Sunday, 10 April 2016

मोसाद

१७ ऑगस्ट १९६६. इझराईलच्या उत्तरेला असलेल्या हात्झोर एअरफोर्स बेसवर असलेल्या रडार यंत्रणेच्या पडद्यावर एक छोटा ठिपका अवतीर्ण झाला. कुठलंतरी विमान इझराईलच्या हवाई हद्दीच्या जवळ येत होतं. आश्चर्याची गोष्ट ही होती, की बहुतेक वेळा असं झाल्यावर इझराईलची मिराज विमानं या आगंतुक विमानाला घेरण्यासाठी हवेत झेपावली असती. पण यावेळी मात्र तसं काहीही झालं नाही. हे विमान इझराईलच्या हद्दीत येईपर्यंत इझरेली वायुदलाने काहीही हालचाल केली नाही.

त्या विमानाकडे पाहून हात्झोर बेसवरच्या प्रत्येकाला धक्का मात्र बसला, कारण ते विमान होतं रशियन बनावटीचं मिग २१. त्यावेळचं अत्याधुनिक आणि घातकी लढाऊ विमान. बलाढ्य अमेरिकेकडेसुद्धा असं विमान नव्हतं. कशासाठी आलं होतं हे विमान इझराईलमध्ये?

याची सुरुवात झाली होती ३ वर्षांपूर्वी. १९६३ मध्ये पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन आणि तत्कालीन मोसाद संचालक इसेर हॅरेल यांच्यात झालेल्या वादानंतर हॅरेलने राजीनामा दिला आणि पंतप्रधानांना त्याच्या जागी नवीन मोसाद संचालकाची निवड करावी लागली. त्यांच्यासमोर त्यावेळी दोन पर्याय होते – शाबाकचा म्हणजे इझरेली प्रतिहेरखात्याचा संचालक अमोस मॅनॉर आणि अमानचा म्हणजे सैनिकी गुप्तचर संघटनेचा संचालक मायर अमित. मॅनॉर नेमका त्याच वेळी नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला असल्यामुळे त्याच्याशी संपर्क साधता आला नाही, त्यामुळे अमान संचालक मायर अमितची मोसादच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली.

अमितच्या नेमणुकीमुळे मोसादमध्ये आमूलाग्र बदल घडून आला. त्याच्याआधी संचालक असलेल्या रूव्हेन शिलोह आणि इसेर हॅरेल यांच्यात आणि अमितमध्ये काही मूलभूत फरक होते. शिलोह आणि हॅरेल या दोघांचाही जन्म ज्यूविरोधी वातावरण असलेल्या भागात झाला होता. शिलोहचा जुन्या जेरुसलेममध्ये तर हॅरेलचा रशियामध्ये. त्यांच्या जन्माच्या वेळी इझराईल ही फक्त एक संकल्पना होती, किंबहुना दोघेही इझराईलला वास्तव बनवण्यासाठी ज्या पिढीने कष्ट घेतले, त्या पिढीचे होते. त्याउलट मायर अमित हा साब्रा म्हणजे पॅलेस्टाईनमधल्या ज्यूबहुल भागात जन्माला आलेला होता. शिलोह आणि हॅरेल यांची पार्श्वभूमी हेरगिरीची होती. दोघेही गुप्त कामगिऱ्यांमध्ये अत्यंत मुरलेले होते. अमितला अशी काहीही पार्श्वभूमी नव्हती. तो त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षी हॅगन्हामध्ये भरती झाला आणि जेव्हा हॅगन्हाचं इझरेली सैन्यात रूपांतर करण्यात आलं तेव्हा तो बटालियन कमांडर होता. इझराईलच्या स्वातंत्र्ययुद्धात काही काळ ब्रिटीश सैन्याविरुद्ध आणि नंतर अरब सैन्याविरुद्ध लढण्याचा त्याला अनुभव होता. त्याचं एकंदरीत कर्तृत्व बघता तो इझरेली सैन्याचा प्रमुखसुद्धा होऊ शकला असता, पण नेगेव्हच्या वाळवंटात सराव करत असताना त्याला एक मोठा अपघात झाला आणि दोन वर्षे सक्तीची विश्रांती घ्यायला लागली. या विश्रांतीच्या काळातच त्याने अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठातून एम.बी.ए. पूर्ण केलं आणि तिथून परत आल्यावर त्याची अमानचा प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आणि १९६३ मध्ये तो मोसाद संचालक बनला.

इसेर हॅरेलच्या राजीनाम्यामागे जरी अमितचा काहीही हात नसला, तरी इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांच्याबद्दल अमानने बनवलेल्या रिपोर्टमुळे हॅरेलला राजीनामा द्यावा लागला हे मोसादमध्ये षट्कर्णी झालं होतंच. परिणामी मोसाद संचालक झाल्यावर अमितला प्रचंड अंतर्गत विरोधाला तोंड द्यावं लागलं. मोसादमधले काही जण हॅरेलशी एकनिष्ठ होते. त्यांनी अमितच्या हाताखाली काम करायला नकार दिला. या लोकांपैकी काहींनी तर अमितची नियुक्ती झाल्यावर लगेचच राजीनामे दिले.

इकडे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियनसाठीही इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञांचं प्रकरण अंगाशी येणारं ठरलं. त्यांनाही जून १९६३ मध्ये राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्याजागी त्यांचे जवळचे सहकारी लेवी एश्कोल पंतप्रधानपदी आले. त्यांनी इसेर हॅरेलची आपला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक केली. हॅरेल त्याला मोसादमधून ज्या परिस्थितीत जावं लागलं त्यामुळे संतापलेला होताच. अमितची बदनामी होईल अशा संधीच्या तो शोधात होता, आणि लवकरच त्याला तशी संधी मिळाली.

