Saturday 15 November 2014

अंधार क्षण - तात्याना नानियेव्हा

एका क्षणात तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, होत्याचं नव्हतं होऊ शकतं. तात्याना नानियेव्हाच्या आयुष्यात तो क्षण २६ आॅक्टोबर १९४२ या दिवशी आला. सोविएत रशिया आणि नाझी जर्मनी यांचं युद्ध सुरू होऊन एव्हाना एक वर्षाहून जास्त काळ होऊन गेला होता. ती युक्रेनमध्ये सोविएत सैन्याच्या इस्पितळात नर्स म्हणून काम करत होती. त्या दिवशीही ती कामात होती. अचानक तिने एक थरकाप उडवणारा खडखडाट ऐकला. हळूहळू तो आवाज वाढत गेला आणि जेव्हा तिने हिंमत करुन खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा समोरचं पूर्ण क्षितिज रणगाड्यांनी व्यापलं आहे हे तिच्या लक्षात आलं. स्वच्छ सूर्यप्रकाशात त्यांचा काळा रंग उठून दिसत होता. त्या क्षणी ते जर्मन पँझर रणगाडे आहेत हे तिच्या लक्षात आलं.

त्या क्षणापर्यंतचं तिचं आयुष्य हे एका निश्चित चाकोरीतून चाललं होतं. ती कम्युनिस्ट पक्षाची सदस्य होती आणि पक्षाशी एकनिष्ठ होती, " आमच्या देशाएवढं आणि समाजाएवढं आदर्श जगात दुसरं काही असू शकेल यावर माझा विश्वासच नव्हता. मला नेहमीच देशासाठी काहीतरी करायची इच्छा होती त्यामुळे जेव्हा जर्मनांनी १९४१ मध्ये आमच्यावर आक्रमण केलं तेव्हा मी लगेचच सैन्यात स्वयंसेवक म्हणून नाव नोंदवलं. " सैन्यात गेल्यावर तिने कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आणि तिला ११ सप्टेंबर १९४२ या दिवशी पक्षाचं पूर्णवेळ सदस्यत्व आणि ओळखपत्रही मिळालं -जर्मन रणगाडे तिच्या आयुष्यात धडधडत येण्याच्या ६ आठवडे आधी.

तात्याना तेव्हा फक्त २२ वर्षांची होती पण तिला लढाईचा अनुभव होता. जर्मन सैन्य रशियन सैनिकांना कोंडीत पकडून शरण यायला भाग पाडत असे. सर्व बाजूंनी वेढल्या गेलेल्या रशियन सैनिकांसाठी सुटका करुन घेणं जवळजवळ अशक्य असे. तात्यानाच्या वैद्यकीय पथकावर बरेचदा अशी वेळ आली होती आणि आश्चर्यकारकरीत्या ते त्यातून बाहेरही पडले होते,  " अशा वेळी लोकांचं डोकं जास्त चालतं. गल्लीबोळातून, बैठ्या घरांच्या गच्च्यांमधून, जमिनीखाली असलेल्या गुप्त भुयारी मार्गाने - कशाही प्रकारे आम्ही जर्मनांच्या वेढ्यातून बाहेर पडत असू. नंतर आम्ही परत आमचं काम सुरू करायचो. "

पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. जर्मन सैनिक इतके अचानक आणि इतक्या मोठ्या संख्येने आले  होते की सुटका शक्यच नव्हती ," पण का कुणास ठाऊक, मृत्यूचा विचार माझ्या मनात आला नाही. तरीही या युद्धातून आपण वाचत नाही असं मला सारखं वाटायचं. "

" इस्पितळात जो राजकीय अधिकारी होता त्याने मला तिथून लवकरात लवकर पळून जायचा सल्ला दिला. पण जर्मनांनी पळून जायला कुठलीही जागा शिल्लक ठेवली नव्हती. सगळीकडे गोळीबार चालू होता आणि आकाशातून जर्मनांची विमानं बाँब टाकत होती. तेव्हा एक गोळी मला चाटून गेली आणि माझ्या पायाला जखम झाली. त्या क्षणी माझ्या दुर्दैवाला सुरूवात झाली. "

