आज जेव्हा नाझींचं चित्रण केलं जातं - टेलिव्हिजनवर किंवा चित्रपटांमध्ये - तेव्हा नाझीवादाचा संबंध फक्त जर्मनीशी जोडला जातो. नाझीवादाने जर्मनीबाहेरच्या अनेक लोकांवर भुरळ टाकली होती हे सोयिस्करपणे विसरलं जातं. अगदी ब्रिटन आणि अमेरिकेतही नाझीवादाचे आणि फॅसिझमचे चाहते होते. ब्रिटनमध्ये सर ओस्वाल्ड मोस्ले आणि स्वीडनमध्ये पेअर एन्गडाल यांनी फॅसिस्ट संघटना स्थापन केल्या होत्या आणि या संघटनांना चांगला लोकाश्रय लाभला होता.
नाझींमध्येही सर्वचजण कट्टर होते असं म्हणता येणार नाही. हिटलरलाही याची कल्पना होती. म्हणूनच त्याने अशा पूर्णपणे नाझी मनोवृत्तीने भारलेल्या लोकांची एक लष्करी स्वरूपाची संघटना असावी अशी इच्छा आपल्या आत्मचरित्रात व्यक्त केली होती. त्याची ही इच्छा पूर्ण करणारी संघटना म्हणजे एस्.एस्. किंवा शुत्झ स्टाफेल. सुरुवातीला केवळ हिटलर आणि इतर नाझी नेत्यांचे संरक्षक अशी ओळख असणा-या या संघटनेचा पसारा नाझी पक्ष सत्तेवर आल्यावर प्रचंड प्रमाणात वाढला.
महायुद्धापूर्वीच्या आणि महायुद्धातल्या नाझी अत्याचारांना एस्.एस्. सैनिक दुस-या कुठल्याही नाझी संघटनेपेक्षा जास्त जबाबदार होते. सगळ्या मृत्युछावण्या, छळछावण्यांवरले, गॅस चेंबर्स आणि युद्धकैद्यांच्या छावण्या या एस्.एस्.च्या अखत्यारीत होत्या. महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांनी खटला भरून फासावर लटकवलेले अर्न्स्ट कालटेनब्रूनेर, मॅक्सिमिलिअन ग्रॅबनर, ओस्वाल्ड पोहल, रुडाॅल्फ होएस; इझराईलच्या ' मोसाद ' या गुप्तहेर संघटनेने अर्जेंटिनामधून पकडून आणलेला अॅडाॅल्फ आईकमन आणि डाॅ. यम या नावाने प्रसिद्ध असलेला जोसेफ मेंगेले - हे सगळे एस्.एस्. चेच अधिकारी होते.
एस्.एस्. च्या अनेक शाखा जर्मनीच्या शेजारी देशांमध्ये कार्यरत होत्या आणि त्यांचे सदस्य जर्मन एस्.एस्. एवढेच कडवे आणि कट्टर नाझी होते. हे सांगण्याचं कारण म्हणजे मला भेटलेला सर्वात कट्टर एस्.एस्. सदस्य हा जर्मन नव्हता तर बेल्जियन होता. त्याचं नाव होतं जॅक्स लेराॅय.
लेराॅयला भेटणं हा एक वेगळाच अनुभव होता. मी युद्धात लढलेल्या इतर अनेक सैनिकांना भेटलो आहे. त्यातले बरेच जण बंगल्यांमध्ये, अत्यंत आरामशीर वातावरणात राहात होते. किंबहुना त्यांनी युद्धानंतर जाणूनबुजून स्वतःभोवती असं वातावरण - एखाद्या कोषासारखं - ठेवलं होतं. लेराॅय मात्र दक्षिण बव्हेरियामधल्या एका गावात एका बैठ्या आणि नव्या, आधुनिक रचनेच्या छोटेखानी घरात राहात होता. मला अजूनही तो आमची वाट पाहात आपल्या घराच्या बाहेर कसा उभा होता ते आठवतं. चणीने तो त्याच्या घरासारखाच छोटा होता. मी जेव्हा ही मुलाखत घेतली तेव्हा तो ७० वर्षांचा होता. युद्धात एक डोळा आणि एक हात गमावूनही त्याच्या लढाऊ आणि आक्रमक वृत्तीत काहीही फरक पडलेला नव्हता.