आपण ज्याला अरब जग म्हणतो, त्यातले बरेचसे देश हे मध्यपूर्व किंवा पश्चिम आशियामध्ये आहेत, पण अरब जगाचा एक महत्वाचा भाग हा उत्तर आफ्रिकेतही पसरलेला आहे. या भागाला माघरेब किंवा मघरीब असं म्हणतात आणि त्यात मॉरिटानिया, मोरोक्को, ट्युनिशिया, अल्जीरिया आणि लिबिया या पाच देशांचा समावेश होतो. एक लिबिया सोडला तर बाकीचे चार देश हे दुसऱ्या महायुद्धापर्यंत आणि त्याच्यानंतर काही काळ फ्रेंच साम्राज्याचा भाग होते. या देशांमध्ये आर्थिक दृष्ट्या सर्वात संपन्न देश म्हणजे मोरोक्को. फ्रेंच प्रभाव आणि त्याशिवाय भूमध्य समुद्राचा किनारा असल्यामुळे युरोपशी व्यापार आणि पर्यटन यामुळे मोरोक्को सर्व अरब देशांमध्ये आधुनिक असा देश होता, आणि तिथला राजा हसन याने फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जाणीवपूर्वक आपल्या देशाचं हे स्वरूप टिकवून ठेवलं होतं. नेमकं तेच इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष नासरला खटकत होतं. १९५६ च्या सुएझ संघर्षानंतर नासर ब्रिटन आणि फ्रान्स यांचा कट्टर विरोधक बनला होता. त्यात त्याला सोविएत रशियाचं लष्करी आणि आर्थिक पाठबळसुद्धा होतं. हसनला त्यामुळे नासर आपल्याला मार्गातून बाजूला काढून मोरोक्कोमध्ये स्वतःचा कोणीतरी हस्तक आणून बसवेल अशी सार्थ भीती वाटत होती. त्यात १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला मोरोक्कोच्या शेजारचा अल्जीरिया स्वतंत्र झाला आणि तिकडे पुराणमतवादी सरकार स्थापन झालं. त्यामुळे मोरोक्कोला अजूनच धोका निर्माण झाला.

राजा हसनने यावर उपाय म्हणून एक अतर्क्य गोष्ट केली. त्याने १९६३ च्या उत्तरार्धात गुप्तपणे मोसादशी संपर्क साधला.

मोसादमध्ये याच्यामुळे एकच खळबळ उडाली. एक अरब देश आणि इझराईलकडून मदत मागतोय? काही लोकांच्या मनात तर हा इजिप्त किंवा सीरिया यांचा इझरेली हेरांना सापळ्यात अडकवण्याचा डाव असावा असाही विचार आला. पण मायर अमितला तसं वाटलं नाही. त्याने रफी एतान आणि डेव्हिड शोमरॉन या दोघांना स्विस पासपोर्टवर मोरोक्कोची राजधानी राबात इथे पाठवलं. तिथे गेल्यावर हसनची ही मागणी खरी असल्याचं या दोघांना समजलं. राबातमध्ये त्यांचा सामना झाला तो पोलादी पुरुष म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोरोक्कन गृहमंत्री जनरल मोहम्मद ओफ्कीरशी. ओफ्कीरचा मोरोक्कोमध्ये प्रचंड दरारा होता. त्याचबरोबर त्याची राजघराण्यावरची निष्ठाही जबरदस्त होती. राजाचे अनेक शत्रू आणि विरोधक मोरोक्कोमधून अचानक गायब होण्यात ओफ्कीरचा खूप मोठा हात होता, पण तसं उघडपणे बोलून दाखवण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती.

ओफ्कीर आणि एतान यांच्यात झालेल्या करारानुसार मोसाद मोरोक्कोच्या गुप्तचर संघटनेला प्रशिक्षण देईल आणि त्याच्या मोबदल्यात मोरोक्को मोसाद एजंट्सना पूर्ण संरक्षण – वेळप्रसंगी राजनैतिक संरक्षण देईल असं ठरलं. राजा हसनने या कराराला मंजुरी दिली आणि अरब जगात मोसादला पहिला मित्र मिळाला.

या भेटीनंतर काही महिन्यांनी ओफ्कीर स्वतः इझराईलमध्ये आला. त्याला इझराईलकडून एक अत्यंत खास कामगिरी करून घ्यायची होती.

मोरोक्कोच्या स्वातंत्र्यसंघर्षात फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळवणं आणि राजेशाही संपुष्टात आणणं हे दोन मुद्दे होते. त्यातला पहिला प्रत्यक्षात आला होता पण दुसरा अजून शिल्लक होता. मोरोक्कन स्वातंत्र्यसैनिकांच्या मते अजूनही त्यांचा स्वातंत्र्यलढा चालू होता. या स्वातंत्र्यसैनिकांचा प्रमुख होता मेहदी बेन बार्का. त्याला १९६२ मध्ये राजाविरुद्ध कट करण्याच्या आरोपावरून मोरोक्कोमधून हद्दपार करण्यात आलं होतं. पण त्यामुळे त्याच्या कारवाया थांबल्या नव्हत्या. त्यामुळे १९६३ मध्ये त्याला त्याच्या अनुपस्थितीत मृत्यूदंडही ठोठावण्यात आला होता.

बेन बार्का पॅरिसमध्ये आहे एवढं ओफ्कीरला समजलं होतं. पण तो नक्की कुठे आहे हे माहित नव्हतं. बेन बार्कालाही आपल्या जिवाला असलेल्या धोक्याची कल्पना होतीच त्यामुळे तोही त्याच्या कारवाया लपूनछपूनच करत असे. मोसादने त्याला शोधून मोरोक्कन गुप्तचरांच्या ताब्यात द्यावं अशी ओफ्कीरची मागणी होती.

