Saturday 15 November 2014

अंधार क्षण - टोइव्ही ब्लाट

नाझींच्या ताब्यातील पोलंडमध्ये राहणं हा एक घुसमटवून टाकणारा अनुभव होता. तुम्ही जर ज्यू असाल तर तुमच्या हालअपेष्टांना सीमाच नव्हती. पोलंड हा ज्यूबहुल असल्यामुळे नाझींना तिथल्या ज्यूंना सर्वात प्रथम संपवणं हे तर्कसंगत वाटत होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी नाझींनी ट्रेब्लिंका, चेल्मनो, आॅशविट्झ, मायदानेक अशा अनेक मृत्युछावण्या  पोलंडमध्येच बनवल्या होत्या. यामधलंच एक नाव म्हणजे साॅबिबाॅर. जवळजवळ २,५०,००० ज्यूंचे बळी घेणा-या साॅबिबाॅरमधून वाचलेल्या थाॅमस ' टोइव्ही ' ब्लाट या माणसाला भेटणं हा एक संस्मरणीय अनुभव होता.

टोइव्ही ब्लाटच्या या मुलाखतीतून मी बरंच काही शिकलो. त्याचा नाझी राजवटीमध्ये पोलिश ज्यू असण्याचा किंवा साॅबिबाॅरमध्ये राहण्याचा अनुभव तर होताच पण माणसापुढे जेव्हा टोकाची परिस्थिती येते तेव्हा त्याची वागणूक कशी बदलते हे त्याच्या अनुभवांवरून शिकायला मिळालं.

पूर्व पोलंडमधील इझ्बिका नावाच्या एका छोट्या शहरात १९२७ मध्ये टोइव्हीचा जन्म झाला. या शहरात कॅथलिक लोक बहुसंख्याक होते. ज्यूंची संख्या साडेतीन हजारांच्या आसपास होती आणि अनेक वर्षे ज्यू आणि कॅथलिक एकत्र राहिले होते. थोडाफार ज्यू विरोध जरी असला तरी त्याची तीव्रता काही जास्त नव्हती. खुद्द टोइव्हीला त्याच्या वडिलांच्या नावामुळे ज्यू विरोधाची झळ कधीच बसली नाही.

टोइव्हीचे वडील सैन्यात होते. पहिल्या महायुद्धानंतर भडकलेल्या रशियन यादवी युद्धात जेव्हा पोलंडच्या सीमांवर रशियाच्या बोल्शेविक सैन्याने आक्रमण केलं तेव्हा त्याचे वडील त्या युद्धात लढले होते आणि त्यात अपंगत्व आल्यामुळे त्यांना जरी घरी परत यावं लागलं असलं तरी सगळीकडे स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांना लोक ओळखत होते. कॅथलिक लोकांनाही त्यांच्याविषयी आदर होता. त्यामुळे टोइव्हीला ज्यू विरोध जरी ऐकून माहीत असला तरी त्याच्यावर तसा प्रसंग आला नव्हता.

नाझींच्या आगमनानंतर परिस्थिती आमूलाग्र बदलली. टोइव्हीला जाणवलेली गोष्ट म्हणजे अचानक कॅथलिकांच्या वागण्यात बदल झाला, " त्यांना एकदम अशी जाणीव झाली की आम्ही दुय्यम दर्जाचे लोक आहोत. त्यामुळे आता आम्हाला काहीही केलं तरी आम्ही त्याचा प्रतिकार करण्याच्या स्थितीत नाही आहोत. त्यामुळे ज्यूंची दुकानं फोडणं, त्यांच्या घरांमध्ये पेटते बोळे फेकणं, ज्यूंना भर रस्त्यात मारणं असे प्रकार राजरोसपणे सुरु झाले. मला नाझींपेक्षाही माझ्या कॅथलिक शेजा-यांची जास्त भीती वाटायची कारण नाझी मला ओळखत नव्हते पण माझे शेजारी मला नक्कीच ओळखत होते. "

इझ्बिका शहर तिथल्या चामड्याच्या वस्तू आणि कातडी कमवायचा कारखाना यामुळे प्रसिद्ध होतं. बरेचसे ज्यू हे या कारखान्यात काम करणारे कुशल कामगार होते. जरी नाझींनी अधूनमधून इझ्बिकामधल्या ज्यूंचं ' स्थलांतर ' केलेलं असलं तरी बरेचसे ज्यू तिथे अजूनही होते आणि नाझींना चामड्याची गरज असल्यामुळे हा कारखाना बंद होणार नाही आणि आपलं स्थलांतर होणार नाही अशी एक आशा त्यांच्या मनात होती.