बेल्जियम हा द्वैभाषिक देश आहे. वाॅलोनिया हा भाग बेल्जियमच्या दक्षिणेला येतो. तो फ्रान्सला लागून असल्यामुळे तिथे प्रामुख्याने फ्रेंच भाषा बोलली जाते. तिथल्या बाशे नावाच्या शहरात १९२६ साली जॅक्सचा जन्म झाला. त्याचे वडील शहराचे महापौर तर होतेच आणि त्याशिवाय अनेक ब्रुअरीज आणि उपाहारगृहे त्यांच्या मालकीची होती. " मी हे तुम्हाला का सांगतोय ते समजून घ्या, " तो मला म्हणाला, " मी जे काही केलं ते आर्थिक चणचण किंवा त्यासारख्या कारणांमुळे केलं नाही तर स्वतःहून केलं. " त्यावेळी तो लिआॅन डेग्रेल या फॅसिस्ट नेत्यामुळे अत्यंत प्रभावित झाला होता. डेग्रेलने रेक्सिस्ट चळवळ सुरु केली होती. सुरुवातीला मुसोलिनीचा इटालियन फॅसिस्ट पक्ष आणि फ्रँकोच्या स्पॅनिश राष्ट्रवाद्यांचा या चळवळीवर प्रभाव होता. नंतर डेग्रेलने नाझी विचारसरणीचा अंगीकार केला. लेराॅयसमोर त्याचाच आदर्श होता, " डेग्रेलने त्यावेळच्या राजकारण्यांवर आणि त्यांच्या भ्रष्टाचारावर कोरडे ओढले होते. मी ११-१२ वर्षांचा असल्यापासून त्याच्या सभांना जायचो, त्याची आणि इतर नेत्यांची भाषणं ऐकायचो आणि भारावलेल्या अवस्थेत घरी परत यायचो." हिटलरने ज्याप्रकारे व्हर्सायच्या तहावर टीका करुन आणि जर्मन राष्ट्रवादाला आवाहन करुन आपला नाझी पक्ष जर्मनीत लोकप्रिय बनवला, तसंच करायचा प्रयत्न डेग्रेलने केला. साम्यवाद हा नाझीवाद आणि रेक्सिस्ट चळवळ या दोघांचाही शत्रू होताच. " आज नाझीवाद आणि रेक्सिस्ट चळवळ या दोन्हीही गोष्टींवर बंदी आहे आणि आजकालच्या जगात त्यांचं तेवढं महत्वही नसेल पण तुम्ही याचा विचार त्या काळाच्या अनुषंगाने केला पाहिजे. तेव्हा त्याचं महत्व होतं. या दोन्ही विचारसरणी साम्यवादविरोधी आणि बोल्शेविकविरोधी होत्या आणि संपूर्ण युरोपात त्यांना प्रचंड पाठिंबा होता. "
पण लेराॅय जरी रेक्सिस्ट चळवळीकडे आकृष्ट झाला असला तरी याचा अर्थ हा नव्हता की तो स्वतःला नाझी वगैरे समजायला लागला होता. उलट त्याच्या आईवडिलांप्रमाणेच तोही बेल्जियमवरच्या जर्मन आक्रमणाने हादरला होता. ब्रिटनमध्ये चर्चिल पंतप्रधान होणं आणि जर्मनीचा बेल्जियमवरचा हल्ला ह्या दोन्हीही घटना एकाच दिवशी घडल्या - १० मे १९४०. तेव्हा जेमतेम १५-१६ वर्षांचा असलेला लेराॅय ढसाढसा रडला होता, " आम्ही घाबरलो होतो कारण जर्मन सैन्याविषयी आमच्या मनात अत्यंत क्रूर आणि असंस्कृत अशी प्रतिमा होती. ते लहान मुलांनाही सोडत नाहीत असंही ऐकलं होतं. नंतर मला समजलं की हा सगळा अपप्रचार होता. असं काहीही नव्हतं. "
जर्मन आक्रमणानंतर लेराॅयच्या कुटुंबाने फ्रान्सच्या दक्षिणेला स्थलांतर केलं. पण काही काळानंतर त्यांनी परत जायचं ठरवलं. या परतीच्या प्रवासात लेराॅय आणि त्याच्या कुटुंबाला जर्मन सैनिकांचा जो अनुभव आला तो ' असंस्कृत आणि क्रूर ' अशा जर्मनांचा नव्हता. " परत जात असताना फ्रान्समध्ये एका ठिकाणी आमची गाडी बंद पडली. जर्मन सैनिकांनी आमची विचारपूस केली, आमची गाडी दुरूस्त करुन दिली, एवढंच नाही तर आम्हाला जेवणही दिलं. अतिशय चांगलं आदरातिथ्य आम्हाला अनुभवायला मिळालं. "
लेराॅयच्या कुटुंबाची अशी सरबराई होण्याचं कारण म्हणजे ते ज्यू किंवा कम्युनिस्ट नव्हते. किंबहुना तो स्वतः रेक्सिस्ट पक्षाचा, म्हणजे नाझींच्या मित्रपक्षाचा सदस्य असल्यामुळे अशी वागणूक त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना मिळणं यात काही आश्चर्यकारक नव्हतं. पण या एका घटनेमुळे लेराॅयला जर्मन्स अचानक सुसंस्कृत आणि स्थानिक लोकांशी मिळूनमिसळून वागणारे असे वाटायला लागले. नंतर किती बेल्जियन ज्यूंना जर्मनांनी मृत्युछावण्यांमध्ये पाठवलं याचा विचार केला तर लेराॅयच्या या अशा विचारांमधला फोलपणा लक्षात येईल.