मोसादने ताबडतोब मदत केली. आपल्या sayan network च्या माध्यमातून त्यांनी बेन बार्का फ्रान्समधून आता स्वित्झर्लंडमध्ये गेल्याचं शोधून काढलं. पॅरिसमध्ये बेन बार्काची एक मैत्रीण होती. तिने लिहिलेलं एक पत्र मोसाद एजंट्सना मिळालं आणि त्यांनी त्यावरून तिच्या हस्ताक्षराची नक्कल केली आणि बेन बार्काला पॅरिसला बोलावलं. या पत्रात असं लिहिलेलं होतं, की एका धनाढ्य मोरोक्कन माणसाला मोरोक्कोमधली राजा हसनची राजवट पसंत नाही आणि तिथे राज्यक्रांती होऊन समाजवादी सरकार प्रस्थापित व्हावं अशी त्याची इच्छा आहे. त्या संदर्भात त्याला बेन बार्काला प्रत्यक्ष भेटायचं आहे. हे बेन बार्काला कळल्यावर तो लगेचच स्वित्झर्लंडमधून पॅरिसमध्ये आला. त्याला या पत्रात सीन नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या ब्रासेरी लिप या प्रसिद्ध रेस्तराँमध्ये भेटायला बोलावण्यात आलं होतं. याच रेस्तराँच्या दरवाज्यात त्याला अटक करण्यात आली. अटक करणाऱ्या फ्रेंच पोलिस अधिकाऱ्यांना ओफ्कीरने पैसे दिलेले होते. त्याला जागून त्यांनी बेन बार्काला ओफ्कीरच्या माणसांच्या हवाली केलं. त्यानंतर बेन बार्का बेपत्ता झाला. नंतर जेव्हा त्याच्या अपहरणात सहभागी असलेल्या फ्रेंच अधिकाऱ्यांना अटक झाली तेव्हा साक्षीदार म्हणून आलेल्या जॉर्जेस फिगोन नावाच्या एका माणसाने आपण ओफ्कीरने बेन बार्काला चाकूने ठार मारल्याचं प्रत्यक्ष पाहिल्याचं कोर्टात सांगितलं. इझराईलमध्ये तर ही बातमी बेन बार्काच्या अपहरणाच्या दुसऱ्या दिवशीच मायर अमितला मिळाली आणि त्याने तातडीने ती पंतप्रधान एश्कोलना दिली.

फ्रान्समध्ये ही बातमी पसरल्यावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जनरल चार्ल्स डी गॉल प्रचंड संतापले. जेव्हा त्यांना मोसादच्या या प्रकरणातल्या सहभागाबद्दल समजलं, तेव्हा त्यांनी फ्रान्स इझराईलला देत असलेली लष्करी आणि आर्थिक मदत एकतर्फी बंद केली. इझराईलमध्येही याचे पडसाद उमटले. इसेर हॅरेलसाठी ही सुवर्णसंधी होती. त्याने प्रसारमाध्यमांतून मोसादवर आणि अमितवर राळ उडवायला सुरुवात केली. असल्या गुन्ह्यामध्ये मोसादसारखी संस्था सहभागी होऊच कशी शकते? फ्रान्ससारख्या इझराईलच्या जुन्या मित्राला असा दगा देणं मोसादला शोभत नाही, अमितने या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे, वगैरे वगैरे.

पंतप्रधान एश्कोलनी सर्व लोकशाही देशांची सरकारं अशावेळी जे करतात तेच केलं. एक चौकशी समिती नेमली. या समितीने अमितला निर्दोष घोषित केलं. त्यांच्या मते मोसादची जबाबदारी बेन बार्काला ओफ्कीरच्या लोकांच्या हवाली करण्यापर्यंत मर्यादित होती. पुढे ओफ्कीरने जे केलं, त्याच्याशी मोसादचा काहीही संबंध नव्हता.

पण यामुळे अमितची बदनामी झालीच. त्यातच मे १९६५ मध्ये सीरियामध्ये इझरेली हेर एली कोहेनला फासावर चढवण्यात आलं. या दोन्हीही घटनांमुळे मोसादमधलं वातावरण अत्यंत नकारात्मक बनलं होतं. ते परत रूळावर आणण्यासाठी एखाद्या नेत्रदीपक यशस्वी कामगिरीची गरज होती.

अमितच्या सुदैवाने त्याला हे करण्याची दुहेरी संधी मिळाली.

१९६५ च्या शेवटी मोसादने अरब जगात अजून एक मित्र शोधला - इराकमधले कुर्द जमातीचे लोक. इराकमध्ये लोकसंख्येचे तीन प्रमुख गट होते (अजूनही आहेत पण आता परिस्थिती वेगळी आहे) – राज्यकर्ते असलेले सुन्नी मुस्लीम, धार्मिकदृष्ट्या इराणला जवळ असलेले शिया मुस्लीम आणि अनेक शतकांपासून इराकी राज्यकर्त्यांशी आपल्या स्वातंत्र्यासाठी झगडत असलेले कुर्द. या कुर्द बंडखोरांचा नेता होता मुल्ला मुस्तफा बर्झानी. त्याच्याशी मोसादने संपर्क साधला होता. इराक त्यावेळी आपल्या प्रचंड तेलसाठ्यातून मिळणारे पैसे सीरिया आणि इजिप्तला रशियन शस्त्रास्त्रं विकत घेण्यासाठी कर्जाऊ देत होता आणि ही शस्त्रास्त्रं इझराईलविरुद्ध वापरली जाणार होती, याबद्दल मोसादची खात्री होती. मोसादने या कुर्द बंडखोरांना शस्त्रं आणि प्रशिक्षण देऊ केलं होतं. ते वापरून ते इराकी सरकारविरुद्ध त्यांचा लढा तीव्र करतील आणि त्यामुळे इराकी सरकारचं लक्ष त्याकडे राहील, त्यांना या युद्धामुळे आर्थिक भार होईल आणि परिणामी इराककडून सीरिया आणि इजिप्तला मिळणारी आर्थिक मदत कमी होईल किंवा बंद होईल असा मोसादचा अंदाज होता. त्याचबरोबर जागतिक स्तरावर कुर्द लोकांची बाजू मांडायचं आणि इराकी सरकारकडून त्यांच्यावर होत असणारे अत्याचार आणि दडपशाही प्रसारमाध्यमांतून जगभर पोचवण्याचं आश्वासनही इझराईलच्या सरकारने मोसादच्या माध्यमातून कुर्द बंडखोरांना दिलं.

