Thursday 11 February 2016

मोसाद

२ जानेवारी १९६५, लाताकिया बंदर, सीरिया. सोविएत रशियामधून आलेलं एक जहाज किनाऱ्याला लागलं. या जहाजात के.जी.बी. ने विकसित केलेली नवीन यंत्रसामग्री होती. प्रामुख्याने रेडिओ संदेश ऐकणे आणि ते कुठून पाठवले जात आहेत, ते ट्रान्समीटर्स शोधून काढणे यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार होता. सीरियामध्ये सध्या वापरली जात असणारी यंत्रणा जुनाट आणि कुचकामी होती. तिच्या जागी ही नवीन यंत्रणा बसवायची सीरियन सैन्याची योजना होती.

७ जानेवारीला ही नवीन यंत्रणा कार्यान्वित होणार होती आणि तिच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून त्या दिवशी सीरियन सैन्याने आपलं संपूर्ण संदेश प्रसारण चोवीस तासांसाठी बंद ठेवलं होतं. पण त्याच वेळी एका अधिकाऱ्याला एक अगदी क्षीण पण जाणवण्याएवढा असा रेडिओ संदेश मिळाला. अगदी अशाच स्वरूपाचे आणि याच फ्रीक्वेन्सीवरचे संदेश याआधीही नोंदवले गेले होते पण त्यावेळी इतर रेडिओ संदेशांच्या गोंधळात ते पकडणं आणि त्यावरून ते पाठवले जात असल्याचं ठिकाण शोधून काढणं हे अशक्य होतं. पण आता अजिबात एकही संदेश पाठवला जात नसल्यामुळे हा संदेश पकडला गेला होता. त्याने ताबडतोब फोन करून ही बातमी सीरियाच्या गुप्तचर संघटनेला दिली. त्यांना हा संदेश कुठून आला, हे जेव्हा समजलं तेव्हा ते हादरले. सीरियन सैन्याच्या राजधानी दमास्कसमधल्या एका तळाच्या अगदी जवळ असलेल्या एका इमारतीमधून हा संदेश पाठवण्यात आला होता आणि सीरियन तंत्रज्ञांनी त्या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरून हा संदेश पाठवण्यात आला आहे, असा निष्कर्ष काढला होता. तिथे राहणाऱ्या माणसाचं नाव होतं कमाल अमीन साबेत.

साबेत दमास्कसमधल्या अतिश्रीमंत आणि अतिमहत्वाच्या लोकांपैकी एक होता. साक्षात राष्ट्राध्यक्ष हाफेझचा जवळचा मित्र. तो राष्ट्राध्यक्षांच्या पुढच्या मंत्रिमंडळात असणार आहे अशीही कुणकुण होती. दर महिन्यात किमान एकदा तरी त्याने दिलेल्या मेजवान्यांच्या बातम्या सीरियन वृत्तपत्रांमध्ये येत असत. बाकी त्याचे या न त्या महत्वाच्या नेत्यांबरोबर फोटो जवळजवळ दररोज असायचेच. त्याने दिलेल्या मेजवान्यांना दमास्कस आणि उर्वरित सीरियामधले सर्व उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित लोक अगदी आवर्जून हजेरी लावत असत. दारू, खाद्यपदार्थ, बायका यांची अगदी रेलचेल असे. त्या साबेतच्या घरातून हा संदेश आलाय?

“काहीतरी चूक आहे,” सीरियन मुखबारत(गुप्तचर संघटना)च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्कर्ष काढला. साबेत, ज्याचे सरकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांशी एवढे जवळचे संबंध आहेत, त्याच्याशी वैर ओढवून घेण्याची कोणाचीही तयारी नव्हती. पण त्या दिवशी संध्याकाळी तसाच संदेश पाठवला गेला. आता मात्र काहीतरी गडबड असल्याची मुखबारतच्या अधिकाऱ्यांची खात्री पटली होती. त्यांनी हे प्रकरण सरळ मुखबारतच्या प्रमुखाकडे – जनरल नदीम अल तायाराकडे नेलं.
अल तायाराने त्यांना साबेतच्या पत्त्यावर धाड टाकण्याचे आदेश दिले.

दुसऱ्या दिवशी – १० जानेवारी १९६५ रोजी सकाळी ८ वाजता दमास्कसच्या अबू रामेन भागातल्या या फ्लॅटमध्ये मुखबारतचे चार अधिकारी घुसले. दरवाज्याची कडी किंवा बेल न वाजवता त्यांनी दरवाजा उखडला आणि ते आत शिरले आणि सरळ बेडरूमच्या दिशेने गेले. साबेत झोपला असेल अशी त्यांची कल्पना होती, पण तो जागा होता, एवढंच नव्हे, तर संदेश पाठवत होता. त्याला त्यांनी रंगेहाथ पकडला होता. त्यांना पाहिल्यावर तो उभा राहिला आणि त्याने हात वर केले. त्यांनी त्याला बेड्या घातल्या आणि ते त्याला मुखबारत हेडक्वार्टर्समध्ये घेऊन गेले.