स्वतः लेराॅय ज्यूंच्या बाबतीत निर्विकार होता. " मला ज्यूंबद्दल काहीही घेणंदेणं नाही, " असं त्याने अनेक वेळा आमच्या मुलाखतीत म्हटलेलं आहे. पण तरीही तो रेक्सिस्ट चळवळीचा जो ज्यूविरोध होता त्यात सहभागी नव्हता. पण त्याचबरोबर तो अत्यंत कट्टर वंशवादी बनला, " गौरवर्णीय वंश हा या सगळ्या जगातला सर्वात महत्वाचा वंश आहे, " असंही विधान त्याने आमच्या मुलाखतीत केलं आहे.
त्याने आम्हाला त्याला शिकवण्यात आलेला एस्.एस्. चा या जगाविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट करुन सांगितला, " या जगात दोन प्रकारचे वंश आहेत - उच्चवर्णीय वंश आणि नीचवर्णीय वंश. गो-या लोकांचा वंश हा उच्चवर्णीय आहे. त्यामुळेच आता अनेक परकीय लोक गो-या लोकांच्या देशांमध्ये येत आहेत. हा सगळा राजकारण्यांचा डाव आहे. त्यांनी जाणूनबुजून वंश भ्रष्ट करण्यासाठी आणि भेसळ असलेला बहुवांशिक समाज निर्माण करण्यासाठी असं केलेलं आहे. आमच्या काळी आम्हाला आमच्या वंशाचा आणि गो-या वर्णाचा अभिमान वाटत असे आणि त्यात काही चुकीचं नव्हतं. "
या अशा टोकाच्या वांशिक आणि कम्युनिस्टविरोधी भूमिकेमुळे लेराॅयने स्वतःहून रशियाविरूद्ध लढाईवर जाण्याचा निर्णय घेतला. त्याची नियुक्ती एस्.एस्.च्या खास वाॅलोन डिव्हिजनमध्ये झाली. त्याचा आदर्श असलेला लिआॅन डेग्रेल तिथे वरिष्ठ अधिकारी होता.
१९४२-४३ हे युद्धाला कलाटणी मिळण्याचे दिवस होते. स्टॅलिनग्राड आणि कर्स्क या दोन्हीही लढायांमध्ये जर्मन सैन्याला आणि एस्.एस्. लाही अपरिमित हानी सहन करावी लागली. सुरूवातीला एस्.एस्. प्रमुख हेनरिख हिमलरचा सैनिकांच्या वांशिक शुद्धतेबद्दल असलेला आग्रह त्याला आता बाजूला ठेवावा लागला होता. एस्.एस्. मध्ये आता इतर देशांमधले सैनिकही घ्यावे लागत होते. युद्धाच्या शेवटी तर निम्म्यापेक्षा जास्त एस्.एस्. सैनिक हे जर्मनी आणि आॅस्ट्रिया या ' आर्यन ' देशांच्या बाहेरचे होते - फ्रान्स, क्रोएशिया, नाॅर्वे, डेन्मार्क, लाटव्हिया, युक्रेन, हंगेरी, एस्टोनिया, अल्बानिया, इटली, स्लोव्हेनिया, सर्बिया आणि बेल्जियम.
" वाफेन एस्.एस्. (एस्.एस्. ची युद्धप्रशिक्षित शाखा) च्या उद्दिष्टांमधलं एक उद्दिष्ट म्हणजे वांशिकदृष्ट्या सर्वोत्तम सैनिक घडवणं, " लेराॅय म्हणाला, " मला माहीत आहे की आजच्या बहुवांशिक युरोपियन समाजात या संकल्पनेला काहीही स्थान नाही - पण त्यावेळी होतं. हे सर्वोत्तम सैनिक देशाची सूत्रं हातात घेतील आणि देशाची सेवा करतील. " त्याच्या मते या सर्वोत्तम सैनिकांपुढे एकच लक्ष्य होतं - रशिया. कम्युनिस्ट, बोल्शेविक रशिया.