एकीकडे हे चालू असतानाच मायर अमितपुढे दुसरी संधी चालून आली.

अमित जरी आता मोसादचा संचालक असला, तरी त्याचे गुप्तचर संघटनांमध्ये कुणीही मित्र नव्हते. जे होते ते सगळे सैन्यात होते. त्यातला एक होता नंतर इझराईलचा राष्ट्रपती झालेला आणि त्यावेळी इझरेली वायुदलाचा प्रमुख असलेला एझेर वाईझमन. तो आणि अमित आपापल्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे बरेच दिवस भेटू शकले नव्हते.

वाइझमनने अमितला एके दिवशी न्याहारीसाठी बोलावलं आणि तिथे बॉम्ब टाकला – मोसाद इझरेली वायुदलाला एक मिग २१ विमान मिळवून देऊ शकेल का?

अमितने त्याच्या आत्मचरित्रात हा प्रसंग लिहिलेला आहे –

मी एझेरकडे रोखून पाहिलं आणि त्याला स्पष्टपणे विचारलं, “डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? कुठल्याही नाटो देशाकडे हे विमान नाहीये.”
एझेरचा तोच मुद्दा होता, “ पण ते आजच्या घडीला उपलब्ध असलेलं सर्वात आधुनिक, सर्वात वेगवान आणि सर्वात घातकी लढाऊ विमान आहे, आणि सोविएत रशियाने ते अनेक अरब राष्ट्रांना दिलेलं आहे, ज्यांच्यात इजिप्त आणि सीरिया यांचाही समावेश आहे. आम्हाला त्यामुळेच हे विमान हवं आहे. तू करता येतील तेवढे प्रयत्न कर.”

अमितने मोसादमध्ये याआधी कोणी मिग विमान मिळवण्याचा प्रयत्न केला आहे का, ते बघितलं. रेहाविया वार्दी नावाच्या एका एजंटने इजिप्त आणि सीरियामधून मिग २१ मिळवण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होते. त्या संदर्भात त्याची अरब जगात वावरणाऱ्या अनेक शस्त्रास्त्र दलालांशी आणि याच क्षेत्रातल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी ओळख झाली होती. अमितला भेटल्यावर वार्दीने परत एकदा मिग २१ मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. आणि त्याला एक धागा मिळाला.

१९६३ मध्ये, अमितची मोसादच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर दोन महिन्यांनी, सलमान नावाच्या एका माणसाने इझराईलच्या पॅरिसमधल्या वकिलातीत जाऊन तिथे एक टेलिफोन नंबर दिला होता आणि त्याच्याबरोबर एक अत्यंत विचित्र संदेशही होता – कोणाला तरी बगदादला पाठवा, या नंबरवर फोन करा, योसेफशी बोला आणि दहा लाख डॉलर्स तयार ठेवा. तुमचं मिग तुम्हाला मिळेल.

हा संदेश सलमानने ज्याला दिला, त्याला सुदैवाने तो विचित्र वाटला नव्हता म्हणून त्याने तो वकिलातीतल्या मोसाद प्रतिनिधीला दिला होता. पण पुढे त्यासंदर्भात काहीही झालं नव्हतं.

आता अमितपुढे प्रश्न होता – हा संदेश आता – दोन वर्षांनंतर कितपत विश्वासार्ह आहे? हा नंबर ज्याचा होता, त्याचं आता काय झालंय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शंका – यात कितपत तथ्य आहे? कशावरून हा इराकी गुप्तचर खात्याचा इझरेली हेरांना पकडण्याचा डाव नाहीये? अमितच्या डोक्यात त्याच वेळी एक विचार आला – हा योसेफ जर इराकमध्ये असेल, आणि त्याने सलमानकडून इझराईलच्या पॅरिसमधल्या वकिलातीत संदेश ठेवला असेल, तर असंच त्याने इझराईलच्या बाकीच्या वकिलातींमध्येही केलं असेल.

त्याचा अंदाज बरोबर होता. इराणमधल्या इझरेली वकिलातीत असलेल्या याकोव्ह निमरोदी नावाच्या एका मोसाद अधिकाऱ्याला असाच संदेश मिळाला होता. त्याने कुतूहल म्हणून योसेफचा पाठपुरावा केला होता आणि त्याला शोधून काढलं होतं. पण पुढे काही न समजल्यामुळे हे प्रकरण याच्यावरच थांबलं होतं. अमितला हे समजल्यावर त्याने योसेफला कामाला लावायचा आदेश निमरोदीला दिला.

योसेफचं पूर्ण नाव होतं योसेफ शेमेश. तो इराकी ज्यू होता. तो आणि सलमान यांचं दूरचं नातं होतं. निमरोदीने अर्थातच त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकला नाही. त्याने योसेफला इराकमध्येच काही कामं करायला लावली आणि खात्री पटल्यावरच मिग विमानाचा विषय काढला.