साऱ्या दमास्कसमध्ये ही बातमी एखाद्या वणव्यासारखी पसरली. कमाल अमीन साबेत आणि शत्रूचा हेर? राष्ट्राध्यक्षांचा खास मित्र आणि पुढच्या मंत्रीमंडळात ज्याचा समावेश होणार होता, असा माणूस? पण साबेतच्या घराची झडती घेतल्यावर सापडलेले गुप्त ट्रान्समीटर्स, घरातच लपवलेल्या मायक्रोफिल्म्स आणि शत्रूच्या हातात जिवंतपणे न सापडता आयुष्य संपवण्यासाठी असलेल्या सायनाईडच्या गोळ्या यांनी साबेतच्या हेर असण्यावर शिक्कामोर्तब केलं.
सीरियन नागरिकांमध्ये तो कोण आहे आणि सीरियाच्या नक्की कुठल्या शत्रूकडून आलेला आहे याबद्दल चर्चा आणि पैजांना एकच उधाण आलं होतं. काही जणांचा संशय इराकवर होता, काहींचा इराण किंवा मग इजिप्तवर. पण २४ जानेवारी १९६५ या दिवशी, दोन आठवडे कमाल अमीन साबेतची कसून ‘ चौकशी ’ केल्यावर आणि त्याचे अनन्वित हाल केल्यावर सीरियन सरकारने त्याची खरी ओळख जाहीर केली आणि पुन्हा एकदा सीरियन जनतेला आणि साबेतचं आदरातिथ्य उपभोगलेल्या लोकांना जबरदस्त हादरा बसला. कमाल अमीन साबेत हा अरब नसून ज्यू होता आणि चक्क इझराईलचा हेर होता. त्याचं खरं नाव होतं एली कोहेन.

१६ डिसेंबर १९२४ या दिवशी अलेक्झांड्रिया, इजिप्त येथे जन्म झालेल्या एलियाहू उर्फ एली कोहेनबद्दल जगभरातल्या इतिहासकारांचं आणि हेरगिरी तज्ञांचं एकच मत आहे – मोसादच्या, किंबहुना जगातल्या सर्वश्रेष्ठ हेरांपैकी एक.

लहानपणापासूनच एली हुशार आणि धाडसी म्हणून प्रसिद्ध होता. त्याची स्मरणशक्ती अफाट होती. ज्यूंचा धर्मग्रंथ असलेल्या ताल्मूदमधली सर्व वचने तो वयाच्या दहाव्या वर्षीच घडाघडा म्हणून दाखवू शकत असे. इजिप्तमध्ये ज्यूंचा छळ होणं ही अगदी नैमित्तिक बाब होती. त्यामुळे ज्यू क्रांतिकारक संघटनासुद्धा उदयाला आल्या होत्या. या संघटनांना पॅलेस्टाईनमध्ये कार्यरत असलेल्या झिओनिस्ट चळवळीचा पाठिंबाही होता. एली अशाच एका क्रांतिकारक संघटनेसाठी काम करत होता. पण त्याचं काम वेगळ्या स्वरूपाचं होतं. १९४८ मध्ये इझराईलची निर्मिती झाल्यावर ज्यूंना स्वतःची मातृभूमी मिळाली होती. पण त्याचबरोबर इजिप्त इझराईलचा प्रच्छन्न शत्रू असल्यामुळे आणि इझराईलच्या निर्मितीच्या वेळी झालेल्या युद्धात इजिप्तला पराभव स्वीकारावा लागला असल्यामुळे तिथे ज्यूंचा छळ अजूनच वाढला होता. या अत्याचारांपासून स्वतःला वाचवण्याचा एकच मार्ग इजिप्तमधल्या ज्यूंसाठी होता – इझराईलला निघून जाणं. अशा ज्यूंना गुप्तपणे इजिप्तच्या बाहेर काढून इझराईलपर्यंत पोचवणं हे काम एली करायचा. त्याच अनुषंगाने १९५४ मध्ये एका धाडसी कटामध्ये त्याने भाग घेतला.