अनेक बेल्जियन लोकांच्यामते जॅक्स लेराॅयने एस्.एस्.चा गणवेष चढवून जर्मनीच्या बाजूने युद्धात भाग घेणं हा देशद्रोह होता. " होय, " तो म्हणाला, " त्यावेळी आणि आत्ताही अनेक लोकांना असं वाटतं. "
तो या आरोपाने दुखावला गेलेला होता हे आम्हाला मुलाखतीदरम्यान जाणवलं. त्याबद्दल बोलताना त्याच्या तोंडून संतापाने शब्द फुटत नव्हते, " देशद्रोह आणि देशद्रोही म्हणजे काय? वयाच्या सोळाव्या वर्षी तुम्ही देशद्रोह म्हणजे काय हे समजण्याइतके मोठे असता का? मी बेल्जियन गणवेष घातला नसेल पण मी कम्युनिझम नावाच्या एका अशा संकल्पनेविरुद्ध लढत होतो जी युरोपियन नव्हती, जी परकीय संकल्पना होती. अशा संकल्पनेला पाठिंबा देणं हा माझ्यामते देशद्रोह होता. आपण देशद्रोह करतोय असा विचारही माझ्या मनात कधी आला नाही. "
लेराॅयची रशियनांविरुद्ध किंवा त्याच्याच शब्दांत सांगायचं तर कम्युनिझमविरुद्ध लढण्याची इच्छा पूर्ण झाली. त्याच्या वाॅलोन डिव्हिजनला पूर्व आघाडीवर युक्रेनमध्ये रवाना करण्यात आलं. तिथे अगदी थोड्याच काळात लेराॅयने एक धाडसी आणि शर्थीने लढणारा सैनिक म्हणून लौकिक कमावला, " आम्ही शस्त्रांनी लढलो आणि वेळप्रसंगी जुन्या काळच्या सैनिकांप्रमाणे शत्रूशी समोरासमोर दोन हात केले. "
त्याला या अशा हातघाईच्या लढाईतील नैपुण्याबद्दल पारितोषिकही मिळालं.
१९४३ च्या हिवाळ्यात पश्चिम युक्रेनमधील टेक्लिनो इथे लेराॅयच्या डिव्हिजनची गाठ त्यांच्यापेक्षा दुप्पट सैनिक असलेल्या रेड आर्मी डिव्हिजनशी पडली. लेराॅयच्या डिव्हिजनचे या लढाईत पूर्णपणे बारा वाजले, " ही लढाई भीषण होती. आमचे ६०% सैनिक मारले गेले होते. दोन-तीन पँझर रणगाड्यांचं आम्हाला संरक्षण होतं पण ते रणगाडे घेऊन जंगलात माघार घेणं शक्य नव्हतं. " या लढाईच्या आठवणी काढताना लेराॅयचा आवेश बघण्यासारखा होता. जणू तो रेड आर्मीशी परत एकदा झुंज देत होता, " आम्ही त्या जंगलात सिंहासारखे लढलो. जरी आमची संख्या कमी होती तरी आम्ही आक्रमण केलं. "
पण तेव्हाच लेराॅयच्या नशिबानेही कलाटणी घेतली, " मी एका झाडामागे दबा धरून बसलो होतो. झाडाचा बुंधा काही तितकासा रुंद नव्हता. अचानक विजेचा झटका बसल्यासारखं वाटलं मला. माझ्या हातातली रायफल खाली पडली आणि त्या क्षणी मला फक्त रक्त दिसलं. बर्फात गळत असलेलं रक्त. माझ्या डोळ्याजवळ गोळी लागली होती. त्या जखमेतून हे रक्त गळत होतं. माझ्या खांद्यामध्येही तीन गोळ्या घुसल्या होत्या. " बर्फात कोसळलेल्या लेराॅयला त्याच्या दोन सहका-यांनी उचललं आणि इस्पितळात नेलं. तिथे मिलिटरी सर्जन्सनी त्याचा हात आणि डोळा वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ते सगळे अयशस्वी झाले.
आता लेराॅयच्या या कथेचा सर्वात महत्वाचा भाग येतो. जरी त्याचा एक हात आणि डोळा त्याने गमावला होता, तरी त्याने आपल्या युनिटमध्ये परत भरती होण्यासाठी अर्ज केला आणि आश्चर्य म्हणजे तो स्वीकारलाही गेला. का केलं त्याने असं?