तिला तेव्हा आपल्याजवळचं कम्युनिस्ट पक्षाचं ओळखपत्र आठवलं. इतके दिवस कुठलाही दरवाजा जादूच्या किल्लीसारखं उघडणारं  हे ओळखपत्र आता तिच्या मृत्यूचं कारण बनू शकलं असतं कारण कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिका-यांना नाझी सापडताक्षणी ठार मारत असत. " मी माझं ओळखपत्र पर्समधून बाहेर काढलं आणि मातीमध्ये छोटा खड्डा खणून त्यात ते पुरलं. मला आठवत नाही कुठे ते पण मी ते करुन झाल्यावर हात झटकून वळले आणि जर्मन सैनिक तिथे आले आणि त्यांनी मला पकडलं. माझ्यासारखे इतर अनेक होते. आम्हा सगळ्यांना त्यांनी एका रिकाम्या घरात डांबलं. दुस-या दिवशी सकाळी जर्मन सैनिक परत आले आणि आमच्यातले जे कुणी जखमी झाल्यामुळे चालू शकत नव्हते त्यांना त्यांनी गोळ्या घातल्या. मी जखमी झाले असले तरी मला चालता येत होतं त्यामुळे माझा जीव वाचला. नंतर माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट काळ सुरू झाला. "

२६ आॅक्टोबर १९४२ या दिवसाआधी तात्याना नानियेव्हाचं आयुष्य एका सुनिश्चित मार्गावरून चाललं होतं पण यानंतर सगळंच अनिश्चित झालं. १९९८ मध्ये जेव्हा मी तिची मुलाखत घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो दिवस तिच्या स्मृतीत इतका पक्का बसला होता की, " मी आजही डोळे मिटले की मला निळं आकाश दिसतं - २६ आॅक्टोबरएवढं निळं आणि त्या पार्श्वभूमीवर उडणारी काळी जर्मन विमानं! "

नाझींनी तिची रवानगी पोलंडमधल्या युद्धकैद्यांसाठी खास बांधलेल्या छळछावणीत केली. ही छावणी दक्षिण पोलंडमधील झेस्टोचोव्हा शहराजवळ होती.
" आम्हाला तिथे पाठवल्यावर त्यांनी आम्हाला आंघोळ करायला सांगितली, मग कैद्यांचे कपडे दिले आणि मग त्यांनी सुंदर दिसणा-या मुलींना बाजूला काढायला सुरूवात केली. माझ्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. आमच्यातल्या १०-१२ मुलींना ते घेऊन गेले. थोड्या वेळाने जेव्हा या मुली परत आल्या तेव्हा त्यांच्यावर काय प्रसंग ओढवला ते आम्हाला सगळ्यांना समजलं. माझ्या नशिबाने माझ्यावर अशी वेळ कधी आली नाही."

दुस-या महायुद्धात झालेल्या बलात्काराच्या घटना या प्रामुख्याने चीन-जपान युद्धात आणि रशियन सैन्याने जर्मनीत प्रवेश केल्यावर म्हणजे जानेवारी १९४५ पासून पुढच्या काळात घडलेल्या आहेत. जपानी आणि रशियन सैनिकांनी बलात्कार केल्याचे पुरावेही आहेत. त्यामानाने नाझींनी बलात्कार केल्याच्या घटना फारच कमी आहेत. पण ते झाले हीदेखील वस्तुस्थिती आहे. आॅशविट्झ आणि चेल्मनोसारख्या मृत्युछावण्यांमध्येही बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत. तात्याना नानियेव्हाच्या मुलाखतीमुळे जर्मन श्रमछावण्या आणि युद्धकैद्यांच्या बराकींमध्येही बलात्कार होत असत ही माहिती उघड झाली. " कधीकधी तर आमच्या समोर त्यांनी इतर मुलींवर बलात्कार केले. आम्ही त्यांच्या नजरेत माणसं नव्हतोच. त्यांच्या दृष्टीने त्यांचा वंश सर्वोत्तम होता आणि आम्ही त्यांचे गुलाम होतो. "

हळूहळू काळ पुढे गेला. युद्धाचं पारडं नाझींच्या विरोधात आणि रशियनांच्या बाजूने फिरायला सुरूवात झाली. १९४३ च्या फेब्रुवारीत जर्मन सैन्याला स्टॅलिनग्राडमध्ये शरणागती पत्करावी लागली. त्याच वर्षी उन्हाळ्यात कर्स्कच्या लढाईत जर्मन सैन्याचं आणि तोफखान्याचं प्रचंड नुकसान झालं आणि १९४४ च्या उन्हाळ्यात रशियन सैन्याच्या ' आॅपरेशन बाग्रेत्सिओन ' ने बेलारुस आणि पूर्व पोलंड अवघ्या अडीच महिन्यांमध्ये मुक्त केला आणि जर्मन सैन्याला जर्मनीच्या दिशेने पश्चिमेकडे रेटायला सुरूवात केली. ३ वर्षांपूर्वी आक्रमकांच्या भूमिकेत असलेल्या नाझींवर आता आपल्या देशाच्या सीमा वाचवायची वेळ आली होती.