पण एप्रिल १९४३ मध्ये नाझींनी संपूर्ण इझ्बिका शहर स्थलांतरित करायचा निर्णय घेतला. " पहाटे ४ वाजता गोळीबाराच्या आवाजाने मला जाग आली. मी खिडकीतून पाहिलं तेव्हा नजर जाईल तिकडे फक्त नाझी सैनिक दिसत होते. माझ्या घरातून त्यांनी मला उचललं आणि बाहेर सैनिकांच्या पहा-यात उभ्या असलेल्या लोकांमध्ये उभं केलं. हा आपला शेवट असू शकतो अशी मला अचानक जाणीव झाली. काय करु शकत होतो मी? "

अचानक टोइव्हीपुढे सुटकेची संधी आली. तिथल्या पहारेक-यांपैकी एकाला सिगरेटची तल्लफ आली होती. त्याने सिगरेट पेटवायला म्हणून आपला चेहरा दुस-या बाजूला वळवला. " मी ती संधी साधली आणि त्या लोकांमधून बाहेर आलो. "

ज्यूंची गठडी वळलेली पहायला अनेक लोक तिथे आले होते. टोइव्ही त्यांच्यात जाऊन उभा राहिला, " पण माझ्या लक्षात आलं की मी फार वेळ स्वतःला वाचवू शकणार नाही कारण बहुतेक जणांना मी कोण आहे हे माहीत होतं. अगदी माझा घनिष्ठ मित्र जरी तिथे असला तरी त्याने मला ओळख दाखवू नये अशीच माझी इच्छा होती. मला तेवढ्यात माझा मित्र यानेक दिसला. तो आणि मी एकमेकांना लहानपणापासून ओळखत होतो. आमचं एकमेकांच्या घरीदेखील येणंजाणं होतं. मी लगेचच त्याच्याकडे गेलो आणि विनंती केली की नाझी निघून जाईपर्यंत तरी मला कुठेतरी लपून राहायला मदत कर. यानेकने होकार दिला आणि असं सुचवलं की सूर्योदय होऊन सगळं स्पष्टपणे दिसायला लागण्याआधी मी गावातून पळून जावं कारण एकदा दिवस उजाडल्यावर मला गायब होता येणार नाही. त्याने मला गावाबाहेर असलेल्या  शेतातल्या एका रिकाम्या कणगीत लपायला सांगितलं. त्याचं स्वतःचं घर तिथून जवळच होतं. तो म्हणाला की एक तासाभरात तो तिथे पोचेल."

टोइव्हीने सांगितल्याप्रमाणे केलं. पण तो जेव्हा त्या कणगीपाशी गेला तेव्हा त्याला तिच्या दरवाज्यावर भलंमोठं कुलूप दिसलं. तो यानेकची वाट पाहात बाहेरच थांबला. तेव्हा गावातल्याच एका ओळखीच्या कॅथलिक स्त्रीने त्याला पाहिलं आणि ती ओरडली, " टोइव्ही पळ! इथून पळून जा! "
" काय झालं? " टोइव्हीने विचारलं.
" तो बघ यानेक येतोय! "
टोइव्हीला कळेना. यानेक येतोय तर त्यात पळण्यासारखं काय आहे? पण त्याने जेव्हा वळून पाहिलं तेव्हा त्याला यानेक एका नाझी सैनिकाबरोबर येताना दिसला.
" यानेक! " टोइव्ही ओरडला, " हे काय करतो आहेस तू? "
" हाच तो मी तुम्हाला सांगितलेला ज्यू! " यानेक त्या नाझी सैनिकाला म्हणाला.

