक्षण उपमंत्री असलेल्या शिमॉन पेरेस यांनी सर्वात प्रथम सत्य काय आहे, ते शोधून काढायचं ठरवलं. त्यांनी मोसाद किंवा शाबाक यांच्याऐवजी इझरेली सैन्याच्या अमान या गुप्तचर संघटनेला हे काम सोपवलं. अमानचा तत्कालीन प्रमुख जनरल मायर अमित आणि त्याच्या लोकांनी दोन आठवड्यांच्या काळात अनेक शास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या निर्मितीशी संबंधित असलेल्या लोकांशी संपर्क साधला आणि मोसादने मिळवलेली माहिती त्यांच्यासमोर मांडली. या सर्वांचं मत पूर्णपणे वेगळं होतं.
इजिप्तकडे रासायनिक आणि जीवशास्त्रीय अस्त्रं विकसित करायची कुठलीही क्षमता नव्हती. येमेनमध्ये त्यांनी वापरलेला विषारी वायू म्हणजे मस्टर्ड गॅस होता. त्यापेक्षा घातकी विषारी वायूंवर इझरेली सैन्याच्या संशोधन विभागाने उपाय शोधून काढले होते. डॉ.ओट्टो योक्लिकने कोबाल्ट ६० चा उल्लेख केला होता, पण जेवढं कोबाल्ट ६० इजिप्तला पाठवण्यात आलं होतं, तेवढ्यात बॉम्ब किंवा किरणोत्सर्गी अस्त्र बनणं अशक्य होतं. स्वतः योक्लिकच्या विधानांमध्येही अनेक विसंगती होत्या. याचा अर्थ सरळ होता. मोसादने, किंबहुना इसेर हॅरेलने जर्मनीबद्दल असलेल्या आपल्या संतापाला पोषक अशी माहिती तिची खात्री न करून घेता वापरली होती. स्वतःच्या व्यक्तिगत भावनांना देशहितापेक्षा जास्त महत्व दिलं होतं.
पंतप्रधान बेन गुरियनकडे जेव्हा ही माहिती गेली, तेव्हा त्यांनी हॅरेलला भेटायला बोलावलं आणि स्पष्टीकरण मागितलं. आपण पत्रकारांना आणि संपादकांना त्यांच्या वर्तमानपत्रांमध्ये जर्मनीविरोधी माहिती छापायला सांगितलं आणि आपल्याकडे त्याच्या सत्यासत्यतेबद्दल काहीही माहिती नाहीये हे हॅरेलने कबूल केलं.
दुसरीकडे अमानचा अहवाल अत्यंत तपशीलवार होता. मायर अमितचे लोक अमेरिकेत जाऊन नासासाठी काम करणाऱ्या वेर्नर फॉन ब्राऊनलाही भेटले होते. इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जवळपास सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी त्याच्या हाताखाली नाझी जर्मनीच्या व्ही-१ आणि व्ही-२ या रॉकेट्सच्या निर्मितीसाठी काम केलं होतं. त्याने इजिप्तमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या यादीवर एक दृष्टीक्षेप टाकला होता, आणि त्यातले बहुसंख्य लोक अण्वस्त्र तर सोडाच, एक साधं क्षेपणास्त्र पण बनवू शकणार नाहीत असं स्पष्टपणे म्हटलं होतं.
एका माणसाच्या अनाठायी संतापापायी दोन देशांमधले संबंध कायमचे तुटण्याच्या स्थितीला आले होते आणि हे पंतप्रधान बेन गुरियनना सहन होणार नव्हतंच, कारण जर्मनीबरोबर इझराईलचे आर्थिक, व्यापारी आणि लष्करी संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी मेहनत केलेली होती. त्यांनी हॅरेलवर देशहिताशी तडजोड केल्याचा आरोप केला.
हॅरेल काहीही न बोलता तिथून निघून गेला आणि त्याने आपल्या ऑफिसमध्ये जाऊन आपला राजीनामा लिहिला आणि ऑफिसच्या किल्ल्यांबरोबर तो पंतप्रधानांच्या ऑफिसमध्ये पाठवून दिला.
बेन गुरियननी त्याच्याशी बोलून त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला. त्याच्या जागी दुसऱ्या कोणाची नियुक्ती होईपर्यंत त्याला त्याचा राजीनामा रोखून धरायलाही सांगितलं, पण हॅरेल आपल्या निर्णयावर ठाम होता.
बेन गुरियनपुढे त्याच्या जागी नियुक्त करण्यासाठी दोन पर्याय होते – शाबाकचा प्रमुख अमोस मॅनॉर आणि अमानचा प्रमुख मायर अमित. दोघांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मॅनॉर नेमका त्याचवेळी नातेवाईकांना भेटण्यासाठी तेल अवीवच्या बाहेर गेल्यामुळे उपलब्ध होऊ शकला नाही, म्हणून जनरल मायर अमितची मोसादच्या संचालकपदी तात्पुरती नेमणूक करण्यात आली.
इसेर हॅरेल नामक युगाचा अंत झाला.
No comments:
Post a Comment