१९५४ मध्ये इझरेली नेत्यांना ब्रिटीश सरकारने ब्रिटीश सैन्य इजिप्तमधून पूर्णपणे काढून घेण्याचा निर्णय घेतल्याचं समजलं होतं. त्याआधीच इजिप्तमध्ये राज्यक्रांती होऊन राजेशाही उलथली गेली होती आणि गमाल अब्दुल नासरच्या नेतृत्वाखाली लष्करी हुकूमशाही सुरु झालेली होती. सर्व अरब देशांमध्ये लष्करीदृष्ट्या इजिप्तच बलाढ्य होता आणि नासर इझराईलचा कट्टर शत्रू होता. त्याच्या मनात आलं असतं तर त्याने कधीच इझराईलवर हल्ला केला असता, पण ब्रिटीश सैन्य देशात असल्यामुळे आणि या सैन्याचे अनेक तळ सुएझ कालव्याच्या बाजूने असल्यामुळे नासरला असं काही करता येत नव्हतं. पण जर ब्रिटनने सैन्य काढून घेतलं, तर नासरला इझराईलवर हल्ला करण्यापासून थांबवणारं कोणीही नव्हतं. शिवाय ब्रिटीश सैन्य निघून गेल्यावर त्यांची आधुनिक युद्धसामग्री आणि शस्त्रास्त्रं यांचा बऱ्यापैकी मोठा साठा इजिप्तकडे आला असता आणि १९४८ च्या पराभवाचा बदला घेण्यासाठी इजिप्तचं सैन्य इझराईलच्या दिशेने झेपावलं असतं यात शंका नव्हती.

त्यामुळे इझराईलच्या नेत्यांच्या मनात एकच विचार होता – काहीही करून ब्रिटिशांना त्यांचा निर्णय बदलायला, निदान काही वर्षे पुढे ढकलायला भाग पाडायचं. नेमकं त्यावेळी डेव्हिड बेन गुरियन इझराईलचे पंतप्रधान नव्हते. त्यांनी राजकारणातून काही काळ निवृत्ती घेतली होती. त्यांच्या जागी त्यांच्याच पक्षाचे पण त्यांच्याएवढे प्रभावी नसलेले मोशे शॅरेट हे पंतप्रधान होते. त्यांचा त्यांच्या मंत्र्यांवरचा प्रभाव हा असून नसल्यासारखा होता. संरक्षण मंत्री पिन्हास लाव्होन उघडपणे पंतप्रधानांच्या अधिकारांना आव्हान देत असे. ब्रिटिशांना इजिप्तमधून सैन्य काढून घ्यायचा निर्णय बदलायला भाग पाडायचं हा विचार लाव्होनचाच होता. त्याने आणि त्यावेळी लष्करी गुप्तचर संघटना अमानचा प्रमुख असलेल्या कर्नल बेन्जामिन गिबलीने एक धाडसी पण तितकीच आततायी आणि धोकादायक योजना बनवली. या योजनेबद्दल ना पंतप्रधानांना माहित होतं ना मोसादला.

गिबली आणि लाव्होन या दोघांनाही ब्रिटन आणि इजिप्त यांच्यामधल्या करारामध्ये एक मुद्दा सापडला होता. त्याच्यानुसार जर इजिप्तमध्ये अत्यंत आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर ब्रिटीश सरकार सैन्य काढून घेणार नव्हतं. गिबली आणि लिव्होन यांनी कोणालाही विश्वासात न घेता असं ठरवलं की जर इजिप्तमध्ये अनेक बॉम्बस्फोट झाले तर ब्रिटीश सरकार असा निष्कर्ष काढेल की इजिप्तच्या नेत्यांचं परिस्थितीवर नियंत्रण नाहीये आणि त्यामुळे ते आपला विचार बदलतील. हे बॉम्बस्फोट इजिप्तच्या मोठ्या आणि महत्वाच्या शहरांमध्ये करायचे हेही ठरलं. कैरो आणि अलेक्झांड्रिया ही दोन शहरं त्यासाठी निवडली गेली आणि हे स्फोट ब्रिटीश आणि अमेरिकन सांस्कृतिक केंद्रं, चित्रपटगृहं, पोस्ट ऑफिसेस आणि इतर सरकारी इमारतींच्या जवळ करावेत असंही ठरलं. इजिप्तमध्ये असलेल्या अमानच्या गुप्तचरांनी त्यासाठी अनेक स्थानिक ज्यूंची मदत घेतली. हे ज्यू कट्टर झिओनिस्ट होते आणि इझराईलसाठी आपले प्राणही देण्याची त्यांची तयारी होती. पण असं करून अमानने इझरेली गुप्तचर संघटनांचा एक अत्यंत महत्वाचा नियम मोडला होता, तो म्हणजे कधीही स्थानिक ज्यूंना घातपाताच्या कामात सहभागी करून घ्यायचं नाही. जर तिथल्या सरकारला अशा कटाचा सुगावा लागला तर संपूर्ण ज्यू समाजाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. शिवाय या कामासाठी निवडलेल्या लोकांनी असल्या गोष्टींचं कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं. त्यांनी बनवलेले बॉम्बही अत्यंत साधे आणि जास्त जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी करणारे नव्हते.