जेव्हा तो नाझी सैनिक टोइव्हीला घेऊन जायला लागला तेव्हा यानेक जे बोलला त्याने टोइव्हीच्या अंगावर सर्रकन काटा आला. पुढे आयुष्यभर हे उद्गार टोइव्हीची झोप उडवणार होते - " मी लवकरच तुझ्यापासून बनवलेला साबण दुकानात बघेन टोइव्ही! "
(ज्यूंना मारल्यावर त्यांच्या शरीरातील चरबी बाहेर काढून एस्.एस्. ती जर्मन कंपन्यांना साबण बनवण्यासाठीचा कच्चा माल म्हणून विकत असे. त्यावेळी अशी अफवा होती. नंतर ते खरं होतं हे सिद्ध झालं. जर्मन कंपन्यांना ही चरबी विकून मिळालेले पैसे एस्.एस्. ने युद्धप्रयत्नांसाठी वापरले. त्यासाठी एस्.एस्. चा खास आर्थिक विभाग होता.)

मी जेव्हा टोइव्ही ब्लाटची मुलाखत घेतली तेव्हा म्हणजे ५० वर्षांनंतरही तो ही घटना सांगताना अत्यंत अस्वस्थ झाला, " पण मला आश्चर्य नाही वाटलं. मी अशा विश्वासघातासाठी मनाची तयारी केली होती."

तो नाझी सैनिक टोइव्हीला शहराच्या मध्यभागी असलेल्या बाजारपेठेत घेऊन गेला. तेव्हा त्याला त्याची आई, वडील आणि भाऊ असे तिघेही तिथे नाझींचे कैदी म्हणून दिसले. " त्याक्षणी काहीच वाटलं नाही. मी अतिशय घाबरलो होतो. इतके दिवस नाझी मृत्युछावण्यांबद्दल ऐकलं होतं. आता तिथे नेऊन मला मारतील का आत्ताच मारतील ते काही कळत नव्हतं. मला अर्थातच मरायचं नव्हतं. मी जेमतेम १५-१६ वर्षांचा होतो."

या सगळ्यांना नंतर एका मालगाडीतून कोंबून पुढे पूर्वेकडे पाठवण्यात आलं. " आशा ही मोठी विचित्र भावना आहे," टोइव्ही म्हणाला, " आम्ही या गाड्यांविषयी ऐकलं होतं. या गाड्यांमधून लोक कुठे जातात तेही आम्हाला माहीत होतं. तरीही लोक प्रवासात हेच बोलत होते की आपल्याला नाझी मारणार नाहीत. नाझींना चामड्याची गरज आहे. आपण जिवंतपणी त्यांच्या जास्त कामी येऊ शकतो. आपण कदाचित एखाद्या श्रमछावणीत जाऊ!"

पण ब-याच तासांनी ही गाडी साॅबिबाॅर नावाच्या मृत्युछावणीत पोचली. ट्रेब्लिंकाप्रमाणेच साॅबिबाॅरलाही रेल्वे स्थानक हे मृत्युछावणीतच होतं.
टोइव्हीने नरकसमान जागेची कल्पना केली होती पण हे ठिकाण एखाद्या खेड्यासारखं टुमदार होतं. सगळ्या इमारतींना, अगदी कुंपणालाही ताजा रंग होता. सगळीकडे फुलांचे ताटवे होते. त्यावर फुलपाखरं उडत होती. रेल्वे स्थानकावर येणा-या आणि जाणा-या गाड्यांची यादी लावलेली होती.

हा सगळा बनाव आहे हा विचार टोइव्हीच्या मनात आला. इतरांनाही हळूहळू समजलं की आपल्या आयुष्याचा अंत इथे होणार आहे. साॅबिबाॅरला उतरल्यावर तिथल्या एस्.एस्. पहारेक-यांनी त्यांची दोन गटांमध्ये विभागणी केली - स्त्रिया आणि मुलं हा एक गट आणि पुरूषांचा दुसरा गट.