बगदादमध्येच योसेफची कॅमिल नावाची एक मैत्रीण होती. ती ख्रिश्चन होती आणि तिच्या बहिणीचं लग्न मुनीर रेदफा नावाच्या एका माणसाशी झालं होतं. तोही ख्रिश्चन होता, इराकी वायुदलामध्ये पायलट होता, मिग २१ विमान जवळजवळ दररोज चालवत होता आणि त्या कामाला वैतागलेला होता. त्याच्या वैताग आणि संतापामागे दोन कारणं होती – तो ख्रिश्चन असल्यामुळे कितीही चांगला पायलट असला, तरी त्याला पुढे जायची संधी मिळणार नव्हती. तो फ्लाईट लेफ्टनंटच राहिला असता. स्क्वाड्रन लीडर बनण्याची संधी त्याला कधीच मिळू शकली नसती. महत्वाकांक्षी रेदफाला हे खटकत होतंच.

दुसरं कारण म्हणजे त्याला कुर्द लोकांच्या खेड्यांवर बॉम्बहल्ले करायला पाठवलं जात होतं. या खेड्यांमधले सगळे कर्ते पुरुष युद्धावर किंवा शेती करायला जात. त्यामुळे गावांमध्ये फक्त म्हातारे लोक, स्त्रिया आणि मुलं एवढेच असायचे. त्यांच्यावर बॉम्बहल्ला करणं त्याच्या मनाला पटत नव्हतं. त्यामुळे इराकमध्ये राहण्यात काहीही अर्थ नाही अशी त्याची धारणा बनत चालली होती.

कॅमिलचा मित्र म्हणून रेदफा योसेफला ओळखत होता. योसेफने हळूहळू त्याच्याशी मैत्री वाढवायला सुरुवात केली आणि एक दिवस सुट्टीसाठी म्हणून ग्रीसला जायचा प्रस्ताव मांडला. रेदफाला रजा मिळणं शक्यच नव्हतं. तेव्हा योसेफने त्याला आपण आपल्या आजारी पत्नीला घेऊन ग्रीक डॉक्टरांना भेटायला चाललो आहोत असं सांगण्याचा सल्ला दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कारणास्तव रेदफाला रजा मिळाली आणि तो आपल्या पत्नी आणि मुलांसह ग्रीसची राजधानी अथेन्स येथे गेला. योसेफ आणि कॅमिलही त्यांच्याबरोबर होते.

अथेन्समध्ये कर्नल झीव्ह लीरॉन त्यांना भेटला. लीरॉन इझरेली वायुदलाच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख होता. मुनीर रेदफाच्या तांत्रिक ज्ञानाविषयी खात्री करून घेणं हे त्याचं काम होतं. त्याने रेदफाला आपण पोलिश पायलट असल्याचं आणि एका कम्युनिस्टविरोधी संघटनेसाठी काम करत असल्याचं सांगितलं. रेदफाला बऱ्याच वर्षांनी एखाद्या पायलटशी इतक्या मोकळेपणाने बोलता येत होतं. त्याने त्याच्या मनातले सगळे विचार लीरॉनला सांगितले.

रेदफाच्या सुट्टीमधला शेवटचा टप्पा होता ग्रीसच्या जवळ असलेल्या क्रीट बेटावरचा एक कँप. लीरॉन तिथेही रेदफाला भेटला, आणि आता त्याने या संपूर्ण प्रकरणातल्या सर्वात महत्वाच्या आणि नाजूक भागाला सुरुवात केली.
क्रीटवरून रेदफा आणि त्याच्या कुटुंबाला इराकला परत जायला एक आठवडा होता. तिथे आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी लीरॉनने रेदफाकडे हा विषय काढला.

“जर तू तुझं विमान घेऊन इराकबाहेर पळून गेलास तर काय होईल?” लीरॉनने आपण पोलंडमधून तसंच पळून आल्याचं रेदफाला सांगितलं होतं.

“ते मला ठार मारतील.” रेदफा शांतपणे म्हणाला.

“का? तू दुसऱ्या एखाद्या देशामध्ये आश्रय घेऊ शकतोस.”

“मला कोण आश्रय देईल?” रेदफा खिन्न सुरात म्हणाला.

“एक देश आहे,” लीरॉन म्हणाला, “इझराईल. ते तुझं अगदी मनापासून स्वागत करतील.”

मुनीर रेदफाने आपल्या या नवीन मित्राकडे रोखून पाहिलं, “आणि हे तुला कसं माहित?”

“कारण मी पोलिश नाही, इझरेली आहे.” असं म्हणून रेदफाला काही बोलायची संधी न देता लीरॉन तिथून उठला, “ आपण उद्या सकाळी बोलू.” आणि तो निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी रेदफानेच लीरॉनशी संपर्क साधला, “ मी तयार आहे.” तो म्हणाला. दोघांनी भेटायची वेळ ठरवली. लीरॉनला अजूनही रेदफाची खात्री वाटत नव्हती, त्यामुळे त्यांच्या भेटायच्या वेळेच्या एक तास आधी येऊन त्याने कोणी इराकी अधिकारी येत नाही ना याची खात्री करून घेतली आणि मग तो रेदफाला भेटला.

या भेटीमध्ये लीरॉनने त्याच्याशी या सगळ्या कामगिरीबद्दल अगदी सखोल चर्चा केली. त्याला मायर अमितने रेदफाला एका ठराविक रकमेची ऑफर द्यायला आणि जर रेदफा कबूल झाला नाही, तर ती रक्कम दुप्पट करायला सांगितलं होतं पण रेदफाने पहिली रक्कम मान्य केली. खरं सांगायचं तर त्याला पैशांची अपेक्षा नव्हती. त्याला फक्त एका गोष्टीची खात्री हवी होती – त्याचं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे. लीरॉनने त्याला तशी खात्री दिली.