सुरुवातीपासूनच ही योजना अत्यंत कमकुवत होती. २३ जुलै १९५४ या दिवशी फिलीप नॅथन्सन नावाच्या एका झिओनिस्ट कार्यकर्त्याच्या खिशात असलेल्या बॉम्बचा अलेक्झांड्रियाच्या एका चित्रपटगृहाच्या दरवाज्यात स्फोट झाला. फिलीपला पोलिसांनी अटक केली आणि त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याच्या नेटवर्कमधल्या सर्व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यात एली कोहेनचाही समावेश होता. त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना काहीही सापडलं नाही. त्याला पुराव्याअभावी सोडून देण्यात आलं, पण इजिप्शियन पोलिसांनी त्याच्या नावाने एक फाईल उघडली आणि त्यात एलीबद्दल त्यांना असलेल्या माहितीची नोंद केली – एलियाहू शॉल कोहेन; जन्म १९२४ अलेक्झांड्रिया, इजिप्त; वडील शॉल कोहेन, आई सोफी कोहेन; २ भाऊ आणि ५ बहिणी. हे बाकीचे नातेवाईक १९४९ मध्ये इजिप्तमधून बेपत्ता झाले आहेत. एली कोहेन हा कैरोमधल्या फ्रेंच कॉलेजचा पदवीधर असून किंग फारूक विद्यापीठ, कैरो, इथे विद्यार्थी आहे. त्याचं संपूर्ण कुटुंब १९४९ मध्ये इझराईलला निघून गेलं होतं आणि तेल अवीवच्या बात याम या उपनगरात स्थायिक झालं होतं पण याबद्दल पोलिसांना काहीही माहित नव्हतं.

एकदा अटक होऊनसुद्धा एली इजिप्तमध्येच राहिला. त्याने इझराईलला निघून जायचा प्रयत्न केला नाही. त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इजिप्तच्या सरकारने इझरेली हेरांच्या अटकेबद्दल जाहीर केलं आणि ७ डिसेंबर या दिवशी त्यांच्यावर खटला सुरु झाला. या हेरांपैकी मॅक्स बेनेट हा अमानचा अधिकारी होता. त्याने आत्महत्या केली आणि सरकारी पक्षाने बाकीच्या सर्वांना मृत्यूदंड देण्यात यावा अशी मागणी केली. संपूर्ण जगभरातून इजिप्तच्या सरकारवर या लोकांना मृत्यूदंड न देण्याबाबत दबाव आणला गेला, पण कुठल्याही अर्जविनंत्यांचा काहीही परिणाम झाला नाही. १७ जानेवारी १९५५ या दिवशी न्यायालयाने आपला निर्णय ऐकवला – दोघांना निर्दोष सोडण्यात आलं, दोघांना ७ वर्षांची सक्तमजुरी, दोघांना १५ वर्षांची शिक्षा, दोघांना जन्मठेप आणि कटाचे सूत्रधार असलेल्या डॉ.मोशे मार्झुक आणि श्मुएल अझार यांना फाशी. ४ दिवसांनी त्यांना कैरो तुरुंगाच्या आवारात सार्वजनिकरीत्या फाशी देण्यात आली.

या सगळ्या प्रकरणाचे राजकीय पडसाद इझराईलमध्ये अत्यंत तीव्रपणे उमटले. गिबली आणि लाव्होन या दोघांचीही कारकीर्द संपुष्टात आली. पंतप्रधान शॅरेटनी लाव्होनच्या जागी निवृत्तीतून परत आलेल्या बेन गुरियनची संरक्षणमंत्री म्हणून नेमणूक केली. नंतर काही काळाने बेन गुरियन पुन्हा पंतप्रधान झाले.

श्मुएल अझार एलीचा मित्र होता. त्याचा एलीवर खूप प्रभाव होता. त्याचा असा मृत्यू झाल्यामुळे एलीच्या मनातही इजिप्त सोडून इझराईलला जायचे विचार यायला लागले पण तो लगेचच इझराईलला गेला नाही.

१९५६ च्या ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये इजिप्तच्या विरोधात झडलेल्या सुएझ संघर्षात ब्रिटन आणि फ्रान्स यांच्याबरोबर इझराईलचाही सहभाग होता. त्यामुळे नासरने १९५७ मध्ये अनेक ज्यूंना इजिप्तमधून हाकलून दिलं. त्यात एलीचाही समावेश होता. आता इझराईलला जाण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

इझराईलमध्ये आल्यावर एलीसाठी सर्वात पहिला प्रश्न होता कामाचा. पण त्याच्या भाषाप्रभुत्वामुळे तो लगेचच निकालात निघाला. त्याला अरेबिक, हिब्रू, इंग्लिश आणि फ्रेंच अशा चार भाषा अस्खलित रीत्या लिहिता, वाचता आणि बोलता येत होत्या त्यामुळे अमानसाठी काही मासिकं आणि नियतकालिकांचे अनुवाद करण्याचं काम त्याला लगेचच मिळालं. पण काही महिन्यांनंतर त्याची ही नोकरी सुटली. अमानसाठी काम केल्यामुळे आणि इजिप्तमध्ये क्रांतिकारक संघटनेत काम केल्यामुळे मोसादमध्ये जाण्याचे विचार एलीच्या मनात यायला लागले होते. त्याने मोसादमध्ये अर्ज केला, त्याला मुलाखतीसाठी बोलावणंसुद्धा आलं, पण मुलाखतीनंतर त्याला नाकारण्यात आलं.