आज जेव्हा मृत्युछावण्यांबद्दल लोक ऐकतात तेव्हा त्यांना एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की या कैद्यांना जेव्हा समजलं की ते मरणार आहेत, तेव्हा त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रतिकार का केला नाही? इतके सगळे ज्यू कसे एवढ्या शांतपणे आपल्या मृत्यूला सामोरे गेले? त्यांनी काहीच विरोध कसा केला नाही?
जेव्हा मी युद्धोत्तर काळात जन्मलेल्या ज्यूंना, विशेषतः इझराईलमधल्या ज्यूंना भेटतो आणि हा विषय निघतो तेव्हा मला असं लक्षात येतं की हा एक वादाचा मुद्दा आहे. इझराईलमधल्या आजच्या काही  ज्यूंसाठी तर ही शरमेची गोष्ट आहे. मला एका इझरेली ज्यू माणसाने ऐकवलं होतं - " तुम्हाला वाटत असेल सगळे ज्यू गरीब बिचारे असतील तर ते चुकीचं आहे. पोलंडचे भित्रे ज्यू असतील तसे पण मी तसा नाही. मी ओल्ड टेस्टामेंटमधला, अरेला कारे करणारा ज्यू आहे. मी इतक्या सहजपणे नाझींना मला मारु दिलं नसतं! "

मला स्वतःला हा ' भित्रेपणाचा ' आरोप पटत नाही. ज्या लाखो ज्यूंनी आपले प्राण दिले त्यांच्या हौतात्म्याचा हा अपमान आहे हे माझं मत आहे. एकतर विरोध करणं अशक्य होतं. लोकांचं मानसिक खच्चीकरण करण्यामध्ये नाझींचा हात कोणीही धरला नसता. स्टॅलिनच्या रेड आर्मीच्या सैनिकांचाही आॅशविट्झ बघून थरकाप उडाला होता. एस्. एस्. चे पहारेकरी आणि सैनिक हे अत्यंत कडवे आणि कट्टर ज्यूविरोधी होते. कुणी जराही विरोध केला तर ते सरळ गोळ्या घालत. जवळजवळ सगळ्या मृत्युछावण्या या रेल्वेने जोडलेल्या होत्या आणि रेल्वे स्थानकं मृत्युछावणीतच असायची. त्यामुळे जेव्हा हे ज्यू कैदी गाडीमधून उतरायचे तेव्हा ते छावणीच्या मध्यावर असत आणि आजूबाजूला टेहळणी मनोरे असायचे. तिथले सैनिक २४ तास या कैद्यांवर नजर ठेवून असत.

आणि या सगळ्या अडथळ्यांना चकवून जर कोणी एखादा तिथून पळालाच तर पुढचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पळून जाणार कुठे? छावणीच्या आजूबाजूला जी छोटी गावं होती, तिथले लोक या पळालेल्या लोकांना पकडून परत नाझींच्या हवाली करत असत. त्यासाठी त्यांना नाझींकडून बक्षीसही मिळत असे.

अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कितीतरी ज्यू कैदी हे वृद्ध आणि आजारी होते. त्यांची तब्येत इतकी खालावलेली असे की सुटका करुन घेण्याची इच्छाच त्यांना होत नसे, आणि जरी झाली तरी शरीर साथ देत नसे. अजून एक प्रश्न होता तो म्हणजे स्त्रिया आणि मुलांचा. लिथुआनियामध्ये मला एक नाझींच्या कैदेतून यशस्वीपणे पळालेली स्त्री भेटली होती. तिने सांगितलेला एक प्रसंग मला अजून आठवतो. १९४१ मध्ये नाझींनी लिथुआनिया ताब्यात घेऊन तिथल्या ज्यूंना मारणं चालू केलं. ही स्त्री तेव्हा किशोरवयीन असेल. तिच्या गावातल्या सगळ्या ज्यूंना नाझी सैनिक गावाबाहेरच्या जंगलात घेऊन चालले होते. पण पहारेक-यांची संख्या कमी होती. या स्त्रीची गावाबाहेरच्या शेताडीतून पलायन करायची योजना होती. तिच्या शेजारून चालणा-या दुस-या एका स्त्रीला जेव्हा तिने आपल्याबरोबर यायला सांगितलं तेव्हा त्या स्त्रीने आपल्या दोन लहान मुलांकडे पाहिलं, " यांना असंच टाकून मी कशी येऊ? " तिने विचारलं.