" मला सामान्य माणसासारखं जगायचं नव्हतं आणि माझ्या सहका-यांसोबत राहायचं होतं. मी एक हात आणि एक डोळा गमावला होता पण जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा अशा गोष्टींनी तुम्हाला फारसा फरक पडत नाही. आणि मला सामान्य माणसासारखं कुठलीही महत्वाकांक्षा नसलेलं सामान्य आयुष्य जगायचं नव्हतं. तुमच्या आयुष्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. तुम्ही कशासाठी तरी, निदान एखाद्या गोष्टीच्या विरोधात तरी - उभं राहिलं पाहिजे. नाहीतर तुमच्या आयुष्याचा अर्थ काय? आयुष्य म्हणजे सदासर्वकाळ टेलिव्हिजन पाहणे नव्हे. त्याचं एक ठाम उद्दिष्ट असलं पाहिजे! "
लेराॅयने ही मतं अगदी परखडपणे आमच्यासमोर मांडली. त्याला सामान्यपणाबद्दल असलेली चीड तो ज्या पद्धतीने त्या शब्दाचा उच्चार करत होता त्यावरून व्यक्त होत होतीच. पण मला हेही जाणवलं की या शब्दांना असलेला गर्भित अर्थ हा वेगळा आहे. मी घेतलेल्या बहुतेक सर्व मुलाखतींमध्ये असं झालेलं आहे. उदाहरणार्थ त्याने केलेलं एक विधान - ' आयुष्य म्हणजे सदासर्वकाळ टेलिव्हिजन पाहणे नव्हे. ' त्याच्या घरात असलेला टेलिव्हिजन सेट हा आजपर्यंत मी पाहिलेल्या टेलिव्हिजन सेट्समध्ये सर्वात मोठा आणि अत्याधुनिक होता. त्यावर देशविदेशांमधली अनेक चॅनेल्स पाहता येत होती. बोलताबोलता लेराॅय असंही म्हणाला - ' मी जेव्हा टेलिव्हिजनवर काही महायुद्धाशी संबंधित चित्रपट पाहतो तेव्हा ते सगळे इतके पूर्वग्रहदूषित वाटतात मला. प्रत्येक चित्रपटात जर्मन लोकांना आक्रमक, असंस्कृत, अत्याचार करणारे, क्रूर असंच दाखवलं जातं. ' त्यावरून मला समजलं की लेराॅयचं आत्ताचं आयुष्य हे त्याने तीच गोष्ट करण्यात जात असणार जिच्यावर त्याने टीका केली होती - सदासर्वकाळ टेलिव्हिजन पाहणे.
माझ्या डोळ्यांसमोर लेराॅयची ही प्रतिमा आली - एक हात आणि एक डोळा गमावलेला आणि टेलिव्हिजनवर जे काही चाललंय त्यावर सतत टीका करणारा. एस्.एस्. साठी तो जेव्हा लढत होता, ते दिवस त्याच्या आयुष्यातले सर्वात आनंदाचे दिवस होते, किंबहुना ख-या अर्थाने आयुष्य जगण्याची संधी त्याला तेव्हाच मिळाली होती.
पण त्याच्याबद्दल सहानुभूती वाटणं कठीणच नाही तर अशक्य आहे . त्याला स्वतःला कोणी सहानुभूती दाखवणं आवडलं नसतंच पण तसंही ते अशक्य असण्याचं कारण म्हणजे त्याने नाझींनी केलेला ज्यूंचा वंशसंहार पूर्णपणे नाकारला.
" अशक्य! असं काही घडलेलं असणं आणि तेही जर्मनांच्या हातून? निव्वळ अशक्य! " तो ठासून म्हणाला, " मी स्वतः असं काही घडलेलं कधीच पाहिलेलं नाही आणि म्हणूनच माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. " मी जेव्हा त्याला म्हणालो की नाझी मृत्युछावण्यांवर वृत्तचित्रं बनलेली आहेत आणि नाझींनी ज्यूंना कसं पाशवी रीतीने मारलं त्याचे भक्कम पुरावे आहेत, तेव्हा त्यानेच मला प्रतिप्रश्न केला, " आणि तुम्हाला वाटतं हे सगळं खरं आहे? "
आमच्या मुलाखतीनंतर काही काळातच लेराॅय मरण पावला. माझी खात्री आहे की शेवटपर्यंत तो एस्.एस्
चा एकनिष्ठ सैनिक म्हणूनच जगला - ज्यूंचा वंशसंहार नाकारणारा आणि सत्य दाखवणा-या आपल्या टेलिव्हिजन सेटवर गुरकावणारा!
No comments:
Post a Comment