मोसादच्या मानसशास्त्रतज्ञांनी एलीचं जे प्रोफाईल बनवलं होतं, त्यात ‘ या माणसाला साहस या गोष्टीची अत्यंत आवड आहे आणि निव्वळ त्याच्यासाठी तो वेळप्रसंगी जिवावरचा धोका पत्करू शकतो ’ असं म्हटलं होतं. असा माणूस मोसादला नको होता, त्यामुळे त्यांनी एलीला परत पाठवलं.

एलीला हा स्वतःचा मोठा अपमान वाटला. त्याच वेळी त्याला हमाशबीर नावाच्या एका डिपार्टमेंटल स्टोअर्स चेनमध्ये काम मिळालं. ही नोकरी हिशेब तपासनीसाची होती. अत्यंत कंटाळवाणं काम होतं, पण पगार चांगला होता, म्हणून एली तिथे काम करायला लागला. त्याच सुमारास त्याच्या मोठ्या भावाने त्याच्या एका मित्राच्या बहिणीशी एलीची ओळख करून दिली. ती एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती आणि तिचं नाव होतं नादिया मायकेल. तिचा भाऊ सामी मायकेल इझराईलमधल्या नामवंत कवी आणि लेखकांपैकी एक होता. नादिया आणि एली एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी यथावकाश लग्न केलं.

इकडे मोसादने जरी एलीला परत पाठवलं असलं, तरी त्यांचं त्याच्यावर बारीक लक्ष होतं. त्याच्या आयुष्यातल्या घडामोडींची ते अगदी तपशीलवार नोंद करत होते. त्यावेळी अमानचा प्रमुख असलेला मायर अमित एका खास प्रकारच्या एजंटच्या शोधात होता. मोसादच्या फाईलमध्ये असा एजंट न मिळाल्यामुळे अमितने मोसादने नाकारलेल्या लोकांची फाईल बघायला सुरुवात केली आणि एलीचं नाव आणि त्याची पार्श्वभूमी कळल्यावर असा माणूस आपल्या कामाला येऊ शकेल याबद्दल त्याची खात्री पटली.

एलीला त्याच्या ऑफिसमध्ये झाल्मान नावाचा एक माणूस भेटायला आला. त्याने त्याला मोसादसाठी काम करायची ऑफर दिली. आपलं नुकतंच लग्न झालं असल्याचं सांगून एलीने त्याला परत पाठवलं. पण अमितला एली कुठल्याही प्रकारे हवा होता आणि लवकरच तशी संधी आली.

गरोदरपणामुळे नादियाला तिची नोकरी सोडावी लागली. हमाशबीरची मालकी एका फ्रेंच कंपनीकडे गेली. त्यांनी पुनर्रचनेच्या नावाखाली अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. त्यात एलीचा समावेश होता.

झाल्मान एलीला परत भेटला आणि त्याने एलीला परत तीच ऑफर दिली. या वेळी एलीने नकार दिला नाही. प्रत्यक्ष काम करण्याआधी त्याला ६ महिन्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करावं लागणार होतं.