क्रीटवरून लीरॉन आणि रेदफा गुप्तपणे रोमला गेले. तिथे त्यांना येहुदा पोरात हा मोसाद अधिकारी भेटला. तो, लीरॉन आणि रेदफा या तिघांनी एकमेकांच्या सम्पर्कात राहण्यासाठी एक कोड ठरवलं. त्यानुसार ज्या दिवशी संध्याकाळी कोल इझराईल या रेडिओ स्टेशनवर “ मरहब्बते मरहब्बते “ हे लोकप्रिय अरेबिक गाणं लागेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी रेदफाने मिग २१ विमान घेऊन तिथून निघावं असंही ठरलं.

हे सगळं चालू असताना मोसाद एजंट्सचं आपल्यावर बारीक लक्ष आहे याची रेदफाला अजिबात जाणीव नव्हती. स्वतः अमित रेदफाला पाहण्यासाठी रोमला आला होता. रेदफा, लीरॉन आणि पोरात जिथे बसले होते, त्याच्या बाजूच्या टेबलवर अमित त्याच्या काही सहकाऱ्यांबरोबर बसला होता. ते जरी अत्यंत हलक्या आवाजात बोलत होते, तरी अमितच्या कानांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐकू जात होत्या. जेव्हा रेदफा विश्वासार्ह आहे अशी त्याची खात्री पटली, तेव्हा तो आणि त्याचे सहकारी तिथून निघून गेले. रेदफाला अर्थातच हे काहीही समजलं नाही.

पण त्याची परीक्षा अजूनही संपली नव्हती. त्याच रात्री लीरॉन रेदफाबरोबर अथेन्सला परतला. आता दोन दिवसांनी रेदफाची सर्वात कठीण परीक्षा होणार होती – त्याला अचानक, कल्पनाही न देता तेल अवीवला पाठवण्यात येणार होतं.

या वेळी झालेल्या एका गडबडीने हे संपूर्ण ऑपरेशन संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला. होता. लीरॉन आणि रेदफा अथेन्स विमानतळावर एकमेकांच्या बरोबर नव्हते, त्यामुळे रेदफा चुकून कैरोला जाणाऱ्या विमानात गेला. इकडे लीरॉन जेव्हा तेल अवीवला जाणाऱ्या विमानात चढला, तेव्हा त्याला रेदफा तिथे दिसला नाही. विमान उड्डाणाची वेळ झाली तरीही तो आला नाही म्हटल्यावर लीरॉनचं धाबं दणाणलं. पण तो प्रयत्नपूर्वक शांत राहिला. १०-१५ मिनिटांनी, विमानाचा दरवाजा बंद व्हायच्या वेळी रेदफा धावत धावत विमानात शिरला. कैरोच्या फ्लाईटवरच्या लोकांनी सगळ्या प्रवाशांना मोजलं होतं आणि जेव्हा त्यांना एक जास्तीचा प्रवासी मिळाला होता, तेव्हा त्यांनी तिकिटं तपासून पहिली होती आणि मग रेदफाला तेल अवीवला जाणाऱ्या विमानाकडे पाठवलं होतं.

रोमप्रमाणेच तेल अवीवमध्येही रेदफा फक्त २४ तास होता. त्याला त्याचा बगदादपासून इझराईलपर्यंतचा मार्ग समजावून सांगण्यात आला आणि रोममध्ये लीरॉन आणि पोरात यांनी त्याच्याबरोबर ठरवलेल्या कोडचीही उजळणी त्याच्याकडून करून घेण्यात आली.

तेल अवीवमधून दुसऱ्या दिवशी रेदफा अथेन्सला आणि तिथून क्रीटला गेला आणि तिथून आपल्या कुटुंबाबरोबर बगदादला परत गेला.

बगदादला परत गेल्यावर साधारण दोन महिन्यांनंतर तो इझराईलला येणार होता. या मधल्या काळात मोसादने ब्रिटनच्या एम.आय.५ आणि अमेरिकेच्या सी.आय.ए.बरोबर संपर्क साधून त्याच्या नातेवाइकांना ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा इथे आश्रय मिळवून देण्यासाठी हालचाली सुरु केल्या. आपल्या एकही नातेवाईकाला इराकी राजवटीकडून त्रास होऊ नये अशी रेदफाची इच्छा आणि ही कामगिरी स्वीकारण्याआधीची अट होती. त्याचं स्वतःचं कुटुंब – त्याची पत्नी आणि दोन मुलं – इझराईलला येणार होते. त्याच्या पत्नीला याबद्दल काहीही माहित नव्हतं. तिला त्याने आपल्याला युरोपमध्ये नवीन नोकरी मिळाल्याचं सांगितलं होतं. त्याच्या नातेवाइकांना इराकी गुप्तचर संघटनेला संशय न येऊ देता बाहेर काढणं हे मोसादपुढचं मोठं आव्हान होतं. त्यात रेदफाने मध्येच एक विचित्र गोष्ट केली, ज्याच्यामुळे ही सगळी योजना कोसळण्याच्या बेतात होती.

