Wednesday, 17 December 2014

अंधार क्षण भाग ५ - निष्ठा

मध्ययुगीन युद्धांमध्ये आणि दुस-या महायुद्धामध्ये असलेला एक अत्यंत महत्वाचा फरक म्हणजे धर्म हा मुद्दा दुस-या महायुद्धात अजिबात महत्वाचा नव्हता. नाझींच्या ज्यू द्वेषाचं कारण धार्मिक नसून वांशिक होतं. हिटलरला तर कुठल्याही धर्माबद्दल आस्था नव्हती.

पण धार्मिक मुद्दे जरी महत्त्वाचे नसले तरी एखाद्या विचारसरणीवर पराकोटीची निष्ठा हे दुस-या महायुद्धाचं वैशिष्ट्य होतं. एस्. एस्. प्रमुख हेनरिख हिमलरसारख्या कट्टर नाझींसाठी सोविएत रशियाविरूद्ध पुकारलेलं युद्ध म्हणजे कम्युनिझम किंवा साम्यवाद आणि राष्ट्रीय समाजवाद या दोन विचारसरणींमधला टोकाचा संघर्ष होता. या भागात जॅक्स लेराॅयची मुलाखत आहे. त्याच्यासाठी साम्यवादाचा समूळ नायनाट करणं हा आयुष्याचा प्रमुख हेतू होता आणि त्याचा उन्माद हा कुठल्याही धार्मिक मूलतत्ववादी अतिरेक्याच्या तोडीचा होता.

हिटलरला याची पूर्ण कल्पना होती की नाझीवादाने एक अशी ' निष्ठा प्रणाली ' निर्माण केलेली आहे जिच्यात पारंपारिक धर्माला काहीही स्थान जरी नसलं तरी या व्यवस्थेवर निष्ठा असलेले लोक आपल्या विचारसरणीशी धर्माप्रमाणेच, कुठलाही प्रतिप्रश्न न विचारता एकनिष्ठ राहतील. " माझ्याकडे एस्.एस्. च्या अशा ६ डिव्हिजन्स आहेत की ज्यामधले सैनिक हे धर्मावर अजिबात विश्वास ठेवत नाहीत पण त्यांची नाझीवादावर एवढी निष्ठा  आहे की ते त्यासाठी अत्यंत शांत आणि नि:शंक मनाने मृत्यूलाही सामोरे जातील " - हे उद्गार खुद्द हिटलरनेच काढलेले आहेत.

या भागात ३ सोविएत सैनिकांच्याही कथा आहेत. त्यांनी जे केलं त्यामागची प्रेरणाही निष्ठा  हीच आहे पण जॅक्स लेराॅयप्रमाणे ते एखाद्या विचारसरणीच्या प्रभावाखाली नव्हते तर त्यांचा एका माणसावर आणि त्याच्या कृतीवर विश्वास होता - सोविएत युनियनचा सर्वसत्ताधीश जोसेफ स्टॅलिन, आणि ज्या भावनेने प्रेरित होऊन ते युद्धात लढले ती भावना म्हणजे तिरस्कार. हे सर्व लोक ' कर्म ' या संकल्पनेवर त्यांच्या नकळत विश्वास ठेवणारे होते. त्यांना अशी  पूर्ण खात्री होती की तुम्ही जर एखादं दुष्कर्म केलंत, तर त्याची परतफेड म्हणून तुमच्याही बाबतीत काहीतरी वाईट गोष्ट घडेल. काहीही कारण नसताना जर्मनांनी रशियावर आक्रमण केलं आणि लाखो निरपराधांची युद्धभूमीवर आणि बाहेर कत्तल केली. त्यांनी त्याची किंमत चुकवलीच पाहिजे. या सूडभावनेनेच ते जर्मनांविरूद्ध लढले.

आज धार्मिक उन्मादामुळे अनेक गुन्हे घडताना आपण पाहतो. कुठलाही धर्म उघडपणे त्याच्या अनुयायांना दुस-या धर्माचा द्वेष करायला किंवा त्याच्या नावावर हिंसाचार करायला शिकवत नाही. तरीही असे अत्याचार होत आलेले आहेत. या भागातल्या मुलाखतींवरुन हे समजून येतं की धर्माशिवाय इतर अनेक अशा विचारधारा आहेत ज्या एखाद्या माणसाकडून अशा गोष्टी घडवून आणू शकतात ह्याची कल्पना इतरांना तर सोडाच, त्या माणसाला स्वतःलाही कदाचित नसेल!

No comments:

Post a Comment