१९६० चं दशक सुरु होताना अनेक गोष्टी बदलल्या होत्या. इझराईलच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी इराक आणि इजिप्त हे दोन्हीही देश ज्यूविरोधात अग्रेसर होते. पण दोन्ही देशांमध्ये झालेल्या राज्यक्रांतीने परिस्थिती बदललेली होती. दोन्ही देशांमध्ये लष्करी राजवट होती आणि तिथल्या राष्ट्रप्रमुखांना आपल्या सैन्याच्या मर्यादांची जाणीव होती. त्यामुळे ६० चं दशक सुरु होताना त्यांचा इझराईलविरोध थोडा कमी झाला होता. पण त्यांची जागा घ्यायला सीरिया पुढे आला होता. इझराईल आणि सीरिया यांच्या सरहद्दीवर असलेल्या गोलान टेकड्या हा इझराईलसाठी डोकेदुखीचा विषय होता. तिथे सीरियन तोफखान्याची अनेक ठाणी होती. त्यांच्यामधून खाली दरीत असलेल्या इझरेली शेतकऱ्यांवर तोफगोळ्यांचा भडीमार ही नित्याची गोष्ट होती. अनेक वेळा सीरियामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांनी इझराईलमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला होता. आणि आता सीरिया आणि इतर अरब देश इझराईलचं पाणी तोडण्याचा विचार करत होते.
इझराईलच्या मध्य आणि दक्षिण भागात नेगेव्हचं वाळवंट पसरलेलं आहे. या भागात पाऊस अतिशय कमी पडतो. १९५० च्या दशकाच्या शेवटी इझरेली इंजिनीअर्सनी जॉर्डन नदी, तिच्या उपनद्या आणि टायबेरिअस सरोवर (ज्याला गॅलिलीचा समुद्र असंही नाव आहे आणि समुद्र म्हटलं तरी ते प्रत्यक्षात गोड्या पाण्याचं सरोवर आहे) यांचं पाणी अनेक कालवे आणि पाईपलाईन्स यांच्यामार्फत नेगेव्हमध्ये खेळवलं आणि तिकडे शेतीची सुरुवात केली. यासाठी इझराईलने वापरलेलं पाणी हे जॉर्डन नदीच्या इझराईलमधून वाहणाऱ्या प्रवाहामधून आणि तिच्या इझराईलमधल्या उपनद्यांमधून वळवलं होतं. पण अरब राष्ट्रांनी त्याविरुद्ध आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यांच्यात झालेल्या बैठकींमध्ये इझराईल वापरत असलेलं पाणी इझराईलला मिळू द्यायचं नाही असं ठरवण्यात आलं आणि ही कामगिरी सीरियाने स्वतःकडे घेतली. हा सीरियन प्रकल्प अर्थातच अत्यंत गुप्तपणे चालणार होता आणि त्याचसाठी मोसादला सीरियामध्ये कोणीतरी ‘ आपला माणूस ’ हवा होता. पहिल्यांदा सीरियन सरकारमधल्या कुणालातरी फोडण्याची योजना आखण्यात आली. पण तिची अव्यव्हार्यता लक्षात आल्यावर मोसादकडे एकच पर्याय उरला होता – आपला कोणीतरी माणूस तिकडे पाठवायचा. तो ज्यू आहे असा संशयही कुणाला येता कामा नये. आणि एली कोहेन असा माणूस आहे, असं मोसादमधल्या लोकांचं मत पडलं. ज्या कारणांमुळे त्याला त्यांनी आधी नाकारलं होतं, त्याच कारणांमुळे एलीला आता मोसादमध्ये प्रवेश मिळाला होता.

एलीला तो काय करतोय आणि पुढे काय होणार आहे, याबद्दल कोणालाही, अगदी त्याच्या पत्नीलाही सांगायची मनाई करण्यात आली होती. त्यामुळे दररोज सकाळी एली काहीतरी थाप मारून किंवा बहाणा करून घरातून निघत असे आणि सरळ अमान – मोसाद यांच्या संयुक्त प्रशिक्षण केंद्रात येत असे. सुरुवातीचे काही दिवस त्याला फक्त एकच काम होतं – स्मरणशक्ती वाढवणं. त्याची स्मरणशक्ती उपजतच जबरदस्त होती, पण ती आता वेगळ्या कामासाठी वापरली जाणार होती.

त्याचा प्रशिक्षक दररोज त्याच्यासमोर वेगवेगळ्या वस्तू टाकत असे आणि अगदी अर्ध्या मिनिटाच्या किंवा काही सेकंदांच्या निरीक्षणानंतर त्याला त्या वस्तू लक्षात ठेवून लिहायला सांगत असे. कधीकधी एक-दोन आठवड्यांपूर्वी दाखवलेल्या वस्तूंबद्दलही हा प्रशिक्षक, ज्याचं नाव यित्झाक होतं, तो एलीला विचारत असे.

कधीकधी यित्झाक एलीला बाहेर रस्त्यावर घेऊन जाई आणि आपला पाठलाग होतोय का हे कसं ओळखायचं, त्यांना झुकांडी कशी द्यायची, अजिबात लक्षात न येऊ देता एखाद्याचा पाठलाग कसा करायचा याचंही प्रशिक्षण होत असे.
अजून एका प्रशिक्षकाने एलीला ट्रान्समीटर कसा वापरायचा त्याचं प्रशिक्षण दिलं. त्यानंतर एक महिना त्याचं शारीरिक आणि मानसिक परीक्षण झालं. एली सगळ्या चाचण्या चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला होता. नंतर त्याला एक वेगळाच पासपोर्ट देऊन जेरुसलेमला जायला सांगण्यात आलं. तिथे त्याला १० दिवस राहायचं होतं आणि फक्त फ्रेंच आणि अरेबिक या दोनच भाषांमध्ये संभाषण करायचं होतं.

एली जेरुसलेमला असतानाच त्याच्या मुलीचा, सोफीचा जन्म झाला. तो त्याच्या भूमिकेत इतका खोलवर शिरला होता, की जेव्हा त्याला मोसादच्या लोकांनी त्याच्या मुलीच्या जन्माची बातमी सांगितली, तेव्हा त्याने प्रतिक्रिया अरेबिकमध्ये दिली.