तो बगदादला परत गेल्यानंतर एक महिना झाला असेल. त्याने अचानक आपल्या घरातलं फर्निचर विकायला काढलं. त्याच्यावर लक्ष ठेवून असलेल्या योसेफकडून जेव्हा हे अमितला समजलं, तेव्हा त्याला धक्काच बसला. जर इराकी गुप्तचर संघटनांना हे समजलं आणि त्यांनी रेदफाला त्याचं कारण विचारलं तर? जवळजवळ एक वर्षापासून चालू असलेलं काम क्षणार्धात मातीमोल होईल, रेदफाला अटक होईल, देशद्रोहाच्या आरोपावरून मृत्यूदंड दिला जाईल, मोसादची मोठी बदनामी होईल – हे सगळे विचार अमितच्या मनात येऊन गेले. पण रेदफाच्या आणि मोसादच्या सुदैवाने इराकी गुप्तचर संघटनेच्या लोकांचं रेदफाकडे लक्ष गेलं नाही.

मोसादच्या योजनेनुसार रेदफाची पत्नी कॅथरीन आणि त्याची मुलं इझराईलमध्ये पोचल्यानंतर काही काळाने तो आपलं काम करणार होता. रेदफाच्या सगळ्या प्रमुख नातेवाइकांना इराकबाहेर काढल्यावर साधारण जुलै १९६६ च्या शेवटी रेदफाने आपल्या पत्नी आणि मुलांना निरोप दिला. ते बगदादहून अॅमस्टरडॅमला गेले आणि तिथून मोसाद एजंट्स त्यांना पॅरिसला घेऊन गेले. तिथे लीरॉन त्यांना भेटला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची तेल अवीवला जाणारी फ्लाईट होती. त्यामुळे त्या रात्री लीरॉनने कॅथरीनला ती आणि तिची मुलं खरोखर कुठे जाणार आहेत ते सांगितलं. तिची प्रतिक्रिया एकदम वेगळी होती. संपूर्ण रात्र ती फक्त रडत आणि मुनीर रेदफाच्या नावाने ओरडत होती त्याने देशद्रोह केलाय असं तिचं म्हणणं होतं. लीरॉनने मोसादच्या काही महिला एजंट्सना बोलावून घेतलं आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आपण इराकी राजदूताला आत्ताच्या आत्ता भेटून हे सगळं सांगू अशी धमकीही तिने दिली. तिच्या भावांना जर मुनीरने केलेला हा देशद्रोह समजला, तर ते त्याला तो असेल तिथे येऊन ठार मारतील असंही ती रडत रडत म्हणत होती.

पहाटे ती काहीशी शांत झाल्यावर लीरॉनने तिच्यासमोर वस्तुस्थिती मांडली आणि तिला नम्रपणे पण ठामपणे सांगितलं की जर तिला तिच्या पतीला परत भेटायची इच्छा असेल, तर तिला इझराईलला यायलाच पाहिजे. तिचाही निरुपाय झाला आणि ती सकाळच्या तेल अवीवच्या फ्लाईटमध्ये आपल्या मुलांबरोबर बसली.

आपली पत्नी आणि मुलं इझराईलमध्ये सुखरूप पोचल्याचं समजल्यावर रेदफाने आता त्याच्या स्वतःच्या पलायनाची तयारी सुरु केली आणि १४ ऑगस्ट १९६६ या दिवशी तो मिग २१ विमान घेऊन बगदादजवळच्या रशीद एअरफोर्स बेसवरून निघाला. पण इंजिनात झालेल्या बिघाडामुळे त्याला परतावं लागलं. इकडे त्याची वाट पाहणाऱ्या मोसादच्या लोकांची झोप उडाली.

दोनच दिवसांनी – १६ ऑगस्ट १९६६ या दिवशी सकाळी ७ वाजता मुनीर रेदफाने परत रशीद एअरफोर्स बेसवरून उड्डाण केलं. इझरेली वायुदलातल्या अगदी थोड्या अधिकाऱ्यांना याची कल्पना देण्यात आली होती. इझराईलच्या हात्झोर एअरफोर्स बेसचा कमांडर मोर्देचाई हॉड हा त्यापैकी एक होता. त्याने फक्त दोन पायलट्सना या इराकी विमानाला घेऊन यायची जबाबदारी दिली होती. बाकी सर्वांना त्याच्याकडून आदेश आल्याशिवाय काहीही करायची मनाई करण्यात आली होती. या विमानाला एखाद्या उत्साही पायलटने इझराईलच्या हवाई हद्दीचा भंग करणारं शत्रूराष्ट्राचं विमान समजून पाडू नये हा यामागचा हेतू होता.

इझरेली प्रमाणवेळेनुसार सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी, उड्डाण केल्यानंतर बरोबर ६५ मिनिटांनंतर मुनीर रेदफाचं मिग २१ विमान इझराईलच्या भूमीवर उतरलं. या ऑपरेशनच्या सुरुवातीनंतर जवळजवळ १ वर्ष आणि १९६७ च्या ६ दिवसांच्या अरब-इझराईल युद्धाच्या १० महिने आधी इझरेली वायुदलाला मिग २१ मिळालं. त्यावेळी हे विमानं सर्व सोविएत बनावटीच्या विमानांमध्ये अत्युत्कृष्ट समजलं जात होतं. अनेक अरब राष्ट्रांना रशियाने ही विमानं दिली होती. त्याच्या तोडीचं एकही विमान नाटो राष्ट्रांकडे नव्हतं – पण आता इझराईलने ती कमतरता भरून काढली होती.

मुनीर रेदफा शांत होता. तो कोणाशीही बोलत नव्हता. आपण आपल्या देशात जायचे परतीचे दोर कायमचे कापून टाकले आहेत याची जाणीव त्याला हळूहळू व्हायला लागली होती.