लहान मुलं हा नाझीप्रणित ज्यू वंशसंहारातला एक निर्णायक मुद्दा होता. कुठल्याही स्त्रीने स्वतःसाठी आपल्या मुलांचा भरारी पथकांच्या बंदुकांसमोर किंवा गॅस चेंबरमध्ये बळी दिलेला नाही. आणि हे निरीक्षण कुणा इतिहासकाराचं नाही तर आॅशविट्झचा कमांडंट असलेल्या रुडाॅल्फ होएसचं आहे. आॅशविट्झ आणि इतर मृत्युछावण्यांमध्ये धडधाकट लोकांना वेगळं काढत असत. बाकीच्यांची - अपंग, आजारी, वृद्ध आणि लहान मुलं - सरळ गॅस चेंबरमध्ये रवानगी होत असे. तेव्हा स्त्रिया आपणहून आपल्या मुलांसोबत गॅस चेंबरमध्ये जात. एकाही स्त्रीने आपल्या मुलांना एकटं गॅस चेंबरमध्ये पाठवलं नाही.

साॅबिबाॅरमध्येही अशी विभागणी झाली. गॅस चेंबरमध्ये जाणा-या लोकांना बाजूला काढल्यावर तिथल्या अधिका-याने कोणी सुतारकाम करणारं आहे का असा प्रश्न विचारला. टोइव्हीने सुतार नसूनही हात वर केला, " मी मनातल्या मनात प्रार्थना करत होतो की या अधिका-याला मला निवडण्याची बुद्धी दे. आणि तसंच घडलं. "

टोइव्हीला अर्थातच फक्त सुतारकाम नाही तर सोन्डरकमांडोची इतर कामंही करावी लागली. त्यामुळे त्याची जरी मृत्यूपासून तात्पुरती सुटका झाली असली, तरी त्याला आपल्या आईवडिलांना आणि धाकट्या भावाला गॅस चेंबरमध्ये जाताना पाहावं लागलं. " मला काहीच वाटलं नाही. त्यावेळी मला त्याचं आश्चर्य वाटलं. जर माझ्या आईवडिलांपैकी कोणा एकाचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असता तर मला आत्यंतिक दुःख झालं असतं. मी अक्षरशः दिवस आणि रात्रभर रडत बसलो असतो. आणि आता माझं संपूर्ण कुटुंब एका क्षणात नष्ट झालं आणि मी एक अश्रूदेखील ढाळला नाही. युद्ध संपल्यावर मी माझ्यासारख्या इतर लोकांना भेटलो आणि त्यांना विचारलं की त्यांची प्रतिक्रिया काय होती? प्रत्येकाने मला हेच उत्तर दिलं की त्यांना रडू आलं नाही. मी याला निसर्गाने केलेलं संरक्षण म्हणतो. जर मी रडलो असतो तर गॅस चेंबरमध्ये जाणा-या पुढच्या कैद्यांमध्ये जावं लागलं असतं. "

टोइव्हीमध्ये ही स्वसंरक्षणाची प्रेरणा इतकी प्रबळ होती की त्याने सोन्डरकमांडोची मानसिक दृष्ट्या अत्यंत कठीण आणि मनाला पिळवटून टाकणारी कामंही एक प्रकारच्या विचित्र अलिप्तपणे केली. त्याचं मुख्य काम होतं गॅस चेंबरमध्ये जाणा-या स्त्रिया आणि मुलींचे केस भादरणं आणि त्यांना गॅस चेंबरच्या दरवाज्यापर्यंत सोडणं. हजारो स्त्रिया आणि मुलींना त्याने त्या दरवाज्यातून आत जाताना आणि हिरवीनिळी पडलेली प्रेतं म्हणून बाहेर येताना पाहिलं. पण त्याच्या डोळ्यांमधून अश्रू आले नाहीत.

त्याने सांगितलेला एक प्रसंग माझ्या मनात अजूनही घर करुन बसलेला आहे. एकदा छावणीच्या बाहेर गावात राहणा-या शेतक-यांनी दोन ज्यू तरुणींना पकडून आणलं होतं. दोघीही जंगलात लपलेल्या होत्या आणि शेतक-यांच्या हातात सापडल्या होत्या. छावणीतल्या एका जर्मन अधिका-याने टोइव्हीला त्या दोघींना गॅस चेंबरमध्ये न्यायला सांगितलं आणि टोइव्ही त्या दोघींना तिथे नेत असताना तो अधिकारी त्यांच्यामागोमाग येत होता.
या दोन मुलींपैकी एकीने टोइव्हीची विनवणी करायला सुरुवात केली. पण त्याच्या हातात काहीच नव्हतं. त्याने त्या दोघींनाही गॅस चेंबरच्या दरवाज्यापर्यंत सोडलं आणि तो माघारी वळला. दोन मिनिटांच्या आत दोन गोळीबाराचे आवाज ऐकू आले. फक्त दोन मुलींसाठी नाझी थोडंच गॅस चेंबर चालू करणार होते?