तिथून परत आल्यावर एका ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या अरब धर्मगुरूने एलीला कुराण, प्रार्थना आणि अरब रीतिरिवाज शिकवले. हे करताना एलीच्या चुका होत होत्या. पण त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला काळजी न करण्याचा सल्ला दिला, कारण त्यांच्या मते एलीची जी कव्हर स्टोरी होती, त्यानुसार तो पाश्चात्य देशांमध्ये राहिलेला अरब होता, त्यामुळे त्याच्या हातून चुका होणं स्वाभाविक होतं.

आता खऱ्या कामगिरीची ओळख करून घेण्याची वेळ आली होती. एलीला एका तटस्थ देशात पाठवून मग तिथून या अरब देशात जायचं होतं. जेव्हा एलीने त्याबद्दल विचारलं, तेव्हा त्याला सांगण्यात आलं – सीरिया किंवा इराक.
त्याचबरोबर त्यांनी त्याला एक नवीन नाव आणि एक नवीन कव्हर स्टोरी, ज्याला हेरगिरीच्या परिभाषेत ‘legend’ असं म्हणतात, ती दिली.

“तुझं नाव कमाल बिन अमीन साबेत. तुझ्या वडिलांचं नाव अमीन बिन खुर्रम साबेत. आईचं नाव सईदा इब्राहीम. तुला एक बहीणसुद्धा होती. तुझा जन्म बैरुट, लेबेनॉन इथे झालेला आहे. तू ३ वर्षांचा असताना तुझ्या आईवडिलांनी लेबेनॉन देश सोडला आणि ते इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया इथे स्थायिक झाले. पण हे विसरू नकोस, की तुझं कुटुंब मूळचं सीरियामधलं आहे. इजिप्तमध्ये गेल्यानंतर एका वर्षाच्या आत तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला. तुझ्या वडिलांचा कापडाचा व्यापार होता. १९४६ मध्ये तुझ्या काकांनी अर्जेन्टिनामध्ये स्थलांतर केलं आणि त्यानंतर काही काळातच त्यांनी तुझ्या वडिलांना तिथे बोलावलं. १९४७ मध्ये तुम्ही सगळे अर्जेन्टिनाला गेलात. तुझे वडील आणि काका यांनी तिसऱ्या एका माणसाला भागीदार म्हणून घेऊन एक दुकान चालू केलं, पण त्याचं दिवाळं काढावं लागलं. १९५६ मध्ये तुझ्या वडिलांचा आणि त्यानंतर ६ महिन्यांच्या आत तुझ्या आईचा मृत्यू झाला. तू तुझ्या काकांच्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काही काळ काम केलंस आणि नंतर स्वतःचा व्यवसाय चालू केलास आणि तो भरभराटीला आला.”

त्याचप्रमाणे त्यांनी एलीला त्याच्या घरच्यांना सांगण्यासाठीही एक दुसरी कव्हर स्टोरी दिली. एलीने नादियाला त्याला इझराईलच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयांसाठी काम करणाऱ्या एका कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्हची नोकरी मिळाल्याचं सांगितलं. या नोकरीसाठी त्याला भरपूर फिरावं लागणार होतं. इझरेली संरक्षण उत्पादनांसाठी सामग्री खरेदी करणे आणि या उत्पादनांसाठी बाजारपेठ शोधणे अशी दोन्ही कामं आपल्याला करायची आहेत, असंही त्याने तिला सांगितलं.

फेब्रुवारी १९६१ मध्ये एलीची कामगिरी सुरु झाली. तो सर्वात पहिल्यांदा तेल अवीवहून झुरिकला गेला. तिथे त्याला भेटलेल्या एका माणसाने त्याला पुढच्या कामगिरीबद्दल सूचना दिल्या आणि त्याच्या हातात ब्युनोस आयर्सचं तिकिट ठेवलं. तिथे एली वेगळ्या पासपोर्टवर गेला.

ब्युनोस आयर्समध्ये एलीचं काम लगेच सुरु झालं नाही. एका भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये एका शिक्षकाकडून स्पॅनिश भाषा शिकणं आणि दुसऱ्या शिक्षकाकडून सीरियन धाटणीने अरेबिक भाषा बोलायला शिकणं हीच कामं त्याला आता पुढचे दोन महिने करायची होती.

दोन महिन्यांनी पुढचा टप्पा सुरु झाला. त्या फ्लॅटमधून बाहेर पडताना एलीने ब्युनोस आयर्समध्ये राहणाऱ्या अरब माणसासारखा पेहराव केला होता आणि त्याच्याकडे आता सीरियन पासपोर्ट होता. त्याच्यावर नाव होतं - कमाल अमीन साबेत.