नाझी जरी बाहेरच्या कुठल्याही बातम्या श्रमछावण्यांमध्ये येऊ देत नव्हते तरी युद्धात जर्मनांची पीछेहाट होते आहे आणि रशियन सैन्य त्यांच्या मागावर आहे हे तात्याना आणि तिच्याबरोबर असलेल्या इतर कैद्यांना कळलं होतं, " आमचं सैन्य वाॅर्सापर्यंत आल्याचं मी ऐकलं होतं. तिथून आमची छावणी ब-यापैकी जवळ होती. आता आमची सुटका होणार होती आणि मला सामान्य माणसासारखं आयुष्य परत जगता येणार होतं. मला परत माझ्या माणसांमध्ये, माझ्या देशात परत जायचं होतं. "

शेवटी तो दिवस आला. झेस्टोचोव्हामधल्या जर्मन सैन्याने आणि एस्.एस्. सैनिकांनी रशियन सैन्यासमोर आपली शस्त्रं खाली ठेवली. " आम्हाला रेड आर्मीची विजयगीतं सगळीकडे ऐकू येत होती आणि त्यांच्या तालावर, रूबाबात आमच्या सैन्याने छावणीत प्रवेश केला. " आपल्या देशबांधवांना पाहून तात्यानाचा आनंद गगनात मावत नव्हता. तुरूंगवासातल्या हालअपेष्टा, सतत आपल्यावर बलात्कार होईल अशी भीती, इतर स्त्रियांवरचे बलात्कार पाहून होणारे मानसिक क्लेश हे सगळं शेवटी संपलं होतं. आता २६ आॅक्टोबर १९४२ च्या आधी तिचं जे आयुष्य होतं तसं तिला परत जगता येणार होतं.

पण प्रत्यक्षात काही वेगळंच घडलं. " दोन रेड आर्मीचे अधिकारी माझ्याकडे आले. त्यांच्यातला एक जण अत्यंत संतापलेला होता आणि प्यायलेलाही होता. 
' कशी काय जिवंत राहिलीस तू इथे?' तो माझ्यासमोर येऊन बरळला ' साली रांड! ' बोलता बोलता त्याने आपलं पिस्तुल काढलं. दुसरा अधिकारी जरा समजूतदार वाटत होता. त्याने या पिस्तुलवाल्याला आवरलं आणि मला तिथून निघून जायला सांगितलं. नंतर आम्हाला कळलं की त्या संतापलेल्या अधिका-याच्या बहिणीवर जर्मनांनी अत्याचार केले होते आणि तिचा गॅस चेंबरमध्ये मृत्यू झाला होता. त्याच्यासारखे अनेक सैनिक होते ज्यांनी युद्धात आपले कुटुंबीय गमावले होते आणि त्यामुळे आमच्यासारख्या जिवंत राहिलेल्या लोकांवर ते संतापलेले होते. जर्मनांनी त्याच्या बहिणीला मारलं आणि मला जिवंत ठेवलं त्यामुळे त्याच्या नजरेत मी एक वेश्या होते. "

रशियन सैन्य तिथे आल्यामुळे जो अवर्णनीय आनंद तात्यानाला झाला होता तो एका क्षणात विरून गेला. ती आणि तिच्यासारखे जे इतर होते त्यांच्यापुढे अजून एक संकट उभं होतं - त्यांच्या देशाचा सर्वसत्ताधीश जोसेफ स्टॅलिन. स्टॅलिनने असं जाहीरच केलं होतं की ' सोविएत युनियनचे कोणीही ' नागरिक ' हे जर्मनांचे युद्धकैदी नव्हते, जे होते ते सगळे सरसकट देशद्रोही आहेत. '  " जर्मनांच्या ताब्यात असलेल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना आमच्या सरकारने स्वीकारलं नाही, " तात्याना म्हणाली, " मला काही जणांनी तर असं सांगितलं की तू जर तेव्हा आत्महत्या केली असतीस तर बरं झालं असतं. आज कदाचित तुला एखादं मरणोत्तर पारितोषिक मिळालं असतं. पण जर्मनांची कैदी होऊन तू चूक केलीस. "

घरी आणि आपल्या कुटुंबियांकडे परत जाण्याऐवजी     तात्यानाला आता सोविएत छळछावणी किंवा  गुलागमध्ये जावं लागलं. तिथे एन्. के.व्ही.डी. च्या अधिका-यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. खरंतर असं म्हणणं चुकीचं आहे कारण त्यांनी तिला एकच प्रश्न सारखा विचारला , " नाझींनी तुझ्यावर काय काम सोपवलेलं आहे? "

" मी एखाद्या बाँबचा स्फोट करुन स्वतःच्या ठिक-या उडवल्या असत्या तरी त्यांचे प्रश्न चालूच राहिले असते. कोणीही माझ्या हकीगतीवर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. मी निरपराधी आहे असं मी घसा फोडून सांगितलं तरी मी कुठल्याही प्रकारे ते सिद्ध करु शकत नव्हते. "