टोइव्हीची खात्री होती की ज्या जर्मन अधिका-याने त्याला त्या मुलींना गॅस चेंबरच्या दरवाज्यापर्यंत न्यायला सांगितलं होतं त्याची स्वतःची त्यांना तिथे नेण्याची हिंमत नव्हती. असा मानसिक त्रास सहन करणं हा सोन्डरकमांडोच्या कामाचा भाग होता.

सप्टेंबर १९४३ मध्ये साॅबिबाॅर सोन्डरकमांडोच्या नशिबाने कलाटणी घेतली. तेव्हा रेड आर्मीमधले काही सैनिक साॅबिबाॅरमध्ये युध्दकैदी म्हणून आले होते. एकतर हे सगळे सैनिक असल्यामुळे त्यांच्यात एक शिस्त आणि कणखरपणा होता. अलेक्झांडर पेचेर्स्की हा या सैनिकांमधला नेता होता. त्याच्या नेतृत्वाखाली या सैनिकांनी उठावाची तयारी केली, सोन्डरकमांडोच्या सदस्यांनाही त्यात सहभागी करुन घेतलं आणि १४ आॅक्टोबर १९४३ या दिवशी उठावाला सुरूवात केली. त्यांनी प्रथम काही पहारेक-यांचं लक्ष वेधून घेऊन त्यांना तिथल्या कारखान्यात बोलावलं आणि तिथे त्यांना ठार मारून, त्यांचे गणवेष आणि शस्त्रं घेऊन पलायन केलं. जे सोन्डरकमांडो सर्वात पहिल्यांदा काटेरी तारांच्या कुंपणाकडे पोचले त्यांनी त्या तारा तोडल्या आणि मागून येणा-यांसाठी जागा केली. त्यांच्यात टोइव्हीचाही समावेश होता. " छावणीच्या जवळ जंगल होतं. बाहेर पडल्यावर मी त्या जंगलाच्या दिशेनेच धावत सुटलो. धावता धावता दोन-तीन वेळा पडलो. मागून जर्मनांचा गोळीबार होत होता. मला वाटलं मला गोळी लागली की काय. पण तसं काही नाही हे लक्षात आल्यावर मी उठून परत पळायला सुरूवात केली. शेवटी त्या जंगलात पोचलो. "

जवळजवळ ३००-६०० सोन्डरकमांडो या सुटकेच्या प्रयत्नात सहभागी होते. पण त्यातले फार थोडे वाचले. अनेक ज्यू नसलेल्या पोलिश लोकांनी या कैद्यांना एस्.एस्.च्या हवाली केलं. जे बचावले त्यांच्यात टोइव्ही एक होता आणि जितक्या ज्यू नसलेल्या लोकांनी त्याचा विश्वासघात केला तितक्याच लोकांनी त्याला मदतही केली.

" जेव्हा तुमच्यासारखे लोक मला विचारतात की या सगळ्या अनुभवांमधून तुम्ही काय शिकलात तेव्हा माझं एकच उत्तर असतं - इतरांचं सोडा, तुम्ही स्वतःलाही ओळखू शकत नाही. एखाद्या माणसाला तुम्ही पत्ता विचारलात, तर तो कदाचित वाट वाकडी करुन तुम्हाला तो पत्ता दाखवायला येईल. पण वेगळ्या परिस्थितीत तोच माणूस तुम्हाला विकून खाईल. आपण परिस्थितीनुसार चांगले किंवा वाईट असतो. आजही जेव्हा एखादा माणूस माझ्याशी चांगला वागतो तेव्हा माझ्या मनात विचार येतो - हा साॅबिबाॅरमध्ये माझ्याशी कसा वागला असता? "

No comments:

Post a Comment