त्या फ्लॅटमधून बाहेर पडल्यावर एलीने सर्वप्रथम एक नवीन फ्लॅट भाड्याने घेतला, एक बँक अकाऊंट उघडला, आणि अरब, विशेषतः सीरियन अरब जिथे प्रामुख्याने असतील अशा रेस्तराँ आणि क्लब्जमध्ये जायला सुरुवात केली. हळूहळू त्याचा मित्रपरिवार वाढायला लागला आणि काही काळातच या आयात-निर्यातीच्या व्यवसायात असणाऱ्या देखण्या अरब माणसाला ब्युनोस आयर्समधले बहुतांश अरब ओळखायला लागले. त्यांच्या अनेक संस्थांना साबेतने अगदी सढळ हाताने देणग्या दिल्या. त्याचं व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक होतं. तो अनेक देश फिरलेला होता आणि गोष्टीवेल्हाळ होता.
त्यामुळे त्याला अनेक क्लब्जमधून मेजवान्यांची आणि कार्यक्रमांची आमंत्रणं यायला लागली.

एली उर्फ साबेतने याच्यापुढचा टप्पा सहजपणे पार केला. एका क्लबमध्ये त्याची ओळख अब्देल लतीफ हसन नावाच्या माणसाशी झाली. हसन अर्जेन्टिनामधल्या अरब लोकांसाठी प्रकाशित होणाऱ्या ‘ अरब वर्ल्ड ’ नावाच्या नियतकालिकाचा संपादक होता. तो या हसतमुख आणि प्रभावी व्यक्तिमत्वाच्या सीरियन ‘ व्यापाऱ्यामुळे ‘ खूपच प्रभावित झाला आणि दोघेही लवकरच घनिष्ठ मित्र बनले.

हसनच्या ओळखीने साबेतला सीरियन राजदूतावासातही प्रवेश मिळाला. अशाच एका राजनैतिक स्वरूपाच्या मेजवानीमध्ये हसनने साबेतची ओळख एका लष्करी अधिकाऱ्याशी करून दिली. या अधिकाऱ्याचं नाव होतं जनरल अमीन अल हाफेझ आणि तो सीरियन राजदूतावासातला लष्करी प्रतिनिधी (military attache) होता.

आता एलीच्या खऱ्याखुऱ्या कामगिरीला सुरुवात झाली. जुलै १९६१ मध्ये कमाल अमीन साबेत हसनला त्याच्या ऑफिसमध्ये भेटला आणि त्याने आपण अर्जेन्टिनामध्ये राहायला कंटाळलेलो असून आपली लवकरात लवकर सीरियाला परत जायची इच्छा आहे असं त्याने सांगितलं. हसन त्याबद्दल काही करू शकेल का आणि त्याच्यासाठी शिफारसपत्र देऊ शकेल का? असंही त्याने पुढे विचारलं. हसनला यात काहीही वावगं वाटलं नाही. कमाल अमीन साबेत हा एक अत्यंत देशभक्त सीरियन असून तो केवळ नाईलाज म्हणून ब्युनोस आयर्समध्ये राहतो आहे या कथेवर त्याचा पूर्ण विश्वास बसलेला होता. त्याने लगोलग एलीला चार शिफारसपत्रं दिली. त्यातलं एक त्याच्या दमास्कसमध्ये राहणाऱ्या मुलासाठी होतं. हसनप्रमाणेच इतर अरब मित्रांना भेटून एलीने त्यांच्याकडूनही अशीच शिफारसपत्रं मिळवली.

ऑगस्ट १९६१ च्या शेवटी कमाल अमीन साबेतने त्याच्या ब्युनोस आयर्समधल्या मित्रांचा निरोप घेतला आणि तो तिथून स्वित्झर्लंडला आणि तिथून म्युनिकला गेला. म्युनिकमध्ये त्याने वेषांतर केलं आणि एका वेगळ्याच इझरेली पासपोर्टवर तो इझराईलमध्ये आला. आता काही महिने तो घरच्यांबरोबर घालवणार होता.

पण मोसादने त्याच्या सुट्टीमध्येही त्याला कामाला लावलं होतं. आता यापुढचा टप्पा अत्यंत धोक्याचा होता. कुणाला जराजरी संशय आला असता, तरी केलेल्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडलं असतं. त्यामुळे या सुट्टीमध्ये मोसादच्या प्रशिक्षकांनी एलीला सीरिया, तिथलं राजकारण, अंतर्गत परिस्थिती, जनमत याबद्दल अगदी सखोल माहिती दिली. त्याचबरोबर त्याचा अरेबिक भाषेचा आणि रेडिओ संदेश पाठवण्याचा अभ्यासही चालूच होता. तासाला १२ ते १६ शब्दांचा संदेश प्रसारित करण्याइतपत एलीची प्रगती झाली होती.

डिसेंबर १९६१ मध्ये एली तेल अवीवहून परत झुरिकला आणि तिथून म्युनिकला गेला. आता यापुढे तो प्रत्यक्ष सिंहाच्या गुहेत जाणार होता – सीरियाची राजधानी दमास्कस.

No comments:

Post a Comment