शेवटी तिच्यावर सोविएत दंडसंहितेच्या कलम ५८ अंतर्गत आरोप निश्चित केल्याचं तिला सांगण्यात आलं. जेव्हा तिने त्याचा अर्थ विचारला तेव्हा तिला
सांगितलं गेलं - मातृभूमीशी विश्वासघात. देशद्रोह.
" त्यावेळी मात्र माझा बांध फुटला. मी वेड्यासारखी रडले. मी कुठल्याही प्रकारे देशद्रोह केला नव्हता. "

१५ मिनिटांच्या खटल्यानंतर तिला ६ वर्षांच्या सश्रम तुरूंगवासाची आणि ३ वर्षांच्या हद्दपारीची अशी एकूण ९ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.
" जर्मनांच्या कैदेपेक्षा या तुरूंगात मला जास्त त्रास झाला, " ती म्हणाली, " तेव्हा आमचे सैनिक आम्हाला सोडवतील या आशेवर मी दिवस काढले. आता मात्र कुठलीच आशा उरली नव्हती. "

१९५३ मध्ये स्टॅलिनचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्याचा उजवा हात आणि क्रौर्यात त्याच्याहून काकणभर जास्तच असलेला लावरेन्ती बेरिया सत्तेवर येईल अशी अटकळ अनेकजणांनी बांधली होती पण क्रुश्चेव्हने बाजी मारली आणि बेरियाचा अंत घडवून आणला. पुढे त्याने स्टॅलिनच्या कारकीर्दीत झालेले गुलाग आणि इतर अत्याचार यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली. स्टॅलिनच्या काळात तुरूंगात गेलेल्या ब-याच कैद्यांची सुटकाही करण्यात आली. तात्यानाचा तुरूंगवास अखेरीस संपुष्टात आला.

ती युक्रेनला परत आली आणि तिला नोकरीदेखील मिळाली पण तुरुंगवासाच्या कलंकामुळे तिला कमी पगारावर काम करावं लागलं. जर्मन आणि रशियनांप्रमाणे तिच्या आयुष्यानेसुद्धा तिला दयामाया दाखवली नाही.

मी तिची मुलाखत १९९८ मध्ये घेतली तेव्हा जर्मन तुरूंग आणि गुलागमधल्या हालअपेष्टांचे परिणाम आणि वार्धक्य यामुळे ती पुरती खचून गेली होती.
" माझं काही खरं नाही, " ती मला म्हणाली, " भूक आणि उपासमार यामुळे माझी हाडं ठिसूळ झाली आहेत. पाठीचा कणा आणि कंबर तर कामातून गेलेले आहेत. "

पण भूतकाळातल्या वेदनांपेक्षा भविष्यकाळाची भीषणता तिला जास्त भेडसावत होती. कीव्हच्या एका उपनगरात ती आपल्या अपंग पतीबरोबर राहात होती. युक्रेनमधला हिवाळा जरी रशियाएवढा कडक नसला तरी तो आपलं अस्तित्व जाणवून देत होता आणि तिच्या घरात थंडीपासून बचाव करण्याची काहीही व्यवस्था नव्हती.
" आम्ही कधीही मरू शकतो आणि आमच्याकडे आमच्या दफनासाठीही आता पैसे उरलेले नाहीत. मला असं बेवारशी मरण येईल याचीच सर्वात जास्त भीती वाटते. "

तिच्या घराची एकंदरीत अवस्था बघता मला हे अशक्य वाटत नव्हतं. माझ्या सहका-यांनी आणि मी चौकशी करुन कीव्हमध्ये दफनविधीचा खर्च किती येतो हे शोधून काढलं आणि तिच्या घरी ते पैसे पोहोचते केले. मी तिची मुलाखत घेतल्यानंतर काही आठवड्यांतच ती मरण पावल्याचं मला समजलं.

मी जेव्हा शाळेत आणि महाविद्यालयात दुस-या महायुद्धाचा इतिहास शिकलो तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की १९४५ मध्ये युद्ध संपलं. त्या वर्षी दोस्त राष्ट्रांनी नाझीवादाला मूठमाती दिली आणि नव्या युगाची सुरूवात केली. पण तात्याना नानियेव्हा आणि तिच्यासारख्या हजारो रशियन युद्धकैद्यांसाठी १९४५ मध्ये काहीच बदल झाला नाही, फक्त तुरूंग बदलला. मला वाटतं तिला मृत्यूनेच तिच्या हालअपेष्टांमधून मुक्ती मिळवून दिली.

No comments:

Post a Comment