त्याच दिवशी संध्याकाळी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये इझरेली सैन्याने ही बातमी जाहीर केली. मुनीर रेदफासुद्धा या प्रेस कॉन्फरन्सचा एक महत्वाचा भाग होता. त्याने आपल्या भाषणात इराकमध्ये ख्रिश्चन आणि ज्यू या अन्य धर्मीय लोकांचा होत असलेला छळ आणि इराकी सरकारने कुर्द लोकांवर केलेले अत्याचार आणि बॉम्बफेक या विषयांवर विस्तृत माहिती दिली.

डॅनी शापिरा हा त्यावेळी इझरेली वायुदलाचा सर्वोत्कृष्ट टेस्ट पायलट होता. तो हे मिग चालवणारा पहिला इझरेली पायलट. रेदफाला जेव्हा तो हे विमानं चालवणार आहे हे समजलं तेव्हा तो काळजीत पडला, कारण त्याला इराकमध्ये हे विमान चालवण्याआधी रशियन पायलट्सकडून दीड महिन्यांचं प्रशिक्षण घ्यावं लागलं होतं. त्याने शापिराला सगळी उपकरणं आणि यंत्रणेची माहिती दिली. ही माहिती रशियन आणि अरेबिक अशा दोन भाषांमध्ये होती. सुदैवाने शापिराला दोन्ही भाषा येत होत्या त्यामुळे तसा प्रश्न आला नाही. रेदफाने शापिराच्या पहिल्या उड्डाणाच्या वेळी त्याच्या शेजारी बसायची इच्छा व्यक्त केली. शापिराची काहीही हरकत नव्हती.

पहिल्या उड्डाणानंतर जेव्हा दोघेही कॉकपिटच्या बाहेर पडले, तेव्हा रेदफाने स्वतःहून त्याच्याशी हात मिळवले, “तुझ्यासारखे पायलट असतील, तर अरब राष्ट्रांची वायुदलं तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत,” तो मनापासून म्हणाला.

जेव्हा इझराईलकडे असलेल्या मिग २१ बद्दल अमेरिकनांना समजलं तेव्हा त्यांनी इझरेली वायुदलाकडे त्याचा अभ्यास करायची परवानगी मागितली. रशियन बनावटीच्या सॅम २ क्षेपणास्त्रांबद्दल अमेरिकनांना असलेल्या सगळ्या माहितीच्या मोबदल्यात इझराईलने अमेरिकन वायुदलाच्या पायलट्सना मिग २१ विमानाच्या अभ्यासाची परवानगी दिली.

इझरेली वायुदलाला या मिग विमानामुळे अरब राष्ट्रांच्या वायुदलांच्या क्षमतेविषयी अचूक अंदाज बांधणं शक्य झालं. त्याचा फायदा त्यांना जून १९६७ मध्ये झालेल्या ६ दिवसांच्या युद्धात झाला. युद्धाच्या पहिल्याच दिवशी इझरेली विमानांनी इजिप्तचं जवळपास संपूर्ण आणि सीरियाचं अर्ध्याहून जास्त वायुदल उध्वस्त केलं, त्यात या मिगच्या सहाय्याने केलेल्या सरावाचा मोठा वाटा होता.

मात्र इझराईलच्या या यशाची मोठी किंमत मुनीर रेदफा आणि त्याच्या कुटुंबाला द्यायला लागली. त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या मनातली आपण मातृभूमीशी प्रतारणा केल्याची भावना कधीच कमी होऊ शकली नाही. मुनीरला इझरेली वायुदलात सन्माननीय कमिशन द्यायचा एझेर वाईझमनचा विचार होता, पण त्यानेच नकार दिला. त्याऐवजी त्याने इझराईलच्या पर्यटन आणि खाजगी विमान वाहतूक क्षेत्रात नशीब आजमावायचं ठरवलं. तेल अवीव ते सिनाई हवाई वाहतूक करणाऱ्या एका एअर टॅक्सी कंपनीमध्ये तो भागीदार म्हणून काम करायला लागला. त्याने स्वतःला इझराईलमधल्या आयुष्यात पूर्णपणे झोकून द्यायचा प्रयत्न केला, पण त्याच्या पत्नीला ते जमू शकलं नाही. ती कट्टर कॅथॉलिक असल्यामुळे ज्यू देशात राहणं तिला मानवलं नाही. ती साधी गृहिणी होती. इथे पूर्णपणे वेगळ्या वातावरणात तिला एकाकी आयुष्य जगावं लागलं आणि तिला त्यामुळे नैराश्याचे झटके यायला लागले. शेवटी आपल्याला ग्रीसमध्ये स्थायिक होण्याची परवानगी मिळावी अशी विनंती मुनीर रेदफाने इझरेली सरकारला केली. त्याच्या विनंतीला मान देऊन मोसादने त्याची ग्रीसमध्ये व्यवस्था केली. त्याच्या संरक्षणाची व्यवस्थाही मोसादने केली होती कारण इराकी गुप्तचर संघटना रेदफाच्या मागावर असतीलच याची मोसादला खात्री होती.

इझराईलमध्ये मिग २१ घेऊन आल्यानंतर २२ वर्षांनी – १९८८ मध्ये – मुनीर रेदफाचा त्याच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मायर अमित मोसादमधून निवृत्त झाल्यानंतरही रेदफा कुटुंबाच्या संपर्कात होता. त्याला कॅथरीन रेदफाने ही बातमी कळवली.

मोसाद आणि इझरेली वायुदलाने मुनीर रेदफाच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित केली. सभेत झीव्ह लीरॉन आणि डॅनी शापिरा यांच्यासारखे रेदफाबरोबर काम केलेले लोकही उपस्थित होते. त्यांना अश्रू आवरत नव्हते. एका इराकी पायलटसाठी मोसादने शोकसभा आयोजित करणं आणि अश्रू ढाळणं ही खरोखर अभूतपूर्व गोष्ट होती.

No comments:

